Friday, October 16, 2015

ऑस्कर वाईल्ड आणि वि स.खांडेकर..


डोरियन ग्रे, ययाति आणि तृप्तता .....
१८९० मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे' मध्ये ऑस्कर वाईल्डने एका अप्रतिम जीवनविचारावर अप्रत्यक्षपणे मार्मिक भाष्य केले आहे.या कादंबरीत बेसिल हा निष्णात चित्रकार डोरियन ग्रे या उमद्या, देखण्या तरुणाचे नितांतसुंदर असे देखणे, लोभस चित्र  बनवतो. ते चित्र पाहून डोरियन ग्रे स्वतःच्याच म्हणजे खरे तर चित्राच्या प्रेमात पडतो. लॉर्ड हेन्रीच्या पाहण्यात हे चित्र येते आणि त्याच्या मनात असूयेपासुन ते मोहापर्यंतचे कपटभाव तरळून जातात. तो डोरियनच्या मनात भीती घालतो, तुझे हे सुंदर तरुणपण तु जपले पाहिजेस, अन्यथा वृद्धत्वाने तुझे यौवन नष्ट होईल, सुरकुत्या पडलेला चेहरा जगासमोर आला की जग तुला हसेल. तु तुझ्या तारुण्याची आणि सुंदर चेहरयाची खूप काळजी घेतली पाहिजेस, ते तुझ्या जगण्यासाठी अनिवार्य आहे असं त्याच्या मनावर बिंबवतो.

लॉर्ड हेन्रीच्या या आगंतुक सल्ल्याचा डोरियनच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो, जीवनातील सर्व मुल्ये त्याच्या चिरतारुण्याच्या मोहापुढे अन सौंदर्याच्या अविवेकी लालसेपुढे कुचकामी ठरतात. जीवनाचा, तारुण्याचा खरा आनंद तो विसरून जातो. त्याच्या कडून भयंकर चुकांची मालिकाच घडते, अघटित घडत राहते कधी अनवधानाने तर कधी जाणीवपूर्वक. त्याला खंत खेद वाटायला लागण्यापूर्वीच त्याचे आनंदी आयुष्य तारुण्याचा हव्यास बनून जाते. त्याची अत्यंत सुंदर पत्नी जी एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री देखील आहे, ती त्याच्या या अमानुष, अविचारी वर्तणुकीला कंटाळते. तिने ज्या डोरियनवर प्रेम केले होते तो हा नव्हे याची प्रचीति आल्यावर एका बेसावध क्षणी ती आत्महत्त्या करते. या घटनेचा डोरियनवर फारसा परिणाम होत नाही. याच बेफिकिरीमुळे त्याच्या हातून पुढे खून होतो. या खुनामुळे त्याला तुरुंगात जावे लागते. काळकोठडीत त्याला उपरती होते पण तोवर सर्व काही त्याने गमावलेले असते.यातच बराच काळ पुढे निघून जातो....

वेगवेगळी व्यक्तिचित्रे, चेहरे रेखाटून त्याची पोर्ट्रेट बनवणारया बेसिलला आता एका क्रूर माणसाचे प्रभावी चित्र बनवायचे असते. त्यासाठी तो अनेक माणसे शोधतो, अनेक ठिकाणांना भेटी देतो पण त्याला या चित्रासाठी मनासारखा चेहरा सापडत नाही. क्रूर चेहरयाच्या शोधात बेसिल हेन्रीच्या तुरुंगातील कैद्यापर्यंत पोहोचतो. एका तुरुंगात त्याला हवा असलेला अगदी क्रूर, राकट, निर्दयी असा चेहरा दृष्टीस पडतो. तो त्या कैदयाला समोर बसवून त्याचे चित्र बनवायला घेतो खरे पण नंतर त्याच्या लक्षात येते की काही काळापूर्वी आपण ज्याचे निरागस, देखणे लोभसवाणे असे पोर्ट्रेट बनवले होतेतो हा कैदीच आहे. हा तर डोरियन ग्रे आहे !!!!

चिरतारुण्य आणि अविवेकी सौंदर्याच्या अतिरेकी हव्यासापोटी डोरियन ग्रे सारख्या संवेदनशील माणसाची कशी शोकांतिका होते हे ऑस्कर वाईल्डने अगदी नाट्यमय पद्धतीने आणि सहज, प्रवाही, अलंकारिक शैलीत मांडले आहे....


या जगात जन्माला येण्याचा एकाच मार्ग आहे, तसं मरणाच नाही. मृत्यु अनेक वाटांनी येतो,कुठून ही येतो तो असं आपले वि.स.खांडेकर 'ययाति'मध्ये लिहितात. या जगात जो तो आपापल्यासाठी  जगतो हेच खरे. वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री.पण खरोखरच हे "आत्मप्रेम" असते. आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते. असं सोप्या भाषेत खांडेकरांनी लिहिले आहे. महाभारतातील ययाति हा खांडेकरांचा नायक आहे, त्याला वृद्धत्वाची अनुभूती होऊ लागल्याबरोबर तो देवाकडे तारुण्यासाठी हात पसरतो, तारुण्याची भिक  मागतो.त्याच्याकडे असलेल्या सर्व साधनांचा मनसोक्त उपभोग घेण्यासाठी त्याला तारुण्य हवे असते.राजा ययाति तारुण्याची भिक मागतो पण त्याच्यासाठी कोणीही आपल्या तारुण्याचा त्याग करत नाही. तारुण्याच्या हव्यासात दग्ध झालेल्या ययातिसाठी शेवटी त्याचा पुत्र पुढे येतो जो आपले तारुण्य आपल्या पित्याला द्यायला तयार होतो. आपल्या मुलाचे तारुण्य उपभोगणारा ययाति काही काळ त्या क्षणिक सुखाच्या उपभोगात दंग होऊन जातो, पण त्याला पुन्हा प्रश्न सतावू लागतो कीं याच्यापुढे काय ? पुन्हा वृद्धत्व आले तर कसे होणार हा विचार त्याला बेचैन करू लागतो.प्रेम आणि तारुण्याच्या शोधात तो पुर्ण आयुष्य घालवतो. त्याला कधीही वृध्द बनायचे नसते. त्याला सदैव चिरतरूण राहण्याची इच्छा आहे. परंतु काही  घटनांमुळे त्याला आयुष्याच्या अंती जाणवत की ही सारी भोगवृत्ती जीवनासाठी उपयुक्त नसते.

माणसांनी उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती, तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. देवान माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याच बंधन हवं. त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही , ते रणांगण आहे.असे दोन टोकाचे पण मार्मिक जीवनदायी विचार ययातिमधून खांडेकर मांडतात. असेच विचार ऑस्कर वाईल्डने 'डोरियन ग्रे'च्या माध्यमातून मांडलेले आहेत.

जीवनात कोणी कुठे थांबायचे, कधी आणि कशा अवस्थेत थांबायचे, का थांबायचे याचे अप्रतिम विश्लेषण हे समान वैचारिक सूत्र या जीवनभाष्य करणारया दोन्ही कादंबरयात मांडलेले आहे. दोन सिद्धहस्त लेखकांच्या अजरामर साहित्यकृती इतकीच याची नोंद न घेता आयुष्याची महान शिकवण सहजगत्या देणाऱ्या दोन श्रेष्ठ कलाकृती म्हणून त्यांचा आस्वाद घेतला पाहिजे. जीवनातील इच्छा - वासनांच्या तृप्ततेचे खरे अर्थ समजण्यासाठी एकदा अवश्य वाचावे असे अलंकारिक साहित्य म्हणून या कलाकृतींचा सदैव उल्लेख होत राहील हे मात्र निश्चित आहे...

आज ऑस्कर वाईल्डचा जन्मदिवस आहे त्यानिमित्ताने हे अल्पसे स्मरण...


- समीर गायकवाड.