Monday, September 28, 2015

'बोल्ड अँड ब्यूटिफूल' बाय लता...


....बलदंड देहाच्या काळ्याकभिन्न आझादला साखळदंडाने जखडून पिंजऱ्यात कैद केलंय. "सी ग्रेड'च्या स्टंटपटातून हाणामारीची किरकोळ कामे करणाऱ्या या नगण्य नटाला कधी नव्हे असं सिनेमाच्या श्रेयनामावलीत महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलंय - "ऍण्ड आझाद इन गोल्ड केज'. अस्वस्थ मन-स्थितीत तो पिंजऱ्यात येरझाऱ्या घालतोय. मग त्याच्यासमोर अवतरलेली कमनीय बांध्याची अल्पवस्त्रांकित हेलन आपल्या मादक हावभावांनी त्याला खुणावू लागते "आंss जाने जां, sss  मेरा ये हुस्न जवॉं...' गाण्यातले आर्त कामुक भावबंध ऐकून पिसाटलेला आझाद वखवखलेल्या नजरेने तिच्या तारुण्याचा आस्वाद घेऊ लागतो आणि प्रेक्षक मात्र कमालीचे रोमांचित होऊन स्टेजवरचा तो आगळावेगळा नृत्याविष्कार भान हरपून पाहू लागतात. तोंडात साखरपाक घोळवावा तसे इथे शब्द घोळवलेत, त्यांच्याशी जालीम खेळ केलाय. सुरुवातीचा 'आं जाने जा'चा आलाप तर अगदी जीवघेणा झालाय. आझादच नव्हे तर अख्खे पब्लिक यामुळे अवाक होऊन जाते. ..शॉट कट !

....नायक विनोद मेहराला जादूची अंगठी गवसल्यामुळे ती तोंडात ठेवताच अदृश्‍य होण्याची किमया याला साध्य झालीय. त्याच्यावर फिदा झालेली आणि सहवासाला आसूसलेली नायिका (रेखा) मात्र या गोष्टीमुळे हवालदिल होऊन त्याच्याशी जवळीक साधू पाहतेय. गायब अवस्थेत तिच्याशी छेडखानी करणाऱ्या त्या चावट नायकाला मग ती मदनिका बिनधास्त आव्हान करीत गाऊ लागते - "अंग से अंग लगा ले, सांसो में है तूफान, जलने लगी है काया, जलने लगी है जान...' गाण्यातील "सांसो में है तूफान'वर तिने टाकलेले दीर्घ उसासे आणि तार स्वरात उच्चारलेला "काया' शब्द ऐकल्यावर "आग बराबर लगी है' असंच दर्शवून जातो. थेटरातलं पब्लिक मात्र चुळबूळ करीत आता काय होणार, याचाच विचार करू लागतं. कट !

.... नजाकतीचं सौंदर्य लाभलेल्या सायरा बानूने फक्त टॉवेल परिधान केलाय. कुटिल कारस्थान करायला निघालेल्या खतरनाक रणजीतला काही वेळापुरतं थोपवून धरण्याची अवघड जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आलीय. मग हमखास यशस्वी ठरणारं ओलेत्या सौंदर्याचं अस्त्र वापरत डोळ्यांच्या मदनबाणांनी त्याला पुरतं घायाळ करीत ती झुलवू लागते - "थोडासा ठहरो... करती हूँ तुमसे वादा, पुरा होगा तुम्हारा इरादा...' पण ती एवढ्यावरच न थांबता त्याला बेधडक आश्‍वासन देते- "मै हूँ सारी की सारी तुम्हारी, फिर काहे को जल्दी करो...' आणि रणजीतचा कलेजा खल्लास! मायबाप रसिक प्रेक्षकांची अवस्था याहून काय वेगळी असणार?

हिंदी चित्रपट संगीतात एका जमान्यात स्वत-चा दबदबा निर्माण करणाऱ्या संगीतकारांच्या तीन जोड्या - लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर-जयकिशन आणि कल्याणजी-आनंदजी यांनी दिलेली ही तीन रोमॅंटिक गीते आशाजींचा हुकमी स्वर दिमतीला असूनही चक्क लताजींकडून गाऊन घेतली गेली आणि आपणही अशा पद्धतीची गाणी गाऊ शकतो हे त्या स्वरसम्राज्ञीने लीलया सिद्ध केलं. अशी मादक, नखरेल उडत्या चालीच्या गाण्यांची गायकी बहुत करून आशाजींकडे आणि साध्या भोळ्या नायिकेच्या सोज्वळ मुखडा असलेल्या गीतांसाठी लताजींचा आवाज ही इंडस्ट्रीची जुनी परंपरा होती. क्‍लब सॉंग, कॅबरे सॉंग, नशिली गाणी म्हणजे संगीतकार डोळे झाकून आशाजींना पाचारण करायचे. कारण यात असलेला त्यांचा हातखंडा.

खरं तर मादक स्वरात गायलेली गाणी आपल्याला ऐकताना सोपी वाटत असली तरी प्रत्यक्षात गायला ती अतिशय कठीण. गायिकेला फक्त आवाजाच्या चढ-उतारातून, उसासे, हुंकार, उचकी, लाडीक हसणं, दीर्घ सुस्कारे अशा नाना हरकती करत सगळा नखरेलपणा दाखवावा लागे. पडद्यावर भूमिका साकारणारी अभिनेत्री या गीतात जो अभिनय करे तशा ध्वनीभावमुद्रा साकारण्याचे काम गायिकेचे. मला लिहायला आणि तुम्हाला वाचायला श्रम पडत नाहीत पण रेकॉर्डिंग रूममध्ये उभं राहून त्या गीताच्या पार्श्वभूमीची कल्पना करत त्यातील भावानुरूप गाणाऱ्याची कसोटी लागते.  

लताजींना अशा प्रकारची "क्‍लब सॉंग्ज' पहिल्यांदा सचिनदांनी दिली. १९५४ मध्ये "नवकेतन'च्या "टॅक्‍सी ड्रायव्हर'मध्ये क्‍लब डान्सर शीला रामाणीसाठी दादा बर्मननी चक्क लताजींकडून "दिल से मिला के दिल प्यार कीजिए...', "ऐ मेरी  जिंदगी...'सारखी गाणी गाऊन घेतली. यातल्या दुसऱ्या गाण्यातील फास्ट ऱ्हिदम त्या काळाचा विचार करता अचाट म्हणावा लागेल असाच होता. मात्र लताजींनी ते सहज गायिले कारण त्यांच्या अशा पाश्‍चात्त्यढंगी गायकीची सुरुवातीच्या चाळीसच्या दशकातील उत्तरार्धातच झाली होती. गायिका अमीरबाई कर्नाटकीसमवेत लताजींनी गायलेलं "गोरे गोरे, ओ बाके छोरे...' (१९५० सालचा 'समाधी' ) हे त्याचं बोलकं उदाहरण. सी. रामचंद्रांनी त्यातला पाश्‍चात्त्य ढंग कमालीच्या द्रुत लयीत पकडला होता. आणि गाण्याची चालही ठेक्यात गुंफलेली होती.

त्यानंतर आर.के.च्या 'आह' (१९५३) या पडेल चित्रपटात शंकर-जयकिशनजींनी लताजींना त्याच पद्धतीचं स्वतंत्र गाणं दिलं ते 'सुनते थे नाम हम जिनका बहार से' नशील्या डोळ्याच्या विजयालक्ष्मी या दुय्यम नायिकेने पार्टीच्या प्रसंगी मादक हावभावांनी पेश करूनही ते दुर्लक्षित राहिलं. एस.जे.ची जोडी हुशारच, त्यांनी 'श्री ४२०'मध्ये "मुड मुड के ना देख..." या क्‍लब सॉंगसाठी मन्नाडेसह आशाच्या आवाजाचा आग्रह धरला आणि ते सुपरहिट झालं. मात्र शंकर-जयकिशनजींचे सहायक दत्ताराम यांनी अशाच पद्धतीचं एक सुरेख क्‍लब सॉंग 'परवरीश'मध्ये दिलं होतं. मन्ना डेसमवेत लताने गायलेल्या त्या द्रुत लयीतल्या गाण्याचा मुखडा होता - 'बेलिया बेलिया बेलिया, भीगीसी बहारो में तुमने इशारों से...' पडद्यावर राज कपूरसह जेनिफर या तारकेने दिमाखात पेश केलेलं ते गाणं लताजींनी तेवढ्याच ताकदीने गायलं होतं.

पन्नासच्या दशकात किवा साठच्या पूर्वार्धात लताजींना अशा पद्धतीची गाणी अभावानेच गायला मिळाली. मात्र पुढे संगीताचा ट्रेंड बदलू लागला. आर.के.च्या "संगम'मधलं "मैं क्‍या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया..." हे एकदम वेगळ्या पद्धतीचं गाणं ही लताजींच्या वाट्याला आलं. फास्ट बीट सॉंग विथ मेन हिरॉईन अशा टाईप्ड गाण्यांची ही सुरुवात होती असं म्हणावी लागेल. कारण इतकी वर्षे दुय्यम नायिका अशी गाणी करायच्या. "संगम'पासून खुद्द नायिकाच बोल्ड होऊन ही उन्मादक गाणी पेश करू लागल्या. त्याच वर्षी आलेल्या "एप्रिल फूल'मध्ये लताने "मेरा नाम रीटा... क्रिस्टीना...' गात थेट कॅबरे सॉंग म्हणायला सुरुवात केली. इथंही पडद्यावर नायिका सायरा बानूच होती. मग पाठोपाठ आलेल्या "गुमनाम'मध्ये बिकीनी परिधान केलेल्या हेलनच्या तोंडी असलेलं "इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात...' पडद्यावर आलं. मात्र त्याचा ऱ्हिदम जरी वेगळा असला तरी गाण्याचा भावार्थ तसा नव्हता.

फास्ट रिदमिक टाईपमधील आशाजींच्या गायकीच्या वर्चस्वाला जणू शह देण्यासाठी पुढच्या दोन वर्षात लताजींनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं. साल १९६९. शंकर-जयकिशनच्या 'जहॉं प्यार मिले'मध्ये सोवळ्या हेमा मालिनीने अंगाला लटके झटके देत पेश केलेल्या त्या उत्तेजक गाण्याचा मुखडा पाहा - "नस नस में अगन, टुटे है बदन, बाहो में छुपाने आ जाओ...' या सुंदर गीताच्या वैशिष्ट्याबद्दल एवढंच सांगता येईल की, संगीतकाराने ते पाश्‍चात्त्य सुरात न गुंफता त्यावर रागदारी साज चढवला आणि तरी त्यातला उन्मादकपणा तसूभरही कमी झाला नाही. एकदा रागदारी प्रयोग केल्यावर मग तशाच मादक गाण्यासाठी त्यांनी अरेबियन म्युझिकचा आधार घेऊन "धरती'मध्ये वहिदा रेहमानसाठी मस्त गाणं दिलं. "इष्क की मैं बीमार कि वल्ला तीर-ए-नजर है पार...' त्याचा वैचित्र्यपूर्ण ठेका आणि लताजींनी नशिल्या आवाजात घेतलेले आलाप, हरकती थक्क करणाऱ्या. शिवाय त्याच दरम्यान आलेल्या "तुमसे अच्छा कौन है'मध्ये लताजी "आँखो में आँखे ना डालो, मुझे कुछ होता है...' असं लडिवाळ गाऊन गेल्या.

"नवकेतन'च्या "टॅक्‍सी ड्रायव्हर'मध्ये लताजींना अशी ऑफबिट गाणी देणाऱ्या दादा बर्मननी तब्बल वीस वर्षांच्या अंतराने धर्मेंद्रच्या 'जुगनू'मध्ये एक नशिलं गाणं दिलं. 'जाने क्‍या पिलाया तुमने बडा मजा आया...' पडद्यावर अर्थात हेमा मालिनी. खरं तर नायिकेने असे मद्याचे प्याले रिचवत म्हटलेल्या गाण्यांचा पायंडाही सी. रामचंद्र यांच्याकडेच जायला हवा. शहेनशहा अकबराच्या दरबारात अनारकलीने पेश केलेलं 'मुहब्बत में ऐसे कदम डगमगाए...' आणि त्यातली 'जमाना ये समजा के हम पी के आये...'वरची लाजवाब उचकी त्याकाळात केवढी गाजली. मग तसा मोह शंकर-जयकिशनलाही न आवरल्याने त्यांनी लाताजींना 'मैंने तो नही पी, मैं साकी बनी थी...' (मैं नशे में हूँ) गायला लावलं. 'इंतकाम'मधलं "कैसे रहूँ चुप...' हे ही त्यांचंच आणखी एक नाशिलं गाणं. 

मात्र आरडींनी लताजींकडून याच पद्धतीचं गाणं दोन भिन्न तालात गाऊन घेतल्याचं लक्षात येतं. "सीता और गीता'मध्ये "हा जी हा मैने शराब पी है...' हे संथ लयीत दिल्यावर विलक्षण द्रुतलयीतही त्याने एक यशस्वी प्रयोग "झील के उस पार'मध्ये केला. पडद्यावर मुमताजने चरित्र अभिनेता अन्वर हुसेनला झुलविण्यासाठी म्हटलेलं, "दो घुँट मुझे भी पिला दे शराबी, देख फिर होता है क्‍या...' हे गाणं जरा आठवा तुम्हाला झिंग आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय वेगात गाणं म्हणताना "जालीमा रे'ची उलट सुलट केलेली फिरवाफिरव केवळ अप्रतिम !!

लताजींचं एक नशिलं गाणं आणि पडद्यावर एकाच वेळी ते गीत साकारणाऱ्या दोन नायिका असाही वेगळा प्रयोग त्या काळात करण्यात आला. चित्रपट होता राजेंद्रकुमारचा 'गोरा और काला'. त्यात हेमा मालिनी आणि रेखा या दोघींसाठी लताजींनी गायलेल्या "एक तो मेरा मस्ताना शबाब, उस पे गिरा दी तुने थोडी शराब...'मधील पहिलं कडवं रेखाने आणि उर्वरित दोन कडवी हेमा मालिनेने पेश केली होती.

मध्यंतरीच्या काळात प्रत्येक म्युझिक चॅनेलवर "कॉंटा लगा...' म्हणत दिलखेच नृत्य करणाऱ्या शेफाली जरीवालाने आरडींनी तीस वर्षांपूर्वी लताला दिलेल्या "बंगले के पीछे, तेरे बेरी के नीचे...' (१९७२ सालचा - 'समाधी' ) या फास्ट ऱ्हिदमच्या गाण्याला अक्षरश- पुनर्जन्म दिला. त्यातले अफलातून बीटस्‌ आणि "अहा रे लगा...'वर लताने टाकलेले मादक उसासे त्या काळातही काळजाचा ठका चुकवीत होते. आर.के.च्या "धरम करम'मध्येही रेखासारख्या फटाकडीसाठी पंचमने लताजींच्या आवाजात असंच आव्हात्मक गाणं दिलेलं, "नाचना नही आवत, कहत अंगना टेढा...' त्यावरचा रेखाचा बोल्ड डान्स रणधीर कपूर बरोबरच प्रेक्षकांनाही घायाळ करून गेला होता. जितेंद्रच्या 'कारवां'त तर पंचमनी लताजींना रफींसह भन्नाट लयीत गायला लावलं. "चढती जवानी मेरी चाल मस्तानी...' एकदम हटकेच. त्यातलं तिचं "हाय रामा...' करीत सुस्कारा सोडणं तर खासच. पंचमच्या अशा गाण्यांच्या आठवणीसोबत दादा बर्मनचं "नया जमाना'मधलं लताचं असंच एक गाणं लक्षात येतं. इथंही हेमा मालिनीनेच सादर केलेल्या त्या गाण्याचा मुखडा होता - "रामा रामा गजब हुई गवा रे...'

अशी ही वेगळ्या नजाकतीची नखरेल, मादक, नशिली गाणी एकदा आठवू लागली की, कितीही सांगता येतील. पण ती लताजींनी गायल्यामुळे त्यांचे वेगळेपण नजरेत भरतं. अर्थात, अशा प्रकारच्या गाण्यांबाबत दोन गोष्टी महत्त्वपूर्ण वाटतात. गायिकेच्या आवाजातील लवचिक मादकता आणि त्या गाण्याचे पडद्यावरील सादरीकरण. "कांटा लगा...'ची प्रचंड लोकप्रियता तेच दर्शवून गेली. जया भादुरीसारखी सोवळी नटी अचानक नायकाला "बाहो में चले आओ, हम से सनम क्‍या परदा...' असं खुलेआम आव्हान देत विचारू लागते तेव्हा ती नायिका आणि तिच्यासाठी पार्श्‍वगायन करणारी लता या दोघीही प्रेक्षकांना क्षणभर धक्कादायक वाटणं स्वाभाविकच आहे.


परंतु त्यांच्या प्रस्थापित इमेजला छेद देऊन कलेच्या व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास तो सुखद धक्का असल्याचं लक्षात येईल. नेहमीची चाकोरी सोडून लताजींनी थोडं वेगळ्या वाटेने जाऊन अशी नखरेल, उन्मादक गाणी तितक्‍याच ताकदीने गायली आहेत. आशाजींच्या तुलनेत संख्येने ती भलेही कमी असतील. परंतु त्यातल्या गायकीच्या कसोटीवर ती तोडीस तोड असल्याचं स्पष्ट जाणवतं. आशाजी आणि लताजी या दोघीही गायिका म्हणून निर्विवाद श्रेष्ठच होत्या यात कोणाचे दुमत असायचे कारण नाही, अगदी माझेही नाही... 

- समीर गायकवाड.