Thursday, December 24, 2015

इस्त्राएल, मलेशिया आणि आपण .....मलेशियाच्या एका बेपत्ता विमानाचा काही ठावठिकाणा शेवट पर्यंत लागलाच नाही. जगभरातील मोठ्या देशांनी या शोध मोहिमेतून शेवटी माघार घेतली होती. बेपत्ता विमानाचे रहस्य कायमस्वरुपी रहस्यच राहू नये, अशी भीती मलेशियाला वाटत होती. सुमारे ५० देशांचे नौदल बेपत्ता विमानाचा मागच्या वर्षभरात शोध घेत होते. परंतु, त्यांना जराही यश मिळाले नाही. शेवटी हे विमान समुद्रात क्षतिग्रस्त झाल्याचे जाहीर करून त्यातील सर्व क्रू सदस्य व प्रवासी मलेशियन सरकारने मृत घोषित केले व प्रकरण संपले असे एकतर्फी जाहीर केले. पण हे झाले कसे याचे नेमके चित्र कधीच जगापुढे आले नाही.
विमानाचे अपहरण झाले तर उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मलेशियाच्या कायद्यात कोणतीही तरतुद या घटनेपर्यंत नव्हती.....

अशीच घटना इस्त्राएलमध्ये आणि आपल्याकडेही घडली होती. आपल्या दोन घटनात आपण प्रवाशांच्या सुटकेच्या मोबदल्यात कारागृहात बंद केलेले अतिरेकी मोकाट सोडले होते. हा माजोरडा हाफिज सईद त्याततलीच एक अवलाद आहे.असो. तर इस्त्राईलच्या घटनेतील शौर्याच्या अन देशप्रेमाच्या असीम भावनेचे उदाहरण इथे  द्यावेसे वाटते !


जून १९७६ मध्ये पॅलेस्टाईन दहशतवाद्यांनी एअरफ्रान्सच्या विमानाचे अपहरण केले होते. विमान तेलअवीव येथून पॅरिसला जात होते. यात २४८ प्रवासी होते. या विमानाला इस्रायलपासून चार हजार किलोमीटर दूर असलेल्या शत्रू देशात युगांडा येथील अॅंटिब विमानतळावर उतरविण्यात आले. दहशतवाद्यांसोबत युगांडाचे हुकूमशहा इदी अमीन यांचे चांगले संबंध होते.
या विमानातील इस्रायली प्रवाशांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना दहशतवाद्यांनी सोडले होते. यावेळी प्रवाशांना सुखरुप परत आणण्याचे इस्रायलसमोर तगडे आव्हान होते. इस्रायलच्या भूमिपासून तब्बल चार हजार किलोमीटर दूर शत्रू देशात विमान होते. तरीही इस्रायल डगमगले नाही. कमांडो कारवाई करून प्रवाशांची मुक्तता करण्यात आली होती. या कारवाईला ऑपरेशन अॅंटिब असे नाव देण्यात आले होते. इस्रायलने बोलणी करण्याऐवजी कारवाईचा पर्याय निवडला. यासाठी कमांडो कारवाईची तयारी करण्यात आली.
इस्रायलचे 100 कमांडो चार कार्गो विमानात बसून युगांडाला रवाना झाले. विमानात केवळ जाण्यापूरते इंधन होते. तेथून परतण्याची तयारी तेथे गेल्यावर करायची होती. युगांडाच्या हुकूमशहाला लक्झरी कारचे वेड होते. त्यामुळे त्यावरच बेतणारी योजना आखण्यात आली. कार्गो विमानातून महागड्या गाड्या रात्रीच्या सुमारास उतरविण्यात आल्या. त्यात इस्रायली कमांडो बसले आणि अपहृत विमानाच्या दिशेने जाऊ लागले.
महागड्या गाड्या बघितल्यावर युगांडाच्या लष्कराला वाटेल, की हुकूमशहा आला आहे. परंतु, ही योजना अयशस्वी झाली. दोन्ही बाजूने जोरदार फायरिंग सुरू झाली. इस्रायली कमांडोंनी तीन टीम तयार केल्या. पहिल्या टीमने प्रवाशांना वाचविले, दुसऱ्या टीमने युगांडाच्या लष्कराला प्रत्युत्तर दिले, तर तिसऱ्या टीमने परतण्याची तयारी केली. विमानतळावरून इंधन गोळा करण्यात आले. त्यानंतर विमानाने यशस्वी उड्डाण केले.
अखेर कारवाई यशस्वी झाली. केवळ एक कमांडो शहिद झाला. इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा तो मोठा भाऊ होता.

आता आपल्याकडे काय झाले होते ते पाहू ....

१९८९ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया हिच्या सुटकेसाठी भारताला पाच दहशतवाद्यांची सुटका केली होती. तर १९९९च्या २४ डिसेंबरला पाकड्या दहशतवाद्यांकडून भारताच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सुटकेसाठी वाजपेयी सरकारला मसुद अझर, ओमर शेख आणि मुश्ताक अहमद झरगर या दहशतवाद्यांना सोडावे लागले होते. अशा प्रकारे राजकीय हाराकिरी करून आपण मुत्सद्देगिरीत कमी पडून पाकड्या दहशतवाद्यांसोमार नाक रगडले होते.

१९९९ मध्ये कंदहार विमान अपहरणावेळी कमांडो पथकांकडून अचानक हल्ला करून प्रवाशांची सुटका करण्याचा भारतीय सुरक्षा संस्थांचा मनसुबा होता. मात्र, त्यावेळी दुबईतील स्थानिक प्रशासनाने साथ न दिल्यामुळे भारताचा प्रयत्न फसल्याचे दुलत यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. भारताच्यादृष्टीने नामुष्कीच्या ठरलेल्या दोन घटनांवेळी गुप्तहेर संस्थेचे प्रमुख असणारे ए. एस. दुलत १९८९ मध्ये दुलत इंटेलिजन्स ब्युरोच्या श्रीनगरमधील विभागाचे प्रमुख होते. तर कंदहार विमान अपहरणावेळी दुलत ‘रॉ’च्या प्रमुखपदी होते. दुलत यांनी ‘काश्मीर- द वाजपेयी इयर्स’ या पुस्तकात काही महत्वाचे उल्लेख केले आहेत. दुलत म्हणतात, आपल्या क्रायसिस मॅनेजमेंट ग्रुपचा (सीएमजी) कंदहार अपहरण प्रकरण हाताळताना गोंधळ उडाला होता, विमान ज्यावेळी पंजाबमध्ये होते त्यावेळी पंजाब सरकार व केंद्र सरकार काहीच करु शकले नाही, पंजाब पोलिसांचे जवान विमानतळ परिसरात होते मात्र केंद्राकडून आदेशाची प्रतिक्षा करावी लागल्याने पोलिस काहीच करु शकले नाही असे दुलत यांनी सांगितले. दुलत यांनी नेमका काय गोंधळ होता यावर सखोल भाष्य करणे मात्र टाळले आहे. कंदहार प्रकरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु होता कंदहार विमान अपहरण प्रकरणात पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा हात असल्याचेही दुलत यांनी पुस्तकात म्हटले आहे. कारण, आयएसआयच्या पाठिंब्याशिवाय अशा प्रकारच्या दहशतवादी मोहिमा पार पाडणे अशक्य असल्याचे मत दुलत यांनी व्यक्त केले आहे . कंदहार अपहरण प्रकरणात पाच दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय झाल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला चांगलेच संतापले होते, रागाच्या भरात ते राजीनामाही द्यायला तयार होते, त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना दूरध्वनी करुन आपला निषेध नोंदविल्याची आठवण दुलत यांनी लिहिली आहे.


कंदहार प्रकरणी सुरक्षा यंत्रणांनी घालवलेली अब्रू कमी पडली म्हणून की काय तपास यंत्रणांनी त्यावर कळस चढवताना आणखी अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली.    १६ वर्षांपूर्वी झालेल्या कंदहार अपहरण प्रकरणातील अतिरेक्यांना बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र उपलब्ध करून दिल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या १९ आरोपींची न्यायालयाने ओकोबर २०१२ मध्ये पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती. या निकालामुळे गुन्हे अन्वेषण विभागाला चांगलीच नाचक्की झाली होती. या प्रकरणी २००२ मध्ये एकूण २३ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर २०१० मध्ये उच्च न्यायालयाने दरडावल्यानंतर खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली होती. खटल्यादरम्यान तीन आरोपींचा मृत्यू झाला.  पोलिसांच्या दाव्यानुसार, १३ डिसेंबर १९९९ कंदहार अपहरण प्रकरणात मदत करण्याचे प्रकरण घडले होते. पाच अतिरेक्यांनी या विमानाचे अपहरण केले होते. त्यानंतर बँक चोरीप्रकरणी अटक केलेल्या  अब्दुल लतीफ आदम मोमीन पटेल याच्या चौकशीतून त्यानेच आपल्या साथीदारांच्या साथीने या अतिरेक्यांना बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले होते. जोगेश्वरी येथील त्याच्या घरातून एके-४७ रायफल आणि रॉकेट लॉन्चरही हस्तगत करण्यात आली होती. तसेच कंदाहार अपहरणासाठीच त्यांनी बँक लूटल्याचे अब्दुलने कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आरोपींवर  पटियाला येथील न्यायालयातही जेथे कंदाहारप्रकरणी मुख्य खटला सुरू आहे तेथेही बनावट पारपत्र उपलब्ध करून दिल्याप्रकरणी खटला दाखल होता. आरोपींमध्ये पारपत्र एजंट, तीन मोटर प्रशिक्षण एजंट, एक राज्य परिवहन विभाग एजंट, रबर मुद्रांक बनविणारे, सहा पारपत्र कार्यातील कारकून, दोन पोलीस हवालदार आणि दोन पोस्टमन आदींचा समावेश होता.  पोलिसांच्या दाव्यानुसार, अब्दुल या सगळ्या कटाचा मुख्य सूत्रधार होता. त्याने ‘सेव्हन ट्रॅव्हल्स’ या कंपनीला हाताशी धरून बनावट कागदपत्रांद्वारे अतिरेक्यांची पारपत्र तयार केली. त्यासाठी त्याने पाच अर्ज केले आणि दोन पारपत्रे मिळविली. कंदहार अपहरणानंतर लगेचच म्हणजे ७ जानेवारी २००० रोजी अतिरेक्यांच्या या बनावट पारपत्राप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येऊन अब्दुलसह २३ जणांना अटक करण्यात आली होती. यातील अब्दुल लतीफ यालाच काय ती जन्मठेप पतियाळाच्या सीबीआय न्यायालयाने सुनावली होती. अशा प्रकारे अब्रूचे धिंडवडे तपास यंत्रणांनी काढून आपले हसे करून घेतले होते.


बुडात दम असेल तर शत्रूला धडा शिकवता येतो अन्यथा पावटे खाऊन निषेधाच्या पिपाण्या वाजवत बसणे हे जास्त सुलभ असते अन आपण तेच करत आलो आहोत ....असो ..मी देखील १२५ कोटी पैकी एक कागदी वीर आहे याचा मला विसर पडून चालेल का ?


१९९९ मध्ये आजच्याच दिवशी ती घटना घडली होती....आपण २६/११ चा जसा इव्हेंट केला आहे तसाच याचाही एक इव्हेंट केला की आपण सगळे आपल्या जबाबदारीतून मोकळे होऊ ...बरोबर आहे ना ?


- समीर गायकवाड .