Thursday, November 26, 2015

कामटे साहेब, जमल्यास आम्हाला माफ करा ….२८ नोव्हेंबर २००८. रक्षकनगर,पुणे. दुपारचे एक - सव्वाएक वाजलेले होते. रणरणते उन्ह डोक्यावर होते तरीही रस्त्याच्या दुतर्फा विमनस्क अवस्थेतील पडलेल्या चेहरयाच्या लोकांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे खिळल्या होत्या, आणि लोकांमध्ये एकच कुजबुज वाढली. सर्वांची अस्वस्थता वाढली. दुरून सायरनचा आवाज येऊ लागला तसे लोकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. कर्णकर्कश्श आवाज करत एम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घोंघावत रोरावणारा आवाज तिथे दाखल झाला. घरातील मंडळींचे तर अश्रुंचे बांध गेल्या कित्येक तासापासून वाहत होते, सर्व वातावरण शोकाकुल होते. अखेर ती वेळ आली अन एम्ब्युलन्सचे दार उघडून तिरंग्यात लपेटलेले ते भूमीमातेच्या वीरपुत्राचे पार्थिव बाहेर काढण्यात आले. अदबीने अन सरकारी इतमामात ते पार्थिव आता घरात आणले गेले. सर्वच जण गलबलून गेले होते, काय बोलावे काहीच सुचत नव्हते, लोक आपल्या अश्रूंना वाट करून देत होते, बाहेरून अमर रहे चा आवाज कानावर पडत होता. तो राजबिंडा देखणा योद्धा मात्र तिरंग्यात शांतपणे पडून होता, त्या सर्व घनगंभीर वातावरणाला छेद दिला त्या लहानग्याच्या शोकाकुल हाकेने ! 'डॅडी, तुम्ही बुलेटप्रुफ जॅकेट का घातलं नव्हतं, यु कम बॅक डॅडी 'अशा शब्दांत तो छोटा मुलगा आपल्या जन्मदात्या पित्याला हाका मारत होता. त्याने मारलेल्या या शोकाकुल हाकेने उपस्थितांचा जीव हेलावला आणि सर्वांचे अश्रुंचे बांध वाहू लागले. त्या लहानग्या मुलाचे नाव राहूल अशोक कामटे ! त्याच्या शेजारी चिरनिद्रेत पडून होते ते भारतमातेचे थोर सुपुत्र शहीद अशोक कामटे !!

२६ नोव्हेबरच्या मुंबईतील दहशतवाद्यांचा धैर्याने सामना करताना कामटे शहीद झाले आहेत, याची कल्पना त्यांचा मोठा मुलगा अर्जुन, वडील मारूतराव, पत्नी विनिता यांना होती, पण लहानग्या राहुलला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हती. वडिलांचे पाथिर्व पाहिल्यावरचा त्याचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. कामटेंचे पाथिर्व गुरुवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमाराला मुंबईहून रक्षकनगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पाथिर्व आणण्यात आले. तेथे अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. शोकाकुल लोकांच्या रांगा त्या दिवशी त्या रस्त्यावर उभ्या होत्या.

अशोक कामटे यांच्या भगिनी शमिर्ला सराफ या दुबईहून पुण्यात पोहचल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला त्यांचे पाथिर्व भव्य मिरवणुकीद्वारे वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यावेळी विविध संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यर्कत्यांनी 'शहीद अशोक कामटे अमर रहे'च्या घोषणा दिल्या होत्या. पुणे शहराच्यावतीने महापौर राजलक्ष्मी भोसले, सर्व राजपत्रित अधिकारी आणि विविध संघटनांनी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पाथिर्वावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर सरकारी इतमामात बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिल्यानंतर त्यांच्या पाथिर्वावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारवाड्यावर सभेचे आयोजनदेखील करण्यात आले होते.……. आणि काळ मात्रे पाप्यांचे पिशाच्च आपल्या अंगाखांद्यावर खेळवत पुढे सरकत गेला ….

आज २६ नोव्हेबर २०१५… दिनदर्शिकेत दरवर्षी हा महिना येतो, ही तारीख येते, आम्ही अजूनही श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या फोटोंचे डिजिटल फ्लेक्स लावतो आणि आमची बेगडी देशभक्ती बाजारू स्वरूपात मांडतो. देशाचे राज्यकर्ते ट्विटरवरून श्रद्धसुमने अर्पित करतात. लोकं फेसबुक अन व्हॉटसएपच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात. काही ठिकाणी रक्तदान शिबिर होतात, तर कुठे सामाजिक उपक्रम होतात.काही ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, तर कुठे अजूनही लोकं मेणबत्त्याच लावतात ! असं करून हा दिवस मावळतो, २७ नोव्हेंबर येतो आणि आम्ही पुन्हा आमच्या दैनंदिन भोकसेगिरीत रुजू होतो. पुन्हा पुढच्या वर्षीच आम्हाला कामटे आठवतात, मुंबई हल्ला आठवतो, २६/११ ह्या दिवशी आम्ही आमच्याच शहिदांच्या स्मृती आम्ही हाडे चघळावी तशी चावून चावून खातो अन दरवर्षी पुरवून पुरवून वापरतो. आम्ही २६/११ हा एक इव्हेंट केलेला आहे. ज्याप्रमाणे २६ जानेवारी आहे, १५ ऑगस्ट आहे तसंच आम्ही २६ नोव्हेंबरचे करून टाकले आहे !

आम्ही २६/११ चे एक ठोकळेबाज साचेबंद सेलिब्रेशन आमच्या डोक्यात पक्के केलेले आहे. आमच्या पुळचट देशभक्तीचे अचाट प्रदर्शन करण्यासाठी आम्ही या दिवसाचा जमेल तितका वापर करत आहो. कारण त्या पलीकडे आमची मजल जातच नाही, उगाच का इंग्रज आमच्या बोडख्यावर १५० वर्षे बसून होते, उगाच का आम्ही कसबचा मन लावून सांभाळ केला, उगाच का आम्ही याकुब मेमन सांभाळला, उगाच का आम्ही अफझल गुरुचे लांगुलचलन केले ! आम्ही करणार तरी काय कारण आमच्या धमन्यातून वाहणारे लालभडक रक्त कधीच गोठून काळपट होऊन गेलेले आहे, आम्हाला संताप येत नाही आलाच तर तो कायम राहत नाही, आमच्या मुठी वळत नाहीत, आमच्या गळ्यावरच्या शिरा ताणल्या जात नाहीत आमची मनगटे ढिली पडली आहेत, आमच्या मस्तकातल्या मेंदूत सूडाचा वणवा पेटत नाही. आम्ही बथ्थड डोक्याचेच आहोत. सगळे कसे दरवर्षी सालाबादच्या चालीवर आम्ही मागून पुढे नेतो आहोत.

आम्हाला कामटेंच्या हत्येचा बदला घ्यावा वाटत नाही, आम्ही कासाबला खाऊ पिऊ घालून नंतर त्याला फासावर लटकावून समाधानी झालो आहोत ! किती भिकारडे अल्पसंतुष्ट आहोत आम्ही ! लाज वाटते मला कधी कधी की कामटेसाहेब तुम्ही आमच्यासारख्या बाजारबुणग्या लोकांनी भरलेल्या देशासाठी आपले बलीदान दिलेत, अन आम्ही काय दिले तुम्हाला ? एक २६/११ ची छापील पद्धतीची श्रद्धांजली ! आमच्या राज्यकर्त्यांची तर काय थोरवी वर्णावी ? शब्द अपुरे पडतात अशा कृतघ्न लोकांसाठी अन कारभारयांसाठी ! आम्ही नुसते वारं सोडत राहतो हाफिजला मारू, दाऊदला पकडून आणू म्हणून पण आम्ही कृती काय करतो ? ठीक आहे सरकारला काही अडचणी असतील पण जनरेटा तरी कुठे आहे या मागणीसाठी ? आमचा राग संताप हा तात्कालिक पाण्यावरच्या बुडबुडया सारखा अन आमच्या सारख्या करंट्या लोकांसाठी तुमच्या सारख्या वीरांनी बलिदान दिलेत तुम्ही सर ! आम्ही २६/११ वर एक मस्त सिनेमा बनविला आणि पॉपकॉर्न खात बघितला याची आम्हाला शरम वाटत नाही....

कामटे साहेब, आम्हाल माफ करा ! आमच्या सगळ्यांचे माहित नाही पण मी तर तुमच्या मुलाला अजूनही कधी भेटू शकलो नाही कामटे साहेब, पण जरी कधी भेटलोच तर किमान मी तरी तुमच्या मुलाच्या नजरेस नजर देऊ शकणार नाही कारण मी देखील या १२५ कोटी बाजारबुणग्यापैकीच एक आहे आणि वर तोंड करून मी कोडग्याप्रमाणे २६ /११ ला तुम्हाला श्रद्धांजली वाहतो ! त्याशिवाय आम्हाला येते तरी काय ? म्हणून म्हणतो कामटे साहेब आम्हाला माफ करा !! तुम्ही गेल्यानन्तर चांबळी या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील लहानशा गावात कित्येक दिवस चुली पेटल्या नव्हत्या, लोकांचे चित्त स्थिर नव्हते. आजही तिथले लोक तुमच्या साठी अश्रू ढाळतात पण आम्ही ?आमचे काय ? आमचे उत्तरदायित्व कोण ठरवणार आहे की नाही ? आमच्या राज्यकर्त्यांना कोण जाब विचारणार आहे की नाही ? हे सर्व कधी होणार ? तोपर्यंत किती २६/११ ची नुसती पोकळ पारायणे आम्ही करणार ? आम्हाला कशाचीही चाड नाही हेच खरे आहे, तुम्हीच चुकलात सर ! तुम्ही आमच्यासाठी बलिदान द्यायला नको होते, तुमचेही कुटुंब होतेच की ! तुम्हालाही मुलेबाळे अन आईवडील होते, जीवनातील सहचारिणी होती. तरीही तुम्ही गेलात, आम्ही बघा कसे मजेत राहतो आहोत अन शहाजोगपणे श्रद्धांजल्या वाहत आहोत !! आज ७ वर्षे झाली तुम्हाला जाऊन, जरी सत्तर वर्षे झाली तरी आम्ही तसेच राहू ! आपलेराकेश मारिया बघा कसे ललित मोदीना भेटले, त्यांनी कसं मस्त छापून घेतलं आहे, तुम्हीच आपलं देशप्रेम क काय त्याच्या भरात गेलात !

काही वर्षांनी २६/११ काय होते असा प्रश्न पुढच्या फेस्बुकी पिढीने विचारला नाही म्हणजे मिळवले .इतके सर्व असूनही २६/११ ची अन कामटे साहेबांची माहिती द्यावीशी वाटतेच. कारण या दिवसाला गंध आहे तो शहिदांच्या घरच्या लोकांच्या अश्रूंचा अन शहिदांचे रक्त मिसळलेल्या पवित्र मातीचा !


मुंबईवरील हल्ल्याला आज (गुरुवार) सात वर्षे पूर्ण होत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्लाने मुंबई पुरती हादरून गेली होती. यात १६६ लोक मारले गेले तर ३०८ लोक जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता. तर, या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील १४ पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.

शहीद अशोक कामटे यांचे आजोबा नारायण कामटे हे राज्याचे पहिले पोलिस महानिरीक्षक होते. त्यानंतर कामटे यांच्या वडिलांनी लष्करात उल्लेखनीय कामगिरी बजावली. ते कर्नल पदावरून निवृत्त झाले. अशोक कामटे ही कामटे कुटुंबातील देशासाठी लढणारी तिसरी पिढी.कामटे यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५ मध्ये झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी इतिहास आणि इंग्रजी विषयात बीए पदवी घेतली आणि त्यानंतर दिल्ली येथील सेंट स्टीफन कॉलेजमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८९ मध्ये ते आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले. मुळातच खेळाची आवड असणाऱ्या कामटे यांनी स्विमिंग, आर्मर कॉम्बॅटमध्ये पदके मिळवली. शूटआऊटमध्ये त्यांनी पोलिस रेकॉर्डही प्रस्थापित केले आहे. पोलिस उपाधीक्षक म्हणून त्यांनी भंडारा येथे उमेदवारी केली. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. १९९६-९७ च्या दरम्यान डिफेन्स सव्हिर्सेसमध्ये ते रूजू झाले. १९९९-२००० मध्ये ते बोस्निया येथे प्रशिक्षणासाठी गेले. २००६-०८ हे दोन वषेर् त्यांनी सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून आपली कारकीर्द गाजवली. त्यानंतर ते पोलिस सहआयुक्त म्हणून मुंबईत कार्यरत होते. पोलिस दलातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती पदक, युनायटेड नेशन्सचे पदक, स्पेशल सव्हिर्सेेस मेडल, विदेश सेवा मेडलने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दहशदवाद्यांशी दोन हात करण्याच्या या कामगिरीवर जाण्यापूवीर् काही मिनिटेच ते पत्नी विनिता आणि वडील मारुतराव यांच्याशी फोनवर बोलले होते. दहशदवाद्यांनी हल्ला केल्यानंतर कामटे हे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी होते. राज्य गुप्तचर खात्याचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल अरहाना यांच्याबरोबर ते टिव्ही पहात होते. त्यावेळी आपणही या पोलिस कारवाईचा एक हिस्सा असायला पाहिजे, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांचा मोबाइलवर कामटे यांना कारवाईमध्ये सामील होण्याविषयी आदेश देणारा फोन आला. काहीतरी करून दाखवण्याची हीच संधी आहे, असे म्हणून ते बाहेर पडले.

२६/११ या मुंबईवरील हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी शहीद झालेले अशोक कामटे यांची जिगरबाज IPS अधिकारी अशी ओळख राहिली असली तरी त्यांची पोलिस दलात मात्र ओळख होती एक 'MR. बॉडीबिल्डर' म्हणून. महाराष्ट्र पोलिस दल देशातील सर्वात ताकदीचे दल म्हणून परिचित आहे. त्याचमुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी गुन्हेगारी आहे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलिस चोखपणे आपली जबाबदारी पार पाडतात. गुन्हेगारी प्रकरणांचा तपास लावण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हातखंडा मानला जातो. याचबरोबर इतर क्षेत्रातही महाराष्ट्र पोलिसांनी आपले नाव रोशन केले आहे. अशोक कामटे हे एका शूर कर्नलचे पुत्र असल्याने लहानपणापासूनच त्यांना घरात व्यायामाचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे लहानपणापासून पिळदार शरीर बनविल्याने अशोक कामटेंनी महाविद्यालयीन काळात बॉडी बिल्डिंगचा छंद लागला. तो तालमीच्या आखाड्यासोबत जिममध्ये जाऊ लागले. मेहनती व व्यायमाचा छंद जडल्याने त्या काळात अशोक कामटे यांनी अनेक ठिकाणी बॉडी बिल्डिंग स्पर्धा जिंकल्या होत्या. त्याचदरम्यान अपार अभ्यास व शारीरिक कष्ट घेत IPS अधिकारी झालात. त्यानंतरही त्यांनी पोलिस दलातून बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यश मिळवले. पुढे यूएनचे मेडल जिंकले. त्याचमुळे अशोक कामटेंची पोलिस दलात MR. बॉडी बिल्डर म्हणून ओळखले जाऊ लागले.

अशोक कामटे मूळचे पुण्याजवळील सासवडचे. मात्र त्यांच्या कटुंबियांचे वास्तव्य पुण्यातील पिंपळे निलख परिसरात आहे. १९८९ च्या IPS बॅचचे अधिकारी राहिलेले कामटे एक सर्वात यशस्वी गणले गेले आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आईपीएस) अधिका-यांपैकी सर्वात वेगळी छाप त्यांनी सोडली होती. त्यांनी अपहरण केलेल्या व दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी खडतर प्रशिक्षण घेतले होते. त्याचमुळे मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कामटे त्यांच्यावर तुटून पडले होते. २६/११ हल्ल्यादरम्यान अशोक कामटे यांच्याकडे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांशी लढताना मुंबईतील कामा हॉस्पिटलजवळ कामटे शहीद झाले होते. कामटे यांच्या पराक्रमाला अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटेंच्या पत्नी विनिता यांनी आपल्या बहाद्दुर पतीवर पुढे 'टू द लास्ट बुलेट' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात विनितानी अशोक कामटे यांचा जीवनपटच त्यात लिहला आहे. २६/११रोजी मुंबई हल्ल्याच्या रात्री अशोक कामटेंनी आपली पत्नी विनिता व मुलांशी केलेली बातचीत याची माहिती दिली आहे. त्यानंतर तासाभरात कामटे शहीद झाले होते. विनिता कामटे यांनी लिहलेले पुस्तक वाचताना अंगावर काटे उभे राहतात.

अनुत्तरीत प्रश्नांच्या गर्तेत अन वैयाक्तीक उत्तरदायित्वाच्या शोधात आम्ही अजूनही ठेचकळत आहोत ! तुमचे बलिदान आम्हाला दीपस्तंभासारखे दिशादायी ठरो ही अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा तुमची माफी मागतो.....

- समीर गायकवाड.