Friday, December 25, 2015

'साधना'ची एक आठवण .....साधनाची एक आठवण - राजकपूरनी साधनाला रडवले होते तेंव्हा ....

वर्ष होते १९५४ चे.... तेंव्हा १५ वर्षांची साधना नुकत्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर आलेली एक देखणी नवतरुणी होती. आपल्या मासोळी डोळ्यांनी समोरच्याला घायाळ करणारी साधना तेंव्हा शालेय विद्यार्थिनी होती. ती नृत्याचे धडे गिरवायला व्यावसायिक डान्स स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला होता. सत्यनारायण नावाचे एक सहाय्यक नृत्य दिग्दर्शक आले होते. त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांच्या डान्स स्टेप्स बघितल्या आणि सांगितले की सुप्रसिद्ध अभिनेते - निर्माते राजकपूरना त्यांच्या आगामी सिनेमातील काही गाण्यांवर समूह नृत्यांसाठी काही नृत्यकुशल मुलंमुली पाहिजेत. डान्स एकेडमीच्या संचालीकांनी लगेच होकार कळवला, कारण राजजींच्या सिनेमात संधी मिळणे ही तेंव्हा कारकिर्दीची सोनेरी संधी समजली जात होती.सत्यनारायणनी तिथल्या काही मुलींना स्वतःसमोर नृत्य करायला लावले आणि त्यातील काही मुलींची अंतिम निवड केली. त्यात साधनाचा समावेश होता. आपल्या निवडीमुळे साधनाला आकाश ठेंगणे झाले. तिला सांगितले गेले की सिनेमातल्या एका संपूर्ण गाण्यातील समूह नृत्यात ती निवडली गेली आहे.

सिनेमाच्या फायनल टेकपूर्वी आधी रिहर्सल झाली. साधना तिथल्या वातावरणावर जाम खुश झाली होती. स्वप्नात पाहिलेले दिग्गज लोक समोर होते, रोलिंग कॅमेरासमोर नाचतानाचे थ्रील तिला खूपच भावले. साधना रोज रिहर्सलला जात होती, ती बिनचूक स्टेप्समध्ये नाच करून दाखवायची. बरेच दिवस हे चित्रण चालले. चित्रिकरणाच्या वेळेस चहापाणी -नाश्ता होऊन जाई अन शिवाय रोख पैसेही मिळत त्यामुळे ती आनंदी होती. एकदाचे त्या गाण्याचे चित्रीकरण संपले, साधना ज्या गाण्यात एक्स्ट्राच्या रोलमध्ये समुहात नाचली होती ते गाणे होते 'रमैया वस्तावैय्या मैने दिल तुझको दिया .....'

आता साधनाला सिनेमा प्रदर्शित होण्याच्या दिवसाचे वेध लागले होते. अखेर तो दिवस जवळ आला. त्या काळातही रिलीज आणि प्रीमियरशोच्या वेळेस मोठमोठाली होर्डींग्ज लागली होती, कारण राजजींसाठी हा सिनेमा फार महत्वाचा होता. आपण ज्या सिनेमात नाचलो तो सिनेमा प्रदर्शित होतोय याचा साधनाला फार आनंद झाला. प्रीमियरशोच्या वेळेस एक्स्ट्रा कलाकार आणि समूहनृत्यातील कलाकार व सहायक तंत्रज्ञ या लोकांना कोठेही बोलवले जात नाही, त्यामुळे साधनाने स्वतःच्या खर्चाने पदरमोड करून आपल्या सर्व मैत्रीणीना सनेमा पाहण्यास नेले. आपण पडद्यावर कसे दिसतो याची तिलाही उत्सुकता होती. सिनेमा सुरु झाला, रमैया वस्तावैया गाणंही सुरु झालं. आधी सोनेरी चमचमत्या कपड्यातलं नादिराचे नृत्य सिक्वेन्स झाले, सीन चेंज होतो आणि राजकपूर मोठ्या हॉटेलमधून बाहेर पडून वस्तीकडे येतात. तिथे गाणं सुरु असतं...गाणं सुरु झालं....सर्व कडवी संपली...गाणंही संपलं...दर कडव्याला, ओळीला साधना तिच्या मैत्रीणीना सांगायची, 'इथे मी आहे बरं का ...'.तिच्या सर्व मैत्रिणी टक लावून पडद्याकडे पहायच्या पण गाणे संपले तरी पडद्यावर साधना काही दिसलीच नाही !

सिनेमा संपला. साधना आणि तिच्या मैत्रिणी थियेटरबाहेर आल्या, तिच्या मैत्रिणीनी तिला विचारले, "तू यात कशी काय दिसली नाहीस ?'....मैत्रिणींचे प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिला काय बोलावे सुचले नाही. तिच्या डबडबलेल्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्यावर मात्र तिच्या मैत्रिणीनी तिची समजूत घातली. रडवेली झालेली साधना हिरमुसल्या चेहऱ्याने घरी गेली अन हमसून हमसून रडली. तिने घरी सर्व हकीकत सांगितली. सगळ्यांनी तिला सिनेमाचा नाद सोडून द्यायला सांगितले पण त्या रात्रीच तिने निश्चय केला की एक ना एक दिवस आपण राज कपूरजींच्या सिनेमात काम करायचेच, आपल्याला ज्यांनी रडवले त्यांच्या सिनेमात नक्की काम करायचेच !

काळ पुढे निघून गेला. साधनाने बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आणि १९६४ मध्ये साधनाचा एक सिनेमा आला, ज्याचे नाव होते 'दुल्हादुल्हन'. त्यात ती हिरॉईन होती आणि तिचे हिरो होते राजकपूर ! त्या दिवशी ती समाधानाने भरून पावली की नाही हे मला माहिती नाही, पण तिचा तो सर्वोच्च आनंदाच्या दिवसापैकीचा एक दिवस असावा हे नक्की !

श्री ४२० मधल्या गाण्याचे राजजींनी ३ सेटमध्ये शूट केले होते, त्याचेही त्यांनी एडिटिंग केले अन त्यातून साधनाचे नृत्य असलेला भाग कट झाला आणि तिच्या समूहनृत्याला कात्री लागली. स्वतः राजकपूर प्रत्येक गाण्याचे एडीटिंग चेक करत असल्याने त्यात कोणी हरकत घेण्याचा सवालच नव्हता. जे सत्यनारायण नावाचे नृत्य दिग्दर्शक साधनाला प्रथम कॅमेरयासमोर घेऊन आले होते ते तिला अमिताभच्या जंजीरच्या प्रीमियरच्या वेळेस गाठ पडले पण तेंव्हा साधनाच्या नजरेला ते नजर मिळवू शकले नाहीत...

‘लव इन शिमला’, ‘मेरे महबूब’, ‘आरज़ू’, ‘वक़्त’, ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘हम दोनों’, ‘वंदना’, ‘अमानत’, ‘उल्फ़त’, ‘बदतमीज’, ‘इश्क पर ज़ोर नहीं’, ‘परख’, ‘प्रेमपत्र’, ‘गबन’, ‘एक फूल दो माली’ आणि ‘गीता मेरा नाम’ हे साधनाचे हिट सिनेमे होते. आपल्या वेगळ्या स्टाईलने त्या काळची फर्स्ट स्टाईल दिवा झालेली साधना आज अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहे ... मनामध्ये आहेत त्या तिच्या सुंदर आठवणी... रमणीय स्मृतींच्या बनातला साधनाच्या तजेलदार आठवणीचा ठेवा पुढील काळात तिच्या आठवणीना उजाळा देतानाच जीवनात आनंदाचा शिडकावा करत राहील...

'अलविदा साधना....' असं मी तर कधी म्हणणार नाही कारण
'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा.....' असं गाणं गात ती आजही आपल्यामध्येच आहे असं मी समजतो....

- समीर गायकवाड.