Friday, January 8, 2016

शिवछत्रपती, गोवामुक्ती संग्राम अन पंडित नेहरू - एक अनोखा आलेख !

आग्र्याहून शिवबांची सुटका झाल्यानंतर स्वराज्याचे दोन मोहरे फुलादखानाच्या तावडीत सापडले होते. तर गोवा स्वतंत्र झाल्यावरही आपल्या स्वातंत्र्यलढ्यातले दोन मोहरे तब्बल ९ वर्षे पोर्तुगीज तुरुंगात खितपत पडले होते. महाराजांनी मुत्सद्देगिरी दाखवत औरंगजेबाला खलिता धाडला अन ९ महिन्यात आपले मोहरे सोडवले तर आपले दोन सेनानी सोडवायला नेहरूंना ९ वर्षे लागली होती...


आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी, आपल्या नेत्याच्या एका आदेशासाठी, आपल्या चळवळीच्या ध्येय-तत्वासाठी, आपल्या असीम राष्ट्रवादासाठी काही माणसे जीवाची बाजी लावून आपले सर्वस्व पणाला लावतात पण एकदा का चळवळीने ध्येय उद्दिष्ट गाठले की मग राज्यकर्त्यांना अशा माणसांचे यथार्थ मोल राहत नाही अन ते सन्मानाचे बुजगावणे होऊन जातात. कधीकधी तर त्याहून वाईट अवस्था येते. कारण आपण ज्याच्या सांगण्यावरून संसार उद्ध्वस्त करून प्राणाची बाजी लावतो त्यालाच आपली नंतर किंमत नसते. पण हे नेहमीच असं असते असं नाही. त्यासाठी दोन उदाहरणे इथे दिलीत. एक शिवकालीन आहे अन एक आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातले आहे !

आधी शिवकालीन घटनेचा आपण शोध घेतला की पुढच्या घटनेचा बोध आपोआप होतो...

छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा औरंगजेबाकडून आगऱ्यात नजरकैद झाले तो इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे. त्यानंतर महाराज १७ ऑगस्ट १६६६ रोजी आगऱ्याहून अगदी शिताफीने निसटले. मात्र त्यांच्या सुटकेचा खलिता औरंगजेबाकडे गेल्यावर त्यांनी या प्रकरणात सामील असणाऱ्या सर्वच जणांना जेरबंद करायचा हुकुम सोडला. मग त्यात या नजरकैदेची सूत्रे ज्याच्या हाती होती त्या फुलादखानापासून ते महाराजांचे निकटवर्तीय समजणाऱ्या कोणाचीही गय करायची नाही अशी आज्ञा त्याने फर्मावली !

इकडे महाराज आग्र्याच्या कैदेत आजारी पडले होते ते आजारपण खोटं होतं पण आग्ऱ्याहून परत आल्यानंतर मात्र महाराज खरंच आजारी पडले. अतिश्रमामुळे हे आजारपण महाराजांच्या वाट्याला आलं. पुढे जवळजवळ तीन आठवडे (सप्टेंबर १६६६ उत्तरार्ध) महाराज पडून होते. आजारी पडलेल्या महाराजांना पाहणं म्हणजे दुमिर्ळच दर्शन. महाराजांच्या अंगात ज्वर होता. पण त्याच्याबरोबर डोक्यात चिंता होती की माझा लेक अजून मथुरेहून परतलेला नाही. दुसरी चिंता त्याहून भयंकर होती. माझे दोन भाऊ औरंगजेबाच्या दाढेखाली अडकले आहेत, हाल सोसताहेत ते कसे सुटतील ? केव्हा सुटतील ? त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे हे महाराजांचे दोन वकील २० ऑगस्ट सोमवार १६६६ या दिवशी आग्रा शहरात फुलादखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले. कैद झाले. या दिवशी अमावस्या होती. हे दोन्ही वकील जणू यमदुतांच्या हाती जिवंत गवसले गेले. मग त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. त्यातील हालाचा हा एक औरंगजेबी प्रकार. या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले, कुठे गेले, कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल

या दोघांची सुटका कशी करता येईल याची चिंता महाराज करीत होते. महाराजांचे स्वत:चे आजारपण हळूहळू ओसरत गेले. याच काळात महाराज राजगडावर येऊन पोहोचल्याच्या म्हणजेच त्यांच्या आग्ऱ्याहून सुटकेच्याही खबरा साऱ्या देशभर पसरल्या. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर होता जुआव नूनिस द कुंज कोंदि द साव्हिर्सेंति. याने महाराज आग्ऱ्यात कैदेत अडकल्याचे कळल्यानंतर लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला पूर्वी एक पत्र लिहून कळविले होते की, "तो शिवाजी आग्ऱ्यास गेला असता औरंगजेबाने त्याला कैदेत डांबले आहे. तो आता कधीही सुटण्याची शक्यता नाही. औरंगजेब शिवाजीला मरेपर्यंत कैदेत ठेवील किंवा ठारच मारून टाकील." ही गोष्ट पोर्तुगीजांना आनंदाचीच वाटत होती. कारण त्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता शिवाजी राजा.

पण हे पत्र लिस्बनला पोहोचायच्या आतच महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला सुटले. ही गोष्ट या पोर्तुगीज गव्हर्नरलाही कळली. तेव्हा तो थक्कच झाला. (दु:खीही झाला) त्याने लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला यावेळी एक पत्र पाठविले आहे. त्या पत्रात साव्हिर्सेंति गव्हर्नरने लिहिले आहे की, "तो शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून मरेपर्यंत सुटण्याची शक्यता नाही असे मी पूर्वी आपणास लिहिले. परंतु तो शिवाजी अशा काही चमत्कारीकरितीने कैदेतून सुटला (आणि स्वत:च्या गडावर येऊन पोहोचलादेखील) आहे की इकडचे सारे जग आश्चर्याने थक्क झाले आहे. खरोखर हा शिवाजी म्हणजे एक विलक्षण माणूस आहे. त्याची तुलना जर करायचीच असेल तर ती अलेक्झांडर दि ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल." हा पोर्तुगीज शत्रूचा शिवाजी महाराजांच्याबद्दलचा अभिप्राय आहे.

महाराज याचवेळी म्हणजे ऑक्टोबर १६६६ मध्ये हवापालट करण्याकरिता म्हणून म्हणजेच विश्रांतीकरिता म्हणून सावंतवाडी आणि पणजी यांच्या पूवेर्ला ऐन सह्यादीच्या रांगेत एक अतिअवघड किल्ला आहे त्या किल्ल्यावर गेले. म्हणताना ते विश्रांतीकरिता जात आहेत असे म्हटले. पण प्रत्यक्षात पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून उखडून काढण्याची योजना आखण्यासाठीच या मनोहर गडावर आले होते यांत शंका नाही.

हा गड पोर्तुगीजांच्या उत्तर सरहद्दीवरती घनघोर जंगलात आहे. महाराजांची तुलना सिकंदर आणि सीझर यांच्याशी करणारा साव्हिर्सेंति हाच यावेळी पणजीस गव्हर्नर होता. या गव्हर्नरने महाराजांकडे रामाजी कोठारी याच्याबरोबर आग्ऱ्याहून (कैदेतून सुटून) सुखरूप परत आल्याबद्दल सदिच्छेचे पत्र आणि नजराणाही पाठविला. परंतु महाराज मनोहर गडावर येऊन राहिल्याचे रामाजीला समजले. त्याने मनोहर गडावर जाण्याचा प्रयत्नही केला. पण अवघड वाटा आणि घनदाट अरण्य यांमुळे त्याला या डोंगरी किल्ल्याचा मार्ग सापडला नाही. म्हणून तो पणजीस परत गेला.

महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. ते वाचण्याजोगे आहे, त्यातील मुख्य विषय असा की, 'मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.' इतकेच नव्हे तर महाराजांनी पुढे आपण युद्धबंदी देखील करण्यास तयार असल्याचे कळवले. हेतू हा की काहीही करून मुघली पाशात यातना सोसणारी आपली जिवाभावाची माणसे आपल्या मुलखात सुखरूप परत यावीत !

औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल येथे शब्द थबकतात.इथे त्या राजाच्या आपल्या जीवलगांवरील अतुट स्नेहाचे अन त्या दोघांचे आपल्या राजाप्रती, स्वराज्याप्रती प्राणाहूनही अधिक असणारे प्रेम दिसते. आपसात दृष्टादृष्ट झाल्यावर त्यांच्या मनात भावनांचे काय कल्लोळ उठले असतील ते शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे !

आता दुसरा किस्सा ..

ह्या किश्शात देखील योगायोगाने पोर्तुगीज कनेक्शन आहे ! आपला देश स्वतंत्र होण्याची प्रक्रिया सुरु असताना तत्कालीन विविध संस्थाने,राजवटी खालसा करून त्यांना देशात विलीन करण्याचे काम तेंव्हा जोमात सुरु होते. सरदार वल्लभभाई पटेलांवर ही जबाबदारी सोपवली गेली होती अन ती त्यांनी सार्थपणे निभावली होती. सर्व ५६२ संस्थाने त्यांनी काही महिन्यातच भारतात विलीन करून घेतली. मात्र गोव्याने पर्यायाने तेथील पोर्तुगीज राजवटीने गोवेनीज जनतेस स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी चौदा वर्षे तिष्टत ठेवले, झुंझत ठेवले, हाल अपेष्टेत ठेवले. मात्र स्वातंत्र्याच्या ध्येयाने पछाडलेल्या ध्येयवेड्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या लढ्याचा धगधगता अग्निकुंड तेवता ठेवला ! त्यांनी आंदोलने, चळवळी सुरु ठेवल्या अन त्यासाठी सर्वस्व पणाला लावले ! यात अनेक सामान्य लोकांचा, नेत्यांचा आणि काही तत्कालीन राजकीय नेत्यांचा समावेश होता. अशा ध्येयवेड्या लोकांपैकी एक होते मोहन रानडे आणि टेलो मास्कारेन्हस !

संपूर्ण गोव्यात विविध आंदोलनांना जोर चढला होता तेंव्हा मोहन रानडे हे गोवा मुक्ती संग्रामातील एक महत्त्वाचे नेते होते. आझाद गोमंतक दलाचे ते प्रमुख नेते होते. प्रारंभी व्यक्तिगत पातळीवर व नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात प्रवेशले. १९५५ मध्ये मोहन रानडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक ठिकाणी कस्टम्स आउटपोस्ट आणि पोलीस ठाणी यांच्यावर सशस्त्र हल्ले झाले. गुळेली कस्टम्स आउटपोस्ट, कलंगुट पोलीस स्टेशन, अस्नोडा रावणफोंड आणि हळदोणे पोलीस आउटपोस्ट यांच्यावर हल्ले झाले. बेती पोलीस स्टेशनवरच्या हल्ल्यात मोहन रानडे गोळी लागून जबर जखमी झाले. त्यांची प्रकृती थोडी सुधारताच त्यांच्यावर खटला चालवून २६ वर्षांच्या सश्रम कारावासाठी त्याना पोर्तुगालला पाठवून देण्यात आले. गोवा मुक्तीनंतर लोकानी मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यावर त्याना सोडून देण्यात आले. या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीतले तितकेच महत्वाचे नाव टेलो डी मस्कारेन्हस यांचे होते. मार्मुगोवा इथे १८९९ मध्ये जन्म झालेल्या टेलो मस्कारेन्हास यांनी १९५० ते १९५९ या काळात मुंबईहून 'Ressurge Goa' हे वृत्तपत्र चालवले होते गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतल्यामुले पोर्तुगीज सरकारने त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला भरून पोर्तुगालला पाठवून दिले.

१९५५ साली पं. नेहरूंच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकारने पोर्तुगीजानी गोवा सोडून जावे या दृष्टीने गोव्याची आर्थिक नाकेबंदी करायचं ठरवलं. पण पाकिस्तानने समुद्रमार्गे मदत करून ही नाकेबंदी परिणामशून्य केली. भारत सरकारवर गोवामुक्तीसाठी सर्व भारतीय नागरिकांकडून दबाव येऊ लागला. शेवट बळाने गोवा स्वतंत्र करायची एक योजना आखण्यात आली. तिला नाव दिलं 'ऑपरेशन विजय'. या योजनेच्या यशस्वी कार्यवाहीची जबाबदारी जन. चौधरींकडे सोपवण्यात आली. ११ डिसेंबर १९६१ पर्यंत बेळगाव, वापी आणि उना इथे अनु. गोवा, दमण आणि दीव वर हल्ले करण्यासाठी भारतीय फौजा तैनात करण्यात आल्या.

गोव्यावरच्या प्रत्यक्ष लष्करी कारवाईचं नेतृत्व मेजर जन. कॅन्डेथ यांच्याकडे होतं. पोर्तुगीजांचं लक्ष वळवण्यासाठी दक्षिणेकडून हल्ला करावा आणि मुख्य हल्ला उत्तर आणि पूर्वेकडून करावा असं ठरलं. १२ डिसेंबर १९६१ ला गोव्याला इतर भारताशी जोडणारे २ मुख्य रस्ते नागरिकांना बंद करण्यात आले. हे सैन्याच्या हालचालींसाठी केलं गेलं. १८ डिसेंबर १९६१ ला दिवस उजाडतानाच प्रत्यक्ष हल्ला करावा असं ठरलं. गोव्याच्या उत्तरेकडून २ आघाड्यांवरून हल्ला सुरू झाला.

एका पलटणीने सकाळी दोडामार्ग इथून गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीजानी वाटेतले पूल आणि बांध उद्ध्वस्त करून टाकले होते. जागोजागी सुरुंग पेरले होते, पण स्थानिक लोकांनी सुरुंग पेरलेल्या जागा बरोबर दाखवून भारतीय लष्कराला बहुमोल मदत केली. किंचितसे गोळीबाराचे आवाज ऐकताच संध्याकाळी पणजी सेक्रेटरियट (जुना आदिलशाही राजवाडा) समोरचा पोर्तुगीज ध्वज उतरवण्यात आला आणि तहाचं, शरणागतीचं पांढरं निशाण फडकवण्यात आलं. १९ डिसेंबर १९६१ ला सकाळी भारतीय सैन्याने फेरीबोटीच्या धक्क्यावर पणजीत प्रवेश केला. मे. जन. कॅन्डेथ यानी सकाळी भारताचा तिरंगा सेक्रेटरियटसमोर फडकवला.

पूर्वेकडून गोव्यात प्रवेश केलेल्या पलटणीने मडगावकडे प्रस्थान ठेवलं. भारतीय सैन्याचं स्वागत करण्यासाठी मडगावचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. वातावरण आनंदाने भरून गेलं होतं आणि उत्साहाच्या आणि राष्ट्रीय घोषणांनी भारून गेलं होतं. मार्मुगोवा (मुरगाव) भारतीय सैन्याच्या ताब्यात आलं. आदल्या दिवशी काणकोण ताब्यात घेणारी सैन्याची तुकडी दुसर्‍या दिवशी सकाळी मडगावला पोचली. त्यानी शहरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली. तसंच सगळ्या सरकारी इमारती, पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन्स इ ताब्यात घेतले. याच दिवशी दमण आणि दीव इथल्या पोर्तुगीज तुकड्यानी कोणताच लढा न देता शरणागती पत्करली. तसंच भारताच्या नौसेनेने गोव्याजवळच्या अंजदीव बेटावर कब्जा केला.

शरणागतीचे अधिकृत पत्र पोर्तुगीज गव्हर्नर जन. वासालु इ सिल्व्हा यानी मेजर के. एस. धिल्लाँ यांच्याकडे सुपूर्त केले. आणि १५६० पासून ३ तालुक्यांमधे, तर १७८१ पासून उर्वरित गोव्यात अनिर्बंधपणे चालू असलेली पोर्तुगीजांची सत्ता संपुष्टात आली. आणि १९ डिसेंबर १९६१ ला संध्याकाळी ऑपरेशन विजयची यशस्वी सांगता झाली. पुढच्याच वर्षी गोवा भारतीय संघराज्यात सामील झाले. सुरुवातीला लष्करी प्रशासकाकडे कारभार होता. नंतर निवडणुका होऊन २० डिसेंबर १९६३ रोजी लोकनियुक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. २२ जानेवारी १९६५ रोजी गोवा विधिमंडळाने हे राज्य महाराष्ट्रात विलीन करावे, असा ठराव केला होता; परंतु १६ जानेवारी १९६७ रोजी यासंदर्भात घेतलेल्या सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित राज्य असावे, असे ठरले. गोव्यात निवडणूक होऊन दयानंद बांदोडकर यांच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्ता आली.

अशा प्रकारे १९६१ पोर्तुगीजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला अन भारताचा अविभाज्य घटक झाला. स्वातंत्र्य मिळाले अन ते जल्लोषात साजरे झाले. सरकार स्थापन झाले. लोक जुन्या राजवटीला विसरून आपल्या लोकांच्या लोकशाहीच्या अमलात सुखाने राहू लागले. इथेपर्यंत सर्व आलबेल आहे परंतु जे लोक आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून, संसार मागे टाकून प्राणाची बाजी लावून गोवामुक्तीच्या आंदोलनात सामील झाले अन पकडले गेले, ज्यांना अजूनही पोर्तुगीज कारागृहात बंदिवानाचे आयुष्य जगावे लागत होते त्यांच्या सुटकेचे काय झाले ?

मोहन रानडे १९५५ पासून तर टेलो मास्कारेन्हस १९५९ पासून पोर्तुगालच्या तुरुंगात होते. त्यांच्या तुरुंगवासाला ६ वर्षे झाल्यानंतर गोवा मुक्त झाला. पण ते कधी मुक्त झाले ? आपली मायभूमी मुक्त झाल्यानंतरही तब्बल ९ वर्षे त्यांना पोर्तुगीज तुरुंगात लिस्बनला खितपत पडावे लागले ! त्यांच्या मुक्ततेसाठी लोकांनी संघर्ष समित्या स्थापन केल्या. विविध संघटना अन पक्षांनी आवाज उठवला पण तत्कालीन सरकार पोर्तुगीजांवर तितके दडपण आणण्यात कमी पडले, मुत्सद्दीगिरीत कमी पडले. लिस्बनमध्ये झिझत पडलेल्या त्या चोवीस जनांसाठी म्हणावे तितक्या नेटाने जोरकस प्रयत्न सरकारकडून न झाल्यानेच तब्बल ९ वर्षे ह्या आपल्याच भाईबंदांना तिथे कारागृहात राहावे लागले,छळ सोसावे लागले !

सरकारने प्रयत्न केले नाहीत असे नाही पण त्यात ती तगमग नव्हती जी शिवाजीराजांमध्ये आपल्या मागे कैदेत अडकलेल्या माणसांसाठी होती ! केंद्राकडून या सुटकेसाठीची इच्छाशक्ती अन दडपण यातून अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याने सर्व मार्ग चोखाळले गेले. यात तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी थेट पोपकडे मध्यस्थी केली ! हा उपायच जास्त लागू पडला असावा.आजच्या दिवशी ८ जानेवारी १९६९ मध्ये मोहन रानडे आणि त्यांच्या साथीदारांची अटकेपासून १४ वर्षांनी अन गोव्याच्या मुक्ततेनंतर ८ वर्षांनी अखेर सुटका झाली.तर टेलो मास्कारेन्हस यांची १९७० मध्ये सुटका झाली. या स्वातंत्र्यसानिकांना पुढे अनेक पुरस्कार सन्मान शासनाकडून मिळाले पण त्यांची स्वातंत्र्योत्तर व्यर्थ गेलेली ९ वर्षे कोणीही परत आणून देऊ शकले नाही....

गोवामुक्तीच्या वेळेस 'टाईम'ने आपल्या मुखपृष्ठावर पंडितजींची छबी झळकावून जे लिहिले होते तेही वाचण्याजोगे आहे, India's Jawaharlal Nehru is like a man who is simultaneously being trampled by an elephant and needled by a mosquito—and goes for the mosquito. While doing his best to ignore Communist China's latest incursions in a vast (50,000 sq. mi.), disputed area on northeastern India, Nehru declared recently that Portugal's lush, Rhode Island-sized colony of Goa on India's west coast was becoming increasingly "intolerable." Last week, for all Neutralist Nehru's past protestations that India would never use force to eject the Portuguese from the last European colony on Indian soil, his armed forces were building up on Goa's 180-mile border, and Nehru himself announced that he was "on the verge" of military intervention.

आजच्या काळात असणारी दळणवळणाची कोणतीही साधने शिवरायांच्या काळात नव्हती, आताच्या खंडप्राय भारतभूमीइतके भौगोलिक बळ अन इतक्या कोट्यावधी जनसंख्येचे पाठबळही त्यांच्याकडे नव्हते, आताच्या इतकी शस्त्रसज्जता त्यांचाकडे नव्हती. मात्र आताच्या पोर्तुगालपेक्षा विशाल अन शक्तिमान अशा मुघल सत्ताधीशाच्या तावडीतून त्यांनी केवळ नऊ महिन्यात आपली माणसे मुक्त करवून घेतली तर पंडित नेहरूंजींच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारला अनुकुल साधने- परिस्थिती असूनही अशाच कामासाठी नऊ वर्षे लागली ! विशेष म्हणजे तेंव्हा पंडितजी जागतिक पटलावर स्वतःची प्रतिमा अलिप्त राष्ट्र चळवळीच्या माध्यमातून उभी करण्याचा प्रयत्न करत होते !!

आपल्या प्रत्येक माणसाला जीव लावणारे, त्यांच्या प्रेमाची - त्यागाची जाणीव ठेवणारे ते शिवाजीराजे अन त्यांच्या एका शब्दाखातर आपला जीव ओवाळून टाकणारी ती माणसे हे सारं कसं अतुलनीय होतं ! त्यांची सर कुणाला येणार नाही हे खरेच आहे मात्र त्यांची धोरणे अन मुत्सद्देगिरी जरी आताच्या राज्यकर्त्यांनी अंगिकारली तरी देशात खरे स्वराज्य येऊ शकते !!

- समीर गायकवाड .

संदर्भ -

गोवा'ज लिबरेशन & देअरआफ्टर - सुरेश कणेकर

आमचे गोंय - भाग ७, स्वातंत्र्यलढा २ : - टीम गोवा

आग्र्यानंतरचे राजकारण - भाग ७१ : - शाहीर बाबासाहेब पुरंदरे

इंडिया इंटोलरेबल गोवा - टाईम, २२ डिसेंबर १९६१.