Friday, October 2, 2015

संताजी घोरपडे - कोंडी झालेला निष्ठावंत पराक्रमी योद्धा…

मराठी राज्यातील कठीण काळ म्हणजे औरंगजेब बादशहाने छत्रपती संभाजी राजांची निर्घृण हत्या केल्यानंतरचा काळ. या काळात औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने हैराण करणाऱ्या पराक्रमी सरदारामध्ये लखलखतं पान होतं ते सेनापती संताजी घोरपडे यांचं. संताजी घोरपडे यांनी मोगलांना आपल्या मोहिमांनी अशी काही जरब बसवली होती, की मराठी सैन्याविरुद्ध लढण्याची मानसिकताच या सैनिकांनी गमावली होती.

पेशवाई बुडाली आणि त्यानंतर इंग्रजी सत्तेविरुद्ध फारसा उठाव झाला नाही. कारण, पेशवाईबद्दल जनतेच्या मनातच फारसे ममत्व उरले नव्हते. लोकांनी इंग्रजी राजवट आणि त्याचा अंमल स्वीकारला. मात्र, संभाजी राजाच्या काळात असे झाले नाही. मोगल सत्तेचा प्रमुख बादशहा औरंगजेब याने संभाजीराजांची हत्या केल्यानंतर अवघी मराठी जनता पेटून उठली आणि पुढची अनेक वर्षे ती मोगली सत्तेशी झुंज देत राहिली. बादशहा औरंगजेबाचा मृत्यू या मराठी मुलखातच झाला आणि मराठी राज्य बुडवायची इच्छा धरून आलेला हा बादशहा निराश अवस्थेतच मृत्यूला शरण गेला. औरंगजेबाला खऱ्या अर्थाने हादरवून टाकले ते मराठी राज्यातील संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन धुरंधर लढवय्या सरदारांनी आणि त्यांच्या सैनिकांनी. यातही संताजी घोरपडे यांचा सेनापती पदाचा कारभार सुवर्णाक्षरांनी नोंद करावा असा आहे. इतिहास घडवावा असे कर्तृत्व असलेला हा रणझुंझार सेनापती केवळ स्वकीयांच्या कारवायांनी आणि दगलबाजीने मृत्युमुखी पडला.

संताजी घोरपडे यांच्यासारख्या लढवय्या सेनानीच्या आयुष्यावरची "संताजी' ही कादंबरी केवळ त्यांच्या आयुष्याचा पट मांडते असे नाही, तर मराठी राज्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जी वर्षे होती त्याचाही ताळेबंद मांडते. या खूप मोठ्या कालखंडात संताजी यांच्यासारख्या धुरंधर सेनानीची किती तगमग झाली असेल, ते काका विधाते खूपच चपखलपणे यात मांडतात. संभाजीराजांच्या निर्घृण हत्येनंतर सारे मराठी राज्य औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडले ही बाब खरी असली तरी, त्यामध्ये औरंगजेबावर मात करण्यासारखी ताकद नव्हती, हे मान्य करावे लागेल. औरंगजेबाच्या विरोधात येथील मराठी सरदार लढत होते तरी त्यांना शिवरायांसारखे धुरंधर आणि लढवय्ये नेतृत्व नव्हते. त्या वेळी मराठी राज्याचा कारभार जरी राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता तरी, समोरचा शत्रू अतिबलाढ्य होता. त्याचे मराठी सरदारांना आमिष दाखवण्याचे तंत्र वेगळे आणि त्याची फौज खूप मोठी होती. त्याचा सामना करण्याइतकी मराठी राज्याची ताकद नव्हती. मराठे त्या वेळी एकाकी होते. त्यांना कुणाचीही मदत होत नव्हती. त्याचबरोबर त्या वेळी मराठी राज्याचा कारभार पाहणारे दरबारी मुत्सद्दी आणि संताजी, धनाजी आणि अन्य पराक्रमी सरदार यांच्यात एकवाक्‍यता नव्हती. रामचंद्रपंत अमात्य आणि प्रल्हादपंत निराजी यांच्यासारखी राजाराम महाराज यांचा कारभार पाहणारी मंडळी अत्यंत कोत्या मनोवृत्तीची अशी होती. कारभार पाहणाऱ्या मंडळींमध्ये लाचखोरीची लागण झालेली होती. त्याचवेळी राज्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले होते. दुष्काळाने आणि मोगली सत्तेच्या अत्याचाराने प्रजा त्रस्त झालेली होती. संताजी आणि त्यांच्यासारखे सरदार कशा आणि कोणत्या परिस्थितीत युद्ध लढत होते याची कल्पना रामचंद्रपंत अमात्य आणि प्रल्हाद निराजी यांच्यासारख्या कधीही रणांगणात न उतरलेल्या कारकुनी प्रवृत्तीच्या कारभाऱ्यांना कशी येणार होती. त्यामुळे संताजीसारख्या धुरंधर सेनानीची उपेक्षा झाली त्यांचा अपमान करून त्यांचे सेनापतीपद काढून घेण्यात आले. हे सगळे सुरू असताना धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या महापराक्रमी सरदारांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि या कारभाऱ्यांनी मराठी राज्याचे हित न पाहता या दोन सेनानींमधील मतभेदाची दरी न बुजवता आपल्या संकुचित स्वार्थासाठी त्यांना झुंजत ठेवले आणि आपला कार्यभाग साधून घेतला.

इतिहासात संताजी यांची नोंद जेवढा पराक्रमी आणि रणधुरंधर अशी आहे, त्याचबरोबर ते शीघ्रकोपी होते अशीपण आहे. राजकारण आणि त्याला लागणारा कावेबाजपणा या माणसाकडे नव्हता. त्याने कायम रणांगण आणि मोहिमा याचा विचार केला. शिवाजीमहाराजांच्या तालमीत तयार झालेल्या या सेनापतीला जहागीर आणि वतनासाठी भांडणे हे कधीच मान्य होण्यासारखे नव्हते; पण त्या वेळचा काळच असा कठीण होता, की राजाराम महाराजांना अशी वतने विविध सरदारांना द्यावी लागली. हे करत असताना कारभाऱ्यांनी आपला स्वार्थही साधून घेतला. सगळा काळच तेव्हा संक्रमणाचा आणि परीक्षा पाहणारा होता; पण या काळात संताजींचे मराठी राज्याशी असलेले इमान कधीही ढळले नाही. परिस्थितीशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही. कायम आपल्या तत्त्वावर आणि तलवारीच्या बळावर त्यांनी आपला आब राखला. त्यांचा खून झाला, ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठी दुर्दैवाची गोष्ट नव्हती तर ती अखिल मराठी राज्यासाठी दुर्दैवाची ठरली. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्यात इतके टोकाचे मतभेद झाले नसते आणि ही दोन असामान्य माणसे एकत्र राहिली असती तर मराठी राज्याचा इतिहास वेगळा झाला असता आणि भूगोलही बदलला असता; पण तसे होणे नव्हते. जसे पहिल्या बाजीरावाला छत्रपती शाहू यांच्या काळातील कारभाऱ्यांनी छळण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपतींच्या सतर्कतेने तो फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र, संताजी यांच्याबाबतीत तसे होऊ शकले नाही. एकतर कारभारी आणि त्याचे कारस्थान यशस्वी होत होते आणि शेवटी राजाराम महाराज आणि संताजी यांच्यातच इतके गैरसमज निर्माण झाले, की या दोघांमध्ये एकदा युद्धही झाले. राजांचीच गैरमर्जी झाल्यावर संताजींना काळ कठीण न येता तर नवलच. त्याचवेळी परिस्थितीही त्यांच्या बाजूने अनुकूल राहिली नाही. संताजींच्या आयुष्याची शोकांतिका व्हायला वेळ लागला नाही. पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या मराठी सेनानीची अखेर दुर्दैवी आणि करुण झाली.

काका विधाते यांनी संताजी या झंझावाती वादळाचा वेध घेताना आपल्या कथानायकाच्या भोवती सगळी कथा फिरत ठेवताना कुणावरही अन्याय होऊ दिलेला नाही. जरी अमात्य आणि निराजी हे खलनायक असले तरी, विधाते यांनी संताजी यांच्या शोकांतिकेला त्यांनाच पूर्ण जबाबदार धरलेले नाही. त्यांनी या मंडळींकडे त्या काळाच्या नजरेतून पाहिले आहे. त्याचबरोबर संताजी यांच्या आयुष्याचा वेध घेताना त्यांनी मराठी राज्यातील खूप महत्त्वाच्या कालखंडाचा सम्यक वेध घेतलेला आहे. संताजी हे या कादंबरीचे कथानायक असले तरी, विधाते यांनी त्यांना अकारण सुपरमॅन केलेलं नाही. त्याचबरोबर त्यांचे कोठेही उदात्तीकरणही केलेले नाही. महाभारतातील कर्ण या व्यक्तीरेखेसारखी संताजी ही प्रवाहपतित व्यक्तिरेखा नव्हती. त्यामुळे विधाते यांना संताजींच्या कोणत्याही चुकीचे समर्थन करण्यासाठी अनावश्‍यक प्रसंग लिहावे लागले नाहीत की कुणाला मुद्दामहून खलनायक करावे लागले नाही. त्यामुळे त्यांनी या साहित्यकृतीत भाषेचा फुलोरा आणलेला नाही. चरित्रलेखनाचा बाज असला तरी केवळ "संताजी एके संताजी', असा प्रकार नाही. संताजी यांच्या माध्यमातून ते त्या वेळच्या मराठी राज्याच्या हालचाली आणि त्या वेळची आव्हाने याचा विचार करतात. त्याचबरोबर आपली मांडणी इतिहासापासून दूर जाणार नाही, याचीही काळजी ते घेतात. त्यामुळे संताजी यांचे कौटुंबिक जीवन आणि त्यांची वैयक्तिक भूमिका मांडताना विधाते यांना कल्पनेरम्यतेचा आधार घ्यावा लागला आहे आणि कादंबरीच्या फॉर्मसाठी ते अपरिहार्य होते; पण ऐतिहासिक सत्यापासून दूर जावे लागू नये म्हणून विधाते यांनी मराठीतील शंभरपेक्षा जास्त आणि इंग्रजी व हिंदी भाषेतील अनेक पुस्तके आणि अनेक ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून आपला कथानायक उभा केला आहे. त्यामुळे तो बावन्नकशी सोन्यासारखा असल्याचे जाणवते व मराठी राज्यातील असामान्य व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख पटते. संताजी घोरपडे हे मराठी राज्यातील महापराक्रमी असं लखलखतं पर्व होतं, पण परिस्थिती आणि औरंगजेबासारखा बलाढ्य शत्रू यामुळे हे पर्व फारसे इतिहासात गौरवले गेले नाही. औरंगजेबाच्या तंबूवरचे कळस या संताजी आणि धनाजी यांनी कापून आणले हे नेहमी सांगितले जाते; पण त्याहीपेक्षा त्यांचा पराक्रम खूप मोठा होता. कळस कापणे ही तर त्यांच्या पराक्रमाची झलक होती. त्यांचा सारा पराक्रम ही कादंबरी सांगते तेदेखील इतिहासाशी फारकत न घेता, हे महत्त्वाचे.


'संताजी' : ले. - काका विधाते, प्रफुल्लता प्रकाशन