Friday, February 12, 2016

बैल ...


तू कुठेही असलास तरी
तुझ्या शिंगांच्या आकाशात
सूर्य डोलायाचा
तुझ्या डोळ्याच्या ओलाव्यात
मायेचा अबोल पारा पाझरायचा  !

तू चालत निघालास
की सगळं शिवार सावध व्हायचं
पाने फुले झाडे पक्षी सगळे अप्रूप व्हायचे
साद गळ्यातल्या घुंगरांचा
त्यांच्या पंचप्राणात घुमायचा !

तू बसून जरी राहिलास
तरी अवती भवती
निसर्ग डोलत राहायचा
तुझ्या पायाखालची माती
राकट खुरांना कवेत घ्यायची !

तू डोळे झापून राहिला
तरी महादेव तुझ्या ठायी
चित्त चुकवून लपून राहायचा
तुझ्या पाठीवरचा भार
आपल्या खांद्यावर घ्यायचा !

तू कामाला जुंपलेला असतोस तेंव्हा
तुझ्या मानेवरचे जूं
लाकडात ओझ्याचे अश्रू आणायचा
तू चाबूक अंगावर घेतोस
तेंव्हा वळ माझ्या कातडीवर केंव्हा रे उठायचा ?  !

तू करतो कष्ट तेंव्हा आम्ही खातो दोन घास
बदल्यात त्याच्या देतो तुला कष्टाचा श्वास
तुझ्या मेहनतीचे कसे फिटतील पांग
तुझ्या ऋणातून कसे होऊ उतराई. कधी तरी सांग !!

- समीर गायकवाड .