Thursday, October 8, 2015

अखेरचे साक्षीदार - दुसरया महायुद्धातील मुले ; स्वेतलाना एलेक्सीविच - साहित्यातील नोबेल विजेत्या .


दि लेझेन झियेग (द लास्ट विटनेस  -  अखेरचे साक्षीदार )

२०व्या शतकाच्या आधी आताच्या बेलारूस या देशाचा भूभाग बरयाच देशांच्या ताब्यात होता त्यामुळे मायभूमीच्या हक्काचा रक्तरंजित संघर्ष इथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेलाच असायचा. आताच्या रशिया, युक्रेन, पोलंड आणि लिथुआनिया या देशांच्या सीमा बेलारुसला लागून आहेत. २१व्या शतकाच्या सुरुवातीस जर्मनीने बेलारूसवर केलेलं आक्रमण आणि रशियन क्रांती या दोन्ही संकटाना तोंड देत बेलारूस हा छोटासा देश २५ मार्च १९१८ या दिवशीच स्वतंत्र झाला होता पण रशियन सैन्याने एक प्रकारे कपटनीतीने या देशावर आपले आधिपत्य सैन्याच्या मदतीने कायम राखले. १ जानेवारी १९१९ रोजी रशियन सोव्हिएत युनियनमधील एक गणराज्य म्हणून बेलारूसची बोळवण झाली. पण तिथे सातत्याने बंड होत राहिले आणि त्यातून केल्या गेलेल्या रिगा ट्रिटी नुसार १८ मार्च १९२१ ला बेलारुसचा पश्चिम भाग पोलंडशी जोडला गेला व उर्वरीत बेलारूस रशियाशी संलग्न राहिला.
पण नेहमीच पूर्ण स्वातंत्र्य ही इथल्या लोकांची मागणी राहिली. मिखाईल गोर्बाचेव्ह रशियन पंतप्रधान असताना या मागणीला जास्त जोर चढला. शेवटी २५ ऑगस्ट १९९१ ला बेलारूस स्वतंत्र देश म्हणून अस्तिवात आला अन इथल्या लोकांचा प्रदीर्घ स्वातंत्र्य लढा संपुष्टात आला. या सर्व घडामोडीवरून या देशात किती रक्तपात झाला असेल अन किती प्रदीर्घ संघर्ष तिथल्या जनतेने झेलला असेल याचा अंदाज येतो. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण मात्र आनंदाचे आहे. बेलारूसच्या प्रसिद्ध लेखिका स्वेतलाना एलेक्सीविच यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार आज जाहीर झाला आहे. त्यांच्या अनेक कादंबरया जागतिक स्तरावर नावाजलेल्या आहेत, विशेषतः युरोपियन देशांमध्ये त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. त्यांच्या गाजलेल्या कादंबरयापैकीच एक Die letzten Zeugen...kinder im zweiten weltkrieg (अखेरचे साक्षीदार - दुसरया महायुद्धातील मुले ) ही कादंबरी खूप प्रसिद्ध आहे.                    

युद्धकाळात सबंध देशात 'जे जे कोणी रडत असतील त्याना गोळ्या घाला' हा त्या युद्धाचा जेंव्हा बाल्यावस्थेला शाप होता आणि कोणी कोणाच्या दुःखाची मोजदाद करत नव्हते तेंव्हाचा हा कालखंड आहे.  लेखिका स्वेतलाना एलेक्सीविच यांचं बालपण त्याच काळात करपून गेलं, कोमेजून गेलं.. सुरुवातीला बेलारुसवर जर्मनीने केलेली स्वारी, नंतरचे गृहयुद्ध आणि युद्धपश्चात कालखंड असे ढोबळमानाने या कादंबरीचे भाग पडतात. सततच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे झालेला रक्तपात आणि त्याचे परिणाम भोगणारया पिढ्या यांचे वर्णन यात आहे. युद्धांमुळे बालकांना भोगाव्या लागणाऱ्या नरकयातना यांचे विशेष वर्णन यात आहे. युद्धविरोधी सुर असणारया या पुस्तकात लेखिकेन लोकांच्या मानसिकतेवर भीतीचा केव्हढा मोठा पगडा राहतो याचे वर्णन केले आहे. त्या काळातील कमजोर, शोषित आणि जीवनाचे भयावह सत्य अनुभवलेल्या लोकांच्या अनुभवाचे प्रकटन यात असल्याचे लेखिका नमूद करतात.


आजच्या काळात सगळ्या जगाला झपाटल्यागत एक अनामिक युद्धज्वर चढलेला असताना अशा सजग,सुजन आणि धाडसी लेखिकेला नोबेल पुरस्कार देऊन नोबेल समितीने शांततेचा संदेश खरया अर्थाने जगभरात पोहोचवण्यासाठी अभिनव लेखिकेची सार्थ निवड केली आहे असेच म्हणावे लागेल. स्वेतलाना यांनी लिहिलेलं युद्धविरोधी लेखन आजच्या राज्यकर्त्यांना बहुमोल मार्गदर्शन करेल असं तर नोबेल समितीला सुचवायचे नाही ना ?  


महिलांचा संघर्ष आणि युद्धविरोधी साहित्य लिहिताना त्यांनी दाखवलेल्या अलौकिक धैर्याचा हा गौरव आहे. साहित्यात नोबेल पुरस्कार पटकावणार्‍या स्वेतलाना या १४ व्या महिला ठरल्या आहेत. युद्धाची खुमखुमी असलेल्या लोकांनी नोबेलविजेत्या लेखिकेचे साहित्य वाचले तरी अनेकांचे डोळे निश्चित उघडतील. नोबेल असेंब्ली आणि नोबेल पुरस्कार विजेत्या स्वेतलाना एलेक्सीविच दोघांचेही अभिनंदन...  


- समीर गायकवाड.