Tuesday, November 24, 2015

यशवंतराव होळकर - एक उपेक्षित महानायक.....

"भारतीय नेपोलियन असं ज्यांचे वर्णन करावं वाटतं ते यशवंतराव होळकर म्हणजे मराठी इतिहासानं राष्ट्राला दिलेली एक देणगीच आहे. पण मतमतांतराच्या गलबत्यात, जातींच्या द्वेषात आणि मुख्यत: आमच्या ऐतिहासिक पुरुषांबद्दलच्या उदासिनतेत ही तेजस्वी व्यक्तीरेखा हरवून गेलेली होती. हातांचा उपयोग परक्या धन्यांच्या समोर मुजरे करण्यासाठी ज्या काळांत लोक करीत होते त्या काळात समर्थपणे समशेर पेलून तिच्या टोकानं इंग्रजांना आव्हान देणारा यशवंत राणाजी हजारो अश्वदळाचा सेनापती. समशेरीप्रमाणेच मुत्सद्देगिरीची ही तलवार चालवणारा राजकारणी. पण त्याच्या उरी एक शल्य होतं. स्वामिनिष्ठेचा एक पारंपारिक पगडा असलेल्या त्या दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात हा माणूस पेशव्यांनी आपल्याला माळव्याची सुभेदारी अधिकृतपणे द्यावी, त्यांच्या हातून मानाची वस्त्रं मिळावीत म्हणून धन्याच्या पायाशी धरणं धरून बसला. पण त्याला मिळाली उपेक्षा, अवहेलना आणि अपमान. एक उमदं जीवनपुष्प चुरगळलं गेलं..." हे उद्गार आहेत ना.सं. इनामदारांचे !
श्रृंगार आणि वीररसानं ओलीचिंब असणारी, इतिहासानं ज्यांना उपेक्षित ठेवलं त्या यशवंतराव होळकरांच्या आयुष्याची शोकांतिका म्हणजेच 'झुंज' ही ना.सं. इनामदारांची कादंबरी ! या कादंबरीतून यशवंतराव होळकरांचे उपेक्षित पैलू हिऱ्याप्रमाणे चकाकत समोर येतात.

तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी यशवंतरावांना अनौरस ठरवत त्यांचा होळकरी गादीवरचा अधिकार नाकारला. संस्थानाची जबाबदारी डंड्रनेक या फ्रेंच अधिकाऱ्यावर सोपवली. या अन्यायाविरुद्ध तरुण यशवंतरावांनी पेंढारी आणि भिल्लांचं सैन्य जमवलं. डंड्रनेकचा पराभव करीत १७९८मध्ये राज्य परत मिळवलंच वर पुढच्याच वर्षी महेश्वर इथं वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करवून घेतला. यशवंतरावांचा भाऊ तुकोजीला पुण्यात हत्तीच्या पायी दिल्यानंतर यशवंतरावांनी पुण्यावर चाल करून शिंदे आणि पेशव्यांची इतकी दाणादाण उडवली की दुसरा बाजीराव शनिवारवाडा सोडून पळून गेला. यशवंतरावांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करून पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करून टाकले. पेशवा पळून गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला. पण दुसरा बाजीराव पेशवा पेशवाई इंग्रजांना देऊन बसला ! एवढे होऊनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटू उद्गार काढलेले नाहीत. ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना प्रात:काळी ज्यांची नावे घेऊ नयेतअशा त्रयीत करून टाकली. बंडवाला होलकर.. होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सैन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले.


शिवाजी महाराजांनंतर इंग्रजांचा धोका ओळखलेला हा दूरदर्शी राजा होता. इंग्रजांविरुद्ध त्यांनी तब्बल १८ युद्धं केली. एकाही युद्धात इंग्रज जिंकू शकले नाही. भरतपूरचं युद्ध तब्बल तीन महिने चाललं, जिंकले ते यशवंतरावच. १८०३मध्ये यशवंतरावांनी इंग्रजांविरुद्ध संपूर्ण लढा पुकारत इंग्रजांना इतकं जेरीस आणलं की त्यांनी शांततेसाठी विनवण्या केल्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांनी शांततेचा प्रस्ताव पुढे केलेला हा एकमेव राजा होता. भानपुरा इथं त्यांनी अद्ययावत तोफांचा कारखाना काढला. ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय होतं कलकत्त्यात. इंग्रजांना नेस्तनाबूत करायचं तर सगळ्यांनी एकत्र लढायला हवं, हेही यशवंतरावांना नीट उमगलं होतं. त्यांनी त्यावेळच्या राज्यर्कत्यांना पत्रं पाठवून तशी आर्जवंही केली. पण त्यांच्यामागे उभे राहण्याऐवजी ही पत्रं इंग्रजांकडे पोहचवण्याचे पराक्रम इथल्या राजांनी केेले. या बहाद्दर राजानं थेट कलकत्त्यावर हल्ला करत साहेबाच्या घरात जाऊन त्याची मानगूट पकडण्याची योजना आखली होती. भिल्ल-पेंढाऱ्यांच्या सैन्यानिशी अफाट पराक्रम गाजवणाऱ्या या राजाच्या आयुष्याची दोरी मात्र बळकट नव्हती. अवघ्या पस्तिसाव्या वर्षी त्यांचा करूण अंत झाला ...


यशवंतराव होळकरांचा इतिहास बघायचा असेल तर आणखी थोडसं भूतकाळात गेल्याशिवाय तो कळणारच नाही. पुण्यापासून ४० मैलांवर फलटणच्या राज्यांत नीरा नदीच्या काठी होळ म्हणून एक गांव आहे. तेथे ४०० वर्षापूर्वी मालीबा या नांवाचा एक धनगर जातीचा गृहस्थ होऊन गेला. त्यानंतरचा ११ व्या पिढीतला पुरुष खंडोजी हा त्या गावंचा चौगुला होता. त्याला मल्लारी नांवाचा एकुलता एक मुलगा होता. त्याने होळकर राज्याची स्थापना केली. यांच्या होळगावी कित्येक पिढया गेल्यामुळे होळकर हे नावं पडलें. या घराण्याचें पूर्वज पूर्वी मथुरेच्या आसपास रहात असावे. तेथून मेवाडांत चितोड नजीक व त्यानंतर दक्षिणेकडे शाऊन औरंगाबादच्या आसपास त्यांनी वस्ती केली असावी, असंही संशोधकांचे मत आहे.


मल्हाररावाचा जन्म १६९४ च्या ऑक्टोबरचा. त्याचा बाप खंडोजी हा मल्लारी लहान असतानांच निवर्तला त्यामुळे त्याच्या आईने होळ सोडले व ती मुलासह खानदेशांत तळोदे गांवी आली. तेथें तिचा भाऊ भोजराज बारगळ रहात असे. तो खाऊनपिऊन सुखी होता. त्याचें कांही स्वार मराठयांचे सरदार कदम बांडे यांच्या तैनातात असत. मल्हाररावासहि त्यांच्याकडे नोकरीस ठेविले होते भोजराव बारगळचा नारायण मुलगा उदेपूरकरांकडे नोकर असून त्याच्या कामगिरीबद्दल राजानें त्यास बुध हें गांव जहागीर दिले होते. भोजराजाची मुलगी गौतमाबाई मल्हाररावास दिली होती. मल्हाररावांची कीर्ति, शौर्य व इमानीपणा पाहून बाजीराव पेशव्यानी इ.स.१७२४ त त्यास आपल्याकडे मागून घेतलें. तेथें लवकरच त्यास ५०० स्वारांवर मुख्य नेमण्यांत आलें. याप्रमाणें मल्हाररावाच्या भरभराटीस आरंभ झाला.


याच सुमारास बाजीरावासारखा खंबीर पेशवा लाभल्यामुळें मराठयांची सत्ता वाढत होती. माळवा आदिकरुन उत्तरेकडील मुलूख जिंकण्याचा त्याचा मुख्य उद्देश होता. महमदशहानें त्यावेळचा माळव्यावरचा सुभेदार निजामउल्मुल्क यास काढून नागर ब्राम्हण गिरधर यास सुभेदार केले होते. निजाम व त्याचा पुतण्या हमीदखान यांच्यामध्ये भांडण लागली होती. त्याचा फायदा घेऊन इ.स.१७२५ त माळव्यावर चौथाई व सरदेशमुखी बसविण्यासाठी बाजीरावानें होळकर, शिंदे व पवार यांस कांही हक्क देऊन पाठविले. त्यांस माळव्याचा सुभेदार गिरधर बहादूर यानें प्रतिबंध केला होता, तरी तो पुढें इ.स.१७२९ च्या मोहिमेंत ठार झाला व त्याची जागा दायबहादूरला मिळाली. तोहि धाडसी व शूर होता. गिरधर बहादुराप्रमाणे यांनेहि मराठयांच्या हल्ल्यांस अडथळा केला. पुढें निजामाने बादशहांचा सूड घेण्याच्या बुध्दीने माळव्यावर स्वारी करण्याची बाजीरावास सल्ला दिला. त्याप्रमाणे इ.स.१७३१त पेशव्यानी आपला भाऊ चिमणाजीआप्पा व मल्हारराव ह्यांस माळवा कायमचा हस्तगत करण्यासाठी पाठविले. त्यांची व रायबहादूरची धारजवळील तरला येथे लढाई होऊन तो ठार झाला. माळवा सर झाल्यामुळे बाजीरावास आनंद झाला. व त्यांने होळकरास माळव्यांतील ८२ परगणे जाहागीर दिले व धारच्या पोवारांच्या वाढत्या सत्तेस आळा बसविण्यासाठी माळव्याची राज्यव्यवस्थाहि त्याच्याकडे सोपविली. नर्मदेच्या आजूबाजूचा प्रदेश मल्हाररावानें पूर्वीच जिंकला होता. त्यामुळें दोन्ही प्रदेशाचें महेश्वर हेंच राजधानीचें शहर झालें. इ.स.१७३५ ते मल्हाररावास माळव्यांत ठेवून बाजीराव पुण्यास गेला. इकडे मल्हाररावानें आग्रयापर्यंतचा मुलूख पादाक्रांत करुन त्यावर चौथाई व सरदेशमुखी बसविली. पुढच्या वर्षी बाजीराव दिल्लीस गेले. त्यांच्याबरोबर मल्हाररावहि होताच. तेथे मोगलांचा पराभव करुन येत असतां भोपाळ येथे निजामाची गांठ पडली. तेव्हां लढाई हाऊन मराठयांची सरशी झाली. त्यांत मल्हाररावाचे अप्रतिम शौर्य दिसून आले.


इ.स.१७६१ त पानिपतची लढाई होऊन तीत मराठी सत्तेस जबर धक्का बसला. या लढाईत मल्हारराव मनापासून लढला नाही. त्यानें आपले अंग काढून घेतल होते. कारण भाऊसाहेबांचा गर्विष्ठ स्वभाव व तदनुरुप वर्तन त्यास आवडले नाही. त्यानंतर निजामाशी राक्षसभुवन येथे जी लढाई झाली, तींत मल्हाररावाची कामगिरी विशेष होती. ह्यामुळे त्यास आणखी ३० लाखांचा मुलूख मिळाला. याप्रमाणें मल्हारराव ७२ वर्षांमध्ये अगदी गरीबाचा राजा झाला. व इ.स१७६६ साली राघोबादादा बरोबर उत्तरेकडे स्वारीवर गेला असता मेच्या २०व्या तारखेस अलमपूर येथे एकाएकी मरण पावला. अजूनही तेथे त्याची छत्री आहे.


वास्तविकतः मल्हारराव हा एक साधा शिपाई होता. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी शिंदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. दुसरया बाजीराव पेशव्याना आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका की पेशवे शिंद्यांचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासूनच प्रयत्न करत होते, पण तेव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेऊन ते सामील होत असले, तरी ते अहल्याबाई असेपर्यंत अधिकृत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करून घेतले नाही. अहल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथून त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धुळीला मिळवला.

मल्हारराव महादजी शिंद्याप्रमाणें जरी मुत्सद्दी नव्हता, तरी त्याची लढण्याची कला व राज्यव्यवस्था ह्या उत्तम होत्या. हा बाणेदार निधडया छातीचा पुरुष त्या धामधुमीच्या काळांत मराठयांचा एक पुढारी होता. त्यास खंडेराव या नांवाचा एक मुलगा होता. तो राजपुतन्याकडे रघुनाथराव व दत्ताजी शिंदे याजबरोबर जात असता कुंभेरीच्या वेढयांत मारला गेला. खंडेरावाचें लग्न शिंदे घराण्यांतील अहल्याबाईशी झाले होते. व तिच्यापासून मालेरावबाबा व मुक्ताबाई अशी दोन अपत्यें त्यास झाली. मालेराव हा मल्हाररावाच्या मागें गादीवर बसला व एक वर्षाच्या आंतच वेड लागून मृत्यू पावला.

मालेराव जिवंत असतां अहल्याबाईनें राज्यांत चांगला बंदोबस्त ठेवून व्यवस्थित रीतीनें राज्य चालविले होते. स्त्री असल्यामुळें तिला सैन्याचें अधिपत्य स्वीकारुन लढाईवर जाता येत नसे, म्हणून त्या कामाकरितां सैन्यांतील होळकर घराण्यातीलच तुकोजी होळकर या अधिकाऱ्याची तिनें योजना केली. तुकोजीराव महत्वाच्या प्रसंगी अहल्याबाईचा सल्ला घेत असे.

इ.स.१७६९ त विसाजी कृष्ण व रामचंद्र गणेश हे रोहिले व जाट ह्यांवर चालून जात असंता त्यांस १५००० फौजेनिशी तुकोजीराव जाऊन मिळाला. इकडे शिंद्याच्या मनांत जनकोजीच्या मरणामुळें रोहिला नजिब उद्दौला याचा सूड घ्यावयाचा होता. पण तुकोजी होळकरानें नजिब उद्दौल्यास आश्रय दिला, त्यामुळें शिंद्याचा नाइलाज झाला. इकडे पुण्यास १८ नोव्हेंबर १७७२ रोजी सवाई माधवराव पेशवे मरण पावले, व त्यांचे धाकटे भाऊ नारायणराव हा पेशवे झाले. त्यानें विसाजीपंतास रोहिल्यांच्या मोहिमेवरुन परत बोलविले. परंतु लौकरच इ.स.१७७३ त आगष्टच्या ३० व्या तारखेस नारायणरावाचा खून होऊन त्याचा चुलता राघोबादादा ह्यास पेशवापद प्राप्त झालें. त्यास तुकोजीचा पाठिंबा होता. तुकोजीस आपल्याकडे घेण्यासाठी नाना फडणविसांनी शिंद्यास मध्यस्थी घातलें. त्यानें इ.स. १७७८ त ७९ लाखाची रक्कम देऊन होळकराचे मन नाना फडणविसाच्या बाजूस वळविले. इ.स. १७८५ त टिपू सुलतानावर गणेशपंतास पाठविले, तेव्हा त्यांच्या मदतीस तुकोजीस दिले होते. ते काम फत्ते केल्यावर अहल्याबाईना भेटण्यासाठी तो महेश्वरास आला. पुन्हां इ.स.१७८८त त्यानें महेश्वर सोडले व अलिबहादूरवर स्वारी करण्यासाठी शिंद्याबरोबर दिल्लीस गेला. इ.स. १७९५ च्या आगस्टच्या १३ व्या तारखेस अहल्याबाई कैलासवासी झाल्या, तेव्हां संस्थानची सर्व सूत्रे तुकोजीच्या हाती आली. १५ ऑगस्ट १७९७ रोजी तो मरण पावला.

तुकोजीस काशीराव व मल्हारराव (दुसरा) असे दोन औरस आणि यशवंतराव व विठोजी हे दोघे दासीपासून झालेले असे चार मुलगे होते. काशीराव हा क्षुद्रबुध्दि असल्यामुळें राज्य चालविण्याच्या कामी मुळीच लायक नव्हता. हा मल्हारराव शूर व तरतरीत होता; पण त्याचा स्वभाव कांहीसा जुलमी होता. त्यानें इ.स.१७९१-९२ मध्यें खुद्द होळकर संस्थानास व आणखी कांही संस्थानाना बराच त्रास दिला होता. या दुसऱ्या मल्हाररावाच्या कृत्याबद्दल तुकोजीस बराच राग आला. त्यानें अहल्याबाईसहि त्याविषयी लिहिलें होतें.

तुकोजीच्या मृत्यूनंर त्या दोघां भावांमध्ये गादीविषयी भांडण जुंपले, ह्या मल्हाररावानें पेशव्याचा आश्रय धरला व काशीरावानें शिंद्यांचा कारभारी सर्जेराव घाडगे याची मदत मागितली. होळकर संस्थानांत अनायासें आपला हात शिरकविण्याची आतां वेळ आली आहे. असे वाटून धाडसानें काशीरावास मदत देण्याविषयी शिंद्याचें मन वळविले त्याप्रमाणे शिंद्याने मल्हाररावाच्या तळास पुणे येथे वेढा दिला. त्यांत मल्हारराव पडला व त्याचा तान्हा मुलगा खंडेराव शिंद्याच्या हाती लागला. त्यानंतर यशवंतराव नागपुरास व विठोजी कोल्हापुरास पळून गेले.

त्यावेळेपासून यशवंतराव हा होळकर घराण्याचा मुख्य बनला. यशवंतराव नागपुरास जातांच भोसल्यांनी शिंद्यांच्या म्हणण्यावरुन त्यास कैद केले. तेथून तो सहा महिने कैद भोगून मोठया युक्तीने खानदेशांत पळून गेला व एका भिल्ल सरदाराच्या आश्रयास राहिला. नंतर वढवाणीवरुन तो धारेस गेला. तेथे आनंदराव पवारानें त्याचें उत्तम प्रकारें आदरातिथ्य केले. याचवेळी रंगराव ओरेकरच्या हाताखालील पेंढाऱ्यांच्या हल्यांतून यशवंतरावानें धार संस्थान वांचविले. पुढें शिंद्यानीं पवारास भीती घातल्यामुळें त्याला धार सोडून जाणे भाग पडलें. अशा स्थितीतही त्यानें देपाळपुरावर हल्ला करुन तें लुटलें. ह्या हल्ल्यांत यशवंतरावाचें नाव होऊन लोक भराभर त्यास मिळत चालले.

यशवंतरावास आपली खरी योग्यता माहीत असल्यामुळे होळकरांच्या दौलतीवर आपला हक्क आहे, असें त्यानें दर्शविलें नाही. मी मल्हाररावाचा मुलगा खंडेराव याचा कैवारी आहे, असें लोकांस भासविलें व जुन्या लोकांना मिळण्यास सांगितले. पुढें लवकरच सारंगपूरचा वजीरहसन आणि अमीरखान (हल्ली टोकच्या गादीवर असलेल्या नवाबाचा पूर्वज-पहा) हे त्यास येऊन मिळाले. कसराबादेस डुड्रनेकही नामधारी काशीरावास सोडून यशवंतरावास मिळाला, यामुळें त्याची कीर्ति वाढून त्यास लोक येऊन मिळाले व सर्वत्र वाहवा झाली. यशवंतरावांचे फार काही मागणे नव्हते, खरे तर पेशव्यांकडे व दौलतरावांकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या.. खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरले जप्तीचे हुकूम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करून द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती की दुसऱ्या बाजीराव पेशव्यांवर आक्रमण करून पेशवाई बुडवून ते आपल्याला हवे ते साध्य करू शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनदीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. तत्पूर्वी शिद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर शिंदे हेच आपले शत्रू आहेत, एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.

डुड्रनेकच्या मदतीनें त्यानें आणखी कांही यूरोपियन मंडळी आपल्या पदरी ठेवली आणि डॉड व प्लमेट ह्यांच्या हाताखाली त्यानें दोन बिग्रेडी उभारल्या. पुढें तो महेश्वरास गेला. तेथे त्याच्या हाती बराच खजिना लागला. त्यांतून त्यानें फौजेचा पगार वाटला. येथे तो नर्मदाकांठी बसून मशाली पेटवून गोळीबार करुन स्वतःची करमणूक करीत असतां एकाएकी बंदूक फुटून त्याचा एक डोळा गेला. नंतर त्यानें माळव्याकडे कुच केले व देवास वगैरेच्या संस्थानिकांकडून खंडणी वसूल करुन शिद्यांच्या ताब्यांतील मुलूखहि त्यानें लुटला (१७९९). ह्या वेळी शिंद्यांची फौज लखबादादाच्या हाताखाली आग्रयाच्या किल्याला वेढा देण्यांत गुंतली होती व खुद्द शिंदे पुण्यास होता. त्यास १८०१ पावेतों दक्षिण सोडून आपल्या प्रांताकडे येता आलें नसते, यामुळें यशवंतरावाचें फावले. इ.स.१८०१ च्या एप्रिलमध्यें विठाजीनें पुण्यास पुंडावा माजविला होता म्हणून त्यास धरुन आणून पेशव्यांनी हत्तीच्या पायी दिलें. ह्या कृत्याबद्दल यशवंतरावानें पेशव्यांचा द्वेष मनांत ठेवला.

इकडे यशवंतरावाचें कृत्य दौलतरावाच्या कानी पडताच तो उत्तरेकडे यावयास निघाला व त्यानें मेजर जॉर्ज हेसिंग याला उज्जैनवर चाल करुन जाण्यास सांगितले. १८०१ च्या जुलै महिन्यांत लढाई होऊन मेजर हेंसिगचा पूर्ण मोड झाला.इ.स.१८११ च्या आक्टोबरच्या २८ व्या तारखेस यशंवतराव भानपुरा मुक्कामी मरण पावला.

यशवंतराव होळकर हा वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. शिंदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी शिंदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणले. शिंदेंनी काय केले, तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे शिंदें व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध र्सवकष लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालून गेले तेव्हाच भोसले यशवंतरावांच्या सूचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालून जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.

यशवंतरावांच्या दूरदृष्टीला दाद देत असता या करंटय़ा सरदारांच्या आत्मघातकी कृत्यांबाबत कोणालाही रोष वाटणे स्वाभाविक आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे.

यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमी काव्याचा व्यापक उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सैन्य ठार झाले..

यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असले तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशाऱ्याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटणी कापून काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रूला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.

अहल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व दुसरया बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारू व दरोडेखोर-बंडखोर असे उल्लेखून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारूच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रूची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे की यशवंतरावांनी शत्रूकडून रीतसर खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लूट केली. पण असे करत असताना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली नसती तर त्याच्या हवेलीला आजही निमकहराम की हवेलीअसे म्हटले नसते. सैन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडून वसूल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी दंडवजा खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.शत्रूला बदनामच करायचे झाले की कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हणजे एक नमुना आहे, यापलीकडे त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

तत्कालीन हिंदू राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, शिंदे -भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. त्यांच्या या आवाहनाला पेशव्यांनी प्रतिसादच दिला नाही कारण, यशवंतरावांना दुसरया बाजीराव पेशव्याने वा दौलतरावाने औरसकधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास पेशवाई हिनत्वाचा दृष्टिकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसताना त्यांनी यशवंतरावांना एक बंडखोरअशीच उपाधी देऊन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रूच मानले. त्यामुळे दुसरया बाजीरावाने यशवंतराव व शिंद्यात सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. शिद्यांनी तसा प्रयत्न फेटाळूनच लावला असता कारण अनौरसाशी काय समझोता करायचा?’ या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढय़ाच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी वृत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हणता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.पुढे यशवंतराव, भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.

यशवंतराव हिंदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सैनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री !

यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले. यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९९ मध्ये करून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.

यशवंतरावांना हिंदी, íशयन, उर्दू, मराठी व संस्कृत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवून ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तमरीत्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटून झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदूकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेब तपासनीस होते, त्यामुळे महसूल-खंडणी वसुलीत कारकून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले, यावरून त्यांची ध्येयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.

यशवंतराव आणि पहिले बाजीराव पेशवे हे एकाच कालखंडात होऊन गेले असते तर एक अलौकिक अन दैदीप्यमान इतिहास घडला गेला असता हे नक्की कारण पहिले बाजीराव पेशवे हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्यानी केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.

१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे. संजय सोनवणी यांच्या पुस्तकाने या सार्वभौम राजाला खरा न्याय मिळाला आहे...

ना.सं. इनामदार यांनी लिहिलेल्या 'झुंझ' मुळे यशवंतराव होळकर कळायला मदत होते पण इनामदारांचे दुर्दैव असे की, 'पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन ठेवणारे आणि अतिरंजित नाट्यमयता यांचा अतिरेकी वापर करून केले गेलेले ऐतहासिक लिखाण करणारे लेखक असा शिक्का काही समीक्षकांनी अलीकडच्य काळात मारला. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ऐतहासिक कादंबरयां संदर्भ मूल्य आणि ऐतहासिक दस्तऐवजाचे रूप या कसोट्यावर काहींनी कमी लेखल्या आहेत अन त्यामुळे त्यांच्या लेखनातील नायक पुन्हा उपेक्षितांच्या अंतरंगात बुडून गेले ही दुदैवाची बाब म्हणावी लागेल. या उलट संजय सोनवणी यांनी सनावली आणि ऐतिहासिक दस्तावेज यांची नेटकी चिकित्सा करत या महानायकाचे मर्मभेदी चित्रण केले आहे, विशेष म्हणजे सोनवणींच्या पुस्तकात प्रबोधनाचा बाज नाही आणि व्यक्तीस्तोमाला टाळून पुराव्यानिशी वास्तविक प्रकटन करण्यावर भर देण्यात आलेला असल्यामुळे वाचकाचा यशवंतराव होळकरांच्या बद्दलचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलण्यास मदत होते..

- समीर गायकवाड.

संदर्भ -
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर - संजय सोनवणी
राऊ - ना.सं.इनामदार
ऐतिहासिक लेखसंग्रह भाग - ९ :- वासुदेव वामन खरे

होळकरशाहीच्या इतिहासाची साधने :- अनंत नारायण भागवत