Wednesday, February 10, 2016

माघ वारी सोलापुरी !


आषाढी,कार्तिकी, माघ आणि चैत्री या मुख्य वारीव्रताच्या एकादशी आहेत. त्यातही आषाढी आणि कार्तिकीस जास्त मान आहे ; या दोन वाऱ्यांना पंढरीत वारकऱ्यांची अलोट मांदियाळी गोळा होते. विठ्ठलाच्या निवासाने पावन झालेले तीर्थक्षेत्र श्रीपंढरपूर आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं असल्याने आषाढी, कार्तिकी आणि चैत्रीस सर्व राज्यांतून येणाऱ्या वारकऱ्यांचे - भाविकांचे आदरातिथ्य करण्यात सोलापूर जिल्ह्यातील दिंड्या -भजनी मंडळे, विविध संस्था व्यग्र असतात. माघ वारीस मात्र सोलापूर शहर, जिल्हा आणि नजीकच्या परिसरातून मोठ्या संख्येने दिंड्या आणि वारकरी, भाविक पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतात...

माघ शु. एकादशीलच 'जया एकादशी' म्हणतात. भौमी एकादशी माघ शु.एकादशीला सामान्यपणे चंद्र मृगशीर्ष नक्षत्रात असतो. या दिवशी उपवास करावयाचा आणि द्वादशीच्या दिवशी षट्‌तिली व्हावयाचे असे मानले जाते. षट्‌तिलेचे प्रकार आहेत - पाण्यात तीळ घालून स्नान करणे, तीळ वाटून अंगाला लावणे, तिळाच्या आहुती देणे, तिळमिश्रित पाणी पिणे, तिलदान करणे आणि तिळ खाणे. याचे फल म्हणजे विष्णुलोकाची प्राप्ती असे मानले जाते.

पंढरीवारी व्रत पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. हे व्रत आषाढ शु. एकादशीपासून करतात. पण मुख्य वारीव्रत म्हणून आषाढ , कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यांतील शु. एकादशीस करतात. पंढरपूर हे वारकर्‍यांच्या भागवतधर्माचे अधिष्ठान व आद्य पीठ आहे. त्यामुळे आत्मोद्धार, लोकोद्धार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इ. गोष्टी या धर्मात एकत्र नांदतात.


या भक्तिधर्मात जातिधर्माचा, स्पृश्यास्पृश्य भेद मानला जात नाही व पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते. म्हणून हा वैष्णव संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. पंढरपूरचा विठोबा त्यांचे उपास्य दैवत आहे. पुंडलिकाचे भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभे आहे व चरणी भीमानदी पतितांची पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे.


दर महिन्याच्या वारीस येणार्‍यांचे नित्यनेम कार्यक्रम : दर महिन्याच्या शु. दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे कीर्तन, दिंडी, भजन वगैरे . एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात.


मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून' कालाप्रसाद ' घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते.


आषाढीस संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. गोल आणि उभे रिंगण होते. कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात असे मानले जाते. तर चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. या तीन वाऱ्यांखेरीज माघ महिन्याच्या जया एकादशीला भरते ती माघ वारी होय …


निष्ठावंत वारकर्‍यांमध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्‌गीता, काहींच्याबरोबर तुळशीवृंदावन ही असतात.


फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये ।' असे वारकर्‍याचे ब्रीद आहे. 'रामकृष्ण हरि'  हा संप्रदाय-मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरुप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाति-वित्त-कुळ यांचा प्रतिबंध नाही.


गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकर्‍यांची बोधचिन्हे होत. वारी करणार्‍यांना गुरु करुन घेऊन त्याकडून माळ घ्यावी लागते.


वारकऱ्यास माळ देताना गुरु  आपल्या शिष्याकडून काही नियम पाळ्ण्याची शपथ घेववतात. ते नियम असे मानले जातात -

(१) खरे बोलणे,
(२) परस्त्री मातेसमान मानणे,
(३) काही अपघात घडला असता भगवंताने क्षमा करावी, म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना करणे,
(४) मद्यमांसाहार आदी सेवन न करता सात्विक आहार घेणे,
(५) दर पंधरवड्यांच्या एकादशीचे व्रत करणे,
६) वर्षातून निदान एकदा तरी पंढरीची वारी करणे,
(७) नित्यनेम म्हणून दररोज 'रामकृष्णहरी' या मंत्राचा १०८ वेळा माळ ओढून जप करणे,
(८) नित्यनेमाने 'हरिपाठा'चे अंभंग म्हणणे व ज्ञानेश्‍वरीच्या काही ओव्या नियमित वाचणे आणि
(९) प्रपंचात वाट्यास आलेली नित्यकर्मे श्रीविठ्ठलस्मरणार्थ प्रामाणिकपणाने पार पाडणे.

कोणत्याही वेळी केव्हाही गळ्यातून तुळशीची माळ काढीत नाहीत. माळ तुटलीच तर दुसरी माळ घालीपर्यंत निष्ठावंत वारकरी थुंकीदेखील गिळत नाही. असे केले नाही, तर ब्रह्महत्येचे पातक मानले जाते.


मागील काही वर्षांपासून माघ वारीतही रिंगणाची प्रथा सुरु केली आहे. सोलापूर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या पार्क मैदानावर हा रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडतो …


यंदाची माघवारी १८ फेब्रुवारी २०१६ रोजी आहे. देव आणि भक्त यांच्यातल्या अलौकिक नात्याचे प्रतिक असणारा वारीचा सोहळा आता केवळ ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे, घरोघरच्या वारकऱ्यांना आता विठूचरणाची ओढ लागली आहे आणि दिंड्यांचा हरिनामाचा गजर आता घुमू लागला आहे ….


राम कृष्ण हरी ….


-  समीर गायकवाड .