Friday, November 27, 2015

'ब्रूस ली' ची अदभूत गाथा ....एका हातावरचे ५० चिन अप्स तो मारू शकत असे, तो तांदळाचा दाणा हवेत भिरकावून त्याला हवेतच चॉपस्टिकच्या सहाय्याने तोडत असे, कोका कोलाच्या सीलबंद डब्यात तो आपली बोटे घुसवू शकत असे, सहा इंच जाडीची लाकडी फळी मोडणे त्याचा एका सेकंदाचा खेळ होता, हाताचे अंगठे आणि तर्जनी यावर तो एका मिनिटात ५० डिप्स मारत असे, त्याच्या हालचाली इतक्या वेगवान असत की सेकंदाला २४ फ्रेम या गतीने त्या चित्रित होऊ शकत नसत म्हणून प्रतिसेकंद ३२ फ्रेम या गतीने त्या चित्रित कराव्या लागत, सीटअपच्या व्ही पोझिशनमध्ये तो ३० मिनिटे बसून राहू शकत असे, आपल्या बुक्कीने तो ९० किलोच्या थैलीस हवेत उडवत असे अन साईड किकच्या आधारे छत कोसळवू शकत असे, एखाद्या व्यक्तीने त्याची खुली मुठ बंद करण्यापूर्वीच तो त्याच्या हातातील एक डाईम काढून त्याऐवजी हातातील दुसरे नाणे सरकावू शकत असे इतका त्याच्या हालचालीचा वेग होता, त्याचा हाताच्या खालच्या दिशेने केलेला प्रहार सेकंदाच्या पाचशेव्या भागाइतका गतिमान असायचा, असे अद्भुत कारनामे करणारा तो म्हणजे अर्थातच ब्रूस ली !! मार्शल आर्ट्सचा अनिभिषिक्त शहेनशहा ! कराटेचा बादशहा ! कुंग फु चा राजा ! ब्रूस ली !!

अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असणाऱ्या चायना टाऊनमधील एका चीनी इस्पितळात ब्रूस ली चा जन्म २७ नोव्हेंबर १९४० ला झाला. पण त्याचं बालपण हाँगकाँगमध्ये गेलं. प्रतिस्पर्धी गँगबरोबर तिथल्या रस्त्यांवर त्याच्या मारामाऱ्या व्हायच्या. अशाच एका गँगबरोबर झालेल्या मारामारीत हरल्यानंतर वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याने मार्शल आर्ट्सचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. एकीकडे हे प्रशिक्षण सुरू असताना त्याच्या रस्त्यांवरील मारामाऱ्याही वाढत होत्या. अशाच एका मारामारीच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला पकडलं. आपल्या मुलाच्या या कारनाम्यांनी त्रासून ब्रूसच्या वडिलांनी हाँगकाँग सोडण्याचा निर्णय घेतला. नाइलाजाने घेतलेला हा निर्णय मात्र ब्रूस लीचं आयुष्यच बदलवणारा ठरला.

शालेय शिक्षणाशी त्याचं फारसं कधी जमलंच नाही. तरीही अमेरिकेत त्याने ते कसंबसं पूर्ण केलं. त्यानंतर युनिव्हसिर्टी ऑफ वॉशिंग्टनमध्ये ड्रामा विषयात डिग्रीचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली. शिक्षणाची गाडी सुरू असतानाच त्याच्यातलं मार्शल आर्ट्स मात्र त्याला स्वस्थ बसू देईना. अमेरिकेतच त्याने मार्शल आर्ट्स शिकवायला सुरूवात केली, तेव्हा त्याचं वय होतं १८. कॉलेज सोडून देऊन त्याने जेम्स यीम ली या स्वत:च्या साथीदाराबरोबर मार्शल आर्ट शिकवण्यावरच लक्ष केंदित केलं.

ब्रूस ली ENTER THE
 DRAGON 
ब्रूसचे वडिल ओपेरा स्टार असल्यामुळे अभिनय त्याच्या रक्तात होताच. १८ व्या वर्षापर्यंत तब्बल २० सिनेमांमध्ये त्याने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. अमेरिकेत गेल्यानंतरही त्याने वेगवेगळ्या सीरिअल्स तसेच सिनेमांमध्येही कामं केली होती. 'द काटो शो'सारख्या कार्यक्रमांमधून थोडंफार नाव कमावलं असलं तरी म्हणावं तसं यश काही त्याला मिळालं नव्हतं. त्यामुळे कंटाळून तो हाँगकाँगला परत आला. काटो शोमुळे आपण स्टार झालो असल्याचं त्याला हाँगकाँगमध्ये आल्यावर जाणवलं.

रेमण्ड चावो यांनी त्याला 'द बिग बॉस' या सिनेमासाठी करारबद्ध केलं आणि रस्त्यावर मारामारी करणारा ब्रूस ली जगभरातल्या रस्त्यांवर पोस्टर्सच्या माध्यमातून झळकला. त्यानंतर मात्र 'फिस्ट ऑफ फ्युरी', 'वे ऑफ द ड्रॅगन' आणि 'एण्टर द ड्रॅगन' (मरणोत्तर) या सिनेमांमधून तो जगभराचा अक्षरश: स्टार झाला. पण हॉलिवुडच्या या विलक्षण स्टारचा जीवनप्रवासही तितक्याच गूढपणे संपला. 'एण्टर द ड्रॅगन'साठी डबिंग करत असतानाच तो जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला. 'एण्टर द ड्रॅगन' हा १९७३ मधला सर्वोच्च कमाई करणारा चित्रपट ठरला होता. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी मार्शल आर्ट्सच्या या मास्टरने आपले कराटेचे धडे गिरवणं थांबवलं ते कायमचंच. 'ननचक्स' हे शस्त्र लोकप्रिय करण्यात ब्रूस लीचा मोठा वाटा होता. आपल्या सिनेमांमध्ये मारामारी करताना तो या ननचक्सचा वापर हटकून करायचाच.जगातील तमाम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चायनिज अभिनेत्याच्या चित्रपटांना चीनमध्ये मात्र प्रदशिर्त होण्यास मज्जाव होता. आता मात्र त्याच चीनमध्ये या ब्रूस लीचा तब्बल १९ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे 'गेम ऑफ द डेथ' हा सिनेमा पूर्ण व्हायच्या आधीच मृत्यूच्या या खेळात २० जुलै १९७३ रोजी ब्रूसला हार पत्करावी लागली.

ब्रूस स्टाईल
 
'इल्युमिनेटी' या आत्मा आणि परकाया प्रवेश यावर काम करणाऱ्या संस्थेचे नाव ली चे नातेवाईक त्याच्या मृत्युच्या अनुषंगाने घेतात. अमेरिकेतील या संस्थेच्या कारवाया विरोधात अब्राहम लिंकन बोलू लागले ज्यामुळे या संस्थेने त्यांची हत्या केली गेली असं मानणारे लोक आजही आहेत. ब्रूस ली या संस्थेच्या संपर्कात होता अन तो परकीय आत्म्यांशी अनिश्ष्ट राक्षशी आत्म्यांशी बोलायचा असं ब्रूस ली च्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्याचा मृत्यू इल्युमिनेटीसाठी त्यांनी पूर्वीच निश्चित केला होता असंही बोलले जाते. If you spend too much time thinking about a thing, You will never get it done" Bruce Lee हे त्याचं प्रसिद्ध वाक्य तो याच संदर्भात बोलला होता असे त्याचे नातेवाईक तेंव्हा सांगत.

फेमस पोझमध्ये ब्रूस  
ब्रूस ली चा मार्शल आर्टशी पहिला परिचय त्याचे वडील ली होई च्युन यांच्यामुळेच झाला, त्यांनी ब्रुसला वू शैली मधील ताई ची चुआन मधील बेसिक्स शिकवले आणि विंग चुन चे शिक्षण त्याने मास्टर यीप मेन कडून घेतले होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी यिप मेन कडून विन चुन ह्या कुंग फु च्या सर्वात जटील आणि ताकदवान पद्धतीचे शिक्षण घेतले होते.

एड पार्कर च्या निमंत्रणावरून ब्रूस ली १९६४ मध्ये लॉन्ग बीच इंटरनेशनल कराटे चैंपियनशिपसाठी आला होता. त्यात त्याने खांद्याच्या अंतरावरती फक्त दोन्ही हाताचे अंगठे आणि तर्जनी यावर ५० डिप्स मारले होते. याच स्पर्धेत त्यांनी एक इंच हालचालीचा कराटेचा शॉट मारला होता. यात डाव्या हाताची हालचाल न करता उजव्या गुडघ्यावर किंचित झुकून उजव्या हाताच्या तळव्याची फक्त एक इंच इतकीच हालचाल करून समोरच्याला फर्लांगभराचा झटका दिला होता. ली १९६७ मध्येही लॉन्ग बीच इंटरनेशनल कराटे चैंपियनशिपसाठी पाहुणा म्हणून हजर झाला होता, यावेळी त्याने USKA विश्व कराटे चैंपियन विक मूर च्या विरोधात नॉन स्टोप शॉटस वापरले होते. यात त्याने मूरला सांगितले होते की त्याने फक्त ब्रूसचे शॉटस अडवायचे आणि ब्रुसने फक्त मूरच्या चेहऱ्यावरच शॉटस मारायचे परंतु मूर एकही शॉट अडवू शकला नाही.

स्क्वाट, पुश अप, रिवर्स कर्ल, काँसंट्रेशन कर्ल, बेंच प्रेस रिस्ट कर्ल, रिवर्स रिस्ट कर्ल, तीन सेट बाईसेप कर्ल याचा समावेश त्याच्या व्यायामात होता. यातील प्रत्येक सेटचे हा ६ ते १२ वर्कआउटचा असायचा. ब्रूस रोज सकाळी ७ ते ९ पोटाचे, लवचिकतेचे आणि रनिंगचे व्यायाम करत असे, ब्रूस ली च्या मते पोट हा सर्वात महत्वाचा अवयव होता. १५ ते ४५ मिनिटात सहा मैल धावण्याचा समावेश यात होता पण धावताना दर ३ ते ५ मिनिटाला तो गती बदलायचा. रस्सीवरून उड्या मारायचा व्यायाम देखील तो रोज करत असे. सायकलवरून ४५ मिनिटात ६ मैल समकक्ष चालविण्याचा व्यायाम तो याच्या नंतर करत असे. हे सर्व झाल्यावर ८०० उड्या मारण्याचा व्यायाम तो करत असे. आपल्या हाताची त्वचा बळकट व्हावी म्हणून गरम वाळू आणि खडी यांनी भरलेल्या बादलीत हात खुपसण्याचा व्यायाम ५०० रीपिटेशनने करत असे.

ब्रूसची आवडती वेशभूषा   
स्वास्थ वर्धक आहार, उच्च प्रोटीन पेय आणि विटेमिन व मिनरल्सने परिपूर्ण अशा आहारात त्याची रुची होती. जंक फूड आणि भाजलेले अन्न तो पूर्णतः टाळायचा. प्रोटीन पेय मात्र वयाच्या तिशीत गेल्यावर त्याने बंद केले होते. भाज्या, फळे, अजवाइन आणि गाजर यांचा ज्यूस तो घेई असं त्याच्या पत्नीने नमूद केले आहे. ब्रुसला त्याची पत्नी लिंडा हिच्या पासून ब्रेंडन हा मुलगा आणि शेनोन ही मुलगी होती.

वयाच्या ३३ व्या वर्षी अचानक झालेल्या मृत्युनंतर ब्रुसलीचे शवविच्छेदन केले गेले. त्यात त्याच्या शरीरात इक्वाजेसिक आणि भांग आढळले होते. त्याचा मेंदू १४०० ग्राम वरून १५७५ ग्राम इतका वाढला होता. १३ टक्के मेंदूच्या आकारात वाढ सुजेमुळे झाली होती. भांग आणि इक्वाजेसिक मुळे स्नायू शिथिल होतात पण त्यामुळे मृत्यू क्वचितच होऊ शकतो आणि सापडलेले घटक अल्प प्रमाणात होते. या सर्व गुंतागुंतीमुळे त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे नेमके कारण निश्चित होऊ शकले नाही. त्याच्या मृत्यूनन्तर त्याचे शव सिएटलमध्ये आणले गेले आणि तेथील लेकव्यू कब्रिस्तान मध्ये पॉइंट २७६ इथे ३१ जुलै १९७३ रोजी त्याचे दफन करण्यात आले .ब्रूसचा ज्या अवस्थेत मृत्यू ओढवला होता तशीच शारीरिक अवस्था त्याने १० मे १९७३ रोजी अनुभवली होती. गोल्डन हार्वेस्ट च्या स्टूडियोत 'एंटर द ड्रेगॉन' या सिनेमाच्या डबिंगच्या वेळेस तो अचानक बेशुद्ध झाला होता त्याला झटके देखील आले होते आणि त्याचा मेंदू त्याला गरगरल्यासारखा वाटत होता. यावेळेस त्याला डॉक्टरांनी मेनीटोल हे मेंदूच्या सुजेचे औषध दिले होते. त्यामुळे तो लगेच पूर्ववत बरा झाला होता.मृत्युच्या दिवशी हीच सर्व लक्षणे पुन्हा आढळली होती. मृत्युच्या दिवशी हॉंगकॉंगमध्ये त्याने त्याचे रुटीन दुपारी ४ पर्यंत व्यवस्थित पार पाडले त्यानंतर त्याला फक्त किंचित डोके दुखल्यासारखे वाटले आणि तो रात्रीचे ७.३० वाजता एक डुलकी घ्यायला गेला पण ती त्याची चिरनिद्रा ठरली, इस्पितळात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

देखणा ब्रूस 
ब्रूसलीच्या मृत्यू नंतर २० वर्षांनी त्याचा मुलगा ब्रेंडन ली हा 'द क्रो' या सिनेमाच्या शुटींग मध्ये अत्यंत धक्कादायक पद्धतीने निधन पावला. या सिनेमातील एका प्रसंगात पिस्तुलमध्ये पुंगळ्याच्या ऐवजी खरया गोळ्या वापरल्या गेल्या आणि पूर्ण पिस्तूल ब्रेंडनच्या शरीरावर मोकळे केले गेले, तो जमिनीवर कोसळला तेंव्हा तो मृत्युमुखी पडला होता. ब्रेंडन आपल्या वडिलांपेक्षाही अधिक चपळ आणि ताकदवान होता. त्याचे दफन त्याच्या पित्याच्या थडग्याजवळच करण्यात आले. ब्रूसची मुलगी शेनोन हिने अभिनय करून पाहिला पण त्यात यश न मिळाल्यामुळे तिने सिनेमाचा नाद लवकरच सोडून दिला. ब्रूस लीच्या कुटुंबाला शाप होता अशी वदंता आजही चीनमध्ये आढळते.६० च्या दशकापासून पुढे जन्माला आलेल्या जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आपला एक स्वतंत्र ठसा उमटवून गेलेल्या या उमद्या व्यक्तीमत्वाच्या माणसाचा अकाली मृत्यू आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या तरुण देखण्या मुलाचा चटका लावून गेलेला मृत्यू यामुळे आजही हळहळ वाटते. ब्रूस ली हा किशोर वयात सर्वांच्या शरीरात, मनात सामावतो अन अखेर पर्यंत अधून मधून आपलं अस्तित्व मारामारीच्या आक्रमक खुमखूमीतून दाखवून देत असतो.

पडद्यावरीलच नव्हे तर वास्तविक जीवनातील या खऱ्याखुऱ्या महानायकाची जागा रिकामी झाली ती कायमचीच, त्याची पोकळी भरून काढेल असं कोणीही झालं नाही. लोकांच्या मनामनात रुतून बसलेल्या या महानायकास आज त्याच्या जन्मदिनानिमित्त त्रिवार सलाम !!


- समीर गायकवाड .