Tuesday, September 15, 2015

बलुतं आणि दया पवार .....एक स्मरण .दया पवारांचं बलुतं तसं प्रचंड गाजलेलं पुस्तक. ग्रंथालीला प्रकाशन व्यवसायात जम बसवुन देणारं हे पुस्तक.  त्यानंतर उपरा व आमचा बाप... सारखी पुस्तक ग्रंथालीने  मराठी वाचकाना दिली. उपरा व आमचा बाप... वगैरे पुस्तक लोक खूप आधीच वाचतात  पण कधी कधी बलुतं तेवढं टाळतात. त्याला कारण काय तर बलुतं बद्दलचीची समीक्षकांची परिक्षण व ईतरांच्या तोंडून ऐकलं जाणार नकारात्मक शेरेयुक्त बोलणं. त्यातून काहींच  मत असं बनलं की बलुतं म्हणजे महारवाड्यातली लफडी”  ! मग कशाला वाचायचं ते पुस्तक ?. कोणत्याही पुस्तकापेक्षा आपला प्रत्यक्ष अनूभव प्रचंड दांडगा की...!  महारवाड्यातली लफडी ईतरांकडून ऐकावीत गैरमहारानी... त्यासाठी पुस्तक कशाला पाहिजे ? असा बरयाच जणांचा एकंदरीत स्टान्स या पुस्तकाबद्दल पूर्वी पहायला मिळायचा..

आहे तरी काय या बलुतंमध्ये ? यात रेखाटलेला महारवाडाही आजच्यापेक्षा कित्येक बाबतीत वेगळा आहे म्हणजे आजचा महारवाडा व पवारांनी १९३५-५५ पर्यंतचा बलुतं मधुन मांडलेला महारवाडा यात प्रचंड तफावत आहे. काही काही गोष्टीतर हादरवून सोडणारया आहेत.
कावाखाना: बलुतंमधलं कावाखाना मनाला चटके लावून जातो. कावाखाना म्हणजे दया पवारांचं मुंबईतलं वास्तव्याचं ठिकाण. तिथेलं वातावरण, बायका, शेजारचे जुगाराचे अड्डे वगैरे... तरी सुद्धा त्याची दुसरी एक बाजूही येतेच व ती म्हणजे हे सगळं जरी असलं तरी कावाखाण्यातली माणसं कशी एकमेकांशी जुडलेली असतात याचे दिलेले अनेक संदर्भ सुखावणारे आहेत. त्यातल्या त्यात हाईट करणारा संदर्भ म्हणजे एक माणूस असतो ज्याची ठेवलेली बायको/बाई त्याच्या पगारावर डल्ला मारते खरं पण रात्री मात्र त्याला हातही लावू देत नाही. हे जेंव्हा कावाखानातल्या ईतर बायकाना कळतं तेंव्हा एकदिवस सगळ्या बायका बळजबरीनी त्या माणसाचं हनिमून घडवून आणतात... कसं? तर त्या बाईला सगळ्या बायका धरतात व खाटेवर झोपवतात. तीचे दोन हात दोन बायका धरतात व आजून दोन बायका पाय फाकवून धरतात... अन नव-याला  सांगतात... आता तू चढ हिच्यावर...अन तो तो चढतो. आई गं... हे वाचून हासून हासून माझी पार वाट लागली. एकंदरीत कहरच म्हणावं लागेल हे प्रकरण. कावाखान्यातले असे अनेक प्रसंग भन्नाट आहेत अन हेलावणारेही आहेत.

गावचा महारवाडा: बलुतंमध्ये पवारानी रेखाटलेला महारवाडा म्हणजे एक अनोखं विश्व. खरंतर माझं हेच मत होतं की एका महाराला त्या महारवाड्यांचं कसलं कौतुक? सगळ्यानाच माहित असतं तिथलं आयुष्य कसं असत ते. पण नाही... पवारानी रेखाटलेला महारवाडा आपल्या अनुभवातल्या व ऐकिवातल्या महारवाड्यापेक्शा नक्कीच वेगळा आहे. कारण ते सगळे अनुभव चक्क १९४० च्या दरम्यानचे आहेत. म्हणजे अजून बाबासाहेबांची बौद्ध धम्माकडॆ वाटचाल वा विचार व्हायचा होता तेंव्हाच्या त्या घटना आहेत. म्हणून त्या नक्कीच वाचनीय तर आहेतच पण अनेक अंगानी वेगळ्य़ा आहेत. महारवाड्यातली गटबाजी, तंटे, झगडे हे तर आहेतच पण आम्ही जे म्हणतो ना की महार बिचारे.... वगैरे साफ  धुवून काढणा-याही काही घटना आहेत. महार त्या काळात सुद्धा मराठ्यांशी कसा झगडा मांडून बसत व नेमक्या वेळेवर नडून प्रसंगी मराठ्याना जेरीस आणल्या जात असे याचं वर्णण जबरदस्त आहे. अरे वर कारे करणा-या त्या घटना म्हणजे महार समाज कसा लढवय्या होता याचे पुरावेच आहेत.

महारांची बढाई: महार समाज बढाई मारण्यात तेंव्हाही कसा मागे नव्हता याचे अनेक उदाहरण व घटना बलुतंमध्ये आढळतात. आपण थेट पांडवांचे वंशज आहोत असा अभिमान बाळगणारे व त्यावरुन दिवस रात्र चकाट्या पिटणारे महार पवारानी मस्त रेखाटले आहेत. तेवढ्यावरच थांबतील ते महार कसले. दिल्लीत म्हणे पांडवांचे एक सिंहासन आहे अन ते अत्यंत गरम आहे... किती गरम? तर त्यावर मके टाकले की त्याच्या लाह्या होतात ईतके ते गरम आहे म्हणे... त्या सिंहासनावर कोणीच बसू शकत नाही... पण बाबासाहेब मात्र त्या सिंहासनावर बसू शकतात! त्या काळात अशी कथा महारवाड्यात सांगितली जायची. त्याच बरोबर बहमणी राजाकडून मिळालेल्या ५२ अधिकाराची कथाही भन्नाट वाटली. असे अनेक किस्से आहेत.

या पुस्तकात एकसे बढकर एक अशा नवनवीन गोष्टी लिहलेल्या आहेत. महारांच्या पोराना शिक्षणासाठी वसतीगृह तयार करुन दिल्यावर पोरं मास्तराशी झगडायची... कशासाठी? तर म्हणे त्याना फीस्ट हवं असायचं. म्हणजे हे फीस्टचं खूळ तेंव्हासुद्धा होतं म्हणायचं. पण त्याच बरोबर शिक्षण घेण्याची जिद्दही महारात ईतरांपेक्षा तौलणिकदृष्ट्या अधिक होती व त्याचे परिणामही कसे दिसू लागले हे या पुस्तकातून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. अगदी पवारांसोबत शिकणारे अनेक विध्यार्थी सरकार दरबारी अधिकारी झाल्याचे संदर्भ वाचून दिलेले आहेत .

आंबेडकर चळवळीला बगल: या पुस्तकातील एक महत्वाची गोष्ट अशी की बलुतंमध्ये आंबेडकर चळवळीबद्द्ल काहीच नाही. जेंव्हा की या काळात आंबेडकर चळवळीचे वारे देशभर घो घो करत जात होते तरी दया पवाराना त्याचा स्पर्श तेवढासा झाल्याचे जाणवत नाही. थोडेफार संदर्भ येतात खरे पण तेवढ्या पुरताच येतात. पण भाऊसाहेब गायकवाडांचे मात्र जागोजागी संदर्भ आले आहेत. अन भाऊसाहेब हे त्यांचे आदर्श असल्याचंही कुठेतरी एका वाक्यात लिहलं आहे.  देव सोडण्याची प्रक्रिया व अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचे संदर्भ ईथे आहेत.
यापलिकडे बलुतंमध्ये बरच काही आहे. महारांची त्या काळाची जिवनशैली कशी होती याचं ते डॉक्यूमेंटेशनच आहे. तर त्याच बरोबर ईतर समाजाचंही बरच वर्णन येतं

एखाद्या व्यक्तीची सहनशीलता किती असावी आणि खरच एखादा समाज केवळ जातिव्यवस्थेच्या आणि पारंपारिक रुढींच्या नावाखाली किती दुर्लाक्षितला जावा, याचा यथाकथित पुरावा, होय पुरावाच म्हणा कारण आजच्या पिढीचा नॅनो स्वप्नांपासून ते भव्य दिव्य मेट्रो पर्यंत इतका व्याप वाढला आहे कि असे विषय केवळ काही न्यूजचॅनलस मध्ये कधी तरी कुठे काही विपरीत घडलं तर चर्चा सत्राच्या नावाखाली विषयाची वाट सोडून भरकटताना दिसतात, तसं म्हंटल तर हि जातीव्यवस्थेची धगधगती आग अजूनही काही शमली नाहीं आहे, गावपातळीवर आज हि कुठे न कुठे हि आपलं विक्राळ रूप दाखवतेच. आज हि अशी अनेक खेडी आहेत जी काळाच्या अजूनही ५० वर्षे मागे आहेत. फक्त शहरी जीवनात हि आग काही प्रमाणात इतकी प्रभावी नाहीं किवा मुद्दामच तिला प्रभावी ठेवत नसावे, नाहींतर उगीच समाज व्यवस्थेच्या नावावर चालवलेल्या अगाळ राजकारणाचं पितळ उघडं होईल ह्याची धास्ती असावी. कारण कशा प्रकारचं हे जगणं असेल ह्याची कल्पना किवां सत्यस्थिती, दया पवार ह्यांनी लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्रातून बलुतंमधून येते.

बलुतं हे केवळ पुस्तक नसून, दगडू मारुती पवार ह्याच्या आयुष्याचा एक विलक्षण असा आढावा आहे, तो आढावा मनाला इतका हुर्हुरी लावून जातो कि उत्तरार्धात गर्दीतून जाताना हरवलेला दगडू शेवटी खूप काळ मनात रेंगाळत राहतो, येउन जाऊन विचारांची जंत्री डोक्यात घर करून ठिया मांडून बसते. काय झालं असेल त्या दगडूच  नंतर? काय तो असंतोष असेल जो शब्दरुपी फुटला.

या पुस्तकावर बोलणारयांनी तर यावर प्रचंड तोंडसुख घेतलं असं स्पष्ट लेखकाने नमूद केलं आहे पण बोलणारयांना हे का नाहीं कळत कि कोण का उगीच आपल्या आयुष्यातल्या आणि महत्वाचं म्हणजे स्वतःच्या चार भिंतीतल्या 'गुपित' गोष्टी अशा प्रदर्शन केल्या सारखं मांडेलआपल्या बायकोचं कळलेलं संभ्रमित प्रकरण असो कि आपल्या आईची वेश्या व्यवसाय करणारी बहिण जमनाबाई असो, फार धाडस लागतं अश्या गोष्टी एक लेखकाने स्वीकारून लिहिणे. पण खंत ह्याचीच आहे कि तोंडसुख घेणारयांनी अश्या संदर्भाचा बोभाटा करणे. अन्यथा त्यांना ८०% पुस्तकात समाजाचे ते कारून व हृदय हेलावणार चित्रण दिसलं नसावं का असा प्रश्न पडतो. तोंडसुख घेणाऱ्यांची संख्या, ही पुस्तक पसंतीस उतरलेल्या समीक्षक आणि वाचकांपेक्षा फारच कमी आहे, कारण विविध थरात आणि वर्गात ह्या पुस्तकाला विशेष पसंती दिली गेली आहे.

नाहीं म्हणालं तरी दगडू चा जीवनक्रम हा वाचकाला मध्येच धक्का देण्याचे काम इतक्याबखुबीने करत असतो कि मनात विचार येतोच, 'अर्रे रे!!! .... काय हे...'. पुस्तकाच्या उत्तार्धात, जेव्हा वाचकाची अपेक्षा असते कि आता दगडूच्या कहाणीचा शेवट आला आहे तेव्हा सई च प्रकरण मनाला चटका लावून जातं. हे प्रकरण खरच इतकं अनपेक्षित आणि साळसूद पणे लिखाणात आला आहे कि दगडू आणि सई  वेगळे होणार ह्याची कल्पना सुद्धा करवत नाहीं. आणि हे असं का घडलं त्या मागे काय कारण होतं, किती खरं होतं आणि किती खोटं ह्या अश्या प्रश्नांचं काहूर डोक्यात उठतं. नकळत वाईट वाटतं ते बकुळेच, काय झालं असेल तिचं नंतर  ? दगडू आणि तिची भेट घडली असेल का? ह्या गोष्टींचा न लागलेला थांगपत्ताच, कुठेतरी पुस्तक संपून देखील भंडावनाऱ्या विचारांमुळे उत्तराच्या शोधात मनात काहूर माजवून सोडतो. असाच आघात करून जाते ती जमनाबाई, आयुष्याची काय खेळी असते हे जमनाबाईची शोकांतिका सांगते. का असं घडलं असेल हे कळून राहत नाहीं. जेव्हा दगडू दादर येथे जमनाबाईला बघून तिच्या वाईट परिस्थितीत तिला न बघितल्या सारखं करतो तेव्हा वाचकाला दगदूचा राग आला नाहीं तर नवल. दगडूच हॉस्टेल जीवन हे तितकंच व्यथीत करणारं आहे.... साध शिक्षणासाठी सुद्धा किती जीवाचा आटापिटा करावा लागतो हे खरच अन्यायकारक आहे. आणि तितकच व्यथीत आई मुलाचं हॉस्टेल मधलं नातं करतं. बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाना नंतर स्वतःला पुढारी म्हणवून घेणार्यांचा वागणं आणि त्यांचा सावळा कारभार आश्चर्यचकित करून टाकतो, कदाचित आज हि हे असंच काहीतरी कारण असेल ह्या समाजाच्या आजच्या फार तितक्याश्या न बदललेल्या परिस्थितीला.

पु लं नी बलुतं बद्दल लिहिताना नमूद केलं आहे की , 'इतकं जीवनाचा कारुण दर्शन घडल्यावर वाचक आपसूकच माणूस म्हणून स्वतःत योग्य ते बदल माणूसकीपायी  करून घेईल.' एखाद्या साहित्याचा ह्याहून हि अधिक यश आणि गौरव तो काय असेल?

आज दगडू केवळ पुस्तकरूपी हयात असला तरी एक विचार राहतोच मनात, दगडूच्या आयुष्यातल्या सोनेरी दिवसांची झालेली हेळसांड, गेलेला काळ कधी भरून देऊ शकतो का?
शिळेखाली हात होता, तरी नाहीं फोडला हंबरडा
किती जन्माची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा...

आज दया पवारांचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्ताने केलेलं हे अल्पसं शब्दस्मरण ….


- समीर गायकवाड .