Thursday, January 28, 2016

आजन्म दुर्दैवाची गाथा - मधुबाला ....


गालफाडे आत गेलेला, निळ्या डोळ्याचा, गरीब घरात वाढलेला अताउल्लाखान पठाण हा मुळचा स्वाबीचा, खैबर पश्तुंख्वा ह्या परगण्यातलं पाकिस्तानातलं हे छोटेखानी शहर आहे. स्वातंत्र्य चळवळीत नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स म्हणून हा भाग ओळखला जायचा. अताउल्लाखान पोट भरण्यासाठी तिथून पेशावरला आला, तिथे त्याला इंपिरियल टोबेको कंपनीमध्ये मुकदमाची नोकरी लागली. पेशावरमध्ये राहत असताना त्याला दोन मुले झाली पण जेमतेम सहा महिनेच ही मुले जगली अन देवाघरी गेली. दोन्ही मुले अकाली वारल्यामुळे अताउल्लाचे कामातले लक्ष कमी झाले अन त्याचे पर्यवसान त्याची नोकरी गमावण्यात झाले.


नोकरी गेल्यावर तो पेशावर मधून आधी लाहोरला नोकरीच्या शोधात गेला, तिथे त्याची दाद लागली नाही. छोटी मोठी कामे करत त्याने काही वर्षे तिथे घालवली. लाहोरमध्ये जन्माला आलेली त्याची दोन मुले मात्र जगली. खाणारी तोंडे वाढली आणि कमाई कमी यामुळे तो वैतागून गेला.  अखेर १९३१ मध्ये निराश होऊन तो सरहदपार थेट दिल्लीत आला. तरुण, देखणी बायको अन सोबत दोन लहान मुले घेऊन तो वेगवेगळ्या ठिकाणी निर्वासितासारखा राहू लागला. शेवटी दिल्लीतल्या चांदणी चौकातील वेश्यावस्तीनजीक एका छोटय़ा झोपडीत त्यांनी आपल्या संसार थाटला. पडेल ते काम करू लागला अन त्याची रोजची आबाळ काहीशी मिटली.

या झोपडपट्टीत राहत असतानाच १४ फेब्रुवारी १९३३ ला त्यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. मुलगी दिल्लीत जन्मल्यामुळे त्याने तिचे नाव ठेवले मुमताज जेहां देहलवी ! कर्मठ अताउल्लाखानाला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यातली चार पाकिस्तानात तर सात भारतात असताना झाली. दिल्लीत जन्मलेल्या मुलीच्या नन्तर जन्मलेल्या त्याच्या तीन मुली आधीच्या मुलांप्रमाणे कमी वयात दगावल्या. दिल्लीतल्या झोपडपट्टीत त्याच्या दारी आलेल्या एका एका फकिराने त्याला सांगितले की त्याची ही मुलगी भविष्यात त्याला खूप नावलौकिक अन अफाट पैसा अडका मिळवून देणार आहे ! त्याच्या या बोलण्यावर भुललेला अताउल्ला १९४० मध्ये पैशाच्या भुकेने दिल्ली सोडून मुंबईला आपला बाडबिस्तरा घेऊन आला.

तेंव्हा व्हिक्टोरिया डॉकयार्ड म्हणून ओळखल्या जाणारया डॉकयार्डला लागून असलेल्या वस्तीत त्याने दोन खोल्या मिळवल्या अन तिथेच संसार थाटला. तिथे आपले बस्तान बसवल्यावर तो आपली ही देखणी मुलगी घेऊन वेगवेगळ्या स्टुडीओचे उंबरठे झिझवू लागला. अखेर त्याची मेहनत फळाला आली, अमेय चक्रवर्तीच्या 'बसंत' मध्ये मुमताज शांतीच्या मुलीची 'मंजू'ची भूमिका तिला मिळाली. इथून तिची बॉलीवूडमध्ये एन्ट्री झाली. याच दरम्यान त्या काळच्या सर्वोच्च लोकप्रिय अभिनेत्री व बॉम्बे टॉकीजच्या मालकीण असलेल्या देविका राणीनी तिला सेटवर बघितले आणि 'तुझे भविष्य उज्वल आहे, मात्र तू नाव बदल' असं सांगितले न त्यांनीच तिला नवे नावदेखील दिले !

या मुलीला सिनेमात कामं मिळायला सुरुवात झाली आणि अताउल्लाखानाला श्रीमंतीची, अय्याशीची स्वप्ने पडू लागली. त्याचे सारे लक्ष आता पोरीची कमाई कशी वाढते याकडे लागून राहिले होते. या फंदयात त्याने कामधंदे बंद केले अन आलेले पैसे खर्च करू लागला. अताउल्लाखानाला मुंबईत आल्यावर दोन अपत्ये झाली ! १४ एप्रिल १९४४ चा दिवस उजाडला, या दिवशी अताउल्ला आपले अख्खे कुटुंब घेऊन सिनेमा बघायला गेला होता आणि दुपारी चारच्या सुमारास डॉकयार्डमध्ये लोडींग होत असलेल्या फोर्ट स्टीकीन ह्या विशालकाय मालवाहू जहाजावर आग लागून महाभयंकर स्फोट झाले, जहाजावर तब्बल १४०० टन विस्फोटकं, ३१ क्रेट भरून सोन्याच्या लडी व ८७००० कापसाच्या गाठी होत्या. या सर्व सामग्रीमुळे या जहाजावरील स्फोटांमुळे अख्खी मुंबई हादरली अन तब्बल ८०० लोक मृत्युमुखी पडले ! आजबाजूच्या सगळ्या झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या. त्यात अताउल्लाखनाचे घर देखील होते. आपण सिनेमाला गेल्यामुळेच अल्लाने आपल्याला वाचवले अशी त्याची धारणा झाली अन इथून पुढे सिनेमाची 'लाईन' कधीच सोडायची नाही याचा त्याने निर्धार केला. सिनेमामुळे जीव वाचला व सिनेमामुळे पोरीला काम मिळतेय, त्यातून आपण जगतोय. असा विचार त्याच्या मनात रुजला. त्यामुळे त्याने आपल्या मुलीला मुमताजला आपले जगण्याचे साधन बनवले. मुमताज हे त्या कुटुंबाचे दुकान बनून गेली व अताउल्ला त्या दुकानाचा मालक !

आपल्या पोरीला काम मिळावे म्हणून अताउल्लाखान रात्रंदिवस स्टुडीओचे हेलपाटे घालू लागला अन त्या पायी मुमताजची फरफट होत गेली. किदार शर्माच्या गळ्यात पडून त्याने कामे मिळवली. १९४४,४५,४६ या तिन्ही वर्षी तिचे बालकलाकाराच्या भूमिकेचे चित्रपट आले. यात किदार शर्माचे दोन चित्रपट होते, त्यानेच पुढे तिला नायिकेची भूमिका दिली१९४७ मधल्या 'नीलकमल' मध्ये ! यातले  दोन सिनेमे देविकाराणी - हिमांशू रॉयच्या बॉम्बे टॉकीजने वितरित केले होते. अखेर तो दिवस उजाडला ज्याची अताउल्लाखान चातकासारखी वाट बघत होता. मुमताजला टॉपचा सिनेमा मिळाला, तोही बॉम्बे टॉकीजचा. सिनेमा होता महल, या सिनेमाने १९४९ मध्ये बॉक्स ऑफिसचा पार कचरा करून टाकला अन इथून पुढे अताउल्लाने अप्रत्यक्षरित्या मुमताजच्या आयुष्याचा कचरा केला ! 'महल'पासून मुमताजची ओळख बदलली, ती देविकाराणीने दिलेल्या नावानेच पुढे जगली. ती आता मधुबाला झाली होती! मधुबाला, भारतीय सिनेसृष्टीला पडलेले सर्वात देखणे स्वप्न, एक आरसपानी कोरीव शिल्प !

अताउल्लाखानाने माधुबालेची अक्षरशः ससेहोलपट केली. सतत धाप लागणारी, वारंवार खोकल्याची उबळ येत राहणारी, केवळ वयात येत असल्याने अंगात भरलेली मधुबाला त्याच्यासाठी नोटमशीन होती. १९४७ मध्ये तिचे पाच सिनेमे आले, १९४८ मध्ये चार तर १९४९ मध्ये तब्बल नऊ चित्रपट ! म्हणजे तीन वर्षात १३ चित्रपट त्याने तिला करायला लावले. १९४९ मध्ये तिचे वय फक्त १६ वर्षे होते. इथे आधीच्या बालकलाकाराच्या भूमिकेतील चित्रपट मोजणीत धरलेले नाहीत कारण बालकलाकाराला सिनेमात अगदी कमी फुटेज मिळते अन त्याची विशेष दखलही नसते. मात्र नायिकेच्या भूमिकेत काम करताना दोन - तीन शिफ्टमध्ये तेरा सिनेमांचे काम तीन वर्षात सोळा वर्षाच्या मुलीकडून करून घेताना अताउल्लाखानाचे काळीज जरादेखील डगमगले नाही कारण त्याला जास्तीत जास्त पैसा हवा होता. 'महल' हिट झाल्यावर त्याने कहर केला, १९५० ते ५२ या तीन वर्षात मधुबालेला त्याने पंधरा चित्रपटात काम करायला लावले. या पंधरामध्ये आणखी एक सोळावा सिनेमा फ्लोअरवर होता ज्याचे चित्रीकरण ९ वर्षे चालले, तो म्हणजे मुघले आझम ! अताउल्लाखान तिचे सर्व व्यवहार बघायचा, सावलीसारखा तिच्या मागे असायचा. निर्माते दिग्दर्शक यांच्याशी तोच बोलणी करायचा आणि ही कठपुतळीसारखी त्याच्या म्हणण्याबरहुकुम काम करायची. त्याने अधाशासारख्या मिळतील त्या प्रॉडक्शन हाऊसचे सिनेमे घेतले, मधुबालेच्या १९५० मधील 'हंसते आसू' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने चक्क ए (फक्त प्रौढांसाठी) प्रमाणपत्र दिले होते यावरून या बाबी अधिक स्पष्ट होतात. हावरट अताउल्लाने दक्षिणेकडचे टुकार सिनेमेदेखील साईन केले. त्यामुळे मधुबालेच्या मुंबई चेन्नई वाऱ्या सुरु झाल्या. 

१९५३ चा जून - जुलै महिना असेल एस.एस. वासनच्या 'बहुत दिन हुये'चे चित्रीकरण चालू होते. रतन कुमार तिचा नायक होता. शुटींग दरम्यानच्या एका दृश्यात मधुबालेच्या नाका तोंडातून रक्त आले. अताउल्लाखानाने शॉट पूर्ण करायला लावला अन तिला तो तिथल्याच दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरांनी तिच्या तपासण्या केल्या अन निदान केले, त्यांचे निदान ऐकून अताउल्लाच्या पायाखालची माती सरकली मात्र त्याच्यातल्या बापाला मायेचा पाझर फुटला नाही. डॉक्टरांनी तिला आयुष्यभर सक्त विश्रांती घ्यायला सांगितले होते, मात्र दुर्दैवाने मधुबाला अशा बापाच्या पोटी जन्माला आली होती की जो तिला सोन्याची अंडे देणारी कोंबडी समजत होता. चेन्नईमधल्या डॉक्टरांनी तिच्या हृदयाला छिद्र असल्याची माहिती अताउल्लाखानाला दिली होती ! मधुबालेच्या धाप लागण्याचे अन वारंवार खोकल्याची उबळ येण्याचे कारणही स्पष्ट झाले, तिच्या फुफ्फुसांवर ह्रदयाचा दबाव पडत असल्याने ती कमजोर झाली होती. आपल्या तरण्याबांड, देखण्या, हुशार, कुटुंबवत्सल अन कमालीच्या आज्ञाधारक मुलीच्या अशा आजाराची इतकी करुण परिस्थिती उदभवल्यावर कोणता बाप मुलीला राबवून घेईल का ? पण अताउल्लाखानाला तिची माया आली नाही.

या काळात माधुबालेची लोकप्रियता गगनाला जाऊन भिडली होती. मुंबईच्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आलेल्या फ्रांक काप्रासारख्या दिग्गज माणसाने तिच्यासाठी हॉलीवूडमध्ये मोठ्या सिनेमाची ऑफर दिली होती पण तिच्या बापाने ती तिकडे गेली तर इकडचे सिनेमे अन पर्यायाने पैसा बंद होईल या भीतीने ती ऑफर धुडकावून लावली. ऑगस्ट १९५२ च्या 'थियेटर आर्ट्स' या अमेरिकन मासिकाने तिची कव्हरस्टोरी छापली अन लिहीले - "जगातली सर्वात मोठी स्टार, मात्र ती अजूनही बेव्हर्ले हिल्स मध्ये नाहीये !" यावरून तिच्या लोकप्रियतेची पुसटशी कल्पना यावी. यामुळेच अताउल्लाखानाने तिला विश्रांती न देता तिचे 'काम' आणि आपले दुकान चालू ठेवले.

१९४४ मध्ये मधुबाला ११ वर्षाची असताना 'मुमताजमहल'च्या निमित्ताने शुटींगला गेली होती अन तिथेच 'ज्वारभाटा'चे चित्रीकरण चालू होते. २२ वर्षाच्या देखण्या दिलीपकुमारचा हा पहिला चित्रपट होता, दिलीपकुमारला कुमारवयीन मधुबालेने तिथे पहिली भुरळ पाडली. या दोघात अनेक साम्य होते, दिलीपकुमारच्या वडिलाना बारा अपत्ये होती, तेही मुळचे पेशावरचे होते अन त्याचीही मूळ भाषा पश्तूनच होती ! शिवाय दोघांच्या आवडी निवडीदेखील सारख्या होत्या. त्यांची जवळीक धूर्त आणि चाणाक्ष अताउल्लाखानाच्या नजरेतून सुटली नाही. तो बारकाईने त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. १९५० मध्ये लॉंन्च झालेला मुघलेआझम १९५३ मध्ये प्रत्यक्षात सेटवर आला, यात दिलीपकुमार मधुबाला जास्त जवळ आले. १९५६ मध्ये दिलीप कुमार - माधुबलेचा 'नया दौर' लॉंन्च झाला आणि अताउल्लाखानाच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. त्याने ओळखले की पोरीचे लग्न दिलीपबरोबर झाले तर आपले दुकान बंद होईल, ते दोघे एकमेकाच्या खूप जवळ होते अन त्यांचे प्रेमदेखील होते याची पूर्ण जाणीव असलेल्या अताउल्लाने मोठा डाव खेळला. त्याने नया दौरच्या प्रॉडक्शन हाऊस असलेल्या बीआर फिल्म्स - बीआरचोप्रांविरुद्ध न्यायालयात फिर्याद दाखल केली. याच्या सुनावणीत दिलीपकुमारने सत्याची बाजू घेत अताउल्लाच्या विरोधात आपली जबानी दिली ! इथून मधुबाला अन दिलीपकुमार यांच्यात बिनसत गेले अन ती कोसळत गेली तर अताउल्लाखान खुश झाला !

दिलीपकुमारने आपले व्यावसायिक निर्णय घेताना आपल्याशी मसलत केली पाहिजे असा आडवाटेचा मार्ग अताउल्लाने या दोघांच्या वाटेत काटे पेरताना स्वीकारला. मधुबालेकडून तिच्या बहिणीने मधुर भूषण (दिग्दर्शक ब्रीजभूषण यांची पत्नी, आधीची जाहिदा) हिने अट घातली की दिलीपसाबने तिच्या वडिलांची माफी मागावी मग सारे सुरळीत होईल पण दिलीपकुमार हे ऐकणार नाही याची पक्की खात्री असलेल्या अताउल्लाखानानेच ही अट घालायला लावली होती अन झालेही तसेच. आपल्यापेक्षा ११ वर्षाने लहान असलेल्या माधुबालेवर प्रेम करणाऱ्या दिलीपकुमारने हळूहळू तिला विसरण्याचा प्रयत्न केला, तिच्यापासून दूर गेला व १९६६ मध्ये आपल्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायराबानोबरोबर त्याने निकाह केला.१९५७ च्या 'नया दौर'पासून यांच्यातला दुरावा इतका वाढला की ते दोघे एकमेकांशी बोलेणासे झाले. मुघलेआझमचे दिग्दर्शक के. आसिफ हे दिलीप-मधुबालाची जोडी प्रेक्षकांना भावल्यामुळे आधी खूप खुश होते पण तणाव निर्माण झाला तेंव्हा त्यांनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही.

या बद्दल दिलीपकुमारनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे - "जेव्हा मुगल-ए-आझमचा प्रसिद्ध मोरपंखाचा सीन शूट होतं होता तेव्हा तर दोघांमध्ये साधं बोलणंही बंद झालं होतं. या दृश्यात शूटींग दरम्यान जेव्हा आमच्या दोघांच्या ओठांदरम्यान केवळ ते मोरपंख होतं, तेव्हा आमच्यातल्या संभाषणाचा शेवट झाला होता. एव्हढंच काय आम्ही एकमेकांना दुआ-सलामही करत नव्हतो… हे दृश्यं म्हणजे केवळ दोन पेशेवर कलाकारांचा अंदाज आणि कलेच्या प्रती समर्पणाचं प्रतीक आहे. ज्यामध्ये दोघांनी आपापले खाजगी वाद बाजूला ठेऊन दिग्दर्शकाच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं."
या सर्व वादात मधुबालेने स्वतःवर सूड उगवला. तिने संगमरवरी शिल्पाचा सीन असो वा खरोखरच्या साखळ्या घालून उभे राहणे असो तिने स्वतःच्या आजाराची परवा केली नाही अन ती झिझत गेली....

लोभी अताउल्लाखानाने प्रॉडक्शन हाऊस देखील काढून बघितले अन माधुबालेने अक्षरशः रक्ताचे पाणी करून कमावलेला पैसा त्याने वाया घालवला. ज्या किशोरकुमारला मधुबालेनेच नीट ओळखले नव्हते त्याच्याबरोबर जेंव्हा तिने लग्न करायचे ठरवले तेंव्हा त्याने वेगळा डाव खेळून बघितला. मात्र यावेळेस तो हरला. अताउल्लाखानाने किशोरकुमारला मधुबालेशी लग्न करायचे असेल तर ते इस्लामी पद्धतीने करावे लागेल अन त्याला धर्मांतर करून इस्लाम स्वीकारावा लागेल अशी अट त्याने घातली. किशोरकुमारचा अब्दुल करीम झाला अन अताउल्लाखानाचे मनसुबे धुळीस मिळाले ! इस्लामी पद्धतीने त्यांचा निकाह झाला. १९५८ ला चलती का नाम गाडी तून यांची ओळख झाली तेंव्हा हे जवळ आले, तिच्यासाठी त्याने त्याच वर्षी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. पुढे त्यांनी तिला लंडनला उपचाराला नेले. पण तोवर फार उशीर झाला होता. अताउल्लाखानाने तिला जे गुरासारखे राबवून घेतले त्याची शिक्षा तिलाच भोगावी लागणार होती...

१९६० मध्ये मुघले आझम रिलीज झाला, १९६० मध्येच तिचा निकाह झाला. एके काळी तीन वर्षात पंधरा सिनेमे करणाऱ्या मधुबालाला अखेरच्या नऊ वर्षात ( १९६० नंतर) प्रदीपकुमार बरोबरचा 'पासपोर्ट', शम्मीकपूर बरोबरचा 'बॉयफ्रेंड', देवआनंद बरोबरचा 'शराबी' अन किशोरकुमारसोबतचे 'झुमरू' व 'हाफटिकीट' असे मोजून पाच सिनेमे करता आले ! तिच्या शेवटच्या दोन वर्षात तिचा आजार इतका बळावला की तिचा आरसपानी देह गोऱ्या कायेतला अस्थिपंजर बनून गेला होता. २३ फेब्रुवारी १९६९ ला तिची या यातनांतून सुटका झाली. तिची धडधड थांबली, तिचे कष्ट थांबले, तिचा लहानपासूनचा भोग संपला, प्रेमात विदीर्ण झालेले अन जन्मतःच छिन्न असलेले तिचे ह्रदय थबकले. त्यातल्या त्यात एकच समाधानाची बाब म्हणजे ती हयात असेपर्यंत किशोरदांनी तिला कधी दुःख यातना दिल्या नाहीत, तिचे शक्य ते सर्व उपचार केले मात्र ते तिला वाचवू शकले नहीत.

प्रेम, समाधान आणि सुख यांची अनुभूती मधुबालेला कधी मिळाली का नाही हे सांगता येणार नाही मात्र ती मृगजळामागे धावणाऱ्या एखाद्या लोभस हरिणीचे आयुष्य तिच्या वाटेला आले हे नक्की. खाष्ट बापाची एक कमालीची आज्ञाधारक व कुटुंबवत्सल मुलगी, जन्मतःच दुखणे घेऊन जन्माला आलेली एक प्रेमळ मुलगी इतकेच तिचे जगणे होऊन राहिले हे मात्र खरे. तिच्या वडिलांनी तिला सार्वजनिक कार्यक्रमात कधीच सहभागी होऊ दिले नाही अन तिची शारीरिक अवस्था देखील तशी नव्हती हेही खरे आहे. त्यामुळे अनेक दंतकथा तिच्याविषयी अव्याहतपणे पसरत राहिल्या....

मधुबालेचे दुदैव इथेच संपले नाही. ते तिच्या मृत्यूपरांत तिला छळत राहिले. मधुबालेला आयुष्यात विश्रांती कसली ती मिळाली नाही, तिला चिरनिद्रा मिळावी म्हणून जुहूच्या मुस्लीम कब्रस्थानमध्ये तिला दफन केले गेले मात्र २००९ - १०च्या दरम्यान तिची कबर तोडली गेली. त्यावर तीन फुट उंचीचा मातीचा नवा थर नव्या कलेवरांच्या दफनासाठी बनवला गेला. अशा रीतीने तिला तिथेही आराम नसीब झाला नाही. आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे ज्यांच्या कबरी या मोहिमेत तोडल्या गेल्या त्यात परवीन बाबी ह्या दुसऱ्या शापित परीची देखील कबर होती........

यांच्यासाठी कुणाला दोन अश्रुंचे थेब ढाळायचे असतील,चार फुले ठेवायची असतील, सुखदुःखाचे दोन भाव व्यक्त करायचे असतील तर आता तिथे कबरीही नाहीत... दुर्दैवाची परिसीमा म्हणतात ती बहुधा हीच असावी .....

-  समीर गायकवाड.

संदर्भ :  दिलीप कुमार : द सबस्टेन्स अॅन्ड द शॅडो ; दिलीपकुमार,
आय वोन्ट टू लिव - द स्टोरी ऑफ मधुबाला ; अकबर खतीजा,
स्टार्स ऑफ द इंडियन स्क्रीन ; बी. पटेल,
मधुबाला डिफरंट स्टोरीज, फिल्मफेअर ; मधुर भूषण.

सूचना - सदर लेखावर धार्मिक, जातीय वा वैयक्तिक विद्वेष असणाऱ्या कॉमेंटस करू नयेत.

No comments:

Post a Comment