Wednesday, September 30, 2015

ऋषिकेश मुखर्जी एक स्मरण ...


"जिंदगी बड़ी होना चाहिए, लंबी नहीं....
बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है..
आनंद मरा नहीं...। आनंद मरते नहीं...।"
ऋषिकेश मुखर्जींनी खंडीभर सिनेमे काढले नाहीत वा ढीगभर सिनेमांचे दिग्दर्शन केले नाही. मोजकेच सिनेमे पण प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा सोडून जाणारे अन जीवनाच्या मर्मावर कधी गंभीरपणे तर कधी हलक्या फुलक्या वातावरणातून भाष्य करणारे चित्रपट त्यांनी बनवले...
एकमेकाच्य अंगचटीला जाणारे नायक नायिका नाहीत आणि मागे शेकडोनी नाचणारे एक्स्ट्रा नाहीत...
संवादाची तुफान आतिशबाजी नाही की हाणामारीचा महापूर नाही...
ढ्यानढ्यान वाजणारं कर्णकर्कश संगीत नाही की ओढूनताणून केलेली दुःखद प्रसंग नाहीत        
तत्वज्ञानाची अवजड भाषा नाही की अश्लील दृष्ये / संवाद नाहीत...
जीवनाचा खरा अर्थ सांगणारे साधे सोपे, प्रवाही अन तरल सिनेमे..खडीसाखरेसारखे गोड लवकर न विरघळणारे खाऊन झाल्यावर देखील जिभेवर चव रेंगाळत राहावी तसे त्यांचे चित्रपट स्मृतीच्या सुखद कप्यात हळुवारपणे रेंगाळत राहतात...

आजकाल असे सिनेमे बनत नाहीत...काय करणार मागणी तसा पुरवठा ...ऋषिदांचे सिनेमे बघणारी पिढी संस्कारक्षम कालखंडाची शेवटची कडी होती की काय असे वाटावे असे सिनेमे आजकाल निघत आहेत. याला काही अपवाद असू शकतात, पण त्यामुळेच की काय अशा प्रतिभावंतांची आजच्या धकाधकीच्या काळात प्रकर्षाने उणीव जाणवतेय...  

ऋषिदांच्या चित्रपटांवर एक नजर टाकली तरी त्याचा प्रत्यय येतो...

   
आनंद मधला हसतमुख पण मृत्यूसन्मुख असणारा आनंद ; राजेशखन्ना  ..
खुबसुरत मधली अल्लड पण हळव्या मनाची मंजू ; रेखा ..
अनाडी मधले तरुण पण परिपक्व जोडपे राज - आरती ; राजकपूर - नूतन...
मिली मधली आजारी पण खट्याळ मिली ; जायाभादुरी
गोलमाल मधला चालू - सज्जन रामप्रसाद / लक्ष्मणप्रसाद शर्मा ; अमोल पालेकर
आलाप मधला आयुष्याचे सुर शोधणारा आलोक ; अमिताभबच्चन
असली नकली मधला रहस्याच्या फेऱ्यात अडकलेला आनंद ; देव आनंद
बावर्ची मधला जीवनाचा सहज अर्थ सांगणारा रघु ; राजेशखन्ना
आशीर्वाद मधले प्रेमळ वृद्ध जोगी ठाकूर अन सालस तरुण यांची हळवे जग ; अशोककुमार- संजीवकुमार
अनुराधा मधे स्त्रीत्वाची कहाणी सांगणारे अनुराधा - डॉक्टर निर्मल ; बलराज साहनी - लीला नायडू
मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबरीवरचा गबन - सुनीलदत्त - साधना,
चुपके चुपके मधलं हलकं फुलकं पण चूरचुरीत हास्य फुलवत नेणारं कुटुंब -
धर्मेंद्र, शर्मिला टागोर, ओमप्रकाश, अमिताभ, जया
अभिमान अहंकार यातलं अंतर सांगणारा उमा - सुबीर यांचा सुरेल जीवनप्रवास ;
अमिताभ, जया
सत्यकाम मधले स्वातंत्र्यानंतरचे तरुणांचे प्रश्न मांडणारे सत्यप्रिय - नरेन ; धर्मन्द्र -संजीवकुमार
         
आज ऋषिकेश मुखर्जींची जयंती आहे....आपले जीवन आनंददायी करून गेलेल्या या थोर व्यक्तिमत्वास शतशः नमन...

- समीर गायकवाड