Saturday, November 7, 2015

रणरागिणी ताराराणी ...


दख्खन जिंकायचीच ह्या मनसुब्याने औरंगजेबाने जेंव्हा दिल्ली सोडली तेंव्हा सह्याद्री गालातल्या गालात हसला, कळसूबाईच्या शिखरावर रोमांच उठले. मावळच्या खोऱ्यात वारा बेभान होऊन वेड लागल्यागत हसत सुटला. संतांच्या ओव्या थरारून गेल्या. काहीशी मरगळून गेलेली  सृष्टी टक्क सावध होऊन बघत राहिली. गडकोटांना स्फुरण चढले. कडयाकपारया उल्हासित झाल्या, नदीनाल्यांना भरून आले. तिन्ही ऋतूंना गहिवर दाटून आला. काळवंडलेल्या आभाळात पिसाळलेले ढग जमा झाले, सौदामिनींचा चित्कार सुरु झाला अन काळाला उधाण आले ! कारण सावज आपण होऊन मृत्युच्या दाढेत जणू चालतच आले ! काळाहून क्रूर असणाऱ्या औरंगजेबाने आधी कपटाने शंभूराजांचा काटा काढला त्याला वाटले मरगट्टे संपले. पण तिथूनच एका विलक्षण चमत्कारक अध्यायास सुरुवात झाली. भद्रकाली रणरागिणी ताराराणी कोपली आणि तिने औरंग्यास पुरते नेस्तनाबूत केले. त्याला इथल्याच मातीत चिरनिद्रा घ्यावी लागली. पण त्या नंतर जे काही घडले त्यामुळे मराठी मातीस भाऊबंदकीचे रक्तरंजित इतिहास घडताना मूक रुदन करण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते. त्या इतिहासाची ही पोस्ट ..... 
मराठी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी राजांच्या पश्चात तीन नायकांचे तीन कालखंड प्रमुख आहेत ते म्हणजे संभाजीराजे, राजाराम महाराज आणि ताराराणी. एका वेगळ्याच मातीत जन्माला येऊन मराठी माणूस आपल्या चिवट,जिद्द,पराक्रम, लढाऊ वृत्ती याच्या जोरावर ताठ कण्याने अन निडर बाण्याने आयुष्यभर कसा झुंझत राहतो हे जर कोणाला पहायचे असेल तर त्याने हा कालखंड जरूर नजरेखालून घालावा. या काळात ओरंगजेबाकडे १४३००० खडी फौज व ९६ मराठे सरदार होते, तर ३० ते ५० हजार इतकीच काय ती मराठी फौज होती. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवून धरले त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. शिवछत्रपतींनी श्वासाच्या ध्येयासक्तीपेक्षाही अधिक मोल देऊन जे स्वराज्य निर्मिले होते ते स्वराज्य, ती मराठी रयत सांभाळण्याची अन त्याचवेळेस औरंगजेबाशी टक्कर देण्याचे कठीण काम शंभूराजांवर येऊन पडली होती. ती त्यांनी सार्थ निभावली. पण त्यांच्या अकाली झालेल्या घरपकडी व नंतर ऐन तारुण्यात झालेली क्रुर क्लेशदायक हत्त्या यामुळे मराठेशाहीचा पार कणा मोडून गेला. १ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस संभाजीराजेंचा पुत्र शाहु त्यावेळी अल्पवयीन होता त्याला छत्रपती सारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी राणी स्त्री सखी राज्ञी जयते महराणी येसूबाई आणि मंत्रीमंडळाने संभाजींचे सावत्र भाऊ राणी सोयराबाई राजारामला बसवायचा निर्णय घेतला, पुढे १२ फेब्रुवारी रोजी राजाराम छत्रपती झाले. संभाजीराजांच्या मागे स्वराज्याच्या गादीवर पुढचा छत्रपती म्हणुन राजारामाला सिंहासनावर  बसवीले. हा कालखंड स्वराज्यासाठी अत्यंत धकाधकीचा गेला..राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांच्या पुढ्यात आव्हाने अनेक अन परिस्थिती बिकट दयनीय होती. संभाजीराजे अटकेत होते, हळूहळू मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजूला झुकत होते . चौतर्फा स्वराज्यावरची आक्रमणे, रयतेतून होणारी स्थानिकांची फंदफितुरी, औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी लागणारया पैशा-अड्क्याची चणचण असे अनेक प्रश्न आ वासून होते. औरंगजेबाच्या सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या अन मदतीला इतर दुश्मन गोळा झाले होते. हे सगळे मिळून राजारामाच्या कच्छपी लागले, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दुर जिंजीस जाउन राज्यशकट हाकण्याचा सल्ला दिला. प्रल्हाद निराजी यांनी स्वराज्यासाठीं श्रमसायास फार केले होते, शिवाय ते शिवाजी राजांच्या तालमींत तयार झालेले होते, त्यामुळें त्यांच्या  वडीलकीखालीं राजारामांनी जिंजीस राज्य चालू केलें. त्यावेळीं अष्टप्रधानांहून वरिष्ट असें प्रतिनिधी हें नवीन पद निर्माण करून तें प्रल्हादपंतास दिलें (१६९२). ह्यामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. एकंदर अशा अवस्थेत राजारामांनी जिंजीला आपला कारभार नेला. नंतर कालांतराने पुढे झुल्फिकार खानाने थेट जिंजीवर हल्ला केला ! पण जिंजी पडण्यापूर्वीच प्रल्हाद पंत मरण पावले म्हणून राजाराम साता-यास आल्यावर त्यांनी तिमाजीपंत हणमंते यांस प्रतिनिधिपद दिलें (१६९७); परंतु ते सक्षम सिद्ध न झाल्याने राजरामांनी रामचंद्रपंताच्या हाताखालील परशुरामपंत किन्हईकरास हें पद दिलें (१६९९).१६७९ ते १७०० पर्यंत महाराष्टावर सतत हल्ले झाले, आक्रमणे झाली. दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचुन गेला. राज्याची तिजोरी मोकळी झाली, राजा परागंदा झाला,शत्रूशी मुकाबल्यासाठी म्हणावी इतकीही फौज नाही अशा अनेक कात्र्यात अडकलेला अननुभवी राजा अन थकून गेलेली प्रजा तरीही हार मानत नव्हते. याच काळात स्वराज्यात भीषण दुष्काळ सातत्याने पडलेमोगलांची लुटालूट जाळपोळ याने रियासतेत प्रचंड गुन्हेगारी वाढली. या गुन्हेगारीवर राजारामांनी एक सरदार नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. युद्धग्रस्ततेमुळे राज्य कर्जबाजारी झाले. पर्याय खुंटत आल्यावर राजाराम महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली पण त्यामुळे  स्वराज्याच्या एकछत्री अंमलास घरघर सुरु झाली.मिळालेल्या वतनानुसार तो सरदार स्वतः कुमक बाळगू लागला आणि राजाला गरज पडेल तेंव्हा मदतीस धावू लागला. याचा अत्यंत घातक दुष्परिणाम असा झाला की हे वतनदार त्यांच्या छोट्याशा वतनापुरतेचे राजे बनून गेले. या वतनदारासोबत जो फौज फाटा असे त्याची निष्टा त्याच्या वतनापुरतीच राहू लागली, स्वराज्याची आस त्याच्या मनातून आपसूक कमी होऊ लागली.स्वराज्याच्या कल्पनेला या निर्णयामुळे हादरे बसायला सुरुवात झाली.फौज बाळगायची राजाची ऐपत नाही, तिजोरी रिकामी झालेली अन चारी दिशेला मुजोर अक्राळविक्राळ शत्रू सीमेवर उभा असल्याने राजाराम यावर काहीच उपाय काढू शकले नाहीत. मुघलांनी या वतनदारांना फितवायला सुरु केले अन स्वराज्य अधिक खिळखिळे झाले.पुढे जाऊन तर एकच वतन अनेकाना दिल्याच्या दुदैवी घटना घडल्या अन अंतर्गत बेबंदशाहीला उत आला. यामुळे स्वराज्य अडचणीत असताना, राजा संकटात असताना वतनदार युद्धाकडे पाठ फिरवू लागले. अशा प्रकारे राजा अधिक कमकुवत होत गेला अन स्वराज्य पोखरले जाऊ लागले. याच काळात केवळ धनाजी जाधव - संताजी घोरपडे यांच्या सारख्या निष्ठावंताच्या मनगटाच्या बळावरच जितकेही राज्य होते ते टिकून राहिले. सातत्याने होत असलेल्या लढाया आणि कागाळ्या याचा सामना करणारया राजारामांना अखंड धावपळ, प्रकृती अस्वास्थ्य याने ग्रासले. त्याची परिणती व्हायची तीच झाली.राजाराम आजारी पडले अन त्यांचा पुण्याजवळ सिंहगडावर या आजारपणातच मृत्यू झाला. ११ मार्च १६८१ ते १६८९ असा अत्यंत पराक्रमी अन संघर्षाचा राजकाळ सांभाजींनी गाजवला. त्यानंतर १६८९ ते १७०० अशी ११ वर्षे अत्यंत बिकट काळात राजारामांचा छत्रपतीपदाचा अंमल राहिला. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरा) आणि कर्ण. पैकी राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर कर्णाला काही दिवसांसाठी गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायसकार सरदेसाई करतात पण तो ३ आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. राजारामाचा संघर्षाचा वसा पुढे महापराक्रमी रणरागिणी ताराराणीने चालविला !पतीच्या हयातीतच राणी ताराबाई स्वतंत्र मोहिमा आखत असे अन त्या फत्ते करत असे. तिने शिवरायांच्या नन्तर सर्वात सक्षमपणे गनिमी काव्याचा वापर करून मोघलांच्या नाकात नऊ आणले होते. मुघल सरदार खाफीखान औरगंजेबाला एक पत्रात लिहितो की, "ताराबाई ही राजारामाची थोरली बायको आहे. ती बुध्दीमान आणि शहाणी  आहे. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवरयाच्या ह्ययातीतच तिचा लौकीक झाला आहे."कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीच्या संस्थापिकाशिवाजी महाराजांच्या स्नुषाराजारामाची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी असा ताराराणीचा थोडक्यात परिचय देता येईल. १६८३८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले. संभाजीराजे दग्याफटक्याने पकडले गेल्यानंतर मुघलांनी रायगडास वेढा घातला तेंव्हा जिंजीला जाण्यासाठी ५ एप्रिल १६८९ रोजी ताराराणीने राजारामाबरोबर रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेल्यानंतर ताराराणी व तिच्या इतर सवती रामचंद्र नीलकंठांच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवीत विशाळगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. पुढे ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई १६९४ मध्ये जिंजीला पोहोचल्या.९ जून १६९६ला ताराईला पुत्र झाला. राजाराम जिंजीहून निसटल्यानंतर ताराराणी आणि त्यांचे आप्त जुल्फिकारखानाच्या तावडीत सापडले. त्यांना जुल्फिकारखानाने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले. त्यांनी ताराराणीला आप्तेष्ठांसह महाराष्ट्रात सुखरूप पोहोचविले. २ मार्च १७०० रोजी राजाराम मृत्यू पावला. त्यानंतर ताराराणीच्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात झाली. ताराराणीच्या कारकिर्दीची सुरुवातच अशी वादळी अन लढवय्येगिरीची होती.राजाराम निवर्तण्यापूर्वीच मुघलांनी सातारयाला वेढा घातला होता. याचवेळी पन्हाळा, विशाळगड, पावनगड अशा  अनेक गडांवर वेढे पडले होते. ताराराणी सर्व वेढ्यांना एकाच वेळेस तोंड देत होती. सातारा, विशाळगड, परळी, पन्हाळा हा मराठी मुलूख पायाखालून गेलेल्या लोकांना लक्षात येईल की हा भूभाग शंभर एक किमीच्या परिघात येतो. घोरपडीसारखी चिवट ताराराणी कुणाच्या बापाला भीत नव्हती तिला जेरबंद करण्यासाठी दिल्लीच्या सल्तनीचा बादशहा आलमगीर औरंगजेब दस्तुरखुद्द स्वतः या मुलखात भुताटकी लागल्यागत जंग जंग पछाडत होता. यावेळी त्याच्याकडे असलेले १५०००० सैन्य या भागात वावरत होते अशी नोंद करून सर जदुनाथ सरकार लिहीतात " किल्ल्याला संपुर्णपणे वेढा घालनेही मोगलांना जमले नाही. शेवटपर्यंत मराठे त्यांना हवे तेव्हा आत बाहेर करु शकत होते. ऊलट मोगलाचेंच सैन्य कोंडल्या सारखे झाले, मराठी सैन्य बाहेरुन घिरट्या घालत व मोगलांची रसद तोडत. येन्याजान्याचे सर्व मार्ग मराठ्यांनी व्यापले होते. कुणालाच संरक्षनासाठी मोठ्या तुकडी शिवाय बाहेर पडता येने अशक्य झाले होते."यावरून मुघलांची नीती ताराराणीने धुळीस मिळवल्याचे स्पष्ट होते, यामुळेच सर्वच इतिहासकारांचे एकमत आहे की, शिवाजीराजांच्या नंतर गनिमी काव्याचा बेमिसाल अन सार्थ वापर जर मराठी रियासतेच्या इतिहासात जर कोणी केला असेल तर तो ताराराणीनेच !मुघलांनी घातलेल्या विशाळगडच्या वेढ्यात त्यांचे फार मोठे नुकसान् झाले. मराठ्यांइतकेच  सह्याद्रीचा घोंघावणारा बेफाम वारा अन वादळी पाऊस ह्यांनी त्याना दे माय धरणी ठाय केले.किल्ला ताब्यात येत नव्हता अन फौज हताश झाली होती, अशा वेळेस ताराराणीने वेगळाच डाव खेळला तिने बेदारबख्तच्या मध्यस्थीने मुघलांकडूनच २ लक्ष रुपये घेऊन किल्ला देऊन टाकला, असाच डाव खेळत तिने अनेक किल्ले मुघलांकडुन पैसे घेऊन सोडुन दिले ! ताराराणीने अफलातून डोके लढवले, मुघलांकडून घेतलेल्या पैशातुन फौज भरती सुरु केली ! रयतेसाठीही काही रक्कम खर्ची पडली !! मुघलांना आधी जेरीस आणायचे, त्यांची माणसे गनिमी काव्याने मारायची अन पुढे त्यांच्याचकडून बक्कळ पैसे घेऊन किल्ला सोडायचा, त्या पैशातून फौज उभी करायची अन पुन्हा किल्ले ताब्यात घ्यायचे !! एकट्या विशाळगडच्या मोहीमेत औरंगजेबाकडची ६००० माणसे धारातीर्थी पडली होती यावरून मराठ्यांनी त्यांना कसे आणि किती पाणी पाजले होते याचा अंदाज यावा. विशाळगड असा पैसा देऊन ताब्यात आला पण आतली मेख बादशहाला माहिती नव्हती. तो आधीच पुरता हैराण झाला होता अन वायोमाने आता थकलाही होता जवळजवळ ३ दशके तो मराठी स्वराज्य चिरडण्यासाठी दख्खनच्या मातीत डेरेदाखल होता पण त्याला आधी शिवबा, नंतर संभाजीराजे, राजाराम अन आता ताराराणीने धूळ चारली होती. वैतागलेला बादशहा बहादुरगडावर  गेला पण तिथेही त्याला नेमाजी शिंद्याने गाठले. औरंगजेबाला चकवून नेमाजी शिंदे माळव्यात घुसला.तिथून तो पुढे सरकला !  ३०००० मराठ्यांनी दिल्लीचा बादशहा जिल्लेइलाही औरंगजेब दक्षिणेत माती खात असताना उत्तरेकडे हल्ला केला. भोपाळपासून उत्तरेकडे नेमाजीने सर्वत्र आपल्या तलवारीचे पाणी मुघालाना पोट भरून पाजले ! अशा प्रकारे बादशहाला इकडे अडकवून ठेवून त्याच्याच मुलुखात गदारोळ उडवण्याचा हा डाव बाजी हरत आलेल्या एका मराठी राणीने आखला अन अंमलात आणला ! हा गनिमी काव्याचा सर्वोच्च डाव केवळ मराठी रियासतेत नव्हे तर जगाच्या इतिहासात देखील एकमेवाद्वितीय ठरावा !!   आपल्या नाकावर टिच्चून मराठे पुढे हल्ले करू लागल्याने औरंगजेबाचे पित्त खवळले, त्याने तडकाफडकीने आणखी सैन्य मागवले. रागाने लालबुंद झालेल्या औरंगजेबाला कळेना की पुढे काय करावेत्याने हातघाईला येऊन थेट राजगड, तोरणा अन सिंहगडलाच एकाच वेळी वेढा घालायला लावला. जाणीवपूर्वक सिंहगड ३ महीने लढवून मराठ्यांनी पुढे ५०००० रु घेऊन किल्ला सोडला. त्यातही खुश झालेल्या बादशहाने गडाचे नवे नामभिधान केलं 'बक्षिंदाबक्ष' ! सिंहगड अशा पेड पद्धतीने ताब्यात घेऊन औरंगजेब पुण्यात येऊन सहा -सात मास राहिला. फेब्रू ते एप्रिल १७०३ दरम्यान असेच पैसे देऊन मुघलांनी राजगड अन तोरणा देखील कब्जे केले. हे किल्ले सोडताना त्यातली सगळी साधनसामग्री मराठे सोबत घेऊन जात असत, जिथले मनुष्यबळ उतरणीला लागे तिथले किल्ले दिले जात.उत्तरेत अंग चोरून बसलेले मराठे अन धनाजी जाधवांनी याच दरम्यान गुजरातेत केलेले हल्ले १७०४ ते १७०६ यामुळे मात्र बादशहा पुरता घायकुतीला आला. धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय या म्हणीचा सार्थ प्रत्यय औरंगजेबाइतका कोणी घेतला नसेलतब्बल २५ वर्षे त्याचे सैन्य मराठी मुलुखात ठेवून तो स्वतः नंतर त्यात आधिपत्य करून देखील त्याचे हात मोकळेच होते अन स्वप्न पुरते उध्वस्त झालेले होते. इथे तो अधिक दैववादी झाला अन सातत्याने परवरदिगार अल्लाहची करुणा भाकू लागला ! पण आयुष्यभर छळ कपटाची बैसाखी घेऊन चाललेल्या औरंगजेबाला खरडत घासत राहावे यासाठी दैव महाकाली परमप्रतापी रणरागिणी  ताराराणीच्या पारड्यात झुकलेले होते !! आपल्या सैन्यातील एक अख्खी पिढी इथे वाया घालवून आपले भंगलेले स्वप्न उराशी घेऊन आताच्या  औरंगाबाद नजीक ३० किमी.अंतरावरील खुलताबाद येथे ३ मार्च १९०७ रोजी अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझीने अखरेचा श्वास घेतला. मराठी स्वराज्य चिरडण्यासाठी आलेला जिल्हेइलाही इथल्याच मातीत गाडला गेला ! नियतीने घेतलेला हा सूड होता, मराठ्यांचे ही अद्वितीय जिद्द होती, ताराराणीचे हे अचूक डावपेच होते, मराठी माणसाने दाखवलेली ही एकजूट होती ! हा एक अचाट पराक्रम होता !!औरंगजेबाला धूळ चारण्यासाठी सर्व मराठे ताराराणीने एकाच भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले होते त्यामुळेच तिच्या योजना सफल होत गेल्या, ताराराणीच्या या एकीच्या बांधणीबद्दल कवि विठ्ठलदास यांनी लिहिलेय की,

" पाटील सेटे कुणबी जुलाई

चांभार कुंभार परीट न्हावी

सोनार कोळी उदिमी फुलारी

या वेगळे लोक किती बेगारी"ही लढाई गनिमी काव्याने लढवताना मराठे वारयाच्या वेगाने अंधारात वा दिवसा उजेडी छापा टाकावा तसे यायचे, निकराचा हल्ला करायचे अन इप्सित साध्य करून पलायन करायचे. असे करत करत त्या भागात ताकद क्षीण झाली की पैसे घेऊन किल्ला सोडून देत. पैसे घेऊन किल्ला ताब्यात घेण्याची सवय लागलेले अन त्याशिवाय तरणोपायही नसलेले मुघल सरदार इतक्यानेच  खुश होऊन बादशहाला कळवायचे के मराठे हार गये !

"मोगलांचे घोडे पाण्यावर आले असता पाणी न पीत त्यास मोगली लोकांनी म्हणावे जे पाण्यामध्ये धनाजी व संताजी दिसतो की काय? रात्री दिवसा कोणीकडुन येतील, काय करतील, असे केले. मोगलाई फौजेत आष्टो प्रह भय बाळगीत. पादशाही बहुत आश्चर्य जाहले की, " मराठी फौज बळावत आहे. अकस्मात यावे, बक मच्छ उचलुन नेतो तस्स घाला घालावा, शिपाईगिरिची शर्त करावी, प्रसंग पडल्यास माघारीपळुन जावे; खाण्यापिन्यास दरकार बाळगीत नाही. पाऊस, ऊन, थंडी, अंधारी काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी, चटनी, कांदे खाऊन धावतात. त्यांस कसे जिंकावे? एक्या मुलकात फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी तो दुसरेकडे जाउन ठाणे घेतात; मुलूख मारीतात; हे आदमी न्हवत, भुतखाना आहे" असं याचं वर्णन आलमगीराच्या इतीहासकारांनी करून ठेवलेले आहे. वैधव्य आले म्हणून रडत न बसता ही रणरागिणी सौदामिनी बनून मुघलांवर तुटून पडली अन नवा इतिहास जन्माला आला.औरंगजेबाच्या मागे माळव्याची सुभेदारी असलेल्या शहजादा आझमने स्वतःला बादशहा घोषीत केले त्याचवेळेस उत्तरेत शहा आलमने बंड पुकारले. जिंजींवर हल्ला करणारया झुल्फिकारखानाने शहजाद्याच्या मदतीने मराठ्यात फुट पाडण्याचा डाव इथे खेळला, त्याने २० वर्षांपासून मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीपुत्र शाहूला कैदेतून आझाद केले ! आपण याला मुक्त केले तर हा आपल्याशी इमान राखेल हे झुल्फीकारखानाने अचूक हेरले होते अन मराठे हे केवळ मराठ्यांकडूनच मारले जातील हे त्याला ३० वर्षात चांगलेच अवगत झाले होते ! जिंजीहून मुक्त झालेला शाहु मराठी मुलुखात आला अन त्याने स्वतःला राज्याचा खरा वारस घोषीत केले.मराठी बेबनावाची अन भाऊबंदकीची अशा प्रकारे ठिणगी पडली. नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, परसोजी भोसला , रुस्तुमराव जाधव असे मातब्बर सरदार शाहुला येऊन मिळाले.आपल्या मनगटाच्या जोरावर स्वराज्य राखलेल्या अन बुद्धीच्या जोरावर रयतेत - सरदारात सवतासुभा न होऊ देता स्वराज्य टिकवून औरंगजेबाला टक्कर देणारया ताराराणीला शाहूंचा दावा कबुल नव्हता, त्या स्वराज्यशकट आपल्या सावत्र पुतण्याच्या (शाहूंच्या) हाती देण्यास राजी नव्हत्या. संभाजीमहाराजांच्या पश्चात आधी आपल्या पतीने आणि नंतर आपण स्वतः तलवार हाती घेऊन जसे स्वराज्य राखले आहे तसे स्वराज्य राखणे इतके वर्षे कैदेत काढलेल्या शाहूंना जमेल की नाही याचा देखील ताराराणींना नेमका अंदाज नव्हता. पण मुघलांचा डाव यशस्वी झाला, काही सरदार शाहुराजांकडून उभे ठाकले तर धनाजी जाधवांसारखे मातब्बर सरसेनापती ताराराणीकडुन उभे राहिली.काही इतिहासकार इथे शाहूंची कड घेताना असे म्हणणे मांडतात की, शाहुना मुघलांनी कैद करण्याआधी संभाजीराजे पकडले गेले तेंव्हा त्यांचे - सईबाई यांचे पुत्र युवराज शाहू अल्पवयीन असल्याने संभाजीराजांचे कनिष्ट बंधू राजाराममहाराज यांना गादीवर बसवण्यात आले होते. शाहूच वारसा योग्य असल्याचे राजारामांचे देखील मत होते असाही दावा ते करतात.पण राजारामांच्या पश्चात स्वराज्याची राखण ज्या ताराराणीने आपल्या असीम शौर्याच्या जोरावर केली तिच्या हक्काचे काय यावर भाष्य करताना इतिहासकार देखील द्विधा मनस्थितीत आढळतात. यात सामोपचार अपेक्षित असताना धनाजी जाधव जोवर ताराराणीकडे असतील तोवर आपण सबळ आणि उजवे ठरू शकत नाही हे मनोमन ओळखून चुकलेल्या शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना धनाजींकडे धाडले. ताराराणीच्या सैन्यावर हल्लादेखील चढवला, यात धनाजी जाधव शाहूंना जाऊन मिळाले पण शेवटी खेड-कडूस येथे दोन मराठी फौजा आपसात भिडल्याच ! यात शाहूंच्या फौजा विजयी झाल्या. इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी ताराराणीचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराराणीनी पन्हाळा हस्तगत केला. पुढे ताराराणीचे नवे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी थोडी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, काही किल्ले देखील त्यांनी कब्जे केले.कान्होजी आंग्रेना जेरीस आणण्यासाठी अन तिथली घडी बसवण्यासाठी शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना मुतालिकपद देऊन पाठवले. ते कार्य त्यांनी चोख पार पाडले. या सर्व घडामोडीबाबत इतिहासकारांमध्ये अनेक टोकाचे मतभेद आहेत हे इथे नमूद करावेसे वाटते.नंतर कान्होजी आंग्रे, सिधोजी घोरपडे, दमाजी थोरात हे देखील शाहुंकडे डेरेदाखल झाले. अशा रीतीने रियासतीमधील सर्व दिग्गज सरदार, मोक्याचे किल्लेशाहुंकडे गेल्यामुळे ताराराणीची बाजु कमकुवत झाली. त्यांनी अनेक वेळा शाहुंशी दावा मांडला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शेवटी १२ फेंब्रुवारी १७०८ ला शाहूनी स्वतःला राज्याभिषेक करविला, छत्रपती असल्याची द्वाही रयतेत फिरवली. या दरम्यान उत्तरेत मोठ्या  उलथापालथी झाल्या. औरंगेजेबाचे दोन शहजादे आझम व शहा आलम यांच्यात सामुगढजवळील जाजाऊ येथे युध्द होऊन त्यात शहा आलम विजयी झाला. त्याने बहादुरशहा ही पदवी स्वतःला धारण करुन तो नवा बादशहा झाला. शहा आलम पातशहा झाल्याचे औरंगजेबाच्या सर्वात कनिष्ठ मुलाला कामबक्ष याला मान्य नव्हते. त्याने शहा आलम विरुद्ध दक्षिणेतून बंड पुकारले. जेंव्हा राजाराम छत्रपति जिंजीस होते तेंव्हा तेथें वेढा घालून बसलेल्या झुल्फीकारखानाच्या मदतीस हाच कामबक्ष आला होता. परंतु त्या दोघांत भांडणे सुरू झालीं व कामबक्ष मराठ्यांकडे राजकारणें करूं लागला. तेव्हा खानानें त्याला कैद करून औरंगझेबाकडे पाठवून दिलें होतें. कामबक्षाचे बंड मोडण्यासाठी  बहादुरशाहने शाहूंची मदत मागितली. शाहुना कैदेतून सोडवताना आझम आणि झुल्फिकारखानाने जे करार मदार केले होते त्यावर नव्या बादशहाची मोहोर उठवून आपल्या छत्रपतीपदाच्या दाव्याला भक्कम करता येईल असा करंटा विचार करून शाहुनी नेमाजी शिंद्यांना बादशहाकडून लढायचे फर्मान जारी केले.जे नेमाजी शिंदे औरंगजेबाच्या हयातीत मराठी रियासतेसाठी उत्तरेवर स्वारी करून गेले होते तेच नेमाजी शिंदे शाहूंच्या आदेशाने नव्या मुघल बादशहाच्या बाजूने लढले ! किती हा दैवदुर्विलास ! १७०९ मध्ये बहादुरशहाने कामबक्षाला पकडुन ठार मारले. या दरम्यान प्रतिनिधी पद शाहूनी परशुरामपंत किन्हईकरांना वंशपरंरेनें वतनी करून दिलें (१७१०). मध्यंतरी काही काळ गदाधर प्रल्हाद यांना व पुढे नारायण प्रल्हाद नाशिककर यांस ५ वर्षे या जागेवर त्यांनी नेमलें होतें. यातील गदाधर प्रल्हाद अहमदनगरच्या मुक्कामात मरठ्यांच्या वतीने भेटायला गेला. त्याने बादशहास दक्षिणेची चौथाई मागीतली. धूर्त झुल्फीकारखानाने आपले वजन लगेच शाहुच्या पारड्यात टाकले, शाहुच्या या अवसानघातकी कारभाराची कुणकुण लागलेल्या ताराराणीने देखील तिच्या  वतीने प्रतिनिधी तिथे पाठवले. इथे आणखी राजकारण झाले, बादशाहच्या दरबारी वजीर असणारया मुनीमखानाचे झुल्फिकारखानाशी सख्य नव्हते, त्यामुळे त्याने झुल्फिकारखानाने आपले वजन शाहुच्या पारड्यात टाकल्याबरोबर त्याचे मत ताराराणीच्या बाजूने मांडले ! यावर बादशाहने आधी वारसा हक्क निकाली काढा मग सनदा देण्यात येतील असा निर्वाळा दिला. सनदाचे काम तसेच राहिले, पुढे शाहू आणि ताराराणी आपसात झगडत राहिले. १७०९ मध्ये बहादुरशाह बादशहा दिल्लीला परतला तरीदेखील हे आपसात भांडत राहिले.१७१० सालानंतरच्या राज्यातल्या अराजकामुळे रामचंद्रपंतांना ताराबाई आणि शिवाजी यांच्या शासनाखालील राज्याचे भवितव्य सुरक्षित वाटेना. त्यांनी इतर जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्याने सप्टेंबर १७१४ मध्ये कोल्हापूर राज्यात सत्तांतर घडवून आणले. ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहुंनी कारभार पाहण्यासाठी  पेशवेपद दिलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना आधीच शाहूच्या बाजूला वळवून घेतले होते. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्या्ला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराराणीनी सातार्यालहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.सन १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्नीग राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून रणरागिणी ताराराणी व त्यांचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे (दुसर्याप शिवाजीचे) निधन झाले. त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या. अशा प्रकारे मराठी स्वराज्याची दुर्दैवी विभागणी झाली !पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कोल्हापुरातील कैदेतून सुटका झाली. आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे, म्हणून त्यांनी शाहूंचे मन वळविले. शाहूच्या मृत्यूनंतर पेशवे बाळाजी बाजीरावानी रामराजाला सातारच्या गादीवर बसविले. तेंव्हा रामराजाला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा ताराराणीनी प्रयत्न केला. रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागतो हे पहाताच त्यांनी तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला.यातून त्यांनी रामराजावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. १७५० मध्ये साताऱ्यात असता त्यांनी रामराजास कैदेत टाकले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने त्यांनी साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. पेशव्यांनी ताराराणींशी गोडीगुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पेशव्यांनी ताराराणीवर आक्रमण केले, हल्ला होताच थकलेली ती राणी पेशव्यांना शरण गेली. १७६० मध्ये कोल्हापुरचे राजे संभाजी निवर्तल्यामुळे पुन्हा वारसाहक्काचा प्रश्न उपस्थित झाला.शेवटच्या काळातले इथले ताराराणींचे जीवनमान ही एक नजरकैदच होती, त्यातच त्यांचे ९ डिसेंबर १७६१ रोजी निधन झाले.१७०० ते १७०७ मराठी राज्यावर सत्ता गाजविणारया, औरंगजेबाला जेरीस आणणारया महाप्रतापी रणरागिणी ताराराणीचा असा दुर्दैवी अंत मनाला चटका लावून जाणाराच होता.शिवछत्रपतीच्या पराक्रमाचा वारसा संभाजी राजांच्या नंतर राजाराम आणि अखेरीस ताराराणी यांनीच चालविला ! पुढच्या भोसले घराण्यात अशी तलवार कोणाला परजता आली नाही असं म्हणणे वावगे ठरणार नाही. एखादा रणमर्द अन निष्णात कारभारी देखील जे करू शकणार नाही ते ताराराणीनी करून दाखवले पण त्यांचा अतिमहत्वाकांक्षी स्वभाव आणि या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी  निजामासारख्या मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नाही. राजारामाच्या वारसाहक्कासाठी भांडून त्यांनी कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. हाच अखेरीस त्यांना अडचणीचा ठरला अन त्यातूनच त्यांचा दुदैवी अंत ओढवला ! कोल्हापुरचे राजे दुसरे संभाजी यांची  राजकीय कारकीर्द इ.स. १७१४ ते १७६० अशी झाली.त्यांच्या फौजात आणि सातारचे शाहू महाराज यांच्या फौजांमध्ये चार लढाया झाल्या. शेवटची लढाई १७३१ मध्ये होऊन कोल्हापूरच्या फौजेचा वारणेच्या काठी पराभव झाला. संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. यांच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.मराठी स्वराज्याचा हा असा चटका लावणारा अंत निश्चितच क्लेशकारक असा आहे....शिवछत्रपतीं व संभाजीराजांच्या नंतर मराठ्यांचे अखेरचे तलवारीचे पाणी खरया अर्थाने तेजस्वी सौदामिनी ताराराणीनीच परजले. अशा या रणरागिणीबद्दल कवी गोविंद यांनी लिहिले आहे...

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |

ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||

ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |

खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||

रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |

प्रलयाची वेळ आली | मुघलहो सांभाळा || "या सर्व घडामोडी पाहता इतिहासकारांनी राणी सोयराबाई आणि संभाजी यांच्यात प्रचंड वितुष्ट होते हे दाखविण्यासाठी अत्यंत खालच्या स्तराला गेलेले वाचायला मिळते. त्या सर्वांची तोंडे बंद करण्यासाठी एक घटना पुरेशी आहे. जेंव्हा संभाजी राजे पकडले गेले तेंव्हा स्वराज्य संकटात आले, अशा वेळेस आणखी बेबंदशाही माजू नये म्हणून नव्या राजाला गादीवर बसवणे निकडीचे होते, यावेळी सम्राज्ञी येसूबाई यांनी आपला पुत्र शाहू यांना गादीवर न बसवता वा त्यास गादीवर बसवून स्वतः कारभार न करता सोयराबाईंचे पुत्र, संभाजीराजांचे सावत्र भाऊ राजाराम महाराज यांना गादीवर बसवले. त्यांच्यातील नात्यांमध्ये असणारा हा विश्वासच पुरेसा बोलका आहे.शाहूंची सुटका झाल्यानंतर वा कैदेआधी त्यांचे रणपराक्रम वा त्यांचे वैयक्तिक कारभार कौशल्य इतिहासात कुठेही समोर येत नाही, त्यांनी कारभार चालविण्यासाठी पेशवे नेमले. शाहूंच्या उलट ताराराणीनी स्वतः व त्यांच्या पतीने स्वराज्यासाठी अथक संघर्ष केला होता. त्यातही राजारामांपेक्षा ताराराणीनी अधिक पराक्रम गाजविला. आपल्या दूरदृष्टीने व हातोटीने त्यांनी मराठे सरदार ऐन मोक्याच्या कालावधीत एकत्र ठेवले. मुघल बादशाहला झुंझावले, स्वराज्य टिकवून ठेवले. असे असतानाही काही इतिहासकार ताराराणीना खलनायिका ठरविण्याचा दुबळा प्रयत्न करतात.


ताराराणीनी अखेरपर्यंत महत्वाकांक्षा ठेवल्या, त्यांनी संघर्ष केला. सासरे (शिवराय), दीर (संभाजीराजे) आणि पती (राजाराम) यांच्या शौर्याला आणि लौकीकाला साजेल असा पराक्रम करणारया या राणीला औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर सावत्र मुले आणि पुतण्या यांच्याशी संघर्ष करावा लागला. त्यांचा स्वतःचा मुलगा शिवाजी (दुसरा) याचा सावत्र आई (राजसबाई) यांच्या कैदेत मृत्यू झाला. तर सावत्र मुलगा संभाजी (दुसरा) जे राजसबाईचे पुत्र होते यांनी  पुढे कधीही राजकारभार करताना काही ऐकले नाही. त्यांचा नातू रामराजा ( हा खरा नातू की खोटा यावर देखील मतभेद आहेत ) जो शाहूंच्या नंतर सातारच्या गादीवर बसला होता तो देखील पेशव्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या ऐकण्यात नव्हता असं त्यांचं मत होतं. १५ जानेवारी १७६१ला पानिपतच्या युद्धात पेशवे हरल्यानंतर वयाच्या ६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. १६६५ जन्म/ १६८३ विवाह / ५ एप्रिल १६८९ राजारामासह रायगड सोडून जिंजीकडे रवाना / इस. १७०० राजारामांचा मृत्यू / १७०७ औरंगजेबाचा मृत्यू / १७०८ शाहूंचा स्वतःला राजा घोषित करून राज्याभिषेक / १७१४ कोल्हापूर संस्थानला दुसरे संभाजी यांचा राज्याभिषेक /  १७६० संभाजी द्वितीय यांचा मृत्यू /  ६ नोव्हेंबर १७६१ ताराराणींचा मृत्यू . एक सून,एक पत्नी, एक आई, एक आजी आणि एक चुलती अशा अनेक नात्याना निभावून नेतानाच प्रबळ शत्रूशी मुकाबला करत वयाच्या २४ व्या वर्षापासून ते अन्तःकाली नजरकैदेत असेपर्यंत वयाच्या ६व्या वर्षापर्यंत संघर्ष करणारया ताराराणीचे आयुष्य एक अथक झुंझीचा धगधगता अग्निकुंड होता असे म्हणणे वावगे ठरणार नाही.


मराठेशाहीतील एक अस्सल रणमर्दानी स्त्री !! भद्रकाली ताराराणी !!- समीर गायकवाड.