Friday, October 2, 2015

मेहमूद आणि 'कुंवारा बाप' - मेमरी रिइंडेक्सिंग....


"मै हुं रिक्षा, तु है गाडी ! घर तक पहुंचा देनेवाली मेरी रिक्षा है सबसे निराली ……."

१९७४ च्या'कुंवारा बाप'मध्ये हे गाणं घामेघूम होऊन गात सायकलरिक्षा ओढणारा मेहमूद डोळ्यापुढून हलत नाही आणि त्याने स्वतः वर केलेले अचूक टायमिंग साधणारे विनोद त्याच्या विलक्षण बोलक्या चेहरयावरील बावळट भाव काही केल्या विस्मृतीत जात नाहीतविनोदाची त्याची स्वतंत्र शैली होती आणि त्याचा वेगळा चाहता वर्ग होता. त्याची जबरदस्त क्रेझ होती. त्याच्या चित्रपटांची यादीही भली मोठी होती….

मेहमूदच्या हास्यस्फोटक चित्रपटांची संख्या बरीच आहे. मेहमूद चित्रपटात आहे म्हणजे तो नक्कीच भरपेट हसवणार हा तेव्हाच्या चित्रपट रसिक पिढीचा विश्वास सतत अधोरेखित होत गेला. मेहमूदनेही कधीच निराश केले नाही. मेहमूदचा फार मोठा आधार मिळतोय म्हणून काही नायक दिग्दर्शकाला त्याचे नाव आवर्जून सुचवायचे ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू, पण हाच मेहमूद काही प्रसंगांत सहजी आपल्याला भारी पडतोय एकूणच चित्रपटावर आपला प्रभाव पाडतोय अशा जाणिवेने त्याच नायकांनी मग आपल्या चित्रपटात मेहमूद नकोअसा सावध पवित्रा घेतला हे त्याचे दुर्दैव ! उत्तम अदाकारी साकारूनदेखील कधी-कधी असा अन्याय होऊ शकतो हे दु: कसे पचवायचे ? यातूनच तो पुढे वेगवेगळ्या वादात आणि बदनामीच्या भोवऱ्यात अडकत गेला….

मेहमूदला रसिकांचे अलोट प्रेम देणारा त्याच्या दिग्दर्शनातील सर्वात भावुक प्रभावी चित्रपट म्हणजे कुंवारा बाप!’. यात त्याने आपल्या पोलिओग्रस्त मॅकी या मुला भोवती कथानक रचताना हा विकार सायकल-रिक्षा खेचणाऱ्या पित्याचे बरे-वाईट आयुष्य याची उत्तम गुंफण घातली. गीत-संगीत-नृत्यातून ही कथा खुलवताना त्याने आपली संगीताची जाण सुस्पष्ट केली. चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा सायकल-रिक्षा चालवणारा नायक महेश (अर्थात मेहमूद) मैं हू घोडा, यह है गाडीअसे उत्स्फूर्तपणे गातो. एक रुपया भाडा, पॅसेंजर इतना जाडा.. मला नको रे नकोअसे म्हणत हसत-खेळत एखाद्याची खिल्ली उडवणाऱ्या या पित्याने गाडीच्या पाठच्या बाजूलाच आपल्या तान्हुल्याला कपडय़ात गुंडाळून ठेवलेले असते. हा मुलगा त्याला एकदा देवळाबाहेर सापडलेला आणि त्याचे खरे माता-पिता सापडल्याने या मुलाच्या पोषणाची जबाबदारी त्याच्यावर आलेली. त्याच्यासाठी तो लोरीही गातो (..री जा निंदिया) तर त्याच्या घरात तान्हुला असल्याने तृतीयपंथीदेखील सज रही गली मेरी..गात-नाचत येतात. या नृत्यासाठी मेहमूदने आपले पिता मुमताज अली यांना संधी दिली, तर या सापडलेल्या मुलावरून मेहमूदचे त्याच्या पत्नीशी (तामिळ अभिनेत्री मनोरमा) होणाऱ्या वादविवादातून विनोद निर्माण होतात. सापडलेला मुलगा पोलिओग्रस्त असल्याचे डॉक्टरकडून (संजीवकुमार) समजताच हा रिक्षावाला हादरतो, पण त्याचे पालनपोषण करण्याशिवाय पर्याय नसतो. मुलगा थोडा मोठा होताच तो देवदर्शनाला जातो. (जय भोलेनाथ जय हो प्रभू). तेथे त्या मुलाचे खरे माता-पिता (विनोद मेहरा-भारती) यांचा शोध लागतो, पण आपण वाढवत असलेल्या मुलाला त्यांच्याकडे देण्यास हा रिक्षावाला तयार होत नाही.. अतिशय भावनिक कथानक रचताना मनोरंजनही होईल याचे भान मेहमूदने ठेवले यातच त्याची दिग्दर्शनीय दृष्टी स्पष्ट दिसते. त्याने कारुण्यात विनोद शोधला. राजेश रोशनला संगीत पदार्पणाची संधी देताना त्याने विविध प्रकारची गाणी चाली त्याच्याकडून करून घेतल्या. अनुभवी गीतकार मजरुह सुलतानपुरीसोबत त्याची जोडी जमवली. हिंदी चित्रपटातले पहिले तृतीयपंथी गीतदेण्याचे श्रेय या चित्रपटाला आहे. मेहमूदच्या एकूण कारकिर्दीतील कुंवारा बापमहत्त्वाचा टप्पा वेगळा अनुभव ठरला. १९७४ साली दक्षिण मुंबईतील ऑपेरा हाऊसला रोटी कपडा और मकानपहिल्याच खेळापासून यशस्वी ठरल्यावर त्याच्या पुढील शुक्रवारीच अगदी जवळच्या रॉक्सीत कुंवारा बापझळकवला रोटी कपडा..च्या तगडय़ा स्पर्धेतही आपल्या गुणवत्तेवर टिकवला पुढे जाऊन तो ज्युबिली हिट झाला.

तो काळ मुख्य चित्रपटगृहाला खूपच महत्त्व असणारा होता, त्यानुसार याच रॉक्सीत मेहमूदने दिग्दर्शिलेले जिनी और जानी एक बाप छे बेटेहेदेखील स्वानुभवावरचे आपल्याच मुलाना त्यात संधी देणारे चित्रपट झळकले, पण स्वत:च्या कथा-व्यथा साकारण्यात मेहमूद यात अपयशी ठरला. हा त्याला मोठाच सेटबॅक होता. त्यातून सावरण्यासाठी त्याने जनता हवालदारया चित्रपटावर लक्ष केंद्रित केले, तेव्हा नेमका राजेश खन्नाचा पडता काळअसल्याने हेमामालिनी अन्य चित्रपटांतून बिझी असल्याने हा चित्रपट खूप रखडला. त्यात रंगत आणण्यासाठी मेहमूदने तृतीयपंथींना बराच वाव दिला, पण तो एकूणच निष्प्रभ ठरला. तरी आपल्याला संगीताचा कान आहे हे त्याने हम से क्या भूल हुईया गाण्यातून सिद्ध केले. बऱ्याच काळानंतर त्याने दुश्मन दुनिया काया चित्रपटाचे दिग्दर्शन केले. फिल्मालय स्टुडिओतील सेटवर मेहमूदला मात्र त्याचे सूर हरवल्यासारखे वाटले. 'पडोसन'मधला त्याचा धिंगाणा आजही लोकांना आवडतो. त्याचं लुंगी गुडघ्यात दुमडून हैदराबादी ढंगातलं हेल काढून बोलणं आजही भाव खाऊन आहे. मराठमोळ्या दादा कोंडकेंनी आगे की सोचमध्ये मेहमूदला संधी दिली. राजकुमार संतोषी दिग्दर्शित अंदाज अपना अपनाहा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

मेहमूदला पहिली पत्नी मधू हिच्यासोबतच्या संसारात चार, तर दुसरी पत्नी ट्रॅसी हिच्यासोबतच्या संसारात दोन मुले एक मुलगी होती. या साऱ्यांना त्याने बालपणीच चित्रपटाच्या विश्वात आणले. त्यापैकी लकी अली गायक (कहो ना.. प्यार हैची हिट गाणी) नायक (सूर’) म्हणून मोठेपणी नावारूपाला आला, तर मासूम अलीने दुश्मन दुनिया काया चित्रपटाची निर्मितीही केली अन त्यात तोच नायक होता. मेहमूदच्या खासगी आयुष्याबाबत (अगदी त्याच्या काही व्यसनांबाबत) गॉसिप मॅगझिन्सनी बरेच काही लिहिले. त्यात तथ्य किती अफवा कोणत्या हे मेहमूद दुर्दैवाने कधीच स्पष्ट करू शकला नाही अथवा त्याच्या त्या समस्येचा अपेक्षित अर्थ घेतला गेला नाही. तो खासगी आयुष्यात खूप दु:खी आहे, म्हणूनच तो आपल्या काही नायिकांत (विशेषत: अरुणा इराणीत) गुंतत वा अडकत गेला अशा प्रकारच्या गोष्टी खूप पसरल्या. सिनेमाचे जग बऱ्याचदा तरी वस्तुस्थितीपेक्षा हवेतील गोष्टीच्या दिशेने विचार करते खुद्द कलाकाराच्या हाती काहीच राहत नाही. मेहमूदचे बंगलोरला भव्य फार्म हाऊस आहे, तो पूर्ण व्यसनी झाला आहे अशा गोष्टींची या अख्यायिकात सतत भर पडत राहिली, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे की त्याच्या अफाट गुणवत्तेनेच तो आजही ओळखला जातो. त्याच्याइतकी क्षमता, विविधता टायमिंग सेन्स असणारा दुसरा विनोदवीरझाला नाही आणि पुढे त्याच्या तोडीचा विनोदवीर होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. तो आजही अनेकांचा आदर्श आहे, हे विशेष आहे. मेहमूद एकच असू शकतो, तो एकच होता.

अभिनेता मेहमूदहा मुमताज अली यांच्या आठ मुलांपैकी एक ! बॉम्बे टॉकीजच्या किस्मतया चित्रपटात त्याने अशोककुमारच्या बालपणी पाकीटमार करणाऱ्या मुलाची भूमिका साकारली. काही काळ तो पी. एल. संतोषी (दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे वडील) यांच्या गाडीचा चालक होता. वयात येताच त्याने सी.आय.डी.’, ‘दो बिघा जमीन’, ‘प्यासाअशा चित्रपटांतून छोटय़ा भूमिका साकारल्या. पण अष्टपैलू विनोदवीरअसा त्याचा विलक्षण जम बसला, त्यात त्याची प्रामुख्याने धुमाळ शुभा खोटेसोबत (चित्रपट जिद्दी’, ‘लव्ह इन टोकियो’) जोडी जमली. विशेषत: महेशहे त्याचे हुकमी रुपेरी नाव ठरले. शुभा खोटेसोबत जमलेल्या जोडीतून त्याने नंदू खोटेनिर्मित, दिग्दर्शित या मालकया मराठी चित्रपटातूनही भूमिका साकारली. या चित्रपटाला ५० वर्षे उलटून गेलीत. मेहमूद नायक असणाऱ्या या चित्रपटात विजू खोटे, शुभा खोटे, धुमाळ, भारती, शंकर घाणेकर, सरोज बोरकर, रणजीत बुधकर इत्यादींच्या भूमिका होत्या. साठ सत्तरच्या दशकात मेहमूदचे अस्सल विनोदाचे नाणे खणखणीत वाजले. छोटे नवाब’, ‘जिंदगी’, ‘चित्रलेखा’, ‘पत्थर के सनम’, ‘गुमनाम’ (यामध्ये तो हेलनसमवेत हम काले है तोया गाण्यावर नाचला), ‘नीलकमल’, ‘दो कलियां’, ‘हमजोली’, ‘भूतबंगला’, ‘साधू और शैतान’, ‘जोहर मेहमूद इन गोवा’, ‘जोहर मेहमूद इन हाँगकाँग’, ‘प्यार किये जा’, ‘पडोसन’ (यामधील त्याचा तामिळ ब्राह्मण संगीत शिक्षक तर अप्रतिम..), ‘देस परदेस’मधलीही त्याची भूमिका गाजली. गोविंदाचा 'आँखे' हा हिट सिनेमा मेहमूदच्या ‘दो फूल’वरून ढापण्यात आला होता.

विनोदी अभिनेत्याचे सर्वात मोठे दु: म्हणजे त्याला कोणत्याच संदर्भात कोणीच गंभीरपणे घेत नाही. विनोद करणे हा अभिनयातील सर्वात सोपा प्रकार मानला जातो अशा कलाकाराच्या खासगी आयुष्यातही सगळे असे हसत-खेळत चालले आहे असे मानले जाते.. त्याचे सगळेच हसण्यावारी नेले जाते. वस्तुस्थिती मात्र खूप वेगळी असते. मेहमूद याबाबत सर्वोत्तम उदाहरण ठरावे.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या एकूणच इतिहास वाटचालीतील मेहमूद हा सर्वात यशस्वी, लोकप्रिय अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखांचे मुखवटे घेत वावरलेला अभिनेता आहे. २३ जुलै हा त्याचा स्मृतिदिन. ( अमेरिकेत पेनिसिल्व्हानिया येथे २३ जुलै २००४ला त्याचा मृत्यू झाला) मेहमूदचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ सालचा. तो ७२ वर्षे जगला. त्याच्या सुखदुःखाच्या संमिश्र आयुष्यातला बराचसा काळ त्याने जगाला हसवण्यात घालवला असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही

विनोदवीर ही मेहमूदची ‘रील लाईफ भूमिकाझाली, तर दु:खमय, क्लेशकारक आयुष्य ही मेहमूदची 'रिअल लाईफ' जीवनावस्था झाली. त्याचा खेळजसा रंगला तसा घडला नाही. 'हम काले है तो क्या हुआ दिलवाले है' असं गाणारा मेहमूद खरोखरच दिलवाला होता पण त्याची लाईफ का कुणास ठाऊक 'कुंवारा बाप'मधल्या सायकलरिक्षावाल्या महेशसारखी ट्रॅजेडीत परावर्तित होत गेली आणि जग त्याला हसत राहिले. त्याच्या दुःखाचे सल कुणाला उमगलेच नाहीत. मेहमूद ड्रग्जच्या आहारी गेला हे जितक्या चवीने चघळले गेले तितक्या आर्ततेने तो या स्तराला कसा गेला याविषयी चर्चा झाल्याचे कुठे पाहण्यात नाही. कदाचित हीच हसऱ्या विदुषकाची रसिकमान्य शोकांतिका असावी...       

- समीर गायकवाड.