Tuesday, December 1, 2015

पोलीस, पोलिसांची 'बेबी' व अजिनोमोटो … डोक्याचे दही करणारे भन्नाट प्रकरण !९ मार्च २०१५. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचा एक हवालदार सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कण्हेरी या आपल्या मूळ गावी रजा घेऊन आला होता, त्याच दिवशी दुपारी तळेगावजवळील ऊर्से टोलनाक्यावर ५० किलो मेफेड्रोन ( हा एक अमली पदार्थ आहे ज्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगत एमडी या नावाने ओळखते) पकडल्यानंतर त्याची लिंक या हवालदाराशी असल्याची माहिती मिळाली. पुण्याजवळ डग्ज सापडल्याची माहिती मिळताच या चलाख माणसाने आपल्या घरातून गावातीलच जगन्नाथ पवार यांच्या घरी मेफेड्रोनने भरलेली पोती हलवली.ही माहिती खंडाळ्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांना समजताच तातडीने सातारा जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या हवालदाराच्या व पवाराच्या घरी धाड टाकली. त्यात ११० किलो मेफेड्रोन ताब्यात घेतले. याच बरोबर त्याच्या घरी काही महत्त्वाचे धागेदोरे व कागदपत्रे सापडल्याचे सांगितले गेले. हे 'एमडी' रेव्ह पार्ट्या करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. तळेगावमध्ये केलेल्या कारवाईत ५० किलो मेफेड्रोन बाळगणारी व्यक्ती होती कोंडुस्कर टॅव्हल्सचे मालक अभिजित कोंडुस्कर यांचे भाऊ रवींद्र कोंडुस्कर. त्या पोलिसाची अधिक चौकशी केली गेली आणि सर्वांना धक्का बसला, त्याच्या पोलीस लॉकर मध्ये १२ किलो एमडी अमली पदार्थ आणि तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन समोर आले होते. त्याची अजून सखोल चौकशी केली गेली तेंव्हा 'तिचे' नाव सप्लायर म्हणून पुढे आले ! ती देशातली सर्वात हिकमती लेडी ड्रग माफिया म्हणून ओळखली जाते ! बेबी पाटणकर तिचे नाव अन त्या पोलिसाचे नाव भास्कर काळोखे !!

पोलीस तपासात असं निष्पन्न झालं की दोघांचा आपसातल्या भागीदारीताला हा गोरख धंदा होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला सातारा पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मला तर असा प्रश्न पडतो की आधी मुद्देमाल पकडला गेला पुण्याजवळ, नन्तर त्याची लिंक लागली साताऱ्यातल्या एका खेडेगावात अन ती पोहोचली ती थेट मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या लॉकरपर्यंत, जर ही माहिती मुंबई पोलिसांना आधी मिळाली असती तर त्यांनी या माहितीचे काय केले असते ? हा प्रश्नच पुढे सर्व प्रकरणाची उकल करून गेला…

यानंतर पोलिसांनी बेबीचा शोध सुरु केला. अमली पदार्थ पुरविणारी महिला म्हणून जेंव्हा बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते तेंव्हापासून तिला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने जंग जंग पछाडले होते. पोलिसांची दहा स्वतंत्र पथके कार्यरत असतानादेखील ती पोलिसांना गुंगारा देत होती. आपल्या मागावर असणाऱ्या मुंबई पोलिसांना तब्बल ४० दिवस गुंगारा देणाऱ्या बेबी पाटणकरला अखेर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पनवेल येथून अटक केली. समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी पाटणकर कुडाळहून खाजगी बसने मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने या बसचा माग घेत पनवेल येथे सापळा लावून बसमधूनच बेबी पाटणकरला अटक केली. एरवी २५ सिम कार्ड वापरणाऱ्या बेबीकडे सिमकार्ड विरहीत मोबाईल सापडला होता. तिच्यासोबत असणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बेबीच्या अटकेमुळे मुंबईतील अमली पदार्थाच्या तस्करीचे साम्राज्याला हादरा बसला होता आणि अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची संधी पोलिसांना मिळाली होती. पण आताच्या घडीला असे वाटते की पोलीसांनी योजनाबद्ध पद्धतीने ही संधी पाण्यात घालवली असावी. फरार असतानाच्या दीड महिन्यांच्या काळात ती सतत पोलिसांना चकवा देत होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी तिचा मुलगा सतीश याला अटक केली होती. तो सातारा पोलिसांच्या ताब्यात होता. याच दरम्यान, ती दोन वेळा मुंबईतही येऊन गेल्याची चर्चा होती ! या प्रकरणाचा तपास पुढे गुन्हे शाखेकडे देण्यात आला आणि न्यायालयाने तिला २८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

आता थोडंसं बेबी पाटणकरविषयी...वरळीतल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील दूधविक्रीपासून ते ड्रगमाफियापर्यंत आपल्‍या साम्राज्‍याचा विस्‍तार करणाऱ्या करणाऱ्या शशिकला ऊर्फ बेबी रमेश पाटणकर हिचं नाव पोलीस खात्याच्या चांगल्या परिचयाचे आहे. लग्‍नाआधी तिचे नाव शशिकला माजगावकर होते. ती १९८५ पर्यंत वरळीत दुधाच्या बाटल्या विकत असे.ईझी मनीच्या शोधात असणाऱ्या बेबीला वेगाने श्रीमंत व्हायचे होते आणि त्यासाठी तिचं लक्ष होतं अमली पदार्थाच्या मादक अन मालदार व्यवसायावर ! दुधापेक्षा अमली पदार्थाच्या विक्रीतून अधिक पैसे मिळतात, असे लक्षात येताच बेबीने मुंबईल्या महाविद्यालयांबाहेर गांजा, हशीष विक्रीचा धंदा सुरू केला. या धंद्यात तिने चांगलाच जम बसवला. राजस्थानमधील भवानी मंडी ते मध्य प्रदेशातील रतलाममधून ती ब्राऊन शुगर आणू लागली. याच काळात कॉन्स्टेबल काळोखे तिला भेटला आणि अमली पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर ती करू लागली. बेबीसाठी काळोखे पोलिसांच्या गाडीतूनही अमली पदार्थाची वाहतूक करू लागला. अशा प्रकारे ही जोडी कार्यरत झाली असं पोलिसांनीच तपासादरम्यान कित्येक वेळा सांगितले होते. आपल्‍या काळ्या धंद्यातून बेबीने कोट्यवधी रुपयांची संपत्‍ती जमा केली. आज घडीला तिच्‍या नावावर वरळीतील सिद्धार्थनगरात ढिगाने घरं - झोपड्या, गोराई बीच येथे बंगला, लोणावळ्यात बंगला, पुण्यात कोरेगाव पार्क येथील आलिशान गृहसंकुलात एक मजला, वाइन शॉप, तीन बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ४० लाख रुपये, कोकणात घरे, आलिशान गाड्या, अशी माया गोळा तिच्या नावावर पोलीस तपासात नमूद आहे. आपण जो काळा व्यवसाय करतोय त्यात कधी ही आपल्याला अटक होऊ शकते हे लक्षात घेऊन धर्मराज काळोखे आणि बेबी पाटणकर यांचे कुटूंब ऐशो-आरामाचं आयुष्य जगत होते. सचिन तेंडुलकरची शेवटी मॅच असो की, आयपीएलच्या मॅच असो अगदी व्हीआयपी तिकिटांवर त्यांनी मॅच बघितल्या आहेत. शिवाय पिकनिक म्हणून देशभर भ्रमंतीदेखील केलीय.धक्कादायक बाब म्हणजे अंमली पदार्थ तस्करीच्या या काळ्या धंद्यात बेबी पाटणकरची दोन मुले, सुना आणि जवळपास सर्वच नातेवाईक मदत करत होते

या सर्व प्रकरणात उडालेला धुरळा जसजसा खाली बसत गेला तसतसा पोलिसांनी या प्रकरणातील सगळ्या प्रकरणाचा गेम केला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ( फोरेन्सिक सर्च लेबोरेटरी - एफएसएल ) दिलेल्या अहवालात काळोखेकडून जप्त करण्यात आलेला हा १२२ किलो अमली पदार्थांचा साठा एमडी नसून तो चायनीज पदार्थांमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो असल्याचे निष्पन्न झाले ! दरम्यान दोनेक महिने उलटून गेले होते, प्रसारमाध्यमांनी या बातमीतले टीआरपी मूल्य संपल्यावर त्यावर थुंकणे देखील पसंत न केल्याने या बातमीला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात मात्र याविषयीच्या छोट्या बातम्या छापून आल्या. याच काळात बेबीचे जमीन अर्ज या अहवालाअभावी फेटाळले गेले होते, एफएसएलचा अहवाल आल्याबरोबर तिने परत एकदा जामिनाचा अर्ज केला. १५ जुलैला तिला जामीन मिळाला देखील. याच वेळेस अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या अारोपाखाली अटक असलेला बेबीचा मुलगा, सतीश पाटणकर, तस्कर सॅम्युअल आणि इतर तिघांनाही न्यायालयाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. अशा प्रकारे अकरा जण जामिनावर सुटले आणि आता पाळी होती भास्कर काळोखेची ! गमतीची बाब अशी की तो देखील ८ ऑगस्ट रोजी जामिनावर सुटला आणि या खटल्याची पूर्ण वाट लागली…

एनडीपीएस ( नार्कोटिक ड्रग्ज एन्ड प्सायकोटिक सब्सस्टन्स एक्ट ) या कायद्याखाली अटक केलेल्या आरोपींना कित्येक वर्षे जामीन मिळत नाही पण इथे सगळ्याच्या सगळ्या डझनभर आरोपींना अवघ्या ३ महिन्यात जामीन मिळाला ही करामत फक्त आणि फक्त आपले पोलिसच करू शकतात. या प्रकरणात अनेक राजकारणी अन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा हात असल्याची खमंग चर्चा रंगू लागली असतानाच एफएसएलचा गमतीदार चायनीज अजिनोमोटो छाप अहवाल कसा काय आला याचे गूढ अजून उकलले गेले नाही ! आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणाची सुरुवात ज्यांच्यामुळे झाली त्या रवींद्र कोंडुसकर यांच्या मालकीच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एमआयडीसीत असणारया ओंकार इंडस्ट्रीवर त्याच दिवशी सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून ३४० किलो मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला होता आणि त्यांतील आरोपींना देखील हीच कलमे लावली होती ! तळेगावजवळील ऊर्से टोलनाक्यावर पकडलेल्या मालाची किंमत ५० कोटी सांगितली गेली होती तर इस्लामपुरात पकडलेल्या मालाची किंमत २०० कोटी सांगितली गेली होती आणि भास्कर -बेबी या जोडीकडील मालाची किंमत १२० कोटी सांगितली गेली होती. यातील कोंडुसकरांच्या एफएसएल अहवालाला गुलदस्त्यात ठेवलं गेलं ! कदाचित तिथं पोलीस अजिनोमोटो रिप्लेस करू शकले नसतील असं काही जण गमतीनं बोलतात.पण या सर्व प्रकरणाची एकंदर हाताळणी बघता सगळं संशयाचं दाट जाळं दिसून येतं. हे सर्व छोटे मासे पाच लाखाच्या किरकोळ जामिनावर बाहेर आल्यावर मोठ्या माशांनी सुटकेचा एकच निश्वास टाकला असेल हे मात्र नक्की !

या सर्व प्रकरणात मती गुंग करणारा युक्तिवाद बेबीच्या वकिलांनी एका फेर अर्जाद्वारे २५ नोव्हेंबर २०१५ च्या दरम्यान केलाय, ते म्हणतात की पोलिसांनी तपासात असं म्हटलंय की आमच्या अशिलाने ( बेबी पाटणकर ) हिने २०१४ च्या वर्षभरात विविध ठिकाणी, वेगेवेगळ्या वेळेत काही लोकांना मेफेड्रोन (एमडी) पुरवले गेले, यावर आम्ही स्वतंत्र युक्तिवाद निश्चित करू पण या संबंधित कालावधीत मेफेड्रोन हा एनडीपीएस अंतर्गत येणारा घटक पदार्थ नाहीये. कारण या संबधीचे नोटीफिकेशन केंद्र सरकारने ५ फेब्रुवारी २०१५ रोजी जारी केले आहे आणि पोलीस तपासातील अशिलावरील नमूद तारखा ह्या तत्पूर्वीच्या आहेत. म्हणून केस निकाली काढावी !!! " याहीपुढे जाऊन बेबी पाटणकरने न्यायालयात जाऊन पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केलेल्या सर्व वस्तू , मालमत्ता , कागदपत्रे परत मागितली आहेत. यात तिने २० मोबाईल सेट, दागिन्यांचे विविध सेट, बंगल्यांची कागदपत्रे, ३ कार, ३५००० रोख रक्कम, मोकळ्या जागांचे सात-बाराचे उतारे, विविध बँकांची कागदपत्रे इतकंच परत मागितलं आहे. आमचा दूधवाला ६० वर्षे झाले दुधाचा व्यवसाय करतो त्याच्याकडे यापैकी काहीही नाही, एक दुध विकणारी बाई कागदोपत्रीची इतकी माया गोळा करू शकते तिची दोन नंबरची बिना कागदपत्राची किती माया असेल ? अन तिच्या या मायाजालात किती पोलीस अन किती राजकारणी असतील ? प्रत्येक शहरात अशा किती बेबी अन किती भास्कर असतील ? कधी आपल्याला अशा प्रकरणातील सत्य कळेल का ?एमडीला गुन्हेगारी जगतात म्याऊम्याऊ या नावाने देखील ओळखले जाते, तर पोलिसांनी या प्रकरणी मेरी बिल्ली मुझी को म्याऊ हे देखील शिताफीने होऊ दिले नाही की काय असं मनात वारंवार येत राहतं. या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत,उलट डोक्याचे मात्र दही निश्चित होते.…

माफिया क्विन म्हणून चर्चेत आलेल्या बेबीला पोलिसांनी अटक करून तिच्या कुकर्मात सहभागाीदार असणार्‍या काहीच पोलिसांचे निलंबन करुन बळीचा बकरा तर बनविला मात्र अशा बेबी घडतातच कशा ? दूधाचा धंदा राजरोसपणे नशेचा धंदा होतो… करोडो रुपये त्यातून कमवले जातात. एकमेकांना मदत करणारेच एकमेकांचे शत्रू बनतात आणि मग सुरु होतो खबर्‍यांचा सिलसिला…

हिंदी सिनेमात प्रतिबिंबित होणारा हा मसाला बेबी पाटणकरच नव्हे तर बहुतांश गुन्हेगारांच्या आयुष्याचाच भाग असतो. बेबी पाटणकरला म्हणे तिच्या मुलाने तु हा धंदा बंद कर नाहीतर मी आत्महत्या करतो. असा तगादा लावल्याने बेबीने डॅग्जचा व्यवसाय मंद केला होता… बंद नाही. मात्र यातून मिळणार्‍या बक्कळ पैशाची हाव तिच्या साथीदारांना सुटत नव्हती. त्यातूनच तीचा ठावठिकाणा देणे, रोकड कुठे आहे याच्या टिप्स देणे, ती कोणत्या एसटीने प्रवास करणार आहे, याबाबतच्या कल्पना पोलिसांना देणे अशी खबरबाजी सुरु झाली… आणि बेबी पोलिसांच्या जाळ्यात सापडली. या प्रकरणातला मुद्दा असा आहे की, खुद्द पोलिसांनाच हाताशी धरुन करोडो रुपयांचे साम्राज्य उभारणार्‍या बेबीचे वास्तव्य इतके दिवस पोलिंसाच्या सहवासातच असताना तिला पकडण्याची गजर का नाही पडली ? तिच्या सहकारी पोलिसांनी जमा केलेली माया इतरांना दिसली नाही का? हा विषय फक्त बेबीच्या प्रकरणातला नाही तर राज्यभरातल्या अनेक गुन्ह्यात थेट पोलिसांचाच वरदहस्त असतो… जसा की बेबीच्या प्रकरणांत खुद्द एका पोलिस उपायुक्त दर्जाज्या अधिकार्‍यावर संशयाची सुई फिरते आहे..नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, औरगाबाद, मुंबई या महत्वाच्या शहरात सुरु असणारा गुडांचा राजरोस हैदोस पाहता पोलिस आणि राजकीय पक्षांच्या मदतीनेच तर गावगुडांचे पृथ्थकरण करण्याचे काम सुरु असल्याचे दिसते.

पोलीस हा जनतेचा मित्र असल्याचे सांगितले जाते, पण जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असते. त्याला कारण, त्याच्या अंगावरची खाकी वर्दी.. या वर्दीच्या आतला माणूस नेहमीच सामान्यांसाठी गूढ असला, तरी तो माणूसच असतो. त्याला भावना असतात, वेदना असतात, विवंचनाही असतात. कधीतरी त्यातूनच तो वैफल्यग्रस्त होतो, आणि स्वतःचे बरेवाईट करून घेतो. मग त्याच्यातल्या माणसाच्या वेदनांचा शोध सुरू होतो. आपल्या मुलाबाळांना चांगले आयुष्य देऊ शकत नाही या विवंचनेत तो कायमच असतो. त्यातूनच तो नैराश्याच्या पायर्‍या चढत जातो आणि शेवटी एका टोकाला जाऊन एकतर आत्महत्या करतो वा या तणावामुळे ग्रासल्याने अतिरक्तदाब, मधुमेह, नैराश्य यामुळे त्याला अकस्मात मृत्यू येतो. त्याच्या पश्चात कोणी त्याच्या कुटुंबीयांची काळजी घेत नाही. सेवानिवासस्थानही सहा महिन्यात रिक्त करावे लागते. वरिष्ठांकडे खेटे टाकूनही त्याच्या कुटुंबीयांना दाद मिळत नाही. भविष्यातील ही आपली स्थिती त्याला सतत पोखरत असते. यातून आपली कधीही सुटका नाही, याचीही त्याला कल्पना असते. या परिस्थितीतीत आपल्याला व आपल्या मुलांना खितपत पडायला लागू नये…नोकरी अहे तोवरच कमाई करायची…या भावनेने पोलिस विश्‍वात उचल खाल्लेली दिसते. म्हणूनच निलंबित करण्यात आलेले पाच पोलिस हे समुद्रातले फक्त पाच मासे आहेत…अख्खे समुद्र स्वच्छ करण्याचे आव्हान सिस्टमपुढे आहे…हे सोप्पे नाही. खाकी वर्दीतलीच नव्हे तर कोणत्याही वर्दीतली खा-खा जोपर्यंत पूर्णत: नेस्तनाबूत होत नाही, तोपर्यंत समाज सुरक्षित होणार नाही… तोपर्यंत बेबी पाटणकरसारख्यांच्या माध्यमातून गर्द, नशा, बारचा विळखा समाजाला पडतच राहणार आहे. सर्वच पोलीस भले असे नसतील, त्यात काही अपवाद देखील असतील. पण एकुणातच त्यांचे प्रमाण किती असेल याचे उत्तर अधिक निराशाजनक येते.

२५ नोव्हेंबरच्य बेबीच्या अर्जावर अजून न्यायालयाचा निकाल यायचा आहे, पण मला खात्री आहे की पोलिसी सेटलमेंट केलेली कागदपत्रे आणि अहवाल, पुरावे याच्या आधारावर हे बारा जण निर्दोष सुटतील. निलंबित झालेले पोलीसही रीतसर हळूच सेवेत देखील दाखल होतील. पोलिसांची 'बेबी' पुन्हा कामाला लागेल अन एके दिवशी ह्या अजिनोमोटोचे चायनीज सगळे मिळून कुठे तरी शांघाय- बीजिंगला जाऊन खातील ! इकडे रेव्ह पार्ट्या चालूच राहतील, तरुण पोरे त्यात बळी पडतील, त्यात अजिनोमोटो नसणार आहे त्यात असणार आहे ते मेफेड्रोन! एमडी ! म्याऊ म्याऊ !! शिवाय रेव्ह पार्ट्या म्हणजे चरायला डबल कुरण, त्यात दोन्ही तिन्ही बाजूंनी भरपेट खाता येतं . ते कसं हातचे जाऊ द्यायचे ? हे सगळं होत राहील अन तुम्ही आम्ही नेहमीप्रमाणे बघ्याच्या भूमिकेतच राहू, आपण पांढरपेशे याहून अधिक काय करू शकतो ?

'कधी कधी निर्मनुष्य रस्त्यावर एखादा पोलीस भेटलाच तर हायसे वाटण्याऐवजी बरयाचदा भीती वाटते ' असं सांगणारी काही माणसे मला आजपर्यंत भेटली आहेत … या वाक्याचा नेमका अर्थ लावण्याचा प्रयत्न मी अजूनही करतो आहे ..

- समीर गायकवाड

( या लेखातील फोटो हा रेव्ह पार्टीत पकडल्या गेलेल्या मुलींचा आहे, बुरख्याच्या आड दडलेल्या या मुलींमध्ये आपल्या परिचयाचं कोणी तरी असू शकतं हा विचार कासावीस करून जातो. )