Saturday, October 10, 2015

राजकुमार ...."गुलाम बनकर जीओगे तो कुत्ता समजकर लात मारेगी ये दुनिया...नवाब बनकर जीओगे तो शेर समझ कर सलाम ठोकेगी ये दुनिया...दम कपड़ों में नहीं, जिगर में रखो, बात कपड़ों में होती तो सफेद कफन में लिपटा मुर्दा भी "सुलतान मिर्ज़ा" होता...".हा संवाद त्याच्याच आवाजात ऐकावा...
वर्ष होतं १९७१. सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा आपल्या 'जंजीर' या नव्याकोरया सिनेमातील नायकाच्या प्रमुख भूमिकेसाठी मेहबूब स्टुडिओमध्ये 'त्याला' भेटायला आले होते. त्याच्या मर्यादा या सिनेमाचे चित्रिकरण सुरु होते. सेटवर त्याच्या जोडीला अजित हा कोस्टार हजर होता. काही वेळ थांबून झाल्यावर आपली सर्व हिंमत एक करून प्रकाश मेहरा त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी जंजीरमध्ये 'लीड रोलसाठी काम करणार का ?' असं त्याला विचारलं. त्यावर त्याने दिलेले उत्तर ऐकून त्यांचा पारा चढला आणि ते काही सेकंदात तिथून चालते झाले. तो प्रकाश मेहरांना म्हणाला होता, "तुमच्या केसाला लावलेले सरसो तेल खूप घाण वास मारतेय, त्यामुळे तुम्ही दोन मिनिट देखील माझ्याजवळ उभे राहू शकत नाही. तुमच्यासोबत सिनेमा करणं ही फार लांबची गोष्ट आहे'
नंतर पुढे १९७३ मध्ये जंजीरने काय इतिहास घडवला हे सर्वश्रूत आहे. पण त्याला त्याची कधी खंत वाटली नाही....
सिनेमाच्या अधे -मध्ये, सुरवातीला वा इंटरवलला कधीही त्याची एन्ट्री होवो शिट्ट्याचा जाम पाऊस पडायचा...
आपल्या ठेवणीतल्या खर्जातल्या आवाजात त्याने नुसते 'जानी' असे जरी म्हटले तरी पैसे फिटायचे .....
त्याचं ओठाच्या कोपरयात पाईप धरणं अन किंचित एका पायावर झुकून वाकडे चालण्याची ढब अन त्याची खांदे हलवत जाण्याची देहबोली कशालाही तोड नव्हती अन अजूनही नाही. डाव्या हातातल्या पाईपशी चाळा करत बोलणे, एखाद्या गिर्रेबाज कबुतरासारख त्याच मान वेळावणं, समोरच्याला गारद करून जाईल अशा धारदार नजरेने बघणं आणि संवादफेक करतानाचे त्याचे पॉझेस हे सारं मिश्रण १२० - ३०० किवामयुक्त पानापेक्षाही रंगतदार होतं आणि लालपांढरया रश्श्यापेक्षा झणझणीत होते… त्याचं चालणं बोलणं सगळं कसं अगदी ठसकेबाज होतं….

त्याचा आवाजच त्याचे सर्व काही होते, तो संवादफेकीच्या शैलीच्या जोरावर समोर कोणताही अभिनेता असला तरी त्याला कच्चा खाऊन टाकायचा....
त्याला डान्स बिन्स असलं काही जमत नव्हत, तो अभिनयाच्या देखील फारसे वाटेला जात नव्हता, त्याने अफेअर बिफेअर देखील कधी केले नाहीत....
पुरस्कार आणि त्यांचे सोहळे यांना त्याने कस्पटाहुन कमी लेखले होते… त्याचा चाहता वर्ग हाच काय तो विशाल पुरस्कार…
जेव्हढा तो स्टायलिश होता त्याच्याहून अधिक पटींनी तो तिरसट होता… अनेक कोस्टार्सना त्याने त्याचा हिसका दाखवला होता…

त्याच्या नावाप्रमणेच त्याचा रुबाब होता…
राजा आणि राणी मी कधी पाहिले नाहीत पण मी हा राजकुमार पाहिलाय अगदी राजे रजवाडयातला खरा राजकुमार देखील त्याच्या पुढे फिका वाटावा असा आवाजाचा किमयागार बादशहा ....आपला जानी ....आपला राजकुमार !
'हमको मिटा सके, जमाने में दम नहीं, हमसे जमाना है, जमाने से हम नहीं...’ (बुलंदी)
"हम आंखोंसे सुरमा नही चुराते, हम आंखेही चुराते है .."
‘न तलवार की धार से, न गोलियों की बौछार से, बंदा डरता है तो सिर्फ, परवर दीगार से...' (तिरंगा)
‘जिनके घर शीशे के हो, वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते..… '(वक्त)
'चिनाय सेठ ये छुरी बच्चों के खेलने की चीज नहीं, ये चाकू है। फ़ेंक दो। लग जाये तो खून निकल आता है। समझे जानी.…'(वक्त)
'जानी,हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे,लेकीन वो बंदूकभी हमारी होगी, गोलीभी हमारी होगी और वो वक्त भी हम तय करेंगे और जगह भी !" (सौदागर)
"काश की तुमने हमे आवाज़ दी होती ......तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते.."(सौदागर)
"आपके लिये मै जहर को दुध की तरह पी सकता हुं, लेकिन अपने खून में आपके दुष्मनी के किडे नही पाल सकता.." (राजतिलक)
"हमारी जुबां भी हमारी की तरह....दुष्मनोंसे सीधे बात करती है ..."
"दादा तो इस दुनिया में दो हैं, एक वो उपरवाला और दुसरे हम !" (मरते दम तक)
असले संवाद त्याच्या नावावर ढिगाने आहेत. "नीलकमल मुझे मालूम था तुम जरूर आओगे !" साधे वाक्य आहे पण ते राजकुमारच्या तोंडी आले की त्याचा अप्रतिम डायलॉग होतो. हे सर्वस्वी त्याचेच यश !

तो राजकुमारसारखा जगला व स्वत: निर्माण केलेल्या अनाकलनीय अशा प्रतिमेनुसारच जगाच्या पडद्यावरून गेला. सिनेमाच्या भाषेत ‘कन्टिन्युटी’. राजकुमारच्या यशोगाथेवर दृष्टिक्षेप टाकताना त्याच्या ‘प्रगतिपुस्तका’नं किती सुपरहिट चित्रपट आहेत, किती अपयशी ठरले यावरून मोजदाद करणे योग्य नाही. राजकुमार त्यापलीकडे जाऊन आपले अस्तित्व वलय व लोकप्रियता निर्माण करण्यात यशस्वी ठरला. कधी तो एखादे कोडे ठरावा, तर कधी घमेंडी वाटावा, असे काहीसे हे चमत्कारिक समीकरण आहे.

विशिष्ट शैलीतील संवादफेक आणि त्याच्या वागण्यासंदर्भातील वेडेवाकडे किस्से या दोन गोष्टींसाठी त्याची ओळख अधोरेखित झाली.बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्याने रहेमान याला उद्देशून केलेला संवाद त्या काळात (१९६७ ) प्रचंड गाजला व असे संवाद म्हणजेच आपली अभिनयशैली असे तो मानू लागला. तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमारने अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी त्यात तो प्रभावीदेखील ठरला. जसे की कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’मध्ये तो मीनाकुमारीला म्हणतो, ‘आपके पांव देखे कितने हसीन है ! जमीं पे मत उतारीये, मैले हो जायेंगे..’ तर कधी तो व्यक्तिरेखेबाहेर येऊन राजकुमार ढंगात संवाद बोलू लागला. 'मर्यादा', 'चंबल की कसम', 'बुलंदी', 'दिल का हीरा', 'कर्मयोगी' अशा चित्रपटांत तसा प्रत्यय येतो. पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्याची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्याला स्वातंत्र्य देतात असे जाणवू लागले. आणि त्याच्या याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्याचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. तो राजकुमारचे संवाद ऐकायला सिनेमाचे तिकीट काढू लागला. त्याच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला. गिरगावातील इम्पिरियल या चित्रपटगृहाच्या भिंतीवर पोस्टरऐवजी त्याचे ‘बुलंदी’मधले संवाद लिहिले होते, ते वाचून तिकीट काढणारे सिनेमावेडे होते. हेदेखील एक यशच !

राजकुमार संवादफेकीतला बादशहा म्हणून ओळखला जाताना त्याच्यातील अत्यंत गुणी सशक्त व संवेदनशील कलाकार बाजूला पडला. मेहबूब खानचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमारचा उत्तम अभिनय पाहायला मिळतो. कालांतराने चेतन आनंदच्या ‘कुदरत’ या पुनर्जन्मावर आधारित चित्रपटातही राजकुमारने सकस अभिनयाचा प्रत्यय दिला.

तो सहकलाकारांशी तिरसटपणे वागतो, अनावश्यक सल्ले व उपदेश देतो, याबाबतही केवढय़ा तरी कथा, किस्से, दंतकथा प्रसिद्ध आहेत. चित्रपट कलाकारांच्या ‘इतनी सी बात’ला तिखट-मीठ लावून अशा गोष्टी पुन:पुन्हा रंगवून सांगितल्या जाताना त्यावरून त्या कलाकाराभोवती एक प्रतिमा निर्माण होते. राजकुमार अशा दंतकथेचा जणू ‘नायक’ ठरला. दिग्दर्शक राज खोसलाला एका पार्टीत म्हणे त्याने विनोदवीर राजकिशोर अशी हाक मारून अवमानित केले, झीनत अमानला अशाच एका ‘पार्टी’त त्याने ओळखलेच नाही व म्हटले, ‘इतनी खूबसूरत हो तो फिल्मों में काम क्यू नहीं करती..?’ ‘गलियों का बादशाह’साठी नृत्याच्या चित्रीकरणात भाग घेताना तो स्मिता पाटीलला म्हणाला, ‘आर्ट फिल्मों में काम करने से कुछ नहीं आता, डान्स आना जरुरी है..’ (हे स्मिताने ऐकून घेतले असेल असे वाटते का?) एकदा परेश रावलने त्याला म्हणे उलट उत्तर देत म्हटले की, 'राजकुमारसर, किसी की आवाज अच्छी होती है तो किसी की अॅक्टिंग.. मगर अॅक्टिंग अच्छी होना जरुरी है.' अशा किश्शांमुळे राजकुमार सतत चर्चेत राहिला. चित्रपटसृष्टी, चित्रपटरसिक व प्रसारमाध्यमे यांना असे किस्से म्हणजे खमंग खुराकच. त्यात तथ्य किती याचा कधीच कोणी शोध घेतला नाही.

कोणत्याही व्यक्तिरेखेत एकाच सुरात संवाद म्हणण्याच्या त्याच्या तथाकथित स्टाइलवर कोणाही दिग्दर्शकाने त्याला रोखले नाही. (बहुधा त्याचे तेच वैशिष्टय़ चित्रपटाला तारेल अशी दिग्दर्शकाला खात्री असावी.) आणि त्याच्या वागण्यात तिरसटपणा का असावा, यामागची मानसिकताही कोणी शोधली नाही. (चित्रपट कलाकाराची लोकप्रियता पाहावी, त्याचे वागणे तपासू नये असा समज असावा.) या साऱ्यातून त्याची जानी अशी ओळख झाली व त्या नावानेच तो ओळखला गेला. त्यात त्याची अभिनेता म्हणून वाढ खुंटली.
‘जेमिनी पिक्चर्सच्या एस.एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ (१९५९) नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ (१९९१)मध्ये तो तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकला. तेव्हा त्याच्यात तोच आत्मविश्वास होता. तो कुठेही कमी पडला नव्हता.

वरळी सी-फेस येथून आपल्या बंगल्यातून तो उघडय़ा जीपमधून एखाद्या राजकुमारासारखा मुंबईच्या उपनगरातील स्टुडिओत येई, पण कोणत्याही सिग्नलला त्याची गाडी थांबली असता कोणीही चाहता अथवा बघ्यांतील कोणीही पुढे सरसावण्यास धजावत नसे. चित्रपटांच्या सेटवर शूटिंगच्यावेळेस राजकुमारचे गोरेगोमटे रूपडे, त्याचा दरारा, रुबाब हे खुलून यायचे. अत्यंत शांतपणे तो सेटवर येई, तो येताच सेटवरच्या शांततेत भर पडत असे. मग दिग्दर्शकाचे त्याच्याशी अदबीने वागणे सुरू झाले की तो सगळय़ांच्या केन्द्रस्थानी असे. पुढे तो दृश्य- संवाद, समोरच्या कलाकाराची जागा, कॅमेऱ्याचा वावर असे सगळे व्यवस्थित समजून घ्यायचा. मध्येमध्ये नाक अथवा डोळय़ांखाली खाजवत, गळय़ावरून हात फिरवत ही स्वारी कॅमेऱ्यासमोर येणार. कामाची कसलीही घाई नसणे हे त्याचे वैशिष्टय़. दुपारी सेटवरच्या लंच ब्रेकची घोषणा होताच तो आपल्या खोलीत/ मेकअप रूममध्ये जाणार (तोपर्यंत व्हॅनिटीचे आगमन झाले नव्हते) दोन तासांची व्यवस्थित विश्रांती-झोप वगैरे घेऊन मग पुन्हा ताजातवाना होऊन सेटवर येणार.

एखाद्या ‘राजा’सारखा तो वावरायचा, त्याला ते शोभायचे. त्याच्या कामाची अशी पद्धत असल्यानेच त्याच्या चित्रपटांची संख्या वाढली नाही. त्याची त्याला आपल्या अस्तित्त्व अथवा स्टारडमसाठी गरजच भासली नाही. तो मात्र ऐटीत सांगे, ‘लोग मुझे देखने के लिए फिल्मो की तिकीट खरीदते है..’ त्याच्या बोलण्यातला हा गर्व अथवा दर्प काहींना खटकेल, पण त्यात त्याचा आत्मविश्वास होता ना? हेमामालिनीने त्याच्यासोबत ‘लाल पत्थर,’ ‘शरारा,’ ‘एक नयी पहेली,’ ‘कुदरत’ इत्यादी चित्रपटांतून आवर्जून भूमिका केली, यावरून तो खाजगी पातळीवर अत्यंत सहकारी वृत्तीचा असावा. त्याच्या पुरू, पाणिनी या मुलांनी व वास्तविकता या मुलीनेही चित्रपटाच्या क्षेत्रात पाऊल टाकले, पण राजकुमारमधील एकही गुण त्यांच्यात नसल्याने त्यांची वाटचाल खुंटली. ‘जानी’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याने कधीही सिनेपत्रकारांशी ऊठसूट ‘सुसंवाद’ ठेवला नाही. आपल्या चित्रपटाचा मुहूर्त, त्याचे चित्रीकरण, प्रीमियर खेळ, पाटर्य़ा यातील आपल्या वागण्यातून तो आपल्याबाबत काय लिहिले जावे यांचा जणू पुरवठा करीत असे. अगदीच कोणी मुलाखतीसाठी आग्रह धरलाच तर तो नजर भिडवत म्हणे, ‘होमवर्क करके आ जाना, राजकुमार से मुलाखत कोई आसान बात नही है..’

इंडस्ट्रीत राजकुमारची ओळख कायम डायलॉगकिंग अशीच राहिली होती.त्याला भानगडीत स्वारस्य नव्हते तरीही 'दिल अपना और प्रीत पराई' या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान मीनाकुमारीला समोर बघून तो बऱ्याचवेळा संवाद विसरून जायचा हे देखील एक सत्य आहे ! राजकुमार एक सनकी माणूस होता पण त्याला मीनाकुमारीबद्दल एक विलक्षण आस्था होती. काही चित्रपट समीक्षकांच्या मते तो देखील मीनाच्या प्रेमात पडला होता. त्याची मीनाबरोबरची वाढलेली जवळीक बघून मीनाच्या पतींनी कमाल अमरोहींनी त्याचे आणि मीनाचे गहिऱ्या प्रेमाची जवळीक दाखविणारे सीन्सच 'पाकिजा'मधून खुबीने टाळले होते. त्या दोघात एक मर्यादारेखा त्यांनी आखून ठेवली होती. तरीही 'आपके पांव देखे बहोत हसीन है ..' असं सांगत या जोडीने रसिकांच्या मनावर गारुड केलं. जेंव्हा 'पाकिजा'त या दोघांच्या एका युगलगीताचा प्रसंग आला तेंव्हा कमाल अमरोहींनी या दोघांवर केमेरा फोकस न करता निसर्ग, पाण्याच्या लाटा, आकाश, चंद्र- चांदण्या यावर जाणीवपूर्वक जास्त फोकस केला. हे गाणं होतं, 'चलो दिलदार चलो चांद के पास चलो …'

राजकुमार प्रेमाच्य भावोत्कट दृश्यात अगदी केविलवाणा अभिनय करायचा. विशेष म्हणजे त्याच्या दिग्दर्शकाना अशा दृश्यास तो मज्जाव करायचा कारण यामुळे त्याच्या इमेजला जबरी तडा जायचा. या सणकी माणसाच्या का नादी लागावे म्हणून त्याचे दिग्दर्शकदेखील अशी दृश्ये टाळत. मात्र १९६५ मध्ये आलेल्या 'काजल' मध्ये राजकुमारने कमाल केली. मीनाबरोबर त्याच्या समोर या सिनेमात धर्मेंद्र होता ! धर्मेंद्रवर मीना जीव ओवाळते हे राजकुमारच्या पक्कं डोक्यात होतं. त्यामुळे त्याने या सिनेमाचे संगीतकार असणाऱ्या रवींना गाठले, रवी हे राजकुमारचे जवळचे मित्र होते. राजकुमारने त्यांच्याथ्रू दिग्दर्शक राम माहेश्वरीकडे एका युगलगीतासाठी गळ घातली. गुलशन नंदा यांच्या कथेत त्या प्रमाणे गाण्याची सिच्युएशन बनवली गेली. गाणे तयार झाले, "छू लेने दो नाजुक होठों को, कुछ और नहीं हैं जाम है ये, कुदरत ने जो हमको बख्‍शा है, वो सब से हसीं इनाम है ये... " या गाण्यात राजकुमारने जीव ओतला, अभिनयाचा पुरेपूर प्रयत्न करून धरमपाजीच्या डोळ्यापुढे काजवे चमकावले ! हे गाणे मीनाकुमारी आणि राजकुमार यांच्यावर चित्रित करण्यास राम माहेश्वरी अखेरपर्यंत राजी नव्हते पण राजकुमारने त्यांना अक्षरशः दरडावले, एरव्ही विशिष्ट डायलॉगसाठी - प्रसंगासाठी प्रचंड आग्रह धरणाऱ्या राजकुमारच्या या गाण्यामागील आग्रहामागे त्याचे मीनावर न व्यक्त झालेलं प्रेमच असावं !

राजकुमारसाठी १९६० ची आणखी एक नोंद राजकुमारसाठीच घेता येईल मात्र वेगळ्या घटनेसाठी. जेनिफर या एंग्लोइंडियन एअरहोस्टेसशी राजकुमार १९६० मध्ये विवाहबद्ध झाला होता, तिच्याशी हिंदू पद्धतीने विवाह करून तिचे नाव त्याने गायत्री असे ठेवले. पुढे तिच्या पासून राजकुमारला पुरू, पाणिनी ही मुले आणि वास्तविका ही मुलगी झाली.

'जानी' कसा अवघड, विक्षिप्त व विचित्र होता याचे हे असे कितीतरी रंग आहेत. पण कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही तो वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. राजकुमार हे वेगळे रसायन आहे हे त्यात त्याने सतत सिद्ध केले, अगदी त्याच्या मृत्यूची बातमीदेखील त्याच्या त्या वाटचालीला साजेशी ठरली. त्याला कर्करोगाने ग्रासले असल्याची बराच काळ चर्चा असूनही त्या दरम्यान त्याने ‘सौदागर’मधील भूमिका साकारली होती, पुढेही काही काळ वाटचाल केली, पण आपल्या आयुष्याचा शेवट मात्र सहजी कोणाला कळणार नाही असाच केला.

राजकुमारचे निधन, त्या संदर्भातील बातमी, त्याच्यावरचे अंत्यसंस्कार हे सगळंच त्याच्या 'आपल्या खासगी आयुष्याबाबत शक्य तितकी गुप्तता पाळा', अशाच स्वभावधर्मानुसार झाले.. ३ जुलै १९९६ चा तो दिवस. त्या बातमीचा तो मोबाईल कॉल, इंटरनेट यांचे आगमन होण्यापूर्वीचा तो काळ. मोजक्या उपग्रह वाहिन्या मात्र आल्या होत्या, पण ‘चोवीस तास’ बातम्यांचा रतीब घालण्याची प्रवृत्ती आली नव्हती. तात्पर्य, राजकुमारच्या निधनाचे वृत्त वेगाने पसरावे असे वातावरण नव्हते. . प्रसार माध्यमात या बातमीची खातरजमा होईपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार झालेदेखील होते.. बॉलीवूडमधल्या कुणालाही न कळवता त्याच्या अत्यंत घनिष्ट मोजक्या कुटुंबियांव्यतिरिक्त त्याच्या अंत्यविधीला कुणीही उपस्थित नव्हते. प्रेस, मिडीयापर्यंत जिथे वेळेवर बातमी पोहोचू दिली नाही तिथे न जन्मलेल्या सोशल मिडीयाचा प्रश्न नव्हता. आत्यांतिक दिखाऊपणाचे लाचार बेगडी आयुष्य जगणारया बॉलीवूडवाल्यांना राजकुमारने अगदी हेतुपुरस्सरपणे आपल्या अंत्यविधीस येऊ दिले नाही मात्र आपले आयुष्य त्यांच्यातच घालवले ! याचे कारण त्याच्या स्वभावातच दडलेले आहे...
राजकुमारच तो, तसाच तिरसट वागणार…

- समीर गायकवाड.