Saturday, January 30, 2016

मिलियन डॉलर बेबी आणि साला खडूस....आर.माधवनचा काल रीलीज झालेला 'साला खडूस' हा सिनेमा क्लिंट ईस्टवूडच्या 'मिलियन डॉलर बेबी'ची भ्रष्ट नक्कल आहे. त्याने हा सिनेमा तमिळ भाषेत देखील बनवला आहे, तिकडचे 'भडक' पब्लिक डोक्यापुढे ठेवून दिग्दर्शक सुधा कोंगरा यांनी हा सिनेमा बनवला आहे. तर 'मिलियन डॉलर बेबी'ला २००४ साली सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्कारासह एकूण चार ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटाची निर्मिती,दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका अशी चौफेर जबाबदारी क्लिंट ईस्टवूडनी यथार्थपणे पार पाडली होती. यात ईस्टवूडसोबत हिलरी स्वाँक व मॉर्गन फ्रीमन यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
नेहमीप्रमाणे इस्टवूडचे यातले पात्र कमी बोलणारे होते. बारीक डोळ्यांमधून ब-याचशा भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची त्याचे कसब या सिनेमात उठून दिसतं. घोग-या आवाजतली त्याची पुटपुटण्याची शैली, साडेसहा फुट उंचीचा सरळसोट देह, आणि नो-नॉन्सेन्स व्यक्तीमत्व, बारीक डोळे करून ओठ किंचित दाबून बोलणारा इस्टवूड माझ्या आवडत्या कलाकारापैकी एक आहे. ईस्टवूडच्या वन ऑफ द बेस्ट मध्ये 'मिलियन....' येतो आणि माधवनने या सिनेमाची अन पात्राची वाट लावून जो सिनेमा बनवला आहे त्याची कीव येते. असो आपल्याकडे अशा प्रकारच्या चोऱ्या सहज खपून जातात...
एक दिग्दर्शक म्हणूनही ईस्टवुडची स्वतंत्र प्रतिभा आहे. वय वाढल्यामुळे आलेला काहीसा फटकळ तुसडेपणा, त्या परिपक्वपणाचाच एक परिणाम म्हणून व्यक्तिमत्त्वात रुजलेली निष्ठा आणि मूल्यांवरील श्रद्धा अलीकडे ईस्टवुडच्या बहुतेक पात्रांमध्ये पाहायला मिळते. ‘मिलियन डॉलर बेबी’मध्ये एका बॉक्सर मुलीची कहाणी आहे. पण रूढार्थानं हा बॉक्सिंगपट नव्हे. बॉक्सिंगच्या रिंगमधले बाउट्स किंवा लढतींचा वापर रूपकात्मकतेपोटी झाला असावा. सिनेमात मुख्य पात्रं तीन. प्रत्येकाची आयुष्यात स्वतंत्र लढाई. मार्गारेट ‘मॅगी’ फिट्झगेराल्ड (हिलरीस्वाँक) ही वेट्रेस आहे. फ्रँकी डुन (क्लिंट ईस्टवुड) हा बॉक्सिंग कोच आहे. उत्तम तरीही अयशस्वी कोच. एडी ‘स्क्रॅप’ डुप्रिस (मॉर्गन फ्रीमन) हा फ्रँकीचा मित्र. लॉस एंजलिसमध्ये ‘हिट पिट’ ही फ्रँकीची जिम म्हणजे हौशी बॉक्सरांना प्रोफेशनल वर्तुळात नेण्यासाठीचा कोचिंग क्लासच. एक दिवस तिथं मॅगी उगवते. तिला बॉक्सर बनायचंय. तिशी ओलांडलेल्या मॅगीमध्ये फ्रँकीला फारसं टॅलेंट दिसत नाही.
‘पोरींना बॉक्सिंग शिकवत नाही’ असं सांगून मॅगीची तो बोळवण करतो. पण मॅगी तरीही जिममध्ये मेहनत घेत राहते. एडीला (जो स्वत:ही कधी काळी बॉक्सर होताच) मात्र ती पोर वेगळी आणि टफ वाटते. अखेर एडीच्याच आग्रहाखातर फ्रँकी मॅगीला ट्रेनिंग देण्यासाठी राजी होतो. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा. ‘प्रोटेक्ट युअरसेल्फ’. स्वत:ला सांभाळा. मॅगी यशस्वी बॉक्सर बनते. लढतींमागून लढती जिंकत जाते. पण मोक्याच्या क्षणी फ्रँकीचा मोलाचा धडा विसरते. एका फाइटमध्ये विचित्र जखमी होते नि तिला कायमचं पंगुत्व येतं. तिघांच्याही दृष्टीनं खरं तर हा अतीव निराशेचा प्रसंग. पण तरीही तिघांना एकमेकांची साथ हवी आहे. कारण प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य हा प्रसंग येण्यापूर्वीपासूनच विस्कटलेलं आहे. मॅगीला तिच्या घरच्यांकडून अजिबात आधार वा माया मिळत नाही. एडीनं एका बॉक्सिंग लढतीमध्ये एक डोळा गमावलेला असतो. आणि त्या लढतीत तो बुक्क्यांमागून बुक्के खात असूनही, टॉवेल फेकायचं – थोडक्यात पांढरं निशाण दाखवण्याचं- त्याचा कोच अर्थात फ्रँकी टाळतो. आपल्या त्या
विलंबामुळेच एडीला डोळा गमवावा लागला ही सल फ्रँकीच्या मनात कायम आहे. त्याची मुलगी त्याच्याशी नेहमीच फटकून वागते. एडीला तर असं कुटुंबही नाही. एडी आणि नंतर मॅगीच्या दृष्टीनं फ्रँकी हाच तारणहार असतो. पण काही अंशी हीच भावना या दोघांच्या बाबतीत फ्रँकीचीही असते. असा हा भावनिक, निकोप, निर्वीष त्रिकोण हॉलिवुडच्या चौकटीत फारच क्वचित दिसला असेल. विश्वास आणि आधार म्हणजे काय असतं, हे या सिनेमातून फार सुरेखरीत्या मांडलेलं दिसतं.
‘अंडरप्ले’ किंवा मराठीत ज्याला संयत अभिनय म्हणतात, त्याचा विलक्षण आविष्कार या त्रयीनं सादर केलाय. वेट्रेस म्हणून
नशिबी येणारी अवहेलना घालवण्यासाठी, मानसिक आघात विसरण्यासाठी शारीरिक आघात सोसण्याची मॅगीची तयारी आहे. कष्ट आणि वेदनांना आलिंगन देण्याची तिची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक मानसिक आणि शारीरिक कणखरपणा हिलरी स्वाँक मस्त दाखवते. केवळ थंड डोळ्यांच्या माध्यमातून ‘बोलते’. तिचा निर्धार पक्का आणि अविचलित आहे. बॉक्सिंग रिंगच्या बाहेर तिला भविष्यच नव्हे, तर आयुष्यही दिसत नाही. खरं तर ही रिंगच तिला मृत्युशय्येकडे नेते, पण आपल्याला हवं ते आयुष्य अखेरीस जगलोच, याचं असीम समाधान मृत्यूकडे जाताना मिटणा-या डोळ्यांमध्येही दिसत राहतं. संवेदनशील तटस्थपणा हा मॉर्गन फ्रीमनच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग असावा. मॉर्गननं या सिनेमात नॅरेटरही आहे. मॅगी आणि फ्रँकीच्या दोलायमान मनस्थितीला आधार आणि दिशा देण्याचं काम मॉर्गन फ्रीमननं साकारलेला एडी व्यवस्थित करतो. हिलरी आणि फ्रीमन अशा दोघांनाही या भूमिकांसाठी ऑस्कर मिळाले. तर दिग्दर्शक म्हणून आणि निर्माता म्हणून क्लिंट इस्टवुड दुहेरी ऑस्करचा मानकरी ठरला.
'साला खडूस' मध्ये एका कोच आणि त्याच्या शिष्याची गोष्ट आहे. आदी तोमर या कथेचा हीरो आहे. आदी हा बॉक्सर असतो. ही भूमिका साकारली आहे अभिनेता आर. माधवनने. आदी तोमरवर त्याच्या चीफकडून अनेक आरोप करण्यात येतात. याच दरम्यान आदीची बदली हरियाणावरुन चेन्नईला केली जाते. आता आदीच्या आयुष्यात एक वेगळे ध्येय असते. तो एका
दमदार बॉक्सरचा शोधात असतो. तिथे त्याची भेट मासे विकणा-या मधीसोबत होते. ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री रितिका सिंहने. मधीला बॉक्सिंगची प्रचंड आवड असते. लहानपणापासून टीव्हीवर मोहम्मद अली यांना पाहून बॉक्सिंगबद्दल प्रचंड ज्ञान तिने मिळवले असते.ज्यांनी 'मिलियन डॉलर..' पाहिलेला आहे त्यांना हा सिनेमा आवडणार नाही मात्र ज्यांनी तो पाहिला नसेल त्यांना कदाचित आवडेल, मध्यंतरानंतर सिनेमा बराच रटाळ आहे.सिनेमाचा क्लायमॅक्स त्या मानाने ठीक आहे. मासे विक्री करणा-या तरुणीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग चॅम्पिअन बनण्याचा प्रवास आणखी चांगला दाखवता आला असता पण तितका वाईटही नाहीे. तिचा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग सामना बघताना प्रेक्षक टाळ्या वाजवतात. नेहमीप्रमाणे प्रेमकथा देखील यात घुसडण्यात आलेली आहे.
खेळाशी निगडीत विषयावर सिनेमा काढल्याबद्दल मात्र आर.माधवनचे कौतुक करायला पाहिजे, यातील निर्मितीमुल्ये आणि तांत्रिक बाजू उजव्या आहेत. अभिनयात रितिका सिंहने बाजी मारलीय. वजन बाढवून अन टफ लुक धारण करून माधवनने स्वतःची गुलछबू इमेज बदलण्याचा प्रयत्न मात्र जरा यशस्वी झाल्यासारखे वाटते. वेगळ्या विषयावरचा चित्रपट ज्यांना बघायचा असेल ते बघू शकतात, ज्यांना बॉलीवूड - हॉलीवूडचा बेसिक फरक बघायचा आहे त्यांनी 'साला खडूस' आणि 'मिलियन डॉलर बेबी' हे दोन्ही सिनेमे पाहावेत त्यातून चित्रपटातले सत्व कळेल व दोहोतला फरक आपोआप स्पष्ट होईल....आणखी एक म्हणजे राजकुमार हिरानीकडून ही अपेक्षा नव्हती...
'साला खडूस'मुळे बऱ्याच दिवसांनी क्लिंट ईस्टवूड आणि त्याचे- माझे सोनेरी दिवस आठवायची उर्मी दाटून आली, 'साला खडूस'चा माझ्यासाठी हा प्लसपॉइंट ठरला हेही काही कमी नाही .....
- समीर गायकवाड.