Saturday, November 21, 2015

चिमणराव गुंड्याभाऊ आणि विस्मृतीचा विजनवास....एक स्मरण" आई-वडिलांचीच पोहोच जर "जलेबीबाई अन मुन्नी बदनामच्या ' पलीकडे नसेल तर मुलांना कुठून कळणार चिं.वि. जोशी म्हणजे कोण? चिमणराव कोण होता? गुंड्याभाऊचं त्याच्याशी नेमकं काय नातं होतं? इंग्रजी हे आता शिक्षणाचं अपरिहार्य माध्यम झालेलं आहे. पण मग अशा वेळी पालकांवर आपली मातृभाषा जपण्याची जबाबदारी दुपटीने नाही का वाढत ?.. जॅक ऍन्ड जिल' शिकवायला शाळा आहेच. आपण त्यांना "ये रे ये रे पावसा' का नाही शिकवू शकत?"


शाळेत असताना नवीन शालेय वर्षाची पुस्तके घरी आणली की त्या पुस्तकांना असणारा अनामिक गंध मनसोक्त हुंगून घ्यायचो, अगदीच अनोखा अन मस्त असा तो वास असायचा. आणलेल्या पुस्तकात सर्वात आधी मराठीचे पुस्तक अत्यंत उत्कंठेने उघडून बसायचो. आधी बालभारती मग कुमारभारती अन पुढे युवकभारती असं ते वाचनाचे वेड कायमचे डोक्यात राहिले ते आजतागायत टिकून आहे, याचे सर्व श्रेय त्या शालेय मराठीच्या पुस्तकांना आहे. तर हे मराठीचे पुस्तक उघडून त्यातली अनुक्रमणिका आधी वाचून त्यात कोण कोणत्या लेखकांचे धडे आहेत याची मी शहानिशा करून घेत असे. चिं.वि.जोशी, शंकर पाटील, गदिमा, व्यंकटेश माडगुळकर,खांडेकर, पुलं,द.मा.मिरासदार, भा.रा.भागवत, गोनीदा,पंढरीनाथ रेगे,कुसुमाग्रज,कानेटकर यांचा शोध मी आवर्जुन घेत असे. नवे लेखक आढळले तर त्यांचेही वाचन लगेच सुरु ! ही मराठीची पुस्तके दोनेक दिवसात वाचून पूर्ण झाल्याशिवाय मनाला शांती मिळत नसे. या सिद्धहस्त लेखकांच्या माझ्यावरील गारुडाचे सर्व श्रेय या पुस्तकांना जाते. आताची मुले मराठी पुस्तके कमी वाचतात अशी ओरड होत्येय, पण अंतर्मनाचा थोडा विचार केला तर यावर उपाय सापडेल.

ज्या ज्या लोकांनी आपली मराठी संस्कृती, आपलं मराठीपण घडवलं त्यांची केवळ माहिती असून चालणार नाही. ही लोकं आणि या लोकांचं काम हा केवळ ज्ञानाचा नसून अस्मितेचा विषय आहे. संस्कृतीचं जतन म्हणून आपण गड-किल्ले जपतो (त्यांची पण वाट लावलीच आहे आम्ही म्हणा!), मंदिरांचे जीर्णोद्धार करतो; त्याच कळकळीने पु.लं.चं लेखन, कुसुमाग्रजांची-बोरकरांची कविता, खळ्यांचं संगीत, कानेटकरांची नाटकं जपून ती पुढच्या पिढीच्या हवाली करता यायला हवीत. इंग्लंड आज आपल्यापेक्षा दसपट मॉडर्न झालंय, पण आजही तिथल्या ओल्ड वीकमध्ये शेक्‍सपियर जगवला जातो. हे जर आपण आपल्या नाटककारांबद्दल, लेखकांबद्दल, कलावंतांबद्दल नाही करू शकलो तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच.

सुरुवात आपल्या शिक्षणातून होते. त्याही आधी घरातून होते. आई-वडिलांनी पु.लं.चं एखादं पुस्तक घरात आणलं किंवा पेंडसे यांची एखादी कादंबरी संग्रही ठेवली तर मुलांना कळणार ना! आई-वडिलांचीच पोहोच जर "जलेबीबाई अन मुन्नी बदनामच्या' पलीकडे नसेल तर मुलांना कुठून कळणार चिं.वि.जोशी म्हणजे कोण ? चिमणराव कोण होता ? गुंड्याभाऊचं त्याच्याशी नेमकं काय नातं होतं ? इंग्रजी हे आता शिक्षणाचं अपरिहार्य माध्यम झालेलं आहे. पण मग अशा वेळी पालकांवर आपली मातृभाषा जपण्याची जबाबदारी दुपटीने नाही का वाढत ? "जॅक ऍन्ड जिल' शिकवायला शाळा आहेच. तुम्ही त्यांना "ये रे ये रे पावसा' का नाही शिकवू शकत ?

जे खऱ्या अर्थाने "क्‍लासिक' असतं ते टिकतं, जे नसतं ते जातं, असा वाद घालणं करंटेपणाचं आहे. "बिथोविन' नुसता टिकला नाही; तो जपला गेला, टिकवला गेला, पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला गेला. आज एखादी युरोपियन नाटक कंपनी जेव्हा शेक्‍स्पियर किंवा ब्रेख्तचं नाटक घेऊन येते तेव्हा ते त्याच पारंपरिक पद्धतीने सादर होत नाही. अनेक लोकांनी या नाटकांची मॉडर्न इंटरप्रिटेशन्स केलीयत, पण त्यात या लेखकांचा आत्मा जिवंत राहिला आहे. आपल्याकडे मध्यंतरी "रीमिक्‍स' लाट आली होती. नंतर नंतर तिचा ताप झाला. पण त्याची एक जमेची बाजूसुद्धा ही आहे, की आजच्या पिढीला त्या जुन्या मेलडीज पुन्हा ऐकायला मिळाल्या. "चुरा लिया है तुमने जो दिलको' हे आर. डी. बर्मन यांचं गाणं नसून बाली सागूचं गाणं आहे असं बऱ्याच बालकांना त्या वेळी वाटलं, ही त्याची एक "फिल्मी साइड' होती हे मात्र नक्की. आपल्याकडे सुनील बर्वेने नुकताच "हर्बेरियम' नावाचा नाटकांच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम राबवला, तोही खूप स्तुत्य आहे. त्यानंतर पुनरुज्जीवित नाटकांची लाट मराठी रंगभूमीवर आलीय. अनेकजण त्याला नाकं मुरडतात. मला या लाटेचं स्वागतच करावंसं वाटतं. नाही तर आम्ही आजचे नट कानेटकरांची समृद्ध भाषा कधी बोलणार? आणि आजचे प्रेक्षक तरी ती कधी ऐकणार?

जुने वाडे पाडून आपण टॉवर्स बांधले. आपल्याला वाटलं, आपण मॉडर्न झालो. पण नाही. आपण बेवारस झालो. असे आपण कुठे कुठे आणि किती किती बेवारस होत जाणार आहोत, या विचाराने खरंच मन बैचेन होतं. रुंद रस्ता बांधणं ही काळाची गरज असू शकते; पण त्याच्या मध्ये जर झाड येत असेल तर रस्त्याने झाडाला वळसा घालून जायला हवं. रस्ता मोठा करायला झाड पाडणं म्हणजे भूक लागली म्हणून माणूस मारण्यासारखं आहे. नव्या काळात जुने विचार, जुनं साहित्य, जुन्या कलाकृती कालबाह्य वाटू शकतात; पण त्यांची जपणूक महत्त्वाची आहे, कारण आजचं नवं त्या जुन्याच्याच पोटातून जन्माला आलेलं आहे किंबहुना बऱ्याच ठिकाणी आजचं नवं जुन्याच्याच पुण्याईवर जगतं आहे. माझ्याच क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर मला असं ठामपणे वाटतं, की प्रत्येक नाट्यनिर्मात्याने आपल्या इतर निर्मितींबरोबरच वर्षाला एक पुनरुज्जीवित नाटक आणि एक बालनाट्य अवश्‍य रंगभूमीवर आणावं. त्यातूनच जुन्याची जपणूक होईल आणि नव्याची पेरणी. हे विचार आहेत अभिनेता चिन्मय मांडलेकर यांचे, पण मी त्यांच्या विचाराशी पूर्णतः सहमत आहे.

विषय नुसता पुस्तके, नाटके यापुरता नसून दुरचित्रवाणी वरील कार्यक्रमाशी देखील निगडीत आहे. मुले काय पाहतात याकडे पालकांचेच लक्ष नसते कारण रिमोटसाठी लढाई घरात चालू असते. सर्वांनी एकत्रित पाहण्याचा क्वचितच एखादा क्षण असतो. मला आठवते दूरदर्शनवर एक मालिका होऊन गेली होती चिमणरावांची ! दूरचित्रवाणीवरची ती चिमणराव-गुंड्याभाऊमालिका खूप गाजली होती. या मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकरांनी, गुंड्याभाऊचे बाळ कर्वे यांनी, चिमणरावांच्या पत्‍नीचे (कावेरीचे-काऊचे) स्मिता पावसकर यांनी, मैना या कन्येचे काम अरुणा पुरोहित यांनी तर मोरू व राघू या पुत्रांचे काम अनुक्रमे नीरज माईणकर व गणेश मतकरी यांनी केले होते. सुषमा तेंडुलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुलभा कोरान्ने या व इतर बऱ्याच कलाकारांनी देखील या मालिकेत काम केले होते. अगदी पोट धरून हसायला लावणारया या निखळ आनंदी मालिकेच्या वेळेस अनेक वाहिन्या नव्हत्या असा कर्मदरिद्री युक्तिवाद काही ज्ञानी इसम करू शकतात, पण ही मालिका घरातील सर्वच जण म्हणजे चार वर्षाच्या गंपूपासून, त्याच्या तरुण आईबाबांपासून ते वृद्ध आजी आजोबांपर्यंत सगळेच जण एकत्र बसून या मालिकेचा आनंद घेत ! कारण ही मालिकाच  मुळात कसदार लेखनावर आधारित अन दमदार अभिनयाने सजलेली होती. आज असं लिखाण, असं सादरीकरण होत नाही का ? नक्कीच होतं, पण ते आपण दुर्लक्षित करतो. गतपिढ्यातले लेखन आपण आपल्या नव्या पिढीसमोर जोवर मांडत नाही तोवर ते त्यापासून अलिप्तच राहतील. यासाठी आपण ते लेखक अन त्यांचं ते सृजनात्मक लेखन नव्या पिढीसमोर मांडायला हवे. आज ख्यातनाम लेखक चिं.वि.जोशी यांचा स्मरणदिन आहे. पण जर आईबाबांनाच त्यांची माहिती नसेल तर पुढे आनंदच असणार आहे.
भूतकाळाच्या पडद्याआड आपली एकाहून एक श्रेष्ठ असणारी लेखक मंडळी जर विस्मृतीत जाऊ लागली तर मराठी वाचवाचा शंख करायचा नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही.

लॉरेल- हार्डी च्या धर्तीवरची जाड्या - रड्या या ढोबळ स्वरूपातील मराठी साहित्यातले दोन मानसपुत्र जोशींनी घडवले, ते म्हणजे चिमणराव अन गुंड्याभाऊ ! पूर्णतः सामान्य मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनाचा मार्मिक आलेख या कथांमधून समोर यायचा. गतकाळच्या काही पिढ्यांना या पात्रांनी रिझवले आहे, करमणूक केली आहे, एक विरंगुळा त्यांनी मिळवून दिला आहे. मराठी साहित्यविश्वात आपल्या लेखनाद्वारे, नर्मविनोदी शैलीद्वारे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारया चिं.वि.जोशींचा वाचकवर्ग सर्व वयोगटातील होता ! त्यांचं आजच्या स्मरणदिनाच्या अनुषंगाने केलेलं हे स्मरण
 
सर्वसामान्य वाचकांना समजेल, रुचेल अशा स्वरूपाचं हलकंफुलकं विनोदी लेखन करून मराठी साहित्यात विनोदाची नवी परंपरा निर्माण करणारे विनोदकार, विनोदी कथाकार म्हणून चिंतामण विनायक ऊर्फ चि. वि. जोशी परिचित आहेत. चिंतामणराव कोल्हटकर, आणि राम गणेश गडकरी यांच्या परंपरेत शोभून दिसणारा कोटीबाज विनोद, मानवी स्वभावातली विसंगती सूक्ष्मपणे हेरण्याची वृत्ती, सोपी भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात हरघडी दिसेल अशी हास्यास्पदता सहजरीतीने दाखवून देण्याची हातोटी यामुळे जोशी यांचा विनोद वेगळा ठरला. तत्कालीन महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय समाज व संस्कृती यांच्या मार्मिक निरीक्षणातून निर्माण झालेल्या अस्सल विनोदाची देणगी चिं. वि. जोशी यांनी मराठी साहित्याला दिली. त्यांचा मानसपुत्र 'चिमणराव' हा मराठी साहित्यात अमर झाला आहे. पाली भाषेचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांचा लौकिक होता. मराठी, हिंदी, पाली भाषांसोबतच चिं. वि. जोशी यांचं गुजराती भाषेवरही प्रभुत्व होतं.

जोशींचा  जन्म पुण्यातला. त्यांचं दुसरीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण हुजूरपागेतील प्रॅक्टीसिंग स्कूलमध्ये झालं. त्यानंतर तिसरीपासून मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी नूतन मराठी विद्यालयात पूर्ण केलं. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी १९१३ साली तत्त्वज्ञानाची पदवी संपादन केली. दोन वर्षांनंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पाली व इंग्रजी साहित्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर लगेच त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, नेटिव्ह इन्स्टिट्युशन आणि सेंट जॉन्स स्कूल या तीन शाळांत पाली भाषा शिकवण्याचं काम केलं. पुढे अमरावती आणि मग रत्नागिरी इथेही त्यांनी शिक्षक म्हणून काही काळ काम केलं. १९२० साली बडोदा संस्थानातील एका महाविद्यालयात त्यांची पाली, इंग्रजी आणि मराठीचे अध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांची इतिहास संशोधनातील गती लक्षात घेऊन बडोदा संस्थानच्या पुरातत्त्व खात्याचे संचालक म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. निवृत्तीपर्यंत ते बडोद्यातच वास्तव्याला होते. त्यानंतर ते पुन्हा पुण्यात स्थायिक झाले.

जोशींची ओळख मराठी साहित्यविश्वात विनोदी साहित्यिक अशी असली तरी त्यांनी इतर अनेक विषयांवर लेखन केलं. त्यांनी चरित्रं लिहिली, मुलांसाठी पुस्तकं लिहिली, ऐतिहासिक संशोधनात्मक लिखाण केलं. पाली भाषेवरील त्यांचं संशोधनात्मक काम आजही अभ्यासलं जातं. जोशी यांच्या इतक्या विविध विषयांत संचार करण्याला बऱ्याच प्रमाणात त्यांचे वडील कारणीभूत होते. त्यांचे वडील म्हणजे 'सुधारक' या पत्राचे संपादक विनायक रामचंद्र जोशी. या पत्रावर पुण्यातल्या तेव्हाच्या सनातनी लोकांचा रोष असला, तरी सुधारकी विचारांच्या विद्वानांचा पाठिंबाही होता. त्यावेळी दिग्गज मंडळी 'सुधारक'च्या कार्यालयात जमून सामाजिक प्रश्नांवर अभ्यासू चर्चा करायची. त्यांच्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी चिं. वि. जोशी यांना मिळायची. या चर्चांचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांच्या लिखाणातून ते पुढे उमटत गेले.

चिं. वि. जोशी यांच्या साहित्यिक लिखाणाला प्रारंभ वा. गो. आपटे यांच्या 'आनंद' मासिकातील कथेने झाला. यात त्यांनी विनोदी कथांसोबतच 'काकूंचे देव' यासारख्या भावनात्मक कथाही लिहिल्या. भोळेपणाचा आव आणून साळसूदपणे दुसऱ्याला बारीक चिमटे घेण्याची जोशी यांची कला 'विविधवृत्त' वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या पत्रांमधूनही आढळते. विनोदी लेख वा कथा लिहिणारे जोशी गंभीर मुद्द्यांवरील मतप्रदर्शनासाठीही प्रसिद्ध होते. तत्कालीन सामाजिक समस्यांवरील त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध आहेत. फाशीच्या शिक्षेच्या अनिष्टतेबद्दल मासिक 'मनोरंजन'मध्ये आणि अस्पृश्यतेबद्दल 'उद्यान' या मासिकात लेख लिहून त्यांनी त्याविरुद्ध लोकांना विचारप्रवृत्त केलं होतं. 'पूना मेल' या दैनिकात त्यांनी हिंदू-मुसलमान सौहार्दावरही काही लेख लिहिले होते.

पाली भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या जोशी यांचा प्राचीन बुद्धधर्म व तत्कालीन समाजाचाही अभ्यास होता. त्यावर आधारित त्यांनी केलेलं लेखन आजही संशोधकांना मार्गदर्शनपर ठरतं. त्यांनी 'मॅन्युअल ऑफ पाली', 'जातकातील निवडक गोष्टी', 'शाक्यमुनी गौतम', 'बुद्ध संप्रदाय व शिकवण', 'अडीच हजार वर्षांपूर्वीचा समाज', 'इंग्रजी शिष्टाचार', 'संशयाचे जाळे' इत्यादी पुस्तकं त्यांच्या संशोधनपर अभ्यासाची ओळख पटवून देतात.

जोशी यांच्या सर्वच लेखनामागे त्यांची जागरूक निरीक्षणवृत्ती दिसते. त्यांचं बरचंसं लिखाण प्रत्यक्ष घटना व लोकांवरील उपहासात्मक प्रकारचं लिखाण आहे. तो काळ, ते प्रसंग, त्या जागा, लोकांचे स्वभाव, वागण्या-बोलण्याच्या लकबी हेरून ते कथाप्रसंग खुलवायचे. त्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अतिशयोक्तीचा वापर व बौद्धिक कोटीबाजपणा करणं टाळलं. सामान्य लोकांच्या स्वभावातील विसंगतीवर हलत-खेळत ताशेरे ओढण्याकडे त्यांचा जास्त कल होता. त्यांचा विनोद गडाबडा लोळायला लावत नाही तर तो खुसखुशीत आहे. एकीकडे तो हसवणारा तर दुसरीकडे तो डोळे पाणावणाराही आहे. वाचक त्याच्याशी सहजपणे जुळवून घेतात. जोशी यांनी विनोदासाठी अश्लीलतेचाही आधार कधीच घेतला नाही. मुळातच त्यांचा अशा गोष्टींना विरोध आणि मनात तिटकारा होता.

चिं. वि. जोशी यांनी सुमारे८० वर्षांपूर्वी लिहिलेले चिमणरावाचे चराट हे पुस्तक आजही वाचकाला मनमुराद हसवते. मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, पापभिरू माणसाच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रसंगांमधून विनोद फुलात जातो. चिं. वि. जोशी सांगतात, त्याप्रमाणे चिमणराव हा कोणी बुद्धिमान किंवा तऱ्हेवाईक माणूस नाही. तो सामान्य मराठी पुरुषापेक्षाही अधिक अजागळ किंवा भोळाही नाही. ‘ ‘टीकाकार आणि न्हावी,’ ‘माझा मुंबईचा प्रवास,’ ‘विमा एजंटास चकविणे,’ ‘लग्नसराई,’ ‘यू. किडवे, आ. सी. एस.,’ ,माझे दत्तक वडील,’ ‘वरसंशोधन,’ ‘माझा सेकंड क्लासने प्रवास,’ ‘अखेर लग्न जमले!,’ ‘गुलाब,’ ‘बोळवण,’ ‘पहारा,’ ‘रावसाहेब चिमणराव,’स्टेट-गेस्ट,’ ‘कॅप्टन चिमणराव-स्काऊटमास्तरया कथांतून चिमणरावाची लहान लहान साह्सेही अनुभवायला मिळतात.

चि. वि. जोशी अर्थातच प्रचंड नावाजले गेले ते त्यांच्या चिमणरावांसाठी. मराठी साहित्यातील एक अफलातून व्यक्तिरेखा म्हणून चिमणराव प्रसिद्ध आहे. त्यावर आधारित चित्रपट आणि दूरदर्शन मालिका यांनी मराठी माणसांच्या मनात घरं केलं. 'चिमणराव' 'गुंड्याभाऊ' या आपल्या मानसपुत्र जोडगोळीच्या माध्यमातून त्यांनी मध्यमवर्गीय माणसाचं जगणं, त्याची स्वप्नं, त्याच्या आयुष्यातील सुख-दुःखं, त्याच्या मर्यादा यांचं चित्रण केलं. चिमणराव व जोशी यांच्याबद्दल बोलताना द. मा. मिरासदार सांगतात, ''चिं. वि. जोशी यांच्या विनोदात शाब्दिक कोट्या कमी आढळतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे स्वभावनिष्ठ विनोद. त्याचे अनेक हास्यकारक नमुने आहेत. पण त्याचबरोबर ते मूळ अनुभवातली विसंगती आणि हास्यकारकता शोधतात आणि विनोदाची निर्मिती करतात. त्यांचा चिमणराव हा स्वतःमधीलच विसंगती प्रकट करतो आणि स्वतःलाच हास्याचा विषय बनवतो. त्यांचा विनोद जीवनातील वास्तवतेपासून दूर जात नाही. स्वतःलाच हास्याचा विषय बनवणं, हा अत्यंत श्रेष्ठ सुसंस्कृत विनोदाचा नमुना म्हटला पाहिजे.''

गेली काही दशके चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव आणि गुंड्याभाऊच्या जोडीने वाचकांना मनमुराद हसवले आहे. मध्यमवर्गीय, सरळमार्गी चिमणरावाचा खळाळत्या स्वच्छ झऱ्यासारखा निर्मळ विनोद कसा होता, हे नव्या पिढीनेही जाणून घ्यायला हवे.

चिमणरावाच्या या पुस्तकामुळे शाब्दिक, प्रसंगनिष्ठ विनोदाचा आदर्श असलेले लेखन जुन्या - नव्या पिढीला वाचता येणार आहे. ह्याही कलावंताच्या सान्निध्यात, मी आपल्या पत्नीशी का भांडतो?, करावाचून करमणूक, हवालदाराचा जॉकी कसा झाला, वरपित्याचा घोटाळा, स्थूल विरुद्ध कृश अशा एकूण १५ कथा पुस्तकात वाचायला मिळतात. या कथांतून चिमणरावांच्या दुनियेतील सगळी पात्रे जिवंत होऊन समोर येतात. आणि दिवस प्रसन्न होतो.

जोशी यांचा विनोदाचा बाज वाचकांनाही भावलेला आहे. त्याची साक्ष म्हणजे आजही त्यांच्या पुस्तकांना वाचकांची मागणी आहे. त्यांच्या विनोदाला काळाची मर्यादा नव्हती हे याने सिद्ध होतं. 'चिमणरावाचे चऱ्हाट', 'आणखी चिमणराव', 'तिसऱ्यांदा चिमणराव', 'चौथे चिमणराव', 'गुंड्याभाऊ', 'मोरू आणि मैना', 'विनोद चिंतामणी', 'वायफळाचा मळा', 'एरंडाचे गुऱ्हाळ', 'ओसाडवाडीचे देव', 'ना मारो पिचकारी', 'घरबशे पळपुटे', 'पाल्हाळ', 'मेषपात्रे', 'रहाटगाडगे', 'लंकावैभव', 'हापूस पायरी', 'संचार', 'बोरीबाभळी', 'स्टेशनमास्तर', 'आरसा', 'आमचा पण गाव', 'सोळा आणे' इत्यादी पुस्तकं त्यांच्या खुमासदार विनोदाचा बाज सांगणारी आहेत.

चिमणरावाची भूमिका साकारणारे दिलीप प्रभावळकर याविषयी सांगतात की,"दूरदर्शनची पहिली मालिका म्हणजे "चिमणराव गुंड्याभाऊ'. ही मालिका महिन्यातून एकदाच प्रसारित होत असे. त्यासाठी आम्ही तालमी करायचो, यावर आता कोणाचाही विश्‍वास बसणार नाही. दूरदर्शनवरचे आम्ही पहिले "सुपरस्टार' होतो...अगदी अमराठी लोकांमध्येसुद्धा!" ..." कारण तेव्हा त्यांना पर्यायच नव्हता, एकच दूरदर्शन होतं, आम्हाला कसलीच स्पर्धा नव्हती... ते इतकं साधंसोपं नसावं.. तसं असतं तर 'पर्याय नाही' म्हणून तेव्हाचे सगळेच कार्यक्रम 'फेमस' झालं असतं.ह्या चिमणरावाने मला फार प्रसिद्धी दिली. उदाहरण द्यायचं झालं, तर सरकारी कामं! माझी सरकारी कामं फार सोपी झाली. नोकरी सोडून नाटकात कायमस्वरूपी उडी घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा भविष्यनिर्वाह निधी घेण्याची वेळ आली.... सरकारी कामाचा अनुभव असलेल्यांना विचारा, किती त्रास असतो !......'एका तासात काम झालं.' कारण, चिमणराव! "माझ्याबरोबर नुसतं असं हात वर करून सगळ्यांना 'नमस्कार नमस्कार' म्हणा.." म्हणून त्या कार्यालयातुन फिरवलं गेलं, पण तासाभरात! तासाभरात काम झालं. कारण, चिमणराव ! पण ह्या चिमणरावानं मला खुप मनस्तापदेखील दिला. म्हणजे, ही भूमिका एवढी गाजली, की त्यापुढे कित्येकदा 'ही भूमिका थोडी चिमणरावासारखी आहे. बोलवा प्रभावळकरांना !' असं होऊ लागलं, ज्यानं मला प्रचंड मनस्ताप झाला. राग येऊ लागला. पण नंतर इतर काही भूमिका मिळाल्या ज्यांचं कौतुक केलं गेलं आणि हळूहळू हा शिक्का हलका होत गेला. "
" थोडंसं चिमणरावांबद्दल सांगतो.., 'चिमणराव. ह्यांचं घरी कोणीच ऐकत नाही. मुलं तर अजिबातच! मुलं म्हणजे मोरू, मैना... पत्नी काऊ. म्हणजे नाव कावेरी, पण प्रेमाने 'काऊ.' गुंड्याभाऊ म्हणजे चुलतभाऊ."  एका प्रसंगात 'चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात'..ह्या प्रसंगात चिमणराव आपल्या मुलाबाळांसमोर ज्ञानेश्वरी पठण करतात. पण त्यांच्या वाह्यात मुलांनी, चिमणरावांनी नवी आणलेली ज्ञानेश्वरी 'मी आधी बघणार, मी आधी' करत त्यातली काही पानं फाटून गेल्यावर तिथं रहस्यकथेच्या पुस्तकातील काही पानं चिकटवली आहेत' हे त्यांना माहीत नसतं. अशी ही ज्ञानेश्वरी मुलाबाळांसमोर, आई, गुंड्याभाऊ, आणि काऊ अशा सर्वांसमोर वाचताना झालेली चिमणरावांची त्रेधा प्रत्यक्ष पाहण्यासारखीच आहे...
.या भूमिकेत डोक्याचा गोटा आवश्यक होता पण हा गोटा खरा गोटा नव्हता, गांधींच्या भूमिकेच्या वेळेसारखा. हा विग होता, ज्यावर 'घेरा' शिवला जात असे... आणि मग चालु व्हायचे चिमणराव... सकाळी साडेआठला चालु झालेलं हे काम, संध्याकाळी साडेपाचला संपुन जाई, पण मग माझी विचित्र अवस्था होत असे. म्हणजे 'खरा मी कोण?' दिवसभर इथे वावरत होता तो 'चिमणराव?' जो आता दिलीप प्रभावळकरांचा मुखवटा घालून जगात फिरणार आहे?' इतका त्याचा प्रभाव पडत होता... "

शेवटी एक चिमणरावाचा एक उतारा ...

मी साळूला विचारले,"हे बघ साळू, तुझ्या माहितीतली सगळ्यांत जुनी लढाई कोणती?"

"राम-रावणांची किंवा कौरव-पांडवांची असेल. त्यांतल्या त्यात राम-रावणांची अगोदरची असेल; कारण कौरव-पांडवांच्या युद्धात कृष्ण हजर होता आणि कृष्णावतार रामावताराच्या नंतर झाला." साळू एखाद्या विद्वानाचा आव आणून म्हणाली.

"दॅट्स ए गुड गर्ल! राम आणि रावण यांचं युद्ध सीतेच्या योगानं लागलं. रावणानं सीतेला पळवून नेलं. तिला परत आणण्यासाठी रावणाशी युद्ध करणं रामाला भाग पडलं. रामाला रावणाची लंका जिंकायची नव्हती, किंवा रावणाच्या मनात रामाची अयोध्या घ्यायची नव्हती. रामाच्या काळात लोकसंख्येच्या मानानं जमीन भरपूर होती, म्हणून जमिनीच्या मालकीकरता हा तंटा उपस्थित झाला नव्हता. एका स्त्रीच्या स्वामित्वासाठी हे युद्ध सुरू झालं." मी म्हणालो.

"उगीच काहीच्या काही कल्पना पोरीच्या डोक्यात भरवून देऊ नको. त्या वेळी जमिनी मुबलक होत्या नि बायकांचा तुटवडा पडला होता असं का तुझं म्हणणं आहे? रावणाच्या अंतःपुरात शेकडो स्त्रिया होत्या, एका सीतेची उणीव त्याला भासली असेल असं मला शक्य वाटत नाही." घैसासमामा मध्येच म्हणाले.

मी भयंकर रागावलो आणि म्हणालो,"मामा, मघाशीच मी तुम्हाला बजावलं की माझ्या बोलण्यात तोंड घालू नका म्हणून. आता पुन्हा बोलाल तर हे जाड पुस्तक तुमच्या डोक्यावर येऊन आदळल्याशिवाय राहणार नाही. ग्रीस देशातील ट्रायची लढाई अशीच हेलन नावाच्या सुंदर तरूण स्त्रीकरिता झाली होती. आपल्या इकडे चितोडच्या पद्मिनीसाठी घनघोर युद्ध झालं होतं. सारांश, स्त्रिया जरी संख्येने कमी नसल्या तरी त्यांत सुंदर स्त्रियांची संख्या फारच कमी असते आणि त्यांचा ताबा मिळवण्याकरिता पुरूष आपापसात झगडतात."

आमचे मामा सुधारक असल्याने नेहमी स्त्रियांची कड घेतात. ते म्हणाले,"स्त्रियांत सुंदर स्त्री क्वचितच असते म्हणजे पुरूष तेवढे मदनाचे पुतळे अन् बायका सगळ्या कुब्जा असं तुझं म्हणणं आहे की काय?" मामांनी आक्षेप घेतला आणि आमच्या बोलण्यात तोंड घातल्याबद्दल त्यांच्या डोक्यावर ज्ञानकोशाची प्रत आदळून मी आपली प्रतिज्ञा पुरी केली. कर्णार्जुन युद्धातल्या शरविनिमयाप्रमाणे मामांनी ज्ञानकोशाचा 'तपून ते धमन्या' विभाग माझ्या अंगावर उलटा फेकला.

मामाने पुस्तक फेकून मारले म्हणून भाच्याला रागावण्याचा अधिकार पोचत नाही, या कारणाने तिकडे दुर्लक्ष करून मी साळूला म्हणालो," साळू, आपण आपलं काम करू या. रामरावणाचं युद्ध स्त्रीकरिता झालं असलं तरी त्यानंतरचं कौरवपांडवांचं युद्ध स्त्रीकरिता झालं नसून जमिनीकरिता झालं असं दिसतं; कारण कृष्णाबरोबर युधिष्ठिराने प्रतिपक्षाला काय निरोप दिला ते सांगशील काय साळू?"

"होऽऽऽ! आम्हांला निदान पाच गाव तरी द्या, म्हणजे आम्ही सुखानं आपला निर्वाह करू, पण दुर्योधन म्हणाला, पाच गाव तर राहू द्या, पण सुईच्या अग्रावर राहील इतकी मातीसुद्धा आम्ही तुला देणार नाही. हे उत्तर मिळताच कौरव-पांडवांच्या लढाईला तोंड लागलं." साळूने प्रौढासारखे उत्तर दिले.

घैसासमामांच्याने स्वस्थ राहवेना. ते म्हणाले,"ती उंटाच्या पाठीवरची शेवटली काडी होती आप्पा. कौरव-पांडवांचं वितुष्ट द्रौपदीमुळेच भडकलं. दु:शासनानं तिची भर सभेत विटंबना केली तेव्हाच कौरवांच्या नाशाच्या आणाशपथा भीमार्जुनांनी घेतल्या. त्यावरून चक्क दिसतं की हे युद्ध जमिनीसाठी नव्हतं." पुनः मामांनी तोंड घातल्यामुळे मी चिडलो आणि ओरडलो,"हे बघा बालमानसशास्त्रवाले! माझं म्हणणं एकसारखं खोडून काढून तुम्ही साळूच्या मनात वडिलांविषयी अवहेलना मात्र उत्पन्न करीत आहां. साळू मला विचारायला आली आहे; तुम्हाला नाही."

"डॅम इट, तू चुकीच्या कल्पना साळूच्या मनात भरवून देतो आहेस. शिक्षणक्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून माझाही अधिकार तुला मान्य केला पाहिजे. मी म्हणतो, जगात मुलं व्हायला सर्वस्वी नालायक कोणी असेल तर त्यांचे आई-बाप हेच होत; कारण शाळेत मिळणार्‍या मुलांच्या ज्ञानात माती कालवायचं पाप तेच करीत असतात. बरं साळू, दुर्योधनानं पाच गावं पांडवांना अग्रहार म्हणून दिली असती तर भारतीय युद्ध थांबलं असतं का?" मामांनी विचारले.

विस्मृतीच्या विजनवासात लोप पावू पाहणारया आणि माझ्यासारख्या अनेकांचे बालपण आजही टिकवून ठेवण्यात मोठा वाटा असणाऱ्या चिं.वि.जोशी या चतुरस्त्र लेखकास सादर प्रणाम......


- समीर गायकवाड.