Friday, November 27, 2015

एनकाऊंटर्स, डॉन गवळी आणि शहीद विजय साळसकर ....एक काळ असा होता की, संघटित टोळ्या मुंबईत खुलेआम मुडदे पाडायच्या. १९९७ मध्ये कामगार नेते डॉ.दत्ता सामंत, कॅसेटकिंग गुलशनकुमार, सिनेनिर्माता मुकेश दुग्गल, गिरणी मालक वल्लभ ठक्कर, बिल्डर नटरवलाल देसाई यांच्यासह ४० बडय़ा व्यक्तींची गुंडांनी हत्या केली होती. त्यामुळे १९९७ मध्ये पोलिसांनी संघटित टोळ्यांविरोधात एन्काऊंटरचे हत्यार उपसून ७१ गुंडांना यमसदनी धाडले होते.
१९९८ मध्ये गुंडांनी सर्व रेकॉर्ड मोडीत काढत १०१ जणांची हत्या केली होती. त्यात शिवसेनेचे नगरसेवक केदार रेडेकर यांच्यासह अनेक व्यावसायिकांचा समावेश होता. १९९९ मध्ये गुंडांच्या रक्तरंजीत कारवायांत ४८ जण ठार झाले. गुन्हेगारी टोळ्यांची वाढती दहशत पाहून तत्कालीन पोलिस महासंचालक अरिवद इनामदार यांनी कडक धोरण स्वीकारले. गुंडगिरी मोडीत काढण्याच्या सूचनाच त्यांनी केल्या होत्या. त्याचे फलस्वरूप म्हणून १९९९मध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ८३ गुंड मारले गेले. त्यामुळे गुन्हेगारांनीही धसका घेतला.

मुंबईतील एन्काऊंटरचा इतिहास पाहिला तर २७२ पैकी ९० टक्के एन्काउंटर विजय साळसकर, प्रदीप शर्मा व प्रफुल्ल भोसले या तीन अधिका-यांनी मिळून केले होते. त्यातील विजय साळसकर यांना मुंबई हल्ल्यात वीरमरण आले. प्रदीप शर्मा यांना लखन भैया एन्काउंटर भोवले. तर ख्वाजा युनूस प्रकरणामध्ये भोसले यांना बराच मन:स्ताप सहन करावा लागला. खरे तर ख्वाजा युनुसचे प्रकरण आणि नुकतेच सांगलीत घडलेले अनिकेत कोथळे प्रकरण बऱ्यापैकी समान आहेत. पोलिसांना बळीचे बकरे बनवण्यात मिळणारा क्रूर आनंद या निमित्ताने लोकांना बऱ्याच अवधीनंतर अनुभवास आला.असो. दोन हजार एक नंतरच्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिका-याची फळीही आता पोलिस दलात कार्यरत नाही. नाही म्हणायला प्रदीप शर्मा ठाण्यात पुन्हा रुजू झालेत पण त्यांनी मध्यंतरी इक्बाल कासकर प्रकरणी दाखवलेली घिसाडघाई त्यांच्या अंगलट येऊ शकते. तर दया नायक यांचेही पंख छाटण्याचा प्रयत्न झाला.

२००० साली पोलिस चकमकीत ७३ गुंड मारले गेले तर गुंडांनी शिवसेना नगरसेविका नीता नाईक, शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण, बबन सुर्वे, रमाकांत हडकर, रिपाइंचे रागो मकवाना यांच्यासह २४ जणांच्या हत्या केल्या. मागील दशकाच्या सुरुवातीला २००१मध्ये पोलिस चकमकीत ९४ गुंड मारले गेले होते. मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील हा उच्चांक होता. त्यानंतर २००२ मध्ये ४७ व २००३ मध्ये गुंडांचा चकमकीत खात्मा झाला. मागच्या दशकात २७२ संशयित गुंड व दहशतवादी चकमकीत ठार झाल्यानंतर या दशकातील पहिल्या पाच वर्षात अत्यंत नगण्य एन्काउंटर झालेय. मानवाधिकार संघटना व उच्च न्यायालयाने देशभरात होणा-या पोलिस चकमकींना फटकारल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पोलिसिंगच्या पद्धतीत मोठा बदल झाला असावा. आजघडीला मुंबई पोलिस दलात अनेक सक्षम अधिकारी उपस्थित असतानाही ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’सारखी संबोधने मात्र पोलिस दलातून नामशेष झाली आहेत. एकेकाळी एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून संबोधल्या जाणा-या पोलिस अधिका-यांची एक फळी मुंबई पोलिस दलात होती. पण त्यातील अनेक जण आता मुंबई पोलिस दलात नाहीत आणि जे आहेत, त्यांनी एन्काऊंटरमुळे एवढे झेलले आहे की, त्यांच्या शब्दकोशातूनही एन्काऊंटर हा शब्द हद्दपार झाला आहे. परिणामी गेल्या काही वर्षात एन्काउंटर हा शब्द अभावानेच कानावर पडतो.

गेल्या दशकात मुंबई पोलिसांनी २७२ गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यात छोटा राजन टोळीच्या ९७ गुंडांचा समावेश आहे. गवळीची टोळी तर नामशेष केली गेली. त्या खालोखाल दाऊद टोळीच्या ४६ गुंडांना पोलिसांनी ठार केले. त्या काळातील चकमकफेम अधिका-यांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर काहींच्या नावावर शतक, काही शतकांच्या उंबरठय़ावर, तर काहींनी अर्धशतक पार केले होते. त्यात अग्रक्रमाने नावे घेतली जातात ती प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, दया नायक, सचिन वाझे यांची. यातील बहुसंख्य अधिकारी १९८३ च्या बॅचचे. प्रदीप शर्मा यांनी एन्काऊंटरचे शतक साजरे केले होते. प्रफुल्ल भोसले यांच्या नावावर ८५ एन्काउंटरची नोंद आहे.

विजय साळसकर यांनी तर अख्खी अरुण गवळी व अमर नाईक टोळी संपवली होती. रवींद्र आंग्रे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरात हैदोस घालणारी मंचेकर टोळी रसातळाला नेली. कोल्हापूरला जाऊन टोळीचा म्होरक्या सुरेश मंचेकरला गोळ्या घातल्या होत्या. दया नायक व सचिन वाझे यांच्या नावावरही एन्काउंटरचे अर्धशतक आहे. पण आता सहाय्यक पोलिस आयुक्त प्रफुल्ल भोसले सोडले, तर यातील बरेचसे अधिकारी पोलिस दलात नाहीत व जे आहेत, त्यांचेही पंख छाटण्यात आले.

अरूण गवळी आणि साळसकर यांचा एक किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. गवळीने एका महिला पत्रकारावर हात उचलला होता. जेव्हा ही माहिती विजय साळसकर यांना कळाली तेव्हा त्यांनी चार पोलिस कर्मचा-यांना सोबत घेतले व तडक धारावीहून भायखळ्यातली दगडी चाळ गाठली. अरूण गवळीच्या घरात घुसून त्याला बाहेर खेचले व पोलिस गाडीत बसवून ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात गवळीला आणताच त्याची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे गवळीची गॅंग टरकली होती. त्याआधी गवळीच्या घरात घुसण्याची कोणाही पोलिस अधिका-याने हिंमत दाखवली नव्हती. त्याहीपुढे जाऊन साळसकरांनी अरुण गवळी गँगचा सफाया केला होता. त्‍यांनी गँगस्टर अमर नाईक आणि सदा पावले यांना अटक केली होती. त्‍यामुळे ते चर्चेत आले होते. पुढे १९९७ मध्ये १५ दिवसातच गवळीचे टॉपचे तीन शूटर्स गणेश शंकर भोसले, सदा पावले व विजय तांडेल यांना एनकाउंटरमध्ये मारले होते. त्यानंतर गवळीचे साम्राज्य नष्ट करताना दिलीप कुलकर्णी, नामदेव पाटील, शरद बंडेकर, बबन राघव, बंड्या आडीवडेकर यांना एनकाऊंटरमध्ये मारले.

साळसकरांनी गवळी टोळीचा सफाया करताना दाऊदच्या टोळीस पूरक काम केले असे आजही दबक्या आवजात बोलले जाते. एकाला मारले तर लाभ दुसऱ्याला होतोच तसा हा प्रकार होता. तरीही हा आक्षेप घेतला गेला. मात्र मुंबई पोलिसांनी दाऊद टोळीचा खातमा करण्यासाठी ती सज्जता वा तत्परता कधीच दाखवली नाही जी गवळीच्या टोळीचा नायनाट करण्यासाठी दाखवली होती, हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही. दाऊदचा वरदहस्त असणे हे जिथे राजकारण्यांना भूषणावह आणि 'सेफ' वाटत होते तिथे पोलिसांची काय कथा ! असो. साळसकरांकडून एका एनकाऊंटर दरम्‍यान एका १८ वर्षीय मुलाला गोळी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे ते वादात अडकले होते. असे असूनही त्यांच्या जांबाजपणामुळे, दिलेरीमुळे अन बेधडक कारवाई करण्याच्या पद्धतीमुळे माजी पोलिस आयुक्‍त राकेश मारिया यांच्‍या ते सर्वात आवडीचे अधिकारी होते. विजय साळसकर यांना मुंबई पोलिस दलातील सहकारी 'महाराज' नावाने ओळखत. साळसकर आपल्या गाडीत सदैव लोडेड पिस्तूल व रायफल घेऊन फिरत.

मुंबईवरील २६/११ च्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या वेळेस आपल्या देशावर झालेल्या भ्याड हल्ला करणा-यांना धडा शिकविण्यासाठी साळसकर पुढे सरसावले. शत्रूएवढी आधुनिक शस्त्रे त्यांच्याकडे नव्हती तरीही त्यांनी बहादुरी दाखवत दहशतवाद्यांशी दोन हात केले. साळसकर यांच्यासह एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे यांच्यासह १४ पोलिस अधिकारी मारले गेले होते. साळसकर मुंबई पोलिस दलात वरिष्ठ पोलिस निरीक्षक होते. २६/११ हल्ल्यापूर्वीच्या काळात ते एन्टी एक्सटोर्शन सेलचे प्रमुख होते. साळसकरांना २६ जानेवरी २००९ रोजी मरणोत्तर अशोक च्रकाने सम्मानित करण्यात आले होते. शहिदांच्या या बलिदानातून काडीचाही बोध आम्ही आणि आमच्या राज्यकर्त्यांनी अजून घेतलेला नाही. अन्यथा हाफिज सईद आज मोकळ्या हवेत श्वास घेत फिरला नसता. उलट दोनेक वर्षापूर्वी साळसकरांच्या निवासस्थानीच दरोडा पडला होता ही आपल्याकडची तऱ्हा ! पण आम्हाला याची न खंत ना खेद ! ज्या दिवशी यांच्या बलिदानाची किंमत सर्वांना कळेल तोच खरा सुदिन म्हणावा लागेल. तोवर तरी एनकाऊंटर स्पेशालीस्ट साळसकर आणि मुंबईवरील हल्ला या लोकमानसाच्या भळभळत्या जखमाच राहतील.

- समीर गायकवाड.

( छायाचित्र - विजय साळसकरांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या टोळ्यांचा जेंव्हा खातमा केला तेंव्हा त्यांना पोलीस महासंचालकाच्या हस्ते विशेष पदकाने गौरवण्यात आले होते तेंव्हाचे हे छायाचित्र आहे.)
आकडेवारी संदर्भ : बदलते पोलिसिंग - अनीश पाटील.