Sunday, October 4, 2015

नामदेव ढसाळ - रक्तात पेटलेले अगणित सूर्य .....


विश्वाला प्रकाशित करणारया दांभिक सूर्याची खोट्या उपकाराची किरणे नाकारून आपल्या सळसळत्या धमन्यातून वाहणारया रक्तात जर अगणित सुर्य प्रज्वलित करून क्रांतीची मशाल पेटवित सगळीकडे विद्रोहाची आग लावत जाण्याची भाषा कोणी कवी करत असेल तर त्या कवीच्या धगधगत्या प्रतिभेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जातेच. अशा कवीची आणि त्याच्या कवितांची दखल घेणे अनिवार्य ठरते.कविवर्य नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या काव्यसंग्रहातली 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो.....' ही कविता असाच इतिहास मराठी साहित्यात घडवून गेली. तिचे आणि 'गोलपिठा'चे हे छोटेखानी विश्लेषण आहे. विद्रोही कवितांचा विषय निघावा आणि कविवर्य नामदेव ढसाळांचा उल्लेख त्यात केला नाही असं होऊ शकत नाही. ढसाळ हे या विद्रोही कवींचे शीर्षबिंदू ठरावेत आणि त्यांचा 'गोलपिठा' हा या कवितांचा प्रदिप्त ध्वजा ठरावा इतपत या विद्रोही काव्यात नामदेव ढसाळांनी आपला अलौकिक ठसा उमटवला आहे.
 कवितांचा एक काळ होता ज्यात प्रतीके म्हणून केवळ चंद्र, तारे, रवी, फुले होती. गुलछबू अन स्वप्नाळू आशय होते, विषयांचे वैविध्य नव्हते. कवितांमधून सामाजिक भान सजगपणे, सक्षमतेने आणि टोकदार पद्धतीने मांडले जाणे अपवादानेच घडत होते. साठच्या दशकापासून मात्र या कागदी गुलाबासारख्या कवितांच्या विश्वास सुरुंग लावण्याचे काम दलित साहित्याने केले. समाज ज्या गोष्टी झाकून ठेवत होता, ज्याचा बभ्रा करणं अशक्य होतं, छान छान शब्दांच्या लालचुटूक मऊ गालीच्याच्या खाली जे एक दबलेले, पिचलेले, घामेजलेले, करपलेले अन कोमेजलेले विश्व होते त्याचा तो अभूतपुर्व हुंकार होता. या काव्याची दखल सरकारांनी तर घेतलीच घेतली पण जागतिक स्तरावर कवींच्या जाणिवांचा उस्फुर्त अविष्कार विविध भाषांतून मांडला गेला. हा हुंकार अनेकांच्या काळजात धडकी भरवून गेला हेही महत्वाचे आहे ; किंबहुना त्याहून महत्वाचे हे की गावकुसाबाहेर हजारो वर्षे खितपत पडलेला आणि अनेकांच्या खिजगणतीतही नसलेला समाजाचा एक महत्वाचा घटक आपल्या भावनांना धारदार शब्दात अणकुचीदार आशयाने प्रसवू लागला होता. या साहित्याची निर्मिती होताना तिच्या निर्मिकांनी रूढ असलेल्या सगळ्या तकलादू संहिता मोडीत काढल्या, खोट्या सभ्यतेची सर्व बंधने धुळीस मिळवली अन सारस्वतांच्या शाब्दिक कचकड्यांच्या रिंगणाची त्रिज्या आपल्या धगधगत्या शब्दांनी वेदनांच्या -अपमानांच्या  अग्नीकुंडात स्वाहा केली. हा खरया अर्थाने विद्रोहच होता म्हणून या कवितांना विद्रोही कविता संबोधणे अधिक संयुक्तिक ठरते...

कवि नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द कवितेतून आवाज उठवला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रीयांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते. ‘गोलपीठा’ला कोणतीही बंधने वा नियम लागू होत नाहीत. तिला वाङ्मयीन संहितेच्या छापील आणि घोटीव रचनेशी तौलनिक दृष्टीकोनातून पाहता येत नाही. दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे साहित्यविश्वातील प्रयोगशील कवी आणि जागतिक साहित्याचे साक्षेपी भान असणारे समीक्षक म्हणून विख्यात आहेत. त्यांच्या 'पोएट ऑफ अंडरवर्ल्ड' या लेखात त्यांनी नामदेव ढसाळांबद्दल लिहिले आहे की, "टी. एस. एलियट यांच्या ‘द वेस्ट लँड’ला कवितासंग्रहाला इंग्रजी कवितेत जे स्थान आहे, ते ‘गोलपीठा’ या नामदेव ढसाळांच्या कवितासंग्रहाला फक्त मराठीच नाही तर एकूण भारतीय कवितेत आहे. एक दलितच अशी कविता लिहू शकतो. गोलपीठाला कोणतीही वाङ्मयीन पार्श्‍वभूमी नाही. कारण ती सर्व अर्थानं ‘अस्पृश्य’ असलेल्या स्रोतांतून उसळून आली आहे कवितेच्या गालिच्याखाली इतर सगळे जे लपवू पाहत होते, तेच दाखवायचं काम या कवितेनं केलं. या कवितेला आता पंचवीस वर्षं झाली. त्यावरचं हे माझं अत्यंत विचारपूर्ण असं मत आहे. मला अत्यंत ठामपणे हे लिहावंसं वाटतं की नामदेवचं सुरुवातीपासूनचं साहित्य हे नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या तोडीचं आहे. आतापर्यंत त्याचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. त्या प्रत्येकावर त्याच्या अद्वितिय ‘जिनियसपणा’ची मोहर आहे. मराठी समीक्षक हे त्याच्या समकालीन लेखकांपेक्षा पंचवीस वर्षं तरी मागे चालत असतात. नुकतेच कुठे ते नामदेवच्या मोठेपणाची दखल घेऊ लागलेत, पण पूर्वग्रह ठेवूनच.’

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …

या कवितेत सुर्याची धग ढसाळांनी त्यांना पाहिजे तशी वाकवून आपल्या शब्दात उतरवली आहे. विश्वाने स्वीकारलेल्या सूर्याला ते नाकारतात आणि आपल्या रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याना आवाहन करतात.तेही कशाचं तर विद्रोहाच्या ज्वालांचं ! खंगलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या समाजबांधवांना ते अक्षरशः हलवून टाकतात,त्यांना आपल्या आजूबाजूला पहायला भाग पाडतात. ते रक्त उसळवतात. आपल्या आईबहिणीवर होणारे अत्त्याचार ते टोकदार शब्दातून मांडतात.

जनतेच्या छळवादात अन रोम जळत होते तेंव्हा निरो फिडेल वाजवत होता, त्याची ही कृती म्हणजे तो किती बेगुमान, बेफिकीर, अत्त्याचारी, उन्मत्त आणि मुजोर होता याचं प्रतिक होती. ढसाळ अत्त्याचारी लोकांना निरो संबोधततात तेंव्हा त्यांना अधिक प्रतिमांची गरज पडत नाही, इतके चपखल अर्थविशेष या उपमेतून निघतात. ढसाळ निद्रिस्त समाजाला डागण्या देऊनच जागे करतात,चौकाचौकात मेणबत्ती प्रमाणे विनातक्रार आणि सहजगत्या जळून जाणारी माणसे  त्यांच्या शब्दात वितळत जातात आणि त्याना जाळणारया उन्मत्त लोकांच्या चिरेबंदी वाड्यांना                                    
आग लावण्याची क्रिया ते स्वतःच सुरु करतात.

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि हक्काच्या घासाचा अट्टाहासही समोरच्या प्रस्थापितांना पटत नव्हता जर कोणी या वाटेवर गेलाच तर तो देशोधडीला लागलाच म्हणून समजायचा तो काळ होता. फाटक्या चिंधूरक्या कपड्यातले हात जर समोरच्याशी दोन हात करायची भाषा बोलू लागले तर त्याचे हातच छाटले जायचे, या हातांना आपल्या अजस्त्र शब्दांची वज्रमुठ देण्याचे काम ढसाळ या कवितेतून करतात.

आणि सरते शेवटी मनाच्या द्वंद्वातून बाहेर पडायची साद देतात, सहनशीलतेच्या साखळ्या तोडल्याशिवाय शोषकांच्या गढ्या उध्वस्त करता येणार नाहीत हे ते लोकांच्या मनावर ठसवतात. उपेक्षितांच्या मातीची अस्मिता आभाळभर झालीय असं तिचं बोलकं वर्णनही ते करतात, यातनेचे युगायुगाचे पुळचट रडगाणे सोडून देऊन एल्गार सुरु केल्याचं ते घोषित करतात.या विद्रोहात सामील होण्याचं जळत्या आत्म्याचं आवाहन आपल्या बांधवांना करतात.त्यांच्याही धमन्यातले रक्त विद्रोहाच्या गर्जनेने पेटवून टाकतात.रक्तात  पेटलेल्या अगणित सुर्यांना ढसाळ लीलया आपले बटिक बनवून टाकतात.....                        

ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर…केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ ला  पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

गोलपिठाच्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकर म्हणतात की, ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे. पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी 'नो मन्स लँड'-निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील'गोलपिठा' नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते. हे जग आहे. रात्रीच्या दिवसाचे रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे,उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाया मनुष्यादेहाचे, असोशी वाहणाया गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाया तरुण रोगी देहांचे,बेकारांचे, भिकायांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे,दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणाया पलंगालगतच्यापोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोपयात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे.त्या मुलाला 'शरीफ' बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणाया क्षयरोगी बापाचे हिजड्यांचे, हातभट्ट्यांचे, अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणाया ऊन चिकट रक्तांचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. १९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडीयेणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणीत्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गिहाइकाच्या प्रतीक्षेत गळाभरप्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते,तो गोलपिठा. दया क्षमा शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो,'इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच उफराट्या काळजाचा असतो."हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणाया कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते.....

अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले, परंतु खेडोपाडी त्यांचे नशीबपालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक विटंबना संपली नाही.कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नातेवाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखाफुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते. भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते....यामुळेच नामदेव ढसाळांची कविता चिरंतन विद्रोहाचे दाहक प्रतिक म्हणून आजही ओळखली जाते..

- समीर गायकवाड.