Tuesday, January 5, 2016

फिटे अंधाराचे जाळे - लुईस ब्रेल...सन १८१२ . फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून वीस मैल अंतरावर असलेल्या कूपर्व्हे या छोट्याशा शहरातील हद्दीलगत असणाऱ्या एका शेतकुरणाजवळच तीन वर्षाचा एक चिमुरडा आपल्या हातातील धारदार आरीने मेजावर पडलेल्या जाड टणक चामड्यावर छेद करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे वडील काही अंतरावर घराबाहेर एका परिचिताशी बोलण्यासाठी नुकतेच बाहेर जाऊन उभे राहिले होते, तेव्हढ्यात त्या मुलाने हा उद्योग आरंभला होता. त्या मुलाचे वडील एक उत्तम जीनगर होते, त्या इलाख्यात ते घोड्याचे उत्कृष्ट खोगीर बनवून देण्यासाठी प्रसिद्ध असल्याने त्यासाठीची सर्व अवजारे घरी पडून असत अन ते सतत आपल्या कामात व्यग्र असत. नुकताच कुठे चालायला शिकलेला हा चुणचुणीत देखणा चिमुरडा आपल्या कामात व्यग्र असणाऱ्या वडिलांना सतत न्याहाळत बसलेला असे, त्याला त्या कामाबद्दल अन अवजारांबाद्द्ल फारच कुतूहल असायचे !त्या कुतुहलातूनच त्याने आता वडील बाहेर गेल्याची संधी साधून त्या अवजारांवर हात चालवायची संधी साधली.त्याने आरी फिरवायला सुरु केली अन काय होतेय हे कळण्याआधीच आरीच्या छेदातून चामड्याचा एक टोकदार तुकडा उडाला अन त्याच्या डोळ्यात घुसला. तो चिमुकला किंचाळला तेंव्हा त्याचे वडील धावत त्याच्यापाशी आले अन त्यांनी त्याला तिथून बाजूला केले. त्याच्या डोळ्यातून होणारा रक्तस्त्राव पाहून ते घाबरले. एव्हाना तो चिमुरडा बेशुद्ध पडला होता. ते त्याला घेऊन नजीकच्या दवाखान्यात गेले, तिथे त्याच्यावर प्रथमोपचार अन तात्पुरती मलमपट्टी केली. दुसऱ्या दिवशी त्याला पॅरिसमधील विख्यात नेत्ररोगतज्ज्ञाकडे घेऊन गेले, त्याला तात्पुरता आराम पडला पण पुढे त्याच्या डोळ्यात जंतुसंसर्ग झाला व त्याचा डोळा निकामी झाला ! पण दुर्दैवाने तो संसर्ग दुसऱ्या डोळ्यातही पसरून त्याचा दुसरा डोळाही दोन वर्षात निकामी झाला अन वयाच्या पाचव्या वर्षी तो पूर्णतः अंध झाला ….

हिकमती अन हिंमती असलेल्या त्या मुलाने जिद्द सोडली नाही अन तो अखेरपर्यंत स्वावलंबी राहिला.त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने तो अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास त्याच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने त्याचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला त्यांनी त्याला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने त्याला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात तो मुळातच हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत तो दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे त्याला अनेक विषयात आवड निर्माण झाली.

पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) त्याला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा तो किशोर सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. त्या शाळेत व्हेलेंटीन ह्यु हे एक सेवाभावी शिक्षक होते, त्यांनी विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे आकलन व्हावे म्हणून जाड कागदावर ठसे (एम्बोस) वापरून अक्षरे - चित्रे बनवली होती. या जाड कागदांचे ते पुस्तक भले मोठे अवजड अन हाताळण्यास किचकट होते, त्यामुळे मुले काहीशी अनुत्सुक असत. व्हेलेंटीन ह्युच्या या पुस्तकांनी त्याचे मात्र लक्ष वेधून घेतले अन त्याच्या मनात अंधांसाठी काहीतरी करून दाखवण्याची बीजे इथे रोवली गेली ! त्यातूनच इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय तो या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. त्याने विज्ञान - संगीत या विषयात विशेष प्राविण्य संपादन केले. सहा वर्षात त्याने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला. इथे तो इतिहास, भूमिती अन गणित विषय शिकवू लागला !

ज्ञानार्जन करून त्याचे समाधान झाले नव्हते त्याला इतर अंध मुलांच्या वाचनासाठी सोपी लिपी तयार करावी हा विचार स्वस्थ बसू देईना. तो रात्रंदिवस त्यात व्यग्र राहू लागला. त्याने अंधांना ईश्वराने दिलेल्या स्पर्शज्ञानाचा वापर नव्या लिपीत करायचे ठरवले पण त्याचा हा लेखन-वाचन विचार तत्कालीन रूढी,संकल्पना, धर्मव्याख्या यांच्या विपरीत असल्याने त्याला कुणाची विशेष मदत याकामी झाली नाही. मात्र त्याने हार न मानता आपले काम चालूच ठेवले अन वयाच्या पंधराव्या वर्षी, १८२४ च्या एका अद्भुत दिवशी त्याने आपले स्वप्न पूर्णत्वास नेले ! 


मात्र याकामी त्याला एका लष्करी अधिकाऱ्याच्या कल्पनेचा आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वापर करता आला अन त्याचे काम सुकर झाले. चार्ल्स बार्बिआ या फ्रेंच सैनिकी अधिकाऱ्याने उठावदार टिंबे आणि रेघा यांच्या आधारे रणांगणावरील रात्रीच्या संदेश वहनासाठी एक लेखन पद्धती तयार केली होती. अंधांच्या लिपीसाठी झपाटलेल्या या तरुणाने त्याची भेट घेतली. बार्बिआने या पद्धतीच्या आधारे अंधांना वाचन करता येईल, अशी एक लिपी किंवा लेखनपद्धती (सोनोग्राफी) स्पष्ट करून सांगितली. तिचेच परिष्करण करून त्याने अंधांसाठी स्वतंत्र लिपी तयार केली. त्याने डेकापॉइंट (ठिपक्यांचे नव्या पद्धतीने सादरीकरण ) द्वारे केवळ बोटाच्या एका स्पर्शावर अक्षरे ओळखण्याची आवृत्ती समोर आणली. त्याचा वापर संगीतातील नोटेशनसाठीदेखील होऊ लागला.त्याने अनेक नकाशे, सांगीतिक खुणा, चित्रे, भूमितीय आकृत्या, पत्रे, माहितीपर पुस्तके याद्वारे निर्मिली. कालांतराने ती प्रसिद्ध देखील झाली पण तो जिवंत असेपर्यंत त्याची लिपी त्याच्या मायदेशाने देखील मान्य केली नाही व तिला अंधांसाठी स्वीकृती दिली नाही. मात्र त्याच्या मृत्यूपश्चात दोन वर्षांनी इस १८५४ मध्ये त्याच्या या लिपीला अधिकृतता मिळाली अन जगभरातल्या अंधांसाठी तिने दीपस्तंभ बनून त्यांच्या आयुष्यात ज्ञानाची कवाडे खुली केली. हा तरुण जो बालपणीच अपघाताने अंध झाला होता त्याचे नाव लुईस ब्रेल अन त्याची जगप्रसिद्ध लिपी म्हणजे ब्रेल लिपी….

लुईस ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकर्‍याची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुईस सगळ्यांचा लाडका होता. लुईसच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत.

लुईस बालपणापासूनच सतत आजारी असायचा. अपघाताने डोळे गमावल्यानन्तर शिक्षणासाठी अन पुढे ब्रेल लिपीच्या निर्मितीसाठी अन नंतर तिच्या मान्यतेसाठी त्याने आयुष्य घालवले. त्यात त्याने प्रकृतीची अक्षम्य हेळसांड केली. लिपी तयार करण्यात त्याची सगळी धनराशी खर्ची पडली, अर्थार्जन तुटपुंजे अन खर्च अफाट यामुळे तो कफल्लक झाला. त्याने दवाखाना - औषधे यावर पैसे खर्चणे टाळले . त्या निर्धनावस्थेतच फुप्फुसांचा क्षय होऊन त्याची प्रकृती ढासळली. आपला ४३ वा वाढदिवस झाल्यानंतर दोनच दिवसांनी त्याचे निधन झाले. त्याच्या हयातीत त्याच्या लिपीला मान्यता मिळाली असती तर किमान त्याचे मरण तरी सुखावह झाले असते. पण तो यात कमनशिबी ठरला.

ब्रेलचे निवासस्थान   
ब्रेलच्या मृत्यूनंतर मात्र जगाला त्याची अन त्याच्या लिपीची खरी किंमत कळाली. जानेवारी २००९ मध्ये लुईस ब्रेलची दुसरी जन्मशताब्दी जगभरात विविध कार्यक्रमातून साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने काही देशांनी ब्रेलची टपाल तिकिटे बनवली तर काही देशांनी त्याची चित्रे असणारी नाणी चलनात आणली. यात युरो देशांनी २ युरोचे, अमेरिकेने एक डॉलरचे तर भारताने देखील दोन रुपयाचे नाणे चलनात आणले. सगळीकडे लुईस ब्रेलच्या स्मृतींना वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

त्याला जगभरात गौरवले गेले. त्याचे कूपर्व्हे येथील घर ऐतिहासिक वारसा म्हणून जाहीर झाले, त्याचे रुपांतर वस्तूसंग्रहालयात करण्यात आलेय. टी. एस. एलियट हे प्रसिद्ध साहित्यिक लुईस ब्रेल बद्दल गौरवोद्गार काढताना लिहितात की, "Perhaps the most enduring honor to the memory of Louis Braille is the half-conscious honor we pay him by applying his name to the script he invented – and, in this country [England], adapting the pronunciation of his name to our own language. We honor Braille when we speak of braille. His memory has in this way a security greater than that of the memories of many men more famous in their day." ब्रिटानिया एनसायक्लोपिडियाने जगभरातील सर्वकालीन श्रेष्ठ १०० व्यक्तींच्या यादीत लुईस ब्रेलचा समावेश केला ! अशा रीतीने जगभरात लुईस ब्रेलचा अन त्यांच्या ब्रेल लिपीचा डंका वाजला गेला. पुढे अनेक अंधांचे जीवन ज्ञानकिरणांनी निरंतर उजळून निघाले…

काल लुईस ब्रेलची जयंती होती अन उद्या त्याचा स्मरणदिन आहे. अंधांच्या जीवनातले अज्ञानाचे जाळे भेदून तिथे ज्ञानाचे आकाश मोकळे करणाऱ्या या महान युगपुरुषास त्रिवार अभिवादन !!

- समीर गायकवाड .

( जाता जाता शेवटी आपल्याकडचा एक उल्लेख इथे खेदाने नमूद करावासा वाटतो, आपल्या कडे जेंव्हा लुईस ब्रेलच्या सन्मानार्थ दोन रुपयाचे नवे नाणे जेंव्हा चलनात आले तेंव्हा आपल्या काही धूर्त अन मतलबी लोकांनी सामान्य जनतेच्या घोर अज्ञानाचा फायदा घेत अशी आवई उठवली की कॉंग्रेस सरकारने इटालियन राजाचे नाणे चलनात आणले आहे, तेव्हा या नाण्यावर तत्काळ बंदी आणली पाहिजे अशा अर्थाचे मेसेज यांनी पाठवले अन त्यांच्या अंध कॉपी पेस्ट भक्तांनी त्याची कोणतीही शहानिशा न करता ते फॉरवर्ड देखील केले ! सोनियांच्या निदर्शनानुसार चालणारे हे सरकार किती नालायक आहे हे दाखवण्याच्या अतिव मोहात या लोकांनी कळत नकळत लुईस ब्रेलचा अन त्याच्या त्यागमय जीवनाचा अपमान केल्याचे साधे शल्य या लोकांच्या गावी नसावे हा प्रकार निश्चितच अत्यंत वेदनादायी होता. विशेष म्हणजे जगभरातल्या अंध व्यक्तींपैकी एक तृतीयांश अंध व्यक्ती आपल्या देशात आहेत अन त्यांच्या जीवनात ज्ञानाचे प्रकाश किरण घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा वापर अशा घृणास्पद बाबींसाठी व्हावा ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. )