Friday, September 25, 2015

शन्ना डेज ....सोनेरी आठवणी ...


तुम्हाला कथा लिहिता येतात ? कथा लिहायला आवडतं ? कथालेखन करायची इच्छा आहे ? कथाविषय काय असू शकतात आणि लघुकथांची परिमाणे काय असू शकतात याची बावनकशी माहिती हवीय ? तर ही ब्लॉगपोस्ट आवर्जून वाचा....
'सुगंध ही फुलांची भाषा. आणि म्हणून जे फूल ती भाषा 'बोलत' नाही, त्याचं नाव अबोली!' असं सुगंधी भावोत्कट लिहिणारा लेखक म्हणजे शं. ना. नवरे. त्यांची एक कथा होती ‘शहाणी सकाळ’. कुठल्याही तरुणाला प्रेमात पाडणारी आणि प्रेमात पडल्यानंतर आवडणारी अशी ही कथा. या कथेचा शेवट म्हणजे शन्नांच्या संघर्षाचे आणि त्यातून निर्माण केलेल्या आनंदी वृत्तीचे प्रतीकच म्हणायला हवे. कथेच्या शेवटी शन्ना म्हणतात, ‘रात्र वेडी असते, पण शहाणी असते ती सकाळ.’ त्यांच्या लेखनाचे आणि एकूणच त्यांच्या साहित्याचे हे प्रातिनिधिक वाक्य आहे असे म्हणावे लागेल. आयुष्यात भावनिक पातळीवर वाहत गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्याच्यावर झालेल्या संस्कारांची, मूल्यांची गरज असते हेच त्यांच्या कथांमधून स्पष्ट होते.

त्यांचे “शन्ना-डे” हे पुस्तक हा एक साहित्यिक खजिनाच आहे. यातील कथा  छोट्या छोट्या हकिकतीनें नटलेल्या व सर्वांगसुंदर तसेच विचारप्रवर्तक व मनाचा शिणवटा पळवून लावणाऱ्या आहेत. कथा वाचताना ओठावर आपसुक हास्य फुलविण्याची ताकद या संग्रहात आहे. हे पुस्तक एकदा वाचलं की कोणत्याही रसिक वाचकाला त्याची पारायणे करावीशी वाटतील.

अवेळी आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करणारे तसेच पाने काढण्यासाठी अक्षत टाकून केळीची क्षमा मागणारे पण त्याचवेळेस घरातील मंडळींशी कठोरपणे वागणारे “हरितात्या” ही एकाच व्यक्तीची दोन टोकाची रूपे अतिशय तरल भाषेत शब्दबद्ध केली आहेत. संवेदनशील लेखकाची हीच खरी ओळख आहे.

संगीतकाराने संगीतबद्ध केलेले गाणे त्यांच्याच तोंडून ऐकणे ही रसिकाला पर्वणी असते. “अण्णा (सी. रामचंद्र)” गात आहेत व शन्ना भान हरपून त्याचा रसास्वाद घेत आहेत हे दृश्य “गाण्याची गोष्ट” वाचतांना डोळ्यासमोर तरळते. या मध्ये गोष्टीचा विषय गाणेही असू शकतो ही कल्पनाच छान वाटते व त्याच बरोबर दोन मनस्वी कलाकारांची भेट हा समसमा योगच डोळ्यासमोर उभा रहातो.

व्यवस्थित वाचता आल्यावर विशिष्टच पुस्तक वाचायचे ही कल्पनाच खूप वेगळी व मनाला भिडणारी आहे. त्या वयात असा विचार मनात येणे हे नक्कीच अकल्पित व उत्साहवर्धक आहे. वाचायचे नक्की केलेल्या पुस्तकाचे लेखक मो. वा. जोशी घरी येउन गेल्याचे अप्रूप व पुस्तक बक्षीस म्हणून मिळाल्याचा आनंद शब्दांत ओतप्रोत भरला आहे व त्यामुळे वाचकांचीही “बगुनानांचे आत्मचरित्र” वाचण्याची उत्कंठा शिगेला पोहोचते.

“जागा झालेला झोपी गेला” यातील “बबन प्रभु” व “शन्ना” या साहित्यातील दोन दिग्गजांची भेट म्हणजे पर्वणीच. “शन्ना” यांनी केलेली निरपेक्ष मदत जाणविते. त्याचबरोबर त्यांचे साहित्यावरील प्रेम व मनाचा मोठेपणा याची प्रचिती येते. शेवटचा बँग तर लाजवाब. हलके फुलके खुशखुशीत तसेच मनाला तजेला देणारे साहित्य ही त्यांची ताकद आहे.

मनाच्या अस्वस्थतेची जाणिव करून देणारी भावना ही 'शन्ना' तितक्याच ताकदीने मांडू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे “अभिमन्यु” मधील “क्लिंट” या बालचित्रकारावरील चुटपूट लावणारे शब्दचित्रण.

“सिनियॉरिटी” यातील निवृत्त झालेल्यांची तगमग, मृत्यू नामक शत्रूची जाणीव होताच सिनियॉरिटी मध्ये आपण मागे आहोत हे पटवून देण्याचा आटापिटा व शेवटी दिलेला पंच नक्कीच अंतर्मुख करणारा आहे.

आपण सगळेच जण प्रत्येक वर्षीच्या एक जानेवारीला काही न काही तरी निर्धार करतोच करतो. काही तडीस जातात काही तसेच राहतात. नेमका हाच दुवा पकडून “शन्ना” नी एक जानेवारी ही कथा शब्दात उतरविली असेल. चौघा मित्रांच्या परस्परांबद्दलच्या भावना त्यांचे विचार व तीस वर्षांनंतर कोण, कोठे व कसा असेल याचे स्वभावचित्र वाचकांच्या मनात रेखाटण्याची किमया गतस्मृतींना उजाळा देते. एक जानेवारीला निर्धार करतांना तो आपल्या आवाक्यातील करावा हा विचार त्यामागे असावा असे वाटते.

लहान व नुकतंच बोलू लागलेल्या मुलाबरोबर गप्पा मारणे म्हणजे सहनशक्तीचा कडेलोट असतो. डोके शांत ठेवुन त्याच्या चित्रविचित्र प्रश्नांना उत्तर देणे ही एक परीक्षा असते. मधूनच अबोल व पटले नाही तर “कत्ती” घेणे. या सर्व गोष्टींचे वर्णन “चव” या गोष्टीतून उलगडते.

“उद्या आणि काल” यातील कल्पनाविलास वाचून करमणूक तर होतेच व त्याच बरोबर हेही मनात येते की उद्या खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली तर ही कल्पनाच अंतर्मुख करणारी आहे. पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालकांची तयारी हे वर्णनच थक्क करणारे आहे.

“घाई” या गोष्टीतून “शन्ना” नी सर्वसामान्यांचा घाई हा स्वभाव विशेष रेखाटला आहे. चहा व पान याचा मनमुराद आस्वाद घेण्याचे वर्णन तर खूपच वेधक आहे. हे वर्णन वाचतांना आपल्या मनातही विचार येतो की कधी कधी घाई करतांना आपण काही चांगल्या व निर्मळ आनंद दायक गोष्टींना मुकत असतो.

“अर्पण” ही कथा तशी घरोघरी घडत असलेल्या एका कौतुकास्पद घटनेचे चित्रण आहे. लहान बाळांनी उच्चारलेला पहिला शब्द ही घटना शब्दात वर्णन करणे खरोखरच कठीण आहे. “चिमण्या मुखातुन बाहेर पडलेला ताजा व निर्मळ शब्द अब्जावधी शिळ्या शब्दांपेक्षा लाख मोलाचा व अनमोल असतो. हे वाक्य तर कथेचा सारांश असल्यासारखे आहे.

“एक पानी” हे मानवाचे स्वभावचित्रण आहे. धन लालसेपुढे माणूस किती केविलवाणा होतो याचे मनाला भिडणारे चित्रण आहे. कल्पनाविस्तार म्हणून एखादी गोष्ट लिहावी व ती वास्तववादी निघावी हा योगायोग खरोखरच दुर्मिळ.

“आरसा” कथेतील कल्पना चित्राचे आराश्यातील वास्तव वाचून कोणीही चकित होईल. आजच्या दुनियेत किलवर तिर्री चौकट एक्क्याच्या खुर्चीवर बसून हात सर करत आहे आणि खरा चौकट एक्का इस्पिकचा छक्का बनून मुकाट्याने मार खात जातो. याचा आधार घेऊन लायकी असुनीही मनाजोगते व लायकीनुसार काम न मिळण्याची व्यथा “क्याट” मध्ये शब्दांत उतरवून त्यांनी वास्तवतेचे दर्शन घडविले आहे.

पत्र लिहिण्यातील आनंद पत्र लेखकालाच कळतो. ही एक कला आहे. कलाकाराचा हिरमोड कसा होतो याचॆ चित्रण “उपसंहार” मध्ये वाचल्यावर मन विषण्ण होते.

कोणतीही गोष्ट हरवणे हा तापदायक प्रकार असतो. तापदायक जरी असला तरी त्याचे वर्णन खुशखुशीत असू शकते याचा प्रत्यय “किल्ल्या” या कथेतून येतो.

“आर्टीस्ट” मध्ये एका कलाकाराचा उमदेपणा दिसतो पण त्याचबरोबर तो या कलेचा उपयोग करून उदरनिर्वाह कसा करतो याचे चित्रण वाचनीय आहे. एक आर्टीस्ट आर्टीस्टची कदर करण्यास किती अधीर असतो व त्या अधीरतेतील तगमग फार छान रेखाटली आहे.

कल्पनाशक्ती किती ताणता येते व शेवटी कारुण्याची झालर कशी देत येते याचे उदाहरण “संबंध” मध्ये वाचनात येते. एका क्षणाची भेट आयुष्यभराची आठवण कशी होऊ शकते याचे सुंदर यात आहे.

बहिणीचे लग्न व बायकोचा खून या दोन परस्परविरोधी घटना “चुटपूट” मध्ये अधीरता उत्पन्न करतात. पहिली म्हणजेच घडलेली घटना व दुसरी म्हणजे एका चित्रपटात पाहिलेले दृश्य यांचा उत्कंठावर्धक शेवट वाचकांनाही चुटपूट लावून जातो.

“विरंगुळा” ही कथा खरोखरच नवल शोभणारी आहे. फुले काढण्यासाठी निर्माण झालेला स्पर्धक, झालेली फजिती व सर्वात शेवटी फुले काढण्यासाठी योजलेला उपाय केवळ अप्रतिम.

पंखा लावल्याचे अप्रूप “पंखा” या कथेत फार परिणामकारकपणे मांडले आहे. जुने घर पाडून नवीन घर उभे राहिले तरी कर्ज न काढता घेतलेला एकशे सत्तर रुपयांचा जुना पंखा डोक्यावर असला की जुन्या दिवसाच्या आठवणी डोक्यातून जाणार नाहीत.

एखाद्या क्षुल्लक, छोट्या गोष्टीमुळे लोकप्रियता कशी वाढू शकते याचे सुंदर वर्णन “टिकली एव्हढी लोकप्रियता” या कथेत केले आहे. वास्तविक टिकली हा कथेचा विषय असू शकतो हीच अचंबित करणारी गोष्ट आहे व ती “शन्ना” च करू जाणे.

त्याचप्रमाणे मुजरा, ओरखडा, अभिमन्यु, चव, लव्ह्बर्डस, टोळ आणि मुंगी, सल, पत्रक, सुगरण, सदरा, विकतच भांडण, मे महिना, वेल्हाळ, परीक्षा, बाबुरावांची गोष्ट, खुणा, स्पर्धा, वेळ, रेसिपी, लेखणी, अव्यापारेषु, हा कोण, नापास, अचानक, धडा, सुरत, पणती, सत्य, आणखी दोन मॉम, भेटलेली घर, गुंता आणि निरोप या आठवणी/अनुभव/लेख/कथा आपणास खूप आनंद व शिकवणही देतात

लेखक, नाटककार, कथाकार म्हणून त्यांची ओळख होती. ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. तसेच ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह आणि ‘निवडुंग‘, ‘इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत.'शन्नाडेज' ही तर रसिक वाचकाना त्यांनी दिलेली अविस्मरणीय भेट. मराठीतील कित्येक साहित्यिकांनी आपल्या अविट लेखन शैलीने भाषेचे सौंदर्य तर वाढविलेच पण त्याचबरोबर जनमानसावर अमिट असा ठसा उमटविला आहे. शन्ना हे आनंदाचे झाड म्हणून ओळखले जायचे इतके त्यांचे लेखन प्रसन्न अन आशयघन असे होते. आपल्या खुशखुशीत शैलीने तसेच सोप्या व सहज भाषेने वाचकांच्या मनात शन्नानी  रसिक व चोखंदळ वाचक वर्गात आपले असे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. संवेदनशीलता, हळवेपणा, हळुवारपणा, सृजनशीलता, सकारात्मक विचारांची सुजाण बैठक हे पैलू त्यांच्या लिखाणात रसिकांची मैफिल जमावी तसे एकवटलेले असतात. हलके फुलके खुशखुशीत तसेच मनाला उभारी देणारे साहित्य ही त्यांची अनन्य साधारण ओळख आहे. दैनंदिन घडत असलेल्या छोट्या छोट्या तसेच शुल्लक गोष्टीत आनंद लपलेला असतो याची जाण “शन्ना” नी करून दिली. त्यांच्या कोणत्याही पुस्तकाचे कोणतेही पण उघडून वाचले तरी त्यात प्रसन्नता व आपलेपणा जाणवितो. व्यक्ती/घटना याचे चित्रण एवढे समर्पक व परिणामकारक असते की वाचताना ते आपल्या डोळ्यासमोर उभे करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्या लेखनात आहे.

आयुष्यातील अनेक दुःखात, अडचणीत, संकटात सुख शोधणारा आणि ते सुख जगाला देणारा एक प्रतिभावंत हरहुन्नरी बहुआयामी साहित्यिक म्हणून मराठी साहित्यविश्वात परिचित असणारया शन्नांना विनम्र अभिवादन ….

- समीर गायकवाड.