Saturday, October 10, 2015

अजरामर 'शोले' मधला उत्कट सीन ....'शोले' सिनेमाच्या अगदी मधोमध हा सीन आहे...
मेंदू बधीर करणारा आणि काळजाचा ठाव घेणारा सीन..
हा सीन सुरु होतो तिथपासून सलग तब्बल सात मिनिटे सिनेमात संवाद नाहीत. कानात शिसं ओतावं तसं संगीत पडद्यावरील दृश्यांच्या पार्श्वभूमीवर वाजत राहते, प्रेक्षक डोळे विस्फारून समोर पाहत राहतात...माझ्या मते सिनेमातील संघर्षाचा हा परमोच्च बिंदू आहे, जो बरोबर अगदी मध्यावर आहे.....
गब्बरसिंह जेल फोडून फरार होतो. तिथून तो थेट रामगढला ठाकूर बलदेवसिंहच्या हवेलीवर येतो आणि हवेलीत असणारी त्याची दोन मुले, मोठी सून,मुलगी यांना काही सेकंदातच काय होतेय ते कळण्याआधी यम सदनी धाडतो. बंदुकीचे आवाज ऐकून ठाकूरचा एकुलता एक नातू बाहेर पळत येतो. हे दृश्य काळजाचा ठाव घेणारे आहे...

टेकड्यांच्या खालील हिरवाईत असणारी ठाकूरची ती भव्य हवेली. हवेलीच्या समोर मधोमध असणारा कराकरा आवाज करत हेलकावे खाणारा लोखंडी झोपाळा. सगळीकडे स्मशानशांतता पसरलीय अगदी चिटपाखराचा देखील आवाज नाहीये, ठाकुरच्या हवेलीला मात्र गब्बरच्या डाकूंनी चोहीकडून घेरले आहे..हवेलीच्या आसपास अस्ताव्यस्त मृतदेह पडले आहेत आणि काळ्याकुट्ट घोड्यावर बसलेला यमदुतासारखा वाटणारा गब्बर उंचावरील टेकडीच्या अगदी समोरच्या टोकावर आस्ते कदम सावकाश पुढे येतो...


आधी तो एक नजर समोर पडलेल्या कलेवरांवर फिरवतो आणि तंबाखूची चंची बाहेर काढतो. चिमुटभर तंबाखू काढून तो हातावर मळतो, हात झटकतो. तंबाखूचा बार तोंडात भरतो, दुसरा हात विजारीला पुसतो. हवेलीतून बाहेर पळत आलेल्या छोट्या दीपकला बघून तो घोड्याला टाच मारून हवेलीच्या दिशेचा दगडी कातळ उतरू लागतो...

लहानगा दीपक घाबरून जातो. त्याच्या तोंडातून आवाज देखील फुटत नाही. तो झोपाळ्याच्या अगदी समोर येऊन उभा आहे. त्याचा श्वास अगदी जोराने सुरु आहे, त्याच्या समोरचा झोपाळा कराकरा आवाज करत हलतो आहे. विचित्र भयप्रद पार्श्वसंगीत वाजत राहते अन काही अंतरावर गब्बर हळूच त्याच्या अगदी समोर येऊन उभा राहतो. तो त्याची बंदूक काढतो, त्याच्यावर नेम धरतो आणि चाप ओढतो...याच वेळेस स्टेशनमध्ये रेल्वे येऊन थांबते, तिच्या शिटीचा कर्णकर्कश्य आवाज बंदुकीच्या गोळीच्या आवाजाऐवजी वापरला आहे.फार दिवसापासून घरच्यांची भेट झाली नाही म्हणून ठाकूर बलदेवसिंह अगदी खुशीने खास रजा काढून गावाकडे येतात, स्टेशनवर उतरल्यापासून ते हवेलीत येईपर्यंत त्यांना काही तरी अघटीत घडल्याचे वाटत राहते. हवेलीच्या पायरीवर त्यांची छोटी बहु शुभ्र वस्त्रात बसलेली बघून त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होते..रामलाल येऊन त्यांचे पाय धरून ओक्साबोक्शी रडू लागतो. ठाकूर बलदेवसिंहांची नजर आता जमिनीवर पांढरया कपड्यात गुंडाळून ठेवलेल्या मृतदेहांकडे जाते..सोसाट्याचा वारा सुटतो, त्या कलेवरांवर झाकलेले पांढरे कापड उडून पडते...सगळा पाचोळा वाहू लागतो अपवाद फक्त ठाकूरच्या नातवाचा ! लहानग्या दीपकच्या देहावर गुंडाळलेले कापड काही अंगावरून हलत नाही. दुःख आणि क्रोध यांच्या आगीत होरपळलेले ठाकूर त्याच्या जवळ जातात, काहीसे वाकून ते त्याच्या चेहरयावरचे कापड बाजूला करतात...पडद्यावर हाताच्या मुठीत कापड घट्ट आवळत जाणारे ठाकूर क्रोधाने लालबुंद होत जाताना दिसतात....दिग्दर्शक रमेश सिप्पीने हा सीन असा काही चित्रित केला आहे की हा सिनेमा कधीही, कुठेही,केंव्हाही पाहिला तरी या सीनला पब्लिक अगदी आवंढा गिळून आ वासून बघत राहतं...शोलेच्या यशात पटकथेचे काम पंचपक्वान्नाच्या जेवणातल्या साखर- मीठासारखं आहे. ते पूर्ण सिनेमात जाणवत राहतं...हा सीन पूर्ण पटकथेची जादू आहे...यातली प्रत्येक फ्रेम देखणी आणि भव्य आहे..

काही महिन्यांपूर्वी हा सदाबहार सिनेमा चाळीशीचा झाला तेंव्हा पुन्हा नव्याने सिनेमा कुटुंबासह पाहिला, तेंव्हाही तो तसाच १५ ऑगस्ट १९७५ च्या रिलीजसारखा तरतरीत वाटला.....

- समीर गायकवाड