Monday, January 25, 2016

चांदण्यांचं प्रेम ...

अंधाराची कावड रात्रभर खांद्यावर घेऊन थकलेल्या चांदण्या
त्याच्या ओझ्याने वाकून जातात,लुकलुकतात. चंद्राकडे बघत जगत राहतात......
हजारो वर्षांपासून प्रतिक्षेच्या फेरयात स्वतःच्या परिघात फिरतात.
दिवस मावळला की एकेक करून त्या प्रकटतात अंधारल्या मेघांना पाठीशी घेऊन
रात्रभर तिष्टत राहतात, अरुणोदयी दमलेल्या भागलेल्या चांदण्या झोपी जातात.
त्यांची साथ सोबत करणारा चंद्रदेखील सकाळी अल्वार झोपी जातो..
सांज होताच सारे आसमंतात हजर होतात,एकमेकाच्या आणाभाका खातात.
चांदण्यांच्या विरहाने चंद्राचा शुभ्र पारा रोज अंधारात हलकेच विरत जातो,
चंद्र अंधारया रात्रीच्या साक्षीने कुढत जातो, स्वतःला झिझवत जातो..
प्रेमविव्हळ झालेला चंद्र अमावास्येला स्वतःला लपवतो, त्याच्या दुःखात चांदण्या देखील सामील होतात, स्वतःला अंधारात लपेटून घेतात ...


अंधारी रात्र ओसरली की मलूल झालेल्या चांदण्या चंद्राच्या शोधात सैरभैर होतात,
आकाश पाताळ एक करतात, लपलेल्या चंद्राला सांज होईस्तो शोधून आणतात.
हळूहळू चंद्र देखील पूर्वपदावर येऊ लागतो, धुंद चांदण्यांच्या मंद उजेडातल्या  मैफिलीत न्हाऊन निघू लागतो, त्यांच्या प्रेमकवितांना पुन्हा बहर येऊ लागतो.
प्रसन्न उत्फुल्लित चंद्र पौर्णिमेला अंधाराला देखील उजळून टाकतो.
पश्चिमेहून प्रत्येक चांदणीला खूष करत निघतो, थेट पुर्वेपर्यंत प्रत्येकीकडे जातो.
अंधाराची कावड खांद्यावर घेऊन उभ्या असणारया चांदण्या त्याच्या क्षणिक सहवासात लखलख चंदेरी तेजात चिंब होऊन जातात, लुकलुकत राहतात....
चांदण्या रात्री प्रेमाला बहर जास्त येतो असे कवी उगीच का म्हणत असतात !

- समीर.