Wednesday, November 25, 2015

उमादेवी ते टूनटून - एका सप्तरंगी स्वप्नाचे दशावतार ...१९४०-४५चा काळ होता, कृष्णधवल सिनेमा बाळसे धरू लागला होता, बोलू लागला होता, गाऊ लागला होता तेंव्हाची ही गोष्ट आहे. रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक.१२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, "मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !" नौशादजींना तिचे वाईटही वाटले अन कौतुकही वाटले.

ती उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा खेड्यातून पळून रेल्वेने थेट मुंबईला आली होती. नौशादजींचा पत्ता पहाटेपासून धुंडाळत ती त्यांच्या घरी आली होती. त्यांनी आधी तिची सर्व सोय केली. तिच्या गावाकडे कळवायला सांगितले. पण ती अगदी बालवयात असताना तिचे आईवडील वारले होते, त्यानंतर तिचे मोठे भाऊ आणि काका यांनी तिचा सांभाळ केला होता. तिची गावाकडे अजिबात ओढ नव्हती अन तिथे तिची मायेची माणसे नव्हती. गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे. या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती . नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ....गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता ...

त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही. तिने नौशादजीचा हात पाठीवर असल्याने कोणताही विचार न करता करारावर स्वाक्षरी केली. तिला गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द,दिल्लगी,चांदनी रात, नाटक ! पैकी 'दर्द' मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं 'अफसाना लिख रही हुं' ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले (काही वर्षापूर्वी तिच्या 'अफसाना लिख रही हुं ..' रिमिक्स देखील आलं होतं) सुरैयाबरोबरचे 'बेताब है दिले दर्द…' ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. तिच्या दोनच वर्षातील हिटस मुळे ती जोहराबाई, नूरजहां अन शमशाद बेगम यांच्या पंक्तीत जाऊन बसली. दर्द नंतर मेहबूब खानच्या 'अनोखी अदा' मधलं 'काहे जिया डोले ..' आणि 'दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया..'हे गाणंही हिट झालं .जेमिनी स्टुडियोशी काम करण्याची परवानगी कारदारनी दिल्यावर तिने १९४८ मधील एस.एस.वासनच्या 'चंद्रलेखा' मध्ये 'सांझ की बेला ...' या हिट गाण्यासह तिने सात गाणी गायली होती !

याच काळात एक अनोखी घटना घडली जिने संगीताचा अन हिंदी सिनेमाचा इतिहास बदलला गेला ! १९४९ चं साल उजाडलं होतं. प्रख्यात निर्माते खेमचंद प्रकाशनी त्यांचा महत्वाकांक्षी चित्रपट 'महल' फ्लोअरवर आणला होता. हा सिनेमा पुढे अशोककुमारचा मास्टरपीस म्हणून गणला गेला. या सिनेमातील 'आयेगा, आयेगा आनेवाला ……" हे गाणं नौशादजीं अन खेमचंद प्रकाश यां दोघांनाही उमादेवी कडून गाऊन घ्यायचे होते. खेमचंद प्रकाश यांचे अन नौशादजींचे नाते ऋणानुबंधाचे होते पण ए.आर.कारदारशी केलेला करार उमादेवीला आडवा आला अन हे गाणं लता मंगेशकरांकडे गेले ! या गाण्याने सुवर्णाक्षरातील इतिहास निर्माण केला. लता मंगेशकर एका रात्रीत स्टार गायिका झाल्या ! उमादेवी मात्र करारात बांधली गेल्यामुळे अशा संधींना मुकत गेली अन तिला हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. ती कामासाठी फिरू लागली... पण ती हार मानणारयापैकी नव्हती...

त्या काळातील अनेका स्ट्रगलरपैकी ती देखील एक स्ट्रगलरच होती. ती आता गव्हाळ वर्णाची, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची नवतरुणी होती, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हती पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. संघर्षाची तिची सर्व तयारी होती. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागली. अशीच दोनेक वर्षे प्रतीक्षेत गेली धड गायकीचे काम नाही अन हातात कोणता सिनेमा नाही यामुळे ती तणावग्रस्त झाली, तिचे ग्रंथी संतुलन ( हार्मोनल बेलन्स ) बिघडले, तिचे थायरोईडस ग्रंथींचे संतुलन बिघडत गेले अन तिची जाडी वेगाने वाढू लागली, शेवटी ज्यांनी गायनात तिला हात दिला होता ते नौशादच तिच्या कामी आले. १९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. यात दिलीप कुमार, नर्गिस आणि मुनव्वर सुलताना यांची मुख्य स्टारकास्ट अन प्रेमाच्या त्रिकोणाची कहाणी होती. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या - मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली अन तिने लगेच होकार कळवला. गायकी वरचा तिचा चरितार्थ अवघड झाल्याने आर्थिक तंगीमुळे वैतागून तिने या भूमेकेतील मधील रिस्क लक्षात घेतली नाही अन लगेच होकार कळवला. पण या सिनेमाने तिला यशही दिले आणि एक शिक्का देखील तिच्यावर मारला. तिचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली ! सिनेमा अफाट चालला, नर्गिस- दिलीपकुमारची जोडी हिट झाली. प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. तिची मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून जन्मास आली. तिचे पूर्ण नाव उमादेवी खत्री ! अशा प्रकारे उमादेवीची नंतर टूनटून झाली अन बघता बघता तिची वाटचाल पाच दशकांची झाली !अफसाना लिख रही हुं

टूनटूनचे एकच ध्यान असायचे, एक बेढब अंगाची, जाडजुड स्त्री. बहुतांश वेळा तिचे पात्र बावळट असायचे. तोंडाचा चंबू करून, अंगाशी फिरकी घेत चालणारे तिचे हे पात्र बहुतांशी ढगळ्या कपड्यात वा घेरदार परकरात असायचे ! तिचा प्रियकर झालेल्या कॉमेडीयन पुरुष पात्रास तिच्यामुळे हशा वसूल करणे अधिक सुलभ जाई, त्यामुळे तिच्याशी काम करायला पुरुष कॉमेडीयन नेहमी उत्सुक असत. तिचे कामच होते प्रेक्षकांना हसविण्याचे अन ते तिने अगदी चोख पार पाडले. तिला पडद्यावर पाहताच थियेटरमध्ये हशा उसळत असे. ती पहिली अशी अभिनेत्री बनली की जिच्यासाठी सिनेमात रोल निर्माण केले गेले अन तिच्या स्टाईलने रोल लिहिले गेले ! चित्र विचित्र कपड्यातली टूनटून कधी असभ्य वा अश्लील विनोदासाठी वादात आली नाही की तिने कुठली तक्रार केली नाही की कसले अफेअर केले नाही, मिळतील ते रोल करत गेली पण तिने कोणत्याही अभिनेत्याशी जोडी बनवली नाही. जॉनी वॉकर,मेहमूद,धुमाळ,आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत तिने सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. तिच्या गाण्याने तिच्यावर मोहित झालेल्या मोहन कुमार या दिल्लीतील तरुणाशी ती विवाहबद्ध झाली. या दांपत्यास दोन मुले अन दोन मुली झाल्या. टूनटूनचा इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला, हा शब्द तिची ओळख होऊन गेला.

टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात तिने काम केलं यावरून तिची लोकप्रियता लक्षात यावी. १९८२च्या नमकहलाल मधील त्यांची गाजलेली शेवटची भूमिका होय. १९९० मध्ये तिने शेवटचा सिनेमा केला. १९९२ मध्ये तिचे पती निवर्तले तर २४ नोव्हेंबर २००३ मध्ये तिचे वृद्धापकाळाने निधन झाले. सिनेमात अनेक जणांनी आपले ध्येय शोधले आहे,क्वचित कुणाला तरी ते मिळते तर उर्वरित लोकांना यश वाकुल्या दाखवत राहते. आपल्या शारीरिक अडचणीलाच उमादेवीने आपला प्लसपॉइंट बनवला अन आपले नशीब आपल्या हाताने लिहिले. तिने दाखवलेले टायमिंग अन छोट्या भूमिकातून लक्षात राहण्याजोगे केलेले काम याची जोड महिला कॉमेडीयनमध्ये पुन्हा तिच्या दर्जाची अनुभवास आली नाही.तिने जवळपास २०० सिनेमे केले यावरून तिची लोकप्रियता लक्षात यावी अन तिचा कालखंडही प्रदीर्घ आहे यावरून प्रेक्षकांनी तिच्यावर किती प्रेम केले होते हे लक्षात येते.

जे टूनटून वर आयुष्यभर टवाळकीच्या दृष्टीकोनातून बघत आले आहेत, त्यांनी किमान एकदा तरी तिचे अफसाना लिख रही हुं ...हे गाणं ऐकावं ! त्यांचं तिच्याविषयीचं मत निश्चित बदलेल !

तिच्या या गाण्याची यु ट्यूब वरील लिंक - https://youtu.be/2G-GEKJ3zdw

हिंदी सिनेमातली पहिली महिला कॉमेडीयन असं बिरूद तिला लावलं गेलं असलं तरी ती एक स्त्री म्हणून तिने तिचे शील आणि संसार दोन्हीही जपले आणि आपल्या वाट्याला आलेले काम उत्कृष्टपणे अन प्रामाणिकपणे यशस्वीरित्या पार पाडले.तिने संसारदेखील सुखाचा केला. हिट सिनेमाच्या यशात खारीचा वाटा असणारया अन पडेल सिनेमात अंगाप्रमाणे दांडगा वाटा असणारया टूनटूनचे नाव चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. " अफ़साना लिख रही हूँ 
दिल-ए-बेकरार का आँखों में रंग भर के तेरे इंतजार का, 
जब तू नहीं तो कुछ भी नहीं है बहार में।
 जी चाहता है मुँह भी ना देखू बहार का, 
हासिल हैं यूँ तो मुझ को जमाने की दौलते 
लेकिन नसीब लाई हूँ एक सोगवार का। 
आजा के अब तो आँख में आँसू भी आ गये, 
सागर छलक उठा मेरे सबर-ओ-करार का…" 
 तिने गायिलेल्या या गाण्याप्रमाणे तिचे आयुष्य अन ध्येय यांचा प्रतीक्षेचा-यशअपयशाचा लपंडाव होत राहिला हे मात्र खरे ! आपल्या कमतरतेवर अश्रू ढाळत बसणारया लोकांना उमादेवी कडून शिकण्यासारखे बरेच काही आहे....

तिचं कोणीही आता फिल्म लाईनमध्ये नाहीये, पण तिच्या स्मृती अजूनही तशाच आहेत थोड्याशा विनोदी अन थोड्याशा काही तरी हरवलेल्या दुदैवाच्या फेरयाच्या....

- समीर गायकवाड.