Sunday, October 18, 2015

वीरप्पन ....कालही, आजही ......आणि उदयाही ?..काहीकाही लोक जिवंतपणी त्यांच्या हयातीत एक दंतकथा बनून राहतात तर काही असेही असतात की त्यांच्या दंतकथेसारख्या जीवनात मृत्यूपश्चातदेखील आणखी अंक जोडले जातात. पण त्यांच्या जीवनातील खरया सत्याचा उलगडा कधी होत नाही, नेमके आणि टोकदार सत्य समोर येण्याऐवजी समोर येत राहतात ते तर्क. आपल्या देशात अशा लोकांची संख्या काही कमी नाही, सिनेमाक्षेत्रात अशा लोकांची संख्या जास्त आहे त्यामानाने गुन्हेगारी क्षेत्रात असे लोक कमी आढळतात पण असे जितकेही लोक आहेत त्यात वीरप्पनचे नाव यातील शीर्ष लोकांमध्ये आहे..

गोपिनाथम,जिल्हा चामराजनगर, कर्नाटक. १८ जानेवारी १९५२. एका गुराख्याच्या घरी मध्यरात्री एक मुलगा जन्माला आला. आर्थिक चणचणीमुळे त्याचे लाडकोड काही झाले नाही आणि तो पोरगा पुढे अभ्यास आणि शाळा या गोष्टीतही रमला नाही. गावातील इतर गुराखी मुले त्याचे आपोआप सवंगडी झाले. बघता बघता तो गुराख्याचा एक हिंडफिरया झाला.मुळात त्याचे गोपिनाथम हे गाव तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवरचे गाव होते, तिथे सीमेवरील किरकिरीमुळे पोलीस काम करायला नाखूष असत, पोलिसांच्या नाखुशीचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे तिथले मदुमलाईचे घनदाट निबिड अरण्य ! तासनतास या जंगलातून फिरता फिरता त्याला शिकारीचे कसब सहज हस्तगत झाले.या पूर्ण परिसराचा काना कोपरा त्याच्या पायाखालून गेला. तो या भागाचा गरुडवाटाड्या झाला. यातूनच किशोर वयातच तो निष्णात शिकारी झाला. वयाच्या १६व्या वर्षी तो शिकारी टोळीत सक्रीय झाला.१७व्या वर्षी त्याने विरोधी टोळीतील सदस्याचा खून केला त्यामुळे तो सेवी गौडाच्या टोळीतला महत्वाचा सदस्य झाला,सेवी त्याचा पैतृक नातेवाईक होता.त्याचे वडील आणि जवळपास सर्व नातेवाईक सेवीला सर्वतोपरी मदत करत असत.वयाच्या विसाव्या वर्षी तो या टोळीचा म्होरक्या झाला आणि त्याचवर्षी त्याला अटक झाली. लॉकअप मधून बाहेर पडलेला हा तरुण पुढे या जंगलाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या जीवावर उठला. तो देशातला सर्वात मोठा चंदन तस्कर बनला, हस्तिदन्ताचा जगातला मुख्य स्मगलर बनला ! तोच हा वीरप्पन ! क्रूरकर्मा वीरप्पन !!

आपल्या सगळ्याना परिचित असणारा वीरप्पन. भल्या मोठ्या मिशांचा सुकड्या अंगयष्टीचा चिवट रानटी डाकू, तस्कर, खुनी माणूस. त्याने अनेक हत्त्याकांडे केली, अपहरणे केली. डॉक्टर राजकुमार या कन्नड सुपरस्टारचे प्रकरण जास्त गाजले, अनेक वनाधिकारयांचे मुडदे पाडले. बाह्य जगाशी त्यांचा संपर्क होता तो एका जुन्या रेडिओद्वारा. ज्या वीरप्पननं जवळजवळ अडीचशे माणसांना मारलं होतं, ते सरकारनं आपल्या मागण्या मान्य कराव्या म्हणून.

वीरप्पन जिवंत होता, त्या काळातही लोकांच्या तोंडी त्याच्या तर्हेतर्हेच्या कथा होत्या. सालेम, कोलातूर, धरमपुरी, मेट्टर आणि त्याचे स्वत:चे गाव गोपीनाथम येथील गावकरी त्यांचा हिरो आणि दैवत समजत... वीरप्पन इतक्या सहज एसटीएफच्या (स्पेशल टास्क फोर्सच्या) कसा हाती लागला, हे मानायला ते आजही तयार नाहीत. त्याच्या स्मरणार्थ देऊळ बांधायची तयारी या लोकांनी चालवली होती यावरून त्याच्यावरील प्रेम लक्षात यावे. अनेक लोक मूळकडू येथील त्याच्या थडग्याजवळ थांबतात. काही अश्रू ढाळतात. काही थडग्याजवळची माती नेतात. एसटीएफचे प्रमुख के. विजयकुमार यांनी वीरप्पन ठार होताच, त्यांच्या डोक्याचे मुंडन करून घेतले आणि बन्नारी अम्मन मंदिर ते नागनल्लूर येथील अंजनेल मंदिर अशी पदयात्रा केली. त्यांनी 'ऑपरेशन ककून'च्या प्रारंभी तशी शपथ घेतली होती.

खुद्द वीरप्पनची पत्नी मुत्तुलक्ष्मी हिनेच त्याच्या मृत्यूबद्दल दोन कथा सांगितल्या होत्या, प्रथम ती म्हणाली होती, "वीरप्पनला त्याच्या टोळीतील लोकांनीच ठार केले". नंतर तिने ही कथा फिरवली."ती आत्महत्या होती". त्याच्या टोळीत कुणी शिरकाव करूच शकत नव्हते. पोलिसांना श्रेय द्यायला ती आजही तयार नाही.

याला मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला होता, ते दावा करतात, 'टोळीतल्या सगळ्याच सदस्यांनी एकाच अॅम्बुलन्समधून प्रवास करणे पसंत करावे', हे शक्यच नाही. वीरप्पनचा उजवा हात सेतुकली गोविंदन् याने सगळ्यांनी एकाच वाहनाने सगळ्यांना प्रवास करू दिला नसता. तेदेखील चकमकीच्या खरेपणाविषयी संशय व्यक्त करतात. त्यांनी विचारलेले प्रश्न असे आहेत.
विरप्पनच्या मृत्यूविषयी अनुत्तरीत प्रश्न !

त्याच्या वाहनावर ४०० गोळ्या झाडल्या गेल्या आणि टायर शाबूत राहिले, हे कसे ? ग्रेनेड (हातबाँब) फेकला गेला असेल, तर धडाका कसा उडाला नाही ? वीरप्पनला केवळ तीन स्वच्छ जखमा झाल्या, कसे शक्य आहे ? या जखमा पॉईंट ब्लॅक शूटिंगसारख्या (अगदी जवळ टेकवून चाप ओढल्यासारख्या) वाटत नाहीत का ? वीरप्पनच्या गावात, गोपीनाथम्मध्ये वेगळीच कुजबूज चालू आहे. या कुजबुजीनुसार सेतुकलीचे वीरप्पनशी वितुष्ट आले होते, त्याने संतापाच्या झटक्यात आपला सरदार वीरप्पन याच्या डोक्यात गोळ्या घातल्या. मग टोळीच्या इतर सदस्यांना ठार करून आत्महत्या केली. पोलिसांना केवळ मुडदे सापडले. एका आख्यायिकेनुसार वीरप्पनच्या टोळीबाहेरच्या लोकांनी वीरप्पन टोळीला खलास (नष्ट) करून त्यांचे मुडदे पोलिसांना दिले. त्यांनी ते रुग्णवाहिकेत घालून नेले. याला जोडून आणखी एक कथा प्रसूत झाली आहे. ती चकमक दोन राज्यांच्या सीमेलगत कर्नाटकच्या प्रदेशात झाली; परंतु तमीळ आणि कन्नहिंग यांच्यात दंगल होऊ नये, यासाठी श्रेय तामिळनाडू एसटीएफला देण्यात आले.

आणखी एका आवृत्तीत केरळातील एका मुस्लिम अतिरेकी गटाचा संबंध दाखवला आहे. एस्टीएफ्ला श्रेय दिलेले नाही. यावर एस्टीएफ् प्रमुख विजयकुमार यांचे स्पष्टीकरण काय ? ते म्हणतात, "ती चकमक चित्रपटातल्यासारखी आणि अवास्तव वाटते". सत्य कल्पितापेक्षा अद्भुत असते. एका सामान्य गुन्हेगाराचे उदात्तीकरण केले गेल्यामुळेच या सत्यावर अविश्वाकस दाखवला जातो. 'वीरप्पन : द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकाचा लेखक सुनाद रघुराम मात्र पोलिसांवर विश्वास ठेवतो. त्याच्या मते, वीरप्पनने आपल्या नव्याने मिळवलेल्या मित्रांपाशी आपल्या योजना उघड करण्याची चूक केली. तो स्वेच्छेनेच बाहेर आला.

वीरप्पनच्या शेवटच्या काही छायाचित्रात त्याच्या आकडेबाज मिशांचा गोंडा दिसत नाही. त्या त्याने का छाटल्या ? यावर एक हकिकत अशी की, वीरप्पन मिशांना कलप लावीत असे. कलपाची भुकटी त्याच्या डोळ्यांत गेली आणि त्यामुळे त्याची दृष्टी गेली; म्हणून त्याने त्याच्या मिशाच छाटून टाकल्या. वीरप्पनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी त्या मिशा स्मृतिचिन्ह म्हणून ठेवून घेतल्या, म्हणून त्याच्या छायाचित्रात मिशा दिसत नाही, असेही काही जणांचे म्हणणे आहे. हे फेटाळत विजयकुमार म्हणतात, "वीरप्पनच्या मिशा काढण्यापेक्षा महत्त्वाची कामे मला होती."

एसटीएफमधील भ्रष्टाचार वीरप्पनच्या हाती लागला होता नव्हे तो या साखळीचा एक सदस्य होता त्याने तोंड उघडले असते आणि ती माहिती जगापुढे आली असती तर अनेकांचे बुरखे टराटरा फाटले गेले असते. त्याला दोन्हीही राज्यातील राज्यकर्त्यांचा सलग ४-५ दशके वरदहस्त होता, त्यांचा तो शार्प शुटरही होता आणि फायनान्सरदेखील होता असा युक्तिवाद असणारा तर्क आजही तामिळनाडूमध्ये मांडला जातो. वीरप्पनचा वापर कमी होत गेला आणि त्याचे उपद्रवमूल्य धोक्याच्या पातळीबाहेर जाईल अशी चिन्हे दिसताच दोन्ही राज्यसरकारांनी त्याच्याविरुद्ध कंबर कसली आणि त्याचा सोक्षमोक्ष लावला...

वीरप्पनला पकडण्याकरता किंवा ठार करण्याकरता ज्या अवाढव्य रकमा दोन्ही राज्यशासनांनी घोषित केल्या होत्या, त्यांना पोलीस पात्र आहेत का ? याबाबत कर्नाटच्या एसटीएफचे माजी प्रमुख एच्.टी. संगलियना सुचवले होते की, हा पैसा वीरप्पन ज्या प्रदेशात सक्रीय होता, त्याच्या विकासासाठी वापरावा. 'स्टार ऑफ मायसोर' चे संपादक के.बी. गणपति एसटीएफमधील भ्रष्टाचाराचा संदर्भ देऊन म्हणतात, खबर्यांवर व्यय करण्यासाठी ठेवलेला निधी त्या कामासाठी क्वचितच वापरला गेला. जिल्हा नैसर्गिक आपत्ती निधीप्रमाणे तो पैसाही एसटीएफवाल्यांनी आपसात वाटून घेतला.पुढे एका घटनेत वीरप्पनला ठार मारणार्‍या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त्रावाने इस्पितळाच्या वाटेवर मरण पावला हा योगायोग काय निर्देश करतो ? वीरप्पनच्या मृत्युनंतर मदुमलाईच्या जंगलातील चंदन तस्करी पूर्णपणे थांबली का याचे उत्तरदेखील नाही असंच आहे.

चंदनाचे लाकूड फार किमती असते. चंदनाच्या झाडाची लागवड झाल्यापासून साधारण १५ वर्षानी त्याच्या खोडाला सुगंध यायला लागतो आणि त्याची किंमत वाढते. चंदनाचे हे झाड तोडून त्यापासून तेल तयार करून अत्तर तयार केले जाते. या तेलाचा आणि अत्तराचा वापर सौंदर्य प्रसाधनात तसेच साबणांमध्ये केला जातो. या तेलाची किंमत विचारात घेऊन सरकारने चंदनाच्या झाडाच्या तोडीवर तसेच विक्रीवर मोठी बंधने घातलेली आहेत. भारत हा चंदनाची लागवड करणारा जगातला मोठा देश मानला जातो आणि भारतातल्या या चंदनाला परदेशात मोठी मागणी असते. म्हणून त्याची निर्यात करणारे लोक मन मानेल, तशी निर्यात करतात आणि पैसा कमावतात. या निर्यातीवर बंधने आणली नाहीत तर ही झाडे दुर्मीळ होऊन जातील आणि हळूहळू नष्टही होऊन जातील. म्हणून सरकार त्यांच्यावर बंधने घालत आहे. जेवढी बंधने अधिक घातली जातील तेवढा तस्करीला ऊत येत असतो. वीरप्पनने तामिळनाडू आणि कर्नाटकाच्या सीमेवरील जंगलात कायमचे वास्तव्य करून जवळपास २५ वर्षे तिथल्या चंदनाची प्रचंड निर्यात केली. ती करत असताना अधिकारी व नेत्यांना भरपूर लाच दिली आणि म्हणूनच वीरप्पनला पकडणे बरीच वर्षे अशक्य होऊन बसले होते. वीरप्पन मारला गेल्यानंतरही चंदनाची आणि रक्तचंदनाची तस्करी आजही सुरू आहे. 'अ' दर्जाच्या रक्तचंदनाची खुल्या बाजारामध्ये किंमत टनामध्ये दीड कोटी रुपये आहे. "ब' दर्जाचे रक्तचंदन 55 लाख रुपयांमध्ये एक टन या भावाने विकले जाते. ही खुल्या बाजारातील सर्वसाधारण किंमत विचारात घेतली असता आंध्र प्रदेश सरकारच्या तिजोरीमध्ये केवळ रक्तचंदनाच्या विक्रीतून लिलावाद्वारे दरवर्षी एक हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम जमा होते. याहून अधिक पटींनी याची तस्करी आजही सरकारी आशीर्वादाने आणि साखळीबद्ध पदधतीने आजही होते यावरून यातील एकूण रक्कम किती प्रचंड असेल याचा छाती दडपवून टाकणारा एक अंदाज यावा.

वीरप्पनला पकडण्याच्या मोहिमेवेळी जलद कृती दलाचे प्रमुख शंकर बिदरी यांच्यासह अनेकांनी स्थानिक महिलांवर बलात्कार केल्याचे काही महिन्यापूर्वी उघड झाले आहे. याविषयी सहा पीडित महिलांनी सविस्तर माहिती दिली होती. वीरप्पनला पकडण्याच्या बहाण्याने काही महिलांवर बलात्कार झाले. शंकर बिदरी यांनी बलात्कार करून क्रूरपणाची वर्तणूक केली. पीपल्स पॉवरनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (फेब्रुवारी २०१५ मध्ये ) पीडित महिलांनी त्यांच्या छळाची माहिती पत्रकारांना दिली. ओली बाळंतीण असताना एका खोलीत डांबण्यात आले. बिदरी यांच्यासह अनेकांनी एक वर्षे सहा महिन्यांपर्यंत बलात्कार केला. नैसर्गिक विधीला जाण्यासाठीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागत होती. एकूण सहा महिलांवर वारंवार बलात्कार झाले. आपल्या पतींना डोळ्यांसमोर मारण्यात आल्याचा आरोपही महिलांनी केला. बिदरींसह इतर अधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी कर्नाटक तमिळ फेडरेशनतर्फे केली आहे. यावर अजून ठोस निर्णय घेणे टाळले गेले आहे.

वीरप्पन संपला पण त्याची प्रवृत्ती अजूनही जिवंत आहे आणि विशेष म्हणजे त्याला जसा राजकारण्यांचा आणि प्रशासनाचा तो उपयोगी असेपर्यंत वरदहस्त होता तसाच आजही त्याच्या प्रवृत्तीतील सुधारित आवृत्तीना आहे. वीरप्पन जर जिवंत स्थितीत माध्यमांच्या साक्षीने पकडला गेला असता तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये अनेक राजकीय आणि आर्थिक भूकंप आले असते.

वीरप्पनच्या सर्वंकष इतिहासावर नजर टाकली की कधी कधी असे वाटते की दाऊद इब्राहीमदेखील जोपर्यंत उपयोगमूल्य आहे तोवर विविध सरकारांनी त्याला जिवंत ठेवला असावा. जेंव्हा त्याचा वापर पूर्ण होईल त्यादिवशी त्याचा देखील वीरप्पन केला जाईल आणि अनेक रहस्य त्याच्याबरोबर कायमची दडपली जातील. सुभाषचंद्र बोसांसारख्या युगप्रवर्तक माणसाची सत्यता जिथे लपवली जाते तिथे युज एंड थ्रो असलेल्या मल्टीपर्पजली युजफुल असणारया वीरप्पन आणि दाऊदची सत्ये कधी देशातल्या जनतेला काय कळतील ????

आजच्या दिवशी ११ वर्षांपूर्वी वीरप्पनची हत्या करण्यात आली पण मला आजही वाटते की वीरप्पन संपला नाही तो विविध रुपात जिवंत आहे,ज्या लोकांच्या रूपाने तो जिवंत आहे त्याना आपण याच्या नावाने ओळखत नाही इतकाच काय तो फरक आहे...

- समीर गायकवाड