Tuesday, October 20, 2015

शिवछत्रपती आणि जावळीचे मोरे .....जावळी हें खेडें प्रतापगडापासून पूर्वेस एका ओहोळाच्या कांठीं ३ मैल आणि मालकमपेठेच्या वायव्येस ३ मैल अंतरावर आहे. जावळीजवळचे डोंगर वारणा नदीपर्यंत पसरलेले आहेत. हें खोरें मुघल अमदानीच्या आधीपासून मराठयांच्या ताब्यांत होतें. पूर्वी हें शिर्के नांवाच्या घराण्याकडे होतें; व हल्लींही त्या घराण्याच्या वंशजाकडे, यात सातारा जिल्हयाच्या दक्षिणेकडील कांहीं खेडीं आहेत. विजापूरचा पहिला राजा युसुफ आदिलशहा यानें मोरे नांवाच्या एका मराठे सरदारास १२००० पायदळ देऊन हें खोरें शिक्यांपासून काबीज करण्यास पाठविलें. त्यानें शिक्यांस तेथून काढून लावून त्याच्या बाजूचे गुजर, महाडिक आणि मोहिते या लोकांची पुंडाई बंद केली. त्यामुळें मोरे यांस ''चंद्रराव'' ही पदवी बादशहानें दिली.
त्याच्या यशवंतराव नांवाच्या मुलानें अहमदनगरच्या बु-हाण निजामशहाच्या फौजेशीं पंढरपूरजवळ जी लढाई झाली तींत पुष्कळ शौर्य दाखवून शत्रूचा बावटा जिंकून आणल्यामुळें, त्यास त्याच्या बापाच्या जागेवर नेमिलें, व त्यालाहि चंद्रराव पदवी दिली. या घराण्याच्या सात पिढयांनीं या प्रांतावर अंमल गाजविला. विजापुरच्या आदिलशाही राजांनीं त्याच्या  स्वामिभक्तीबद्दल तो प्रांत केवळ नांवाला खंडणी घेऊन त्याच्याकडे सोंपविला होता. स्वराज्यनिर्मितीनंतर शिवरायांनी मो-यास आपल्या बाजूस वळविण्याचा प्रयत्न केला परंतु तो वळला नाहीं. त्यानें विजापूर सरकारकडून महाराजांना कैद करण्यास आलेल्या शामराज नांवाच्या इसमास जेव्हां वाट दिली तेव्हां मात्र शिवछत्रपतींनी त्यास शत्रू मानिलें.... 'मो-याजवळचे लोक बळकट असून त्याचा मुलगा, भाऊ आणि कारभारी हिंमतराव हे शूर होते. शिवाजीराजांनी 'देशमुखांचा जमाव बराबर घेऊन जमावाच्या बळें युद्ध करून जाऊली घेतली' (जेधे शकावली.)  स. १६५५ मध्यें ही गोष्ट घडली. पुढें दुस-या वर्षी चंद्ररावापासून रायरींचा किल्ला घेतला. त्यावर चंद्ररावानें आदिलशहाशीं शिवाजीविरूद्ध मसलत चालविल्यानें त्याची चौकशी करून शिवरायांनी त्याला व त्याच्या मुलांनां देहांत शासन केलें व सर्व जावळी प्रांत खालसा केला. ( सातारा गेझेट; जेधे शकावली; मो-यांची बखर.)असा मोऱ्यांचा इतिहास सांगतो, तर अन्य नोंदीनुसार दुसराही विचारप्रवाह आहे

 महाबळेश्‍वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्‍यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोर्‍यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. चंद्ररावहा मोर्‍यांचा पिढीजात किताब होता.
आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोर्‍यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण शिवाजीराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे चंद्ररावझाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोर्‍यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला लागले आणि चंद्रराव मोर्‍यांनी महाराजांविरुद्ध सवतासुभा मांडला. चंद्रराव मोरे महाराजांचे उपकार विसरले.

सनावळीनुसार ३१ डिसेंबर १६५५ महाराज किल्ले पुरंदरावरुन जावळीवर निघाले. मंगळवार दिनांक १५ ज़ानेवारी १६५६ महाराजांनी जावळी घेतली. ३० मार्च १६५६ पर्यंत महाराज जावळी मुलुखांत होते. १५ एप्रिल १६५६ ते १४ मे १६५६ या कालावधीत महाराजांनी रायरी घेतला. जावळी मुलुखावर महाराज चालून आले त्याला निरनिराळी कारणे आहेत. त्याबाबत मोरे घराण्याची बखर सांगते महाराजांनी चंद्ररावास लिहिले -
तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां, राजे आम्ही आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन आपला मुलुक खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करुन फंद कराल, तर जावली मारुन तुम्हास कैद करुन ठेवू
उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले की, “तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावर कोण मानितो? येता जावली जाता गोवली पुढे एक मनुष्य जीवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोंकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबलेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितो आम्हा श्रीचे कृपेने पादशाहाने राजे किताब, मोरचले, सिंहासन मेहरेबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दरपिढी राज्य जावलीचे करतो. तुम्ही आम्हांसी खटपट कराल तर पष्ट समजून करणे आणखी वरकड मजकूर तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश घेता अपयशास पात्र होऊन जाल.
दौलतीचा खांब होण्याऐवजी मोर्‍यांनी दौलतीलाच आव्हान दिले. ‘‘...तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्‍वर! त्याच्या आणि बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. येता जावळी, जाता गोवळी?’’ राजगडाच्या सदरेवर मोर्‍यांनी उद्दामपणे लिहिलेले पत्र पंतांनी राजांना वाचून दाखविले. हा मग्रुरीचा जबाब ऐकून महाराज संतापले. मोर्‍यांना अखेरची संधी मिळावी म्हणून महाराजांनी पुन्हा एक पत्र मोर्‍यांना धाडलं जावळी खाली करोन, हात रुमालांनी बांधून भेटीस येणे!

पण चंद्रराव व हणमंतराव गुर्मीला आले. कारणच तसे होते. कारण त्यांच्या ताब्यात होते जावळीचे खोरे! म्हणून चंद्ररावाने महाराजांस आव्हानात्मक लिहिले. दारूगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविते थोर समर्थ असो, ‘तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!’’ ...मोर्‍यांच्या या पत्राची थैली राजगडाच्या सदरेवर उघडली गेली आणि महाराजांच्या संतापाचा कडेलोट झाला. महाराजांनी ओळखलं, मोर्‍यांस मारल्याविना स्वराज्य साधत नाही. जावळी स्वराज्यात येत नाही. जगतगुरू तुकोबा मोरे स्वराज्य प्रतिपश्चंद्रलेखेवहोण्याकरिता महाराजांना मदत करीत होते आणि जावळीचे मोरे स्वराज्याच्या मुळावरच उठले होते. जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्‍या चंद्रराव मोर्‍यांनी शिवाजी महाराजांना डिवचलं. जावळी म्हणजे वाघाची जाळी. जावळीचे खोरे म्हणजे महाबिकट मुलुख. जावळीच्या खोर्‍यात उतरणे म्हणजे मृत्यूच्या खाईत उतरण्यासारखे होते. याच जावळीच्या आणि आपल्या पायदळाच्या गुर्मीत मोर्‍यांनी राजांना उलट उत्तर पाठविले होते.....

"शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजी राणे यानी पौष चतुर्दतीस जाऊन जावली घेतली. शके १५७८, दुमुर्ख संवछर वैशाखमासी राजश्री सिवजी राजे यानी रायरी घेतली समागने कान्होजी जेधे देशमुख तालुका भोर व बांदल व सिलिंबकर देशमुख व मावळचा जमाव होता, हेबतराऊ व बालाजी नाइक सिलिंबकर याणी मध्यस्ती करुन चंदरराऊ किलियाखाली उतरले," असे जेधे शकावली सांगते.
शके १५७७ मन्मथ सवछरी पौष्य शुध चतुर्दस राजश्री सिवाजी जाऊन जाऊली घेतली चंदरराऊ पळोन राइरीस गेले, तेथे राजश्री स्वामीनी किलीयास वेढा घातला बरोबर कान्होजी नाईक व जमाव व वरकडा देशमुखांचा जमाव होता ते समई हैबतराऊ सिलिंबकर देशमुख तालुका गुंजणमावळ यांणी मध्यस्ती करुन चंदरराऊस भेटविले. असे जेधे यांचा करीना सांगतो.

मराठ्यांचे दुर्दैव, दुसरं काय! महाराजांचे कान्होजी जेधे, हैबतराव शिळीमकर, संभाजी कावजी कोंढाळकर, नांदलनाईक यांना तातडीचे हुकूम सुटले. निवडक धारकरी जावळीच्या कीर्र जंगलात घुसले. एकदम भयंकर कालवा उठला. चर्तुबेट, जोर, शिवथर आणि खुद्द जावळीवर एकाचवेळी मराठ्यांचा छापा पडला.
चंद्रराव, प्रतापराव, हणमंतराव आणि सगळी मोरे मंडळी धावली. दोन्ही बाजूंकडून मराठेच आपापसात लढू लागले, पण स्वराज्यासाठी त्यांचा नाइलाज होता. कापाकापी सुरू झाली. किंकाळ्यांनी जावळी कोंदली. संभाजी कावजी कोंढाळकरांनी हणमंतराव मोरे ठार केला. प्रतापराव मोर्‍यांनी लपत छपत विजापूरचा रस्ता धरला. खासा चंद्रराव जावळी हातची जातेय हे पाहून रायरीकडे पळाला.

मोरे कुलोत्पन्न जावळीतील आद्य चंद्ररावराजाविषयी मोरे यांचा बखरकार सांगतो -एकवचनी चंद्रावर हुजूर. तेव्हा चंद्रराव आडेल शिपाई, आजदादेघरचा राऊत मर्दाना,” “चंद्ररायाचे राज्य धर्माला जावलीकर राज्य करीत असता राजीयातील हिस्से एक हिसीयाची शिबंदी पायेहासम, एक हिसीयाची अन्नछत्रे व धर्म खैरात एका हिसीयाची खाजगी खर्च, तोसीखाना, पागा, सुरतखाना, अदिलखाना वगैरे, एक हिसा देवस्थली देव, शिवालये, माहाबलेश्वरी पंचगंगा चंद्ररायाही बांधल्या. ऐशा सात शिवपुऱ्या चंद्ररायाही आपले वंशपरंपरा जेथून जावलीचे राज्य जाले, तेथून संपेल तेथवर देवस्थली बाकी चालविली. ऐसे धर्मराजे मोरे जाहले

जावळी काबीज झाली. १५ जानेवारी १६५६ या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्‍वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला- मुरारबाजी देशपांडे!

जावळी काबीज झाल्यावर जावळीजवळचे चंद्रगड, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हेही किल्ले स्वराज्यात सामील झाले. जावळीची जागा कमालीची बिकट तेवढीच अजिंक्य! महाराजांनी आपला खजिना ठेवण्याकरिता हीच जागा पसंत केली. जावळी खोर्‍याला खेटून असलेल्या पारघाटाच्या नाकासमोरील भोरप्या डोंगरावर महाराजांनी तटा-बुरुजाचे शेलापागोटे चढविले आणि तयार झाला जावळी खोर्‍याचा रखवालदार किल्ले प्रतापगड’! याच प्रतापगडाने आणि जावळीच्या खोर्‍याने महाराजांना अफझलयुद्धात प्रचंड यश मिळवून दिले.
असे हे जावळीचे खोरे महाबळेश्‍वराच्या पश्‍चिमेकडे आहे. महाबळेश्‍वराहून कोकणात म्हणजे महाडकडे उतरणार्‍या गाडीरस्त्याच्या दोन्ही बाजूस जावळीचे खोरे आहे. महाबळेश्‍वर उतरून प्रतापगडाकडे जाण्याच्या रस्त्याच्या उजव्या बाजूस जावळीचा फाटा आहे. येथून जवळच मोर्‍यांची जावळी आहे. गावात मोर्‍यांच्या कुलदैवतांचे मंदिर आहे. जवळच मोर्‍यांच्या गादीचे ठिकाण आहे.
महाबळेश्‍वरहून प्रतापगडाकडे जाणार्‍या रस्त्याचा डावीकडचा फाटा पार गावात जातो. येथे रामवरदायिनीचे मंदिर आहे. जवळच शिवाजी महाराजांनी ३०० वर्षांपूर्वी कोयना नदीवर बांधलेला तीन कमानींचा दगडी पूल आहे. आजही या पुलावरून गाड्या ये-जा करतात. हा पूल आजच्या राज्यकर्त्यांसाठी आदर्शआहे.

सकळकळेकृत शिवकाव्यया पोथीतील सर्ग ६ मधील श्लोक क्र.१ सांगतो की राज्ञी जयश्रीसहित शिवाजीराजे स्वस्तयन करुन मंगल वाद्य घोषात स्वत:चे नगराकडे निघाले. त्याच सर्गात उल्लेख आहे की, शिवरायांना गजदानाची इच्छा झाली सकळकळ ब्राहमण याने चंद्रमाला नदीच्या किनारी यज्ञमंडप उभारला यज्ञाचे वेळी इन्द्रादि देवतांना आवाहन केले. संक्राती प्रथम दिवशीपुण्याहवाचन, दुसरे दिवशी धनदान व यज्ञसमाप्तीच्या वेळी ब्राह्मणांनी शिवाजी राजांस सुवर्णकुंभात भरलेल्या गंगोदकाने राजाभिषेककेला व दान केल्याचे उल्लेख आहेत. यावरुन शिवरायांनी मोरे उपकुळ विचारे कुलोत्पन्न शिवराज्ञी जयश्री उर्फ लक्ष्मीबाई हिच्यासह आपणांस जावळीमध्ये १४ जानेवारी १६५६ रोजी मकरसंक्रमणच्या मुहूर्तावर राजाभिषेक विधी सुरु करुन पंडित सकळकळे ब्राह्मण गुरुच्या हस्ते राजाभिषेक करवून घेतला आणि जावळी मुलखात घोषित केले. की यापुढे जावळी मुलखाचे राजे चंद्रराव मोरे नसून शिवाजी महाराज राजे आहेत. या राजाभिषेकाने जावळीच्या प्रजाजनांस महाराजांनी सत्ताबदल झाल्याचे दर्शवून दिले. त्यामुळेच मोऱ्यांचे सेनापती मुरारबाजी आपल्या चार बंधुसह आणि तान्हाजी मालुसरे आपल्या सूर्याजी बंधूसह तसेच काही मराठा घराणी आपल्या सैन्यासह शिवसैन्यात सामील झाली.
किल्ले रायगडावर मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी जावळी मुलुखाचे अधिपत्य प्रस्थापित करण्यासाठी आपला पहिला श्रीशिवराजाभिषेकसंपन्न व विस्तीर्ण जावळीचा राज्यकर्ता चंद्रराव याला नमवून त्याचे राज्य जिंकल्यावर १६५६ मध्ये मकरसंक्रमणाच्या काळात करवून घेतलेला दिसतो.असे या पोथीनुसार दिसून येते, मात्र यातील दाव्यांवर इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत.


स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मोरयांना आपले पुर्वज आणि त्यांचा इतिहास याचे पुनर्लेखन करावेसे वाटले. त्यानुसार मोरे घराण्याने इतिहासकालीन संदर्भ घेऊन नवीन पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी दिलेल्या संदर्भात असे नमूद केले आहे की, राजकीय वैमनस्यातून रघुनाथपंत सबनीस व संभाजी कावजी बांदा या शिवरायांच्या शिलेदारांच्या हस्ते १६५६ मध्ये दौलतराव मोरे यांचे दत्तक पुत्र कृष्णराव मोरे (शेवटचे चंद्रराव) तसेच हनमंतराव व सूर्याजीराव यांचा घातपाताने अंत झाला. त्यानंतर राजगादीचे वारस कृष्णाजीराव व बाजीराव यांचा क्रूरपणे शिरच्छेद केला गेला, असे बखरीत नोंद आहे. जावळी (सातारा जिल्ह्यातील प्रांत) राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर मोरे कुळवंशाने छत्रपतींच्या निर्वाणानंतरच्या काळातही स्वराज्याच्या रक्षणार्थ रक्त सांडले. मात्र, आपले १६० वर्षांचे राज्य वाचविण्यासाठी चंद्रराव मोरे घराण्याने छत्रपती शिवरायांना विरोध केला. हीच घटना सातत्याने काही इतिहास लेखकांनी पुढे आणली. परंतु, वास्तव कधीच समोर आणले नाही. असं त्यांचं यावरचं प्रतिपादन आहे...