Wednesday, December 30, 2015

कथा एका लेखकाची ; रूडयार्ड किप्लिंग - नोबल ते ऑस्कर !बालवयात पाहिलेली कार्टुन्स वृद्धत्वापर्यंत मनात घर करतात, आजच्या पिढीला जसे छोटा भीम, डोरेमोनचे वेड आहे तसे एका पिढीला मोगली, मिकी माऊसचे वेड होते. मोगली हा 'जंगलबुक'चा प्राण आहे. साहित्यातील नोबेल विजेते रूड्यार्ड किप्लिंग यांनी हे पुस्तक लिहिले होते. २९ डिसेंबर १८९२ रोजी ब्रेटेलबोरो येथे किप्लिंग दांपत्याने १० डॉलरच्या भाड्यावर घेतलेल्या ब्लीस कॉटेजमधील  घरात जोसेफिन हे पहिले मुल जन्मास आले. तळघरात असलेल्या खोलीत बाळ बाळंतीण होते अन दुसऱ्या आठ फुटाच्या खोलीला ते अभ्यासिका म्हणून वापरायचे. हिवाळ्यात त्यांच्या खिडकीच्या चौकटीपर्यंत बर्फाचा थर जमा होई. दूर बर्फातले लांडगे तिथून स्पष्ट दिसत. किप्लिंग जेंव्हा भारतातील वनात फिरले होते तेंव्हाच त्यांच्या मनात लांडग्यांनी वाढवलेल्या जंगली मुलाची कथाबीजे पेरली होती. त्या कथेला इथे धुमारे फुटले ह्याला प्रमुख कारण होते ते घरात जन्माला आलेले लहान मुल, बाहेरची बर्फाळ सृष्टी अन त्या दशकातील शांत, शीतल वातावरण. तिथे त्यांनी इतर पात्रे जन्मास घातली अन निर्माण झाली एक अजरामर साहित्यकृती, 'जंगलबुक' ! कनेक्टीकट नदीच्या काठी त्यांनी जेंव्हा आपले स्वतःचे घर बांधले होते तेंव्हा त्याचे नाव 'नौलखा' असे ठेवले होते ! ब्रिटीशकालीन भारतात जन्मास येऊन इथेच बालपण-तारुण्य व्यतीत केलेल्या या लेखकाचे लेखन कसे परिपक्व होत गेले याचे उत्तर त्यांच्या इथल्या वास्तव्यात दडले आहे...

साधारण २०-२२ वर्षापूर्वी दूरदर्शनवर 'जंगलबुक' या मूळ कथेवर आधारित अतिशय लोकप्रिय मालिका सुरू होती. त्या मालिकेचे शीर्षकगीत प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे होते. या मूळ कथेचा जनक रूडयार्ड किप्लिंग -हा जन्माने भारतीय होता. रूडयार्ड किप्लिंग यांना १९०७ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. ज्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला त्या वर्षी इंग्लंडमधील अन्य लेखकांना तो पुरस्कार मिळेल अशीच शक्यता वाटत होती. स्विनबर्न, टॉमस हार्डी, रॉबर्ट ब्रिज इत्यादी लेखकांची नावे स्विडिश अकॅडमीला पाठवण्यात आली होती. किप्लिंग यांचे नाव पाठवावे अशी विचारणा पत्रातून झाली तेव्हा कुठे त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. योगायोगाने त्यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर 'किप्लिंग यांच्या साहित्यात आदर्शवादाचा मागमूस तरी आहे का?' अशी ओरड त्यांच्या विरोधकांनी केली. पण त्यात किती तथ्य होते की नाही हे कळण्यासाठी किप्लिंगचे सर्व लेखन वाचायला हवे...

किप्लिंग यांचा जन्म मुंबईत ३० डिसेंबर १८६५ रोजी झाला. त्यांचे वडील जॉन लॉकवुड किल्पिंग हे उत्तम कथा सांगणारे आणि शिल्पकार होते. ते एक चांगले चित्रकारसुद्धा होते. १८११ साली रुडयार्ड किप्लिंग यांचे 'बीस्ट ऍंड मॅन ऑफ इंडिया' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामधील चित्रे त्यांच्या वडिलांनी काढली होती. रुडयार्ड यांच्या आईचे नाव एलिस मॅकडॉनल्ड होते. ती अतिशय उत्साही आणि हसतमुख अशी स्त्री होती. रूडयार्ड यांच्या स्वभावात याचे प्रतिबिंब बघावयास मिळते. किप्लिंग यांचे मूळ नाव जोजफ रूडयार्ड असे होते.  स्टेफोर्डशायर जवळील रूडयार्ड या तलावाजवळ त्यांचे मातापिता प्रथम एकमेकांना भेटले होते व त्याची आठवण म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव रुडयार्ड ठेवले होते. किप्लिंग यांचे बालपण आणि तारूण्य भारतातच गेले. उच्चशिक्षणाकरता डिवानशायर येथे गेल्यावर किप्लिंग यांना आईची आठवत येत असे. घरापासून दूर असतांना हा सुरुवातीचा काळ त्यांना खूप त्रासदायक वाटला होता.

१८८० साली ते भारतात परत आले आणि पत्रकारितेत काम करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यादरम्यान त्यांनी अनेक लघुकथा आणि कविता लिहिल्या. भारतातील सैनिकांची स्थिती जाणून घेण्यास किप्लिंग उत्सुक होते म्हणून 'ड्यूक ऑफ कॅनॉट' भारतात आले असतांना किप्लिंग यांनी त्यांना सीमाप्रांतात राहून लेखन करण्याची परवानगी मागितली. १८८२-१८८९ या काळात किप्लिंग लाहोर, मुंबई अशा शहरात राहिले आणि त्यांनी विपुल लेखन केले. भारतातील वृत्तपत्रातून त्यांचे सर्व लेख, कथा आणि कविता प्रकाशित होत असत. किप्लिंग यांचे पहिले पुस्तक 'ए. एच. व्हीलर ऍंड कंपनी'ने काढले होते. ते किप्लिंग यांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केले आहे. किप्लिंग यांनी 'हिल्स, टु आईज ऑव्ह एशिया' हे पुस्तक लिहिले. त्यात 'डिपार्टमेंटल डिट्टीज', 'सोल्जर्स', 'थ्री' आणि 'अंडर द देवदार' अशा कितीतरी सुंदर कथा आहेत. ब्रिटिश राजवटीदरम्यानच्या भारतीय वसाहतीचे चित्रण त्यात आहे.

किप्लिंग यांनी भारताच्या संदर्भात विशेषतः सैनिकांच्या आणि त्यांच्या बायकांच्या संदर्भात जे काही लिहिले ते वाचून इंग्रजी वाचकांमध्ये खूप चर्चा होत असे. हे सगळे अतिशयोक्तीपूर्ण लेखन आहे असा त्या चर्चांचा सूर असे. ज्यांनी भारताला भेट दिली होती त्यांना त्यामधील सत्याचा पडताळा आला होता. पण इतरांच्या मनात मात्र संदेह कायमच होता. त्याकाळात राजाश्रयाविना आपण राहू शकणार नाही अशा विचारसरणीचे आणि परिणामी गुलामगिरीला मान्यता देणारे अनेक लोक भारतात होते. अशांची वर्णने किप्लिंगने केलेली आहेत. किप्लिंग यांचे लेखन त्यांच्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनावर आधारित असून ते त्यापासून वेगळे करता येत नाही, अशी टीका त्यांच्यावर नेहमी होत आली. त्याचमुळे त्यांच्यावर वर्णद्वेषाचा आरोप झाला. असे असले तरी त्यांच्या लेखनात युरोपियांव्यतिरिक्त इतरांविषयी काही चांगले संदर्भ आणि उद्गार आढळतात हे विशेष म्हणायला हवे! किप्लिंग यांच्या या विचारसरणीचे लोक आजही आपल्या देशात आढळतात हेही खरे आहे...  

१८८९ मध्ये किप्लिंग इंग्लंडला परत गेले. त्यांनी भारतातील इंग्रजी साम्राज्याच्या काळातली वर्णने अतिशय मार्मिक आणि सजीवपणे केली, म्हणून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. टीकेची पर्वा न करता किप्लिंग यांचे लेखन सुरुच राहिले. भारतीय नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या त्यांच्या ८० लघुकथा पुन्हा इंग्लंडमध्ये प्रकाशित करण्यात आल्या. एक काळ असा होता की दर महिन्याला त्यांचे कोणते ना कोणते पुस्तक प्रकाशित होत असे. त्यांच्या कविताही प्रकाशित होत राहिल्या. तीस वर्षे हा क्रम सुरू होता. त्यामुळे साहित्यजगतात किप्लिंग यांच्या पुस्तकांचा जणू पूरच आला होता. किप्लिंग यांना जे यश मिळाले तेवढे यश त्या काळात इतर कोणत्याही इंग्रजी लेखकाच्या वाट्याला आले नव्हते. भारतीय पार्श्वभूमी असलेल्या त्यांच्या साहित्यामधून अनेक हिंदी शब्दांचा वापर केलेला आढळतो. त्यामुळे भारताबाहेरच्या वाचकांना अनेक हिंदी शब्दांचा परिचय झाला. पंडित, हुक्का, बंदर, आया इत्यादी शब्द त्यांच्या लेखनात आढळतात. नंतर हे सर्व शब्द इंग्रजीत रूळले आहेत.

१८९२ च्या जानेवारीत किप्लिंग यांचा विवाह कॅरोलिनशी झाला. ती एका अमेरिकन पत्रकार; पुढे प्रकाशक झालेल्या व्यक्तीची बहीण होती. लग्नानंतर किप्लिंग सपत्नीक जपानच्या दौऱ्यावर गेले. तिथे असतांना त्यांनी ज्या बँकेत पैसे ठेवले ती बँक बुडाल्याची खबर मिळाली. त्यामुळे ते दोघे तडक इंग्लंडला परत आले. तेथे त्यांनी ४ वर्षे अतिशय सुखात काढली. त्यांना पुढील चार वर्षाच्या कालखंडात एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. 'दि डेज वर्क', 'दि सेव्हन सीज' ह्या रचना त्यांनी त्या काळात पूर्ण केल्या. जंगल बुक या अजरामर साहित्यकृतीचे लेखन त्याचवेळी केले. या सर्व पुस्तकांची युरोप आणि अमेरिकेत खूप विक्री झाली. जगातील अनेक भाषांत त्याचे अनुवादही झाले. 

त्यांची 'द नौलखा- अ स्टोरी ऑफ इस्ट ऍंड वेस्ट', 'द जंगल बुक',  'द सेकंड जंगल बुक' आणि 'कॅप्टन्स करेजियस' ही सर्व पुस्तक खूप गाजली. किप्लिंगच्या साहित्यातल्या व्यक्तिरेखांनी त्यांची सामाजिक आणि राजकीय भूमिका लोकांसमोर मांडली. 'किम' असो, 'द व्हाईट मॅन्स बर्डन' असो की गंगादिन कवितेमधला 'गंगादिन' अथवा जंगलबुक मधला 'अकेला', किप्लिंगच्या  व्यक्तिरेखा ब्रिटिश, जर्मन सत्ताधारी व्यक्तीं आणि हुकुमशाहीचे, दडपशाहीचे चित्रण करतात. ह्या व्यक्तीरेखा म्हणजे काल्पनिक पात्रे आहेत असा युक्तिवाद किप्लिंगचे समर्थक करतात; पण त्यातच किप्लिंगची खरी भूमिका दिसून येते. त्यामुळे किप्लिंगवर जे आरोप झाले त्यातले तथ्य सुद्धा ध्यानात येते.

१८९८च्या हिवाळ्यात किप्लिंग परिवार दक्षिण आफ्रिकेत सुटीनिमित्ताने गेला. मुलांना तेथील रहिवासी, हवामान आणि एकंदर वातावरण खूप आवडले होते आणि ते कित्येक वर्षे त्यांच्या मनात होते, अशी नोंद किप्लिंगने त्यांच्या 'समथिंग अबाऊट मायसेल्फ- फॉऱ माय फ्रेंडस, नोन ऍंड अननोन' या आत्मचरित्रात केला आहे. पुढे एक वर्षानंतर अमेरिकेत असतांना निमोनियाने किप्लिंगच्या मुलीचा मृत्यू झाला. स्वतः किप्लिंगसुद्धा निमोनियाने बराच काळ आजारी होते. बॉयर युद्धादरम्यान किप्लिंगनी सैन्याला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सैन्याकरता पत्रकार म्हणूनही काम केले. त्या दोन आठवड्यात त्यांनी युद्धाचे भयभीत करणारे अनुभव घेतले. टायफाईड, डिसेंट्री, आणि बराक्समधील घटनांचा ते साक्षीदार होते. मृत्यूला सामोरे जातांनाही ती मुले अतिशय आनंदी आणि उत्साही होती अशी नोंद त्यांनी आत्मचरित्रात केली आहे. पण त्या युद्धाने आलेल्या अनुभवाने किप्लिंग व्यथित झाला होते. पुढे काही काळ त्यांनी एकांतवासात घालवला. पण किप्लिंगच्या पुढील लेखनात या युद्धाचे, रशिया, ब्रिटन आणि आशियातील परस्पर संबंधांचे चित्रण अधिक ठळकपणे जाणवत राहाते.

१९०१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या 'किम'मध्ये किप्लिंगनी एका प्रवासवर्णनात अपेक्षित असणारी कष्टकरी समाजाची सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशी ऐतिहासिक स्थित्यंतरे अतिशय प्रभावीपणे रेखाटली आहेत. उत्साही, बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेली पात्रे आणि वैविध्यपूर्ण प्रसंगानी किप्लिंग वाचकाला खिळवून ठेवतात. या पुस्तकात असणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा आत्मशोध, धार्मिक ओढ , शांतता , हेरगिरी, रहस्याचा मागोवा, हिंसा आणि अध्यात्मात अपेक्षित ज्ञानप्राप्ती यात गुंफलेल्या आहेत. किम लाहोरसारख्या शहरात अनाथ म्हणून लहानाचा मोठा होतो. त्याची श्रद्धा एका तिबेटी लामावर असली तरी प्रत्यक्षात तो ब्रिटिशांचा गुप्तहेर आहे.
आयुष्याच्या या दोन टोकांना एका धाग्यात बांधण्याची किमची धडपड सुरू आहे. रहस्य आणि विविध घटनांनी भरलेले पण तरीही धार्मिकतेचा शोध घेणारे असे हे एक उत्कंठावर्धक पुस्तक आहे. ब्रिटिशकालीन भारताचे व तत्कालीन राजकीय घटनांचे चित्रण जिवंत करण्यात किप्लिंग यशस्वी झाला आहे. बौद्ध परंपरेवर आधारित एक उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक आगळा ठसा उमटवते. वाचकांना किप्लिंगचे व्यक्तिमत्त्व आणि किम यात साम्य वाटावे अशा घटना, अशी वर्णने किममध्ये आहेत. या पुस्तकावर अनेकांच्या प्रतिक्रिया वाचावयास मिळतात. त्यामध्ये कवी टी. एस. इलिएट यांना किप्लिंगच्या मनातील सुरुवातीचे आणि नंतरचे भारताचे चित्र खूप बदललेले व एकदम वेगळे वाटले. या विरोधाभासाची कल्पना सुरुवातीच्या कथा आणि किम मधील व्यक्तिरेखा यांचे वर्णन पाहिले तर सहज लक्षात येते. इलिएट म्हणतात की, 'लहान वयात किप्लिंगनी भारतावर आणि भारतीयांवर प्रेम केले. त्याचमुळे किम मधील व्यक्तिरेखांमध्ये एक सच्चेपणा आहे कारण त्यांच्यामध्ये किप्लिंगची प्रेममय जाणीव दिसते. म्हणूनच किममध्ये असणारी श्रीमंत विधवा, लामा, हरीचंदर मुखर्जी, मेह्बुब अली ही पात्रे खरीखुरी माणसे वाटावीत अशी आहेत.' तरूण वयात किप्लिंगच्या लेखनात जो उपरोध दिसतो त्यातून भारतातले ब्रिटिश, सिमला आणि दिल्लीच्या कथांची वर्णने आली आहेत.

१९१५ साली पहिल्या महायुद्धादरम्यान किप्लिंग पश्चिम आघाडीवर पत्रकार म्हणून गेले होते. त्यांनी त्या काळात 'फ्रान्स ऍट वॉर', 'द फ्रिंजेस ऑफ द फ्लीट' (१९१५) व 'सी वॉरफेअर' (१९१६) ही पुस्तके लिहिली. 'द आयरिश गार्डस इन द ग्रेट वॉर' (१९२३) या पुस्तकात त्यांनी आपल्या १८ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूबद्दल लिहिले आहे. आपल्या मुलाला आयरिश सैन्यात भरती होण्यास त्यांनी प्रवृत्त केले होते, याविषयी एक अपराधीपणाची भावना हे पुस्तक वाचतांना जाणवते. १९२२ साली त्यांनी 'द रिच्युअल ऑफ द कॉलींग ऑफ ऍन इंजिनियर' आणि 'द आयर्न रिंग सेरेमोनी' यांचे लेखन केले.

१९२६ साली त्यांचे छायाचित्र 'टाईम' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते. त्यांचा मृत्यू १९३६ साली जानेवारी महिन्यात झाला. 'पोएट्स कॉर्नर' या ठिकाणी इतर प्रसिद्ध साहित्यिकांप्रमाणे त्यांची कबर आहे. सुप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेलने किप्लिंगवरील लेखात त्यांचा उल्लेख ब्रिटीशांच्या हुकुमशाही राजवटीचा प्रेषित असा केला आहे. त्यांच्या कविता वाचून ऑरवेलला जर्मन आणि ब्रिटिश सत्ताधारी लोकांमधील संघर्षाची प्रकर्षाने आठवण झाली होती. टी. एस. एलिएट यांनी किप्लिंग यांचा उल्लेख एक उत्तम कवी म्हणून केला, 'त्यांनी कविता लिहिणे सोडू नये' अशी टिप्पणी याआधीच केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान श्री. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आवडत्या पुस्तकांमध्ये किप्लिंगच्या 'किम' या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. कारकिर्दीत आणि मृत्यूनंतरही किप्लिंग वर्णद्वेष, हुकुमशाही राजवटीचा पुरस्कार यामुळे वादाच्या भोवऱ्यात आणि प्रकाशात येत राहिले. त्यांची ही भूमिका जशी नाकारता येत नाही तसेच त्यांचे साहित्यातले स्थानही नाकारता येत नाही. मुंबईत जे. जे. स्कूलच्या आवारात त्यांचा पुतळा आहे. 'जंगल जंगल पता चला है' असे म्हणत 'मोगली' आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्या वेळी किप्लिंगचे स्मरण होते एवढे मात्र नक्की! किप्लिंग यांच्या अमरकथेवर बेतलेल्या  'जंगलबुक' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल ईफेक्टसचे २०१७ सालचे ऑस्कर मिळाले. त्या निमित्ताने जुन्या स्मृतींना तेव्हढाच उजाळा ....

- समीर गायकवाड.