Friday, November 6, 2015

'पाटलाच्या पोरा'ची चित्तरकथा ....एके काळी मराठी सिनेमात सरपंच, पाटील, तमाशा आणि गावातल्या भन्नाट कथा यांचा वरचष्मा असलेले चित्रपट मोठ्या संख्येने बनत त्यावेळची ही गोष्ट आहे. या कालखंडात भालजी पेंढारकर म्हणजे ऐतिहासिक, दत्ता धर्माधिकारी म्हणजे कौटुंबिक, राजा परांजपे म्हणजे विनोदी आणि दिनकर द. पाटील व अनंत माने म्हणजे ग्रामीण चित्रपट, हे समीकरण मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या मनात ठसलेलं होतं. शाळेत असताना वसंत पेंटर बाकावरचा शेजारी, शाळेत मराठी शिकवायला मास्टर विनायक शिक्षक म्हणून, महाविद्यालयीन शिक्षणात प्राध्यापक म्हणून ना.सी.फडके अन माधव ज्युलियन अन करियरच्या सुरुवातीलाच बाबुराव पेंढारकर यांची साथ असं भाग्य लाभलेला माणूस देखण्या साहित्यकृतींचा लेखक अन तडाखेबंद चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून नावालौकिकाला आला तर त्यात नवल ते काय ?

मराठी चित्रपटसृष्टीत आचार्य अत्रे, विश्राम बेडेकर, दिनकर द. पाटील आणि म. गो. (बाबा) पाठक या साहित्यिकांची उत्तम दिग्दर्शक म्हणून गणना होते. साहित्यिक असल्यामुळे कथा-पटकथा संवादया चित्रपटातल्या महत्त्वाच्या तंत्रावर त्यांची हुकमत असे. बर्‍याच चित्रपटांचे यश त्याच्या कथा-पटकथा संवादयावर असते. त्यादृष्टीने दिग्दर्शक हा साहित्यिक असल्यास चित्रपटाला एक वेगळे परिमाण लाभते. जवळपास पन्नास चित्रपटांचं दिग्दर्शन व शंभरहून अधिक चित्रपटांचं लेखन इतकं काम करणारे दिनकर द. पाटील  हे मराठीतील एकमेव साहित्यिक दिग्दर्शकअसावेत.दिनकर द. पाटलांचा जन्म चिकोडी तालुक्यातल्या बेनाडी या आडबाजूच्या खेड्यातला. त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. पुढे माध्यमिक शिक्षणाकरिता ते कोल्हापूरला आपल्या मामांकडे आले. दिनकरचे वडील दत्ताजीराव कोर्टकचेरीच्या कामासाठी नेहमी फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्यावेळी राजाारम हायस्कूल प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा काही शाळा होत्या. पण दिनकरच्या वडिलांनी त्याला विद्यापीठ हायस्कुलात घातले. कारण त्या शाळेची भक्ती ईश्‍वराची सेवा मानवाचीही बिरूदावली त्यांना फारच आवडली. दिनकरच्या वर्गात पंचवीस-तीस मुलं होती. त्याच्यासोबत कायम असणारा वसंत पेंटर आणि दिनकर कायम मागच्या बाकावर बसत. वसंत व दिनकर दोघांनी पुढे मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नाव काढलं. विद्यापीठ हायस्कुलात त्यावेळी मा. विनायक आणि गजानन जागीरदार हे शिक्षक होते.मा. विनायक हे दिनकरच्या वर्गाला मराठी विषयाचे शिक्षक होते. त्यांची शिकविण्याची पद्धत अतिशय नाट्यपूर्ण होती. शिवाजीचा उजवा हातशिकवताना त्यातला प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहायचा. तर यशवंत कवींची आई म्हणोनि कोणीशिकवतांना ते एकदम भावनाविवश होत. तेच विनायक यशवंतांचीच वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती, मन्मना नाही क्षितीही कविता ऐकवताना एखाद्या जहाल देशभक्ताप्रमाणे विलक्षण तेजानं तळपत. भा. रा. तांबे यांच्या मरणात खरोखर जग जगतेया कवितेतून जीवनाचं सार सांगत तर कवी माधव ज्यूलियन यांची मराठी असे आमुची मायबोलीअशी शिकवत की सार्‍या विद्यार्थ्यांना पारतंत्र्याची खंत वाटे. विनायकरावांनी मुलांना कवितेची गोडी लावली, त्यांच्याकडून तत्कालीन मराठी कवींच्या अनेक कविता पाठ करून घेतल्या. इतकंच नव्हे तर त्यांच्यावर साहित्यिक संस्कारही घडवले.त्या काळात शाळा-कॉलेजातील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते लेखक होते- वि.स. खांडेकर आणि ना.सी.फडके. त्यावेळच्या तरुणपिढीला फडके-खांडेकरांनी वेडच लावले होते. इतके की दर रविवारी विद्यापीठ हायस्कुलातील साहित्यिकप्रेमी विद्यार्थी विनायकांच्या घरी जमत. मा. विनायक हे किर्लोस्करमासिकात छापून आलेल्या फडके व खांडेकरांच्या कथा त्यांना वाचून दाखवत. फडक्यांच्या कथांनी तेव्हाच्या तरुणांना प्रेम करायला प्रवृत्त केलं, तर खांडेकरांच्या कादंबर्‍यांनी आत्मपरीक्षण करायला लावले. अशाप्रकारे दिनकरमधला साहित्यिकमा. विनायकांनीच घडवला.पुढे उच्च शिक्षणकरिता त्यांनी राजाराम कॉलेजात प्रवेश घेतला ज्युनियर बी.ए.च्या वर्गात असताना कॉलेजच्या राजारामियनया मासिकाचा संपादक म्हणून दिनकरची नियुक्ती झाली. ना. सी. फडके आणि नामवंत  प्रेमकवी माधव ज्यूलियन हे दोघेही राजाराम कॉलेजात त्यावेळी प्राध्यापक होते. त्यांच्या अनुकरणाने दिनकर लिहायला लागला. सेवक’, ‘सत्यवादीअशा स्थानिक वर्तमानपत्रांतून तो लिहिता असे. लवकरच किर्लोस्करमासिकाच्या कथास्पर्धेत दिनकरच्या एरिनाया कथेला पहिलं बक्षिस मिळालं आणि दिनकर द. पाटील हे मान्यवर लेखक झाले.याच सुमारास शारदामंडळनावाची एक साहित्यसंस्था दिनकरराव चालवत होते. त्या संस्थेने एकदा मुलींची वक्तृत्वस्पर्धा ठेवली. त्या स्पर्धेत मुलींच्या शाळेतली सुमन शिंदे नावाची विद्यार्थिनी पहिली आली. शारदा मंडळाचे प्रमुख दिनकराव असल्यामुळे त्यांचा सुमनशी परिचय झाला. पुढे तो इतका वाढला की दिनकरराव चक्क सुमनच्या प्रेमात पडले. त्यावेळी दिनकररावांच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती. घरी जेव्हा समजलं की दिनकरराव सुमनच्या प्रेमात पडले आहेत तेव्हा घरात एकच वादळ उठलं. वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं.दिनकररावांच्या प्रेमकथेचा शेवट लग्नात झाला. पण त्यांच्या खर्‍या आयुष्याची सुरुवात तिथूनच झाली. बेघर परिस्थितीतल्या दिनकररावांना त्यांचे आवडते शिक्षक मा. विनायक यांनी आधार दिला. त्यांचा सहकारी म्हणून दिनकरराव हंस पिक्चर्समध्ये दाखल झाले. पुढे हंसचे रुपांतर नवयुगमध्ये झाले. पुढे नवयुगही बंद पडले आणि विनायकनी स्वत:ची प्रफुल्ल पिक्चर्सही नवी चित्रसंस्था कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत सुरू केली. बडी मॉंनंतर विनायकनी प्रफुल्ल पिक्चर्सही संस्था आपल्या सार्‍या स्टाफसह मुंबईला हलवली. मुंबईला नाना चौकातील शंकरशेटवाड्यात त्यांनी सार्‍या स्टाफची राहायची सोय केली. दिनकर पाटीलही त्यांच्याबरोबर मुंबईला आले.मुंबईला विनायकांच्या मंदिरचित्रपटांचं शूटिंग चालू होतं. त्यासुमारास जुन्या हंसचे मॅनेजर वामनराव कुलकर्णी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे विनायकांनी त्यांना कोल्हापूरहून मुंबईला बोलावून घेतलं. वामनराव आले. त्यांच्यामधला व्यवस्थापक कुठल्याही प्रसंगी जागरूक असायचा. त्यांनी विनायकरांवांपुढे एक प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, ‘‘विनायकराव, तुम्ही कोल्हापूरचा शालिनी स्टुडिओ भाड्याने घेतलाय आणि काम इथं मुंबईला करताय. तेव्हा शालिनी स्टुडिओ आम्हाला द्या. आम्ही तिथं चित्रपट सुरू करतो म्हणजे तुमचं शालिनीचं भाडं वाचेल!’’ विनायकरावांनी तो प्रस्ताव मान्य केला. वामनरावांनी मग आपला मोहरा दिनकररावांकडे वळवला. त्यांनी दिनकररावांना विचारलं, ‘दिनकर तुझ्यापाशी एखादी ठणठणीत स्टोरी आहे का?’

ठणठणीत म्हणजे?’

ठणठणीत म्हणजे बंदा रुपयासारखी वाजणारी...

म्हणजे धंदा करणारी?’

अर्थात! नाहीतरी चित्रपट काढायचा कशाला?’ वामनराव म्हणाले. त्यांनी चित्रपट व्यवसायाचं इंगितच त्यांना सांगितलं.

दिनकररावांनी मग त्यांना किर्लोस्करमासिकात प्रसिद्ध झालेली वाघ्यामुरळीही कथा दाखवली.

हे बघ, आमचे सूत्रधार आहेत बाबुराव पेंढारकर. त्यांनी पसंत केली की मी तुझी कथा घेतलीच.असं म्हणत वामनरावांनी एक सुरती रुपया दिनकररावांच्या हाती दिला. हा घे स्टोरी लिहिण्याचा संचकार !

दिनकररावांनी उत्साहात वाघ्यामुरळीची पटकथा लिहून तयार ठेवली. लवकरच बाबुरावांचा कथा पसंत असल्याचा निरोप आला. त्यांनी कोल्हापूरला संवाद लिहिण्यासाठी बोलावले. दिनकररावांनी विनायकरावांकडे पंधरा दिवसांची रजा मागितली. ती त्यांनी दिली. दिनकरराव कोल्हापूरला आले. त्यांचे कुटुंब त्यावेळी कोल्हापुरातच होते. लवकरच त्यांनी वाघ्यामुरळीच्या पटकथेवर संवाद लिहून काढले. बाबुरावांनी चित्रपटाचं नाव जयमल्हारअसं ठेवलं.बाबुरावांच्या मनात त्यावेळी जयमल्हारचं दिग्दर्शनही दिनकररावांनी करावं असं होतं. दिनकरराव त्यावेळी विनायकरांच्या हाताखाली असल्यामुळे बाबुरावांनी विनायकरावांनातसं विचारलं पण विनाकरावांनी बाबुरावांना तसं करायची परवानगी दिली नाही. ते बाबुरावांना म्हणाले, ‘‘दिनकर माझा सहाय्यक आहे. त्याला मीच दिग्दर्शक करणार !’’  राम कर्वे व राम देवताळे यांच्या मल्हारी मार्तंडया चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद व दिग्दर्शन दिनकर द. पाटील यांचे होते तर गाणी ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेली होती. संगीत वसंत पवारांचे होते ,वसंतरावांनी दोन तासांत त्यातील सर्व गाण्यांना चाली लावल्या होत्या  ढोलकीची साथ बबन काळे यांनी केली होती. त्यातील सुलोचनाबाईंनी गायलेल्या पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवाआणि फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या ऊसाला लागंल कोल्हाsss’" या लावण्यांनी पुढे उभ्या महाराष्ट्राला वेड लावले. या दोन लावण्यांचे ध्वनिमुद्रण राजकमल स्टुडिओत चालू होते तेंव्हा लावण्या इतक्या सुरेख रंगल्या होत्या, की त्या ऐकायला ध्वनिमुद्रक मंगेश देसाई स्वत: जाऊन शांतारामबापूंना घेऊन आले. त्‍या चित्रपटाच्‍या गाण्‍यांच्या पार्श्‍वगायनासाठी १९६५ साली सुलोचनाबाईना महाराष्‍ट्र सरकारने  विशेष राज्‍य पुरस्‍काराने सन्‍मानित केले.

नियतीचा खेळ किती विचित्र असतो. विनायकरावांनी आपला शब्द आपल्या मरणाचं मोल देऊन खरा केला. १९ ऑगस्ट १९४७ रोजी विनायक वारले. त्यांच्या मृत्यमुुळे अपुरा राहिलेला मंदिरपूर्ण करण्याची जबाबदारी शांतारामबापूंनी दिनकररावांवर सोपवली. अशा रीतीने दिनकररावांनी पहिलं दिग्दर्शन केलं तर विनायकरावांच्याच चित्रपटाचं! विनायकरावंनी दिनकरला असं दिग्दर्शक बनवलं! मंदिरचं काम चालू असतानाच जयमल्हारपूर्ण झाला. त्याचं दिग्दर्शन द. स. अंबपकर यांनी केलं होतं. ग. दि. माडगूळकरांनी फर्मास फक्कड आणि अक्कडबाज अशा लावण्या लिहिल्या. दादा चांदेकरांनी तितकंच ढंगदार संगीत दिलं. या लावण्यांनी त्यावेळी महाराष्ट्रत धमाल उडवून दिली होती. दिनकररावांनी, लिहिलेला हा पहिलाच चित्रपट प्रचंड गाजला.

जयमल्हारपासून पडद्यावर लावणीप्रधान ग्रामीण चित्रपटांचे नवे युग सुरू झाले. दिनकर द. पाटील हे लोकमान्य पटकथाकार झाले. खरं म्हणजे त्यांना कथालेखनाच्या तंत्राचं शिक्षण वगैरे काही मिळालेलं नव्हतं. वास्तविक ना. सी. फडके आणि  वि. स. खांडेकर या त्यांच्या आवडत्या लेखकांच्या वाचनामुळे दिनकरावांच्या लेखणीवर त्यांचेच संस्कार व्हायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही. संवाद लिहिताना त्यांना भालजी पेंढारकरांचीच लेखणी अनुकरणीय वाटली. भालजींची खटकेबाज संवादाची शैली दिनकररावांनी आत्मात केली. एकदा भालजी म्हणालेसुद्धा होते, ‘माझं शिष्यत्व सांगणारे कोणी असोत नसोत. पण माझा खरा शिष्य कोणी शोभत असेल तर दिनकर पाटीलच !पण दिग्दर्शनाच्या बाबतीत मात्र दिनकरराव हे विनायक स्कूलचेच विद्यार्थी होते.

विनायकांच्या मृत्यूनंतर दिनकररावांनी ठरवलं की आता सहकारी म्हणून काम करायचं नाही तर स्वतंत्रपणे चित्रनिर्मिती सुरू करायची. तेव्हा दिनकररावांनी राम राम पाव्हणंची कथा लिहिली. तो पडद्यावर आणण्यसाठी ते भांडवलदार शोधू लागले. एका धनिकाने त्यांना सांगितलं, ‘तुम्ही आधी गाणी ध्वनिमुद्रित करा. नंतर मी पैसे नक्की देतो !अशावेळी लतादीदी त्यांच्या मदतीला धावल्या. दिनकररावांनी शांता शेळके आणि पी. सावळाराम यांच्याकडून गाणी व लावण्या लिहून घेतल्या. लतानं शब्द दिल्याप्रमाणे संगीत दिग्दर्शन केलं. मंगेशकर कुटुंबाचे दिनकररावांशी शेवटपर्यंत चांगले संंबध होते. राम राम पाव्हणंनंतरच्या  पाटलाचं पोरया चित्रपटानेही रौप्यमहोत्सव साजरा केला. दिनकररावांनी लिहिलेल्या वादळ’, ‘शिकलेली बायको’ (दिग्दर्शक -माधव शिंदे) तसंच ज्योतिबाचा नवस’, ‘जावयाची जात’ (दिग्दर्शक कमलाकर तोरणे) या चित्रपटांनीही अमाप यश मिळवले.

आपल्या पन्नास वर्षाच्या कारकीर्दीत दिनकररावांनी सुमारे शंभरहून अधिक चित्रपटांचं लेखन, पस्तीस चित्रपटांचं दिग्दर्शन दहा अनुबोधपट तयार केले. साहित्याच्या क्षेत्रातही त्यांची कामगिरी मोठी आहे. पाच नाटके, दोन एकांकिका, चार कथासंग्रह चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रुपेरी पडदा तंत्रमंत्रहे चित्रपटविषयक पुस्तक व पाटलाचा पोरहे आत्मचरित्र एवढा त्यांचा साहित्यसंभार आहे.चित्रपटांचा `धंदाहोण्यापूर्वी सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या दिनकर द. पाटील यांचे प्रस्तुतचे `रुपेरी पडदाः तंत्र आणि मंत्रहे पुस्तक आपणांस चित्रपटाच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. आपण प्रत्यक्ष पडद्यावर पाहत असलेल्या चित्रपटाच्या सर्वांगांचा-अंतरंगाचा नेमकेपणाने आणि नेटकेपणाने वेध घेतल्याचे येथे जाणवते. अगदी सुरवातीच्या मूकपटापासून ते आताच्या दूरचित्रवाणीपर्यंतच्या चित्रपट-प्रवासाचा येथे साकल्याने विचार केलेला आहे. शिवाय अधूनमधून सिनेसृष्टीतील किस्से आल्याने ते रंजकही झाले आहे.

जवळजवळ ५० वर्षे लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक या त्रिविध नात्यांनी सिनेसृष्टीतील घडामोडींना साक्षी असलेल्या दिनकर द. पाटलांच्या अनुभवांचे हे उत्कट प्रगटीकरण आहे. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंचा विचार मांडताना ते कोठेही बोजड होऊ नयेत याची दक्षता त्यांनी घेतलेली आहे. चित्रपटसृष्टीवर आतापर्यंत अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत; होताहेत. परंतु सिनेमाच्या मंत्राबरोबरच त्याच्या तंत्राचाही साकल्याने विचार करणारे हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे ठरावे.

भालजी म्हणजे ऐतिहासिक, दत्ता धर्माधिकारी म्हणजे कौटुंबिक, राजा परांजपे म्हणजे विनोदी आणि दिनकर द. पाटील व अनंत माने म्हणजे ग्रामीण चित्रपट हे समीकरण मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या मनात ठसलं. दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर’ (१९६०), ‘प्रेम आंधळं असतं’ (१९६२) आणि ते माझे घर’ (१९६३) या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान लाभला तर कुंकू माझं भाग्याचंला फिल्ममेकर ऍवॉर्ड मिळालं. दिनकररावांनी चित्रपट व्यवसायावरचा पहिला चित्रपट तारका’ (१९५४) आणि भिकार्‍यांच्या जीवनावर पहिला चित्रपट मूठभर चणे’ (१९५५) हे चित्रपट काढले. त्यांना ग.दि. माडगूळकर पुरस्कार (१९८२), जनकवी पी. सावळाराम पुरस्कार (१९९८) आणि चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार (१९९८) हे मानाचे पुरस्कार लाभले होते. मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषणया पदवीने सन्मानित केले होते. विनायक स्कूलचे आणि साहित्यिक-दिग्दर्शक म्हणून दिनकर द. पाटील यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत अभिमानाने घ्यावे लागेल ! ( संदर्भ दिनकर द.पाटील, तारांगण - मधु पोतदार ) मराठी सिनेमाच्या एका गौरवास्पद कालखंडाच्या ऐतिहासिक शिलेदारापैकी एक असं दिनकर पाटलांचे वर्णन केलं तर वावगं ठरू नये...

मागच्या एक वर्षापूर्वी (६ नोव्हेंबर) दिनकर पाटलांची जन्म शताब्दी वर्षभरात कोणत्याही कार्यक्रमाविना कोरडी संपन्न झाली, तर मागील वर्षी  दिग्दर्शक अनंत मानेंचे जन्मशताब्दीवर्षही असेच उपेक्षेत गेले.  मराठी चित्रपटसृष्टीत काळ सरल्यावर माणसांची कदर का राहत नसावी हा प्रश्न जीवाला खंत लावून जातो

- समीर गायकवाड.