Friday, September 11, 2015

जिवलग ...भल्या पहाटेच राणूच्या वस्तीत हालचाल चालू होती. रानातला गार वारा अंगावर काटा आणत होता. बांधावरच्या लिंबाच्या पानाची सळसळ चांगलीच ऐकू येत होती. शेजारच्या जालिंदरच्या शेतातला जुनाट वड हेलकावे खातोय असं उगाच वाटत होतं. टिटव्यांचा टीटीविटीटीव आवाज दुरून येत होता पण अगदी स्पष्ट होता. लांब अंतराहून पिंगळा देखील त्याचे अस्तित्व जाणवून देत होता. रातकिड्यांचा किर्र आवाज एक तालात येत होता. आठवड्यापासून चालू झालेला पाऊस मातीने अधाशासारखा पिऊन टाकला होता. जागोजागी ढेकळात चिखलात आलेलं तण त्या पहाटवारयावर डुलत होतं. नांगरट केलेली बुजून गेली होती, सगळी जमीन दबून गेली होती. तीनएक एकराच्या त्या शेतात राणूकाकाने अख्खे आयुष्य घालवले होते. आता भल्या पहाटे शेतातल्या वस्तीत हळूच लगबग चालली होती. वस्ती म्हणजे तरी काय ? शाडूने कधीकाळी रंगवलेल्या मातीच्या विटांच्या चार बसक्या भिंती आणि आढ्याला लिंबाचे, बाभळीचे जुने वासे. त्यावर चिपाडे आणि झावळ्या शाकारलेल्या होत्या. भिंतीत एकदोन डोके तुटलेल्या खुंट्या अन एक पिवळट देवळी ! एका कोपरयात भेगाळलेली चूल अन एका कोपरयात उघडा पडलेला माठ ! त्या खोलीच्या बाजूला दगडी कुंबी केलेला गोठा. इतकीच काय ती तिथली वस्ती होती. गोठ्यात जुनाट दगडांची दावण होती. त्या दावणीला दोन म्हातारे झालेले गलितगात्र बैल बसून होते. हिरया आणि सुभान्या. ते दोघेही एकाच वेळी त्या वस्तीवर आले होते तो दिवस आजही राणूकाकाच्या ध्यानात आहे.

मऊसुत रेशमी अंगाची ती पांढरी खोंडं राणुने नगरजवळच्या घोडेगावाहून आणली होती. तेंव्हा गावात कैकांच्या शेतांनी मोट होत्या. पाऊसपाणी वेळेवर होत होतं. सगळ्यांच्या रानात औत ओढण्यापासून, नांगरट, कुळवण, मळणी आणि उसाची गाळणी अशी खंडीभर कामं असायची. त्या कामांसाठी बैल कमी पडायचे, मग एकमेकाचे बैल घेतले दिले जायचे. कधी टाचकं पडलं नव्हतं. कडबा असायचा. पाऊसपाणी झालं की बाटूक असायचं, हिरवा गवत-घास असायचा. पाऊस आटला की भरडा- कडवळ. जेंव्हा औतं जोरात होते तेंव्हा राणूने कधीकधी त्याना गुळपोळी सुद्धा खाऊ घातली होती. दोघांनाही कासरयांचे दोर अन नाकात घातलेली वेसण होती. मोट, गाडी ओढून ओढून त्यांचे कोवळे खांदे भरून आले की राणू त्याच्या हाताने त्यांचे खांदे रातसारी मळून टाकायचा. वेसणीच्या ओढीने नाक भरून यायचे. हनपटीने जोर लागायचा. ते दोघे कधी कधी चिडले की मातीत घट्ट खुरं रोवून उभे रहायचे तेंव्हा राणू जवळ जायचा आणि त्यांच्या अंगावर हात फिरवायचा. थोडा वेळ विश्रांती द्यायचा. एखादा पोळ -वळू बैल मोकळा पळत जाताना दिसला की हे दोघे त्याच्याकडे आभाळ जमिनीला टेकूस्तोवर बघत रहायचे, तेंव्हा राणुला उगाच अपराधी वाटायचं. गावात लोकांच्या शेतात ऊस, ज्वारी- बाजरी- मका- गहू सगळं पिकायचं पण राणूचं रानच मुळात पडीक बरड जमीनीचं होतं आणि पाण्याची बोंब बारमाही होती.नेमकी त्याच्या आजुबाजुच्या शेतकरयाचीही हीच स्थिती होती. त्यामुळे इतकी सोन्यासारखी बैलं लोकाच्या शिवारात न्हेऊन जुपावी लागतात याचं त्याला शल्य होतच. त्याच्या शेतात जास्तकरून ज्वारी-बाजरी आणि तुरीवरच जोर राहायचा त्यामुळे अगदी थोडंच काम असायचं, ते झालं की बैल घेऊन दुसरयांची शेतं गाठायचा, मिळेल ते काम स्वतःही करायचा. पण बैलांच्या अंगाला चाबकाची वादी लागू देत नव्हता. त्या खोंडाची जेंव्हा धष्टपुष्ट बैलं झाली तेंव्हा त्यांचे अंग चांगले भरून आले होते. ऐटदार मोठे वशिंड किंचित कलुन गेले होते. हातभर लांब टोकदार शिंगे शोभून दिसत होती. पाठीवर मस्त पन्हाळी तयार झाली होती. टणक रुंद पांढरया कपाळावरचे काळे राखाडी बारीक ठिपके उठून दिसायचे. दोघंही कधी कधी डिरक्या मारायचे, अंगात वारं भरल्यागत तरकटल्यावाणी करायचे पण राणूने कधीही त्यांची चीडचीड केली नव्हती. गावातले लोक मात्र बैलाची असली रग जिरवण्यासाठी मुसळावर अस्तीनं ठेचून काढायचे अन वर हसायचे. पण राणूने त्याना कधी रानटी वागणूक दिली नव्हती. त्यांना काम नसले की पुढ्यात वैरण टाकून द्यायचा अन स्वतः कुठं तरी कामाला जुपून घ्यायचा. हे दोघे रवंथ करत गोठ्यात नाहीतर बांधावर झाडाखाली बसून रहायचे.

काळ पुढे गेला. विहिरीच्या काठांवर धाडधाड आवाज करणारं पिस्टनवालं इंजिन आलं. विहिरीजवळच्या वाशावर शेडला बांधलेलं काळं लोटकं पकपक आवाज करू लागले आणि बैलांचे एक काम कायमचे कमी झाले. काहींनी बैल ऊस कारखान्याला कामाला लावले. उसाच्या गाडीवर लादला जाणारा टनाच्या मापात्ला ऊस बघून बैलांच्या आधी राणूचीच छाती दडपून गेली. शेतातल्या काळ्या-तांबड्या मातीतनं, खडकाळ रानामाळातून पुढे डांबरी सडकेवरून बैल अशा जीवघेण्या ओझ्याखाली न्यायचे म्हणजे त्यांच्या पायाला खुरांमध्ये नाल ठोकावी लागे, ते ओझं घेऊन शहरातल्या रस्त्यानं जाताना बैल अनेक वेळा बुजतात तर कधी कधी ओझ्याने त्यांचे गुडघे बसतात. त्यांचा खांदा मोडायला येतो या सर्व गोष्टींचा विचार करून राणूने त्याना ऊसगाडीला कधी जुंपू दिले नाही. काही जणांनी त्याला सांगितलं की आता बैल शहरातल्या एखाद्या हमालाला विकले तर पैसे चांगले येतील नंतर चिंचूके देखील मिळणार नाहीत. हमालीपासून ते वाळू सिमेंट आणण्यासाठी बैल एकदा का जुंपले की तो हमाल त्या बैलाचे पार भुस्कट पडेपर्यंत काम लावणार. दगडगोटे ओढण्यापासून ते चुना मळण्याचे, आडतीची अशी कोणतीही आणि कितीही ओझी उचलण्याची कोणतीही कामे करताना त्या बैलांचे आयुष्य अजून कमी होऊन ते अर्धपोटी ठेवले जातात आणि मग कसायाच्या सुरीखाली जातात हे राणूला माहिती होते. त्यामुळे त्याने बैल विकले नाहीत. बैलाना मिळेल तेव्हढेच काम तो घेऊ लागला अन पोटपाण्यासाठी त्याचे सारे घरदार लोकाच्या शेतावर रोजंदारीने जाऊ लागले.

कामाअभावी रानातल्या धावेवर चिंचेच्या सावलीत आता हिरया आणि सुभान्या कधीकधी इळभर बसून राहू लागले. घरातल्या माणसांच्या पोटापाण्याची आबाळ सुरु झाली. निसर्गानेच हात आखडता घेतला. दरसाली कमी होत होत मागच्या चारेक वर्षात पावसाने तोंड काळे केले. जे हिरवेगार शेतमळे ढसाढसा पाणी प्यायचे, पाण्याचा मुसंडा वाफ्यांमधून वाहायचा तिथं आता जमीन भेगाळू लागली होती. ज्यांच्याकडे बैल होते अशा काही जणांनी बैल ऊसगाडीवर लावले, काहींनी विकले तर काहींनी कत्तलखाना गाठला. हत्तीसारखे दिसणारे बैल रानात बसवून ठेवले म्हणून गाव राणूला हसून राहिलं पण त्यानं कधी त्यांचं बोलणं मनावर घेतलं नाही.पण चारयावाचून बैलांची आबाळ होऊ लागली. त्यांची तब्येत ढासळू लागली. पोटं खाली गेली, कवळाभर असणारया गर्दनी बारीक झाल्या. दांडगी लट वशिंड खंगून गेल्या. शेपट्या बारीक झाल्या, फरयाचं मास गळून गेलं. तरी देखील जेंव्हा कधी काम मिळंल तेंव्हा राणू जुंपेल त्या कामावर ते जीव लावून, नसा ताणून काम करायचे. पाय उचलत नव्हते तरी नेटाने पावलं टाकत होते,त्यांचे गुडघे मोडून यायचे आणि त्यांच्या अंगावरचं रेशमी कातडं लोंबू लागले होतं, पाय तळावले होते. डोळं तांबारल्यागत लाल व्हायचे. तोंडाला फेसाच्या तारा लोंबायच्या, अंगभर गोचीड गोमाशा झाल्या होत्या. नख्या भरून यायच्या, खांदा अवघडून जाऊन जाऊन गाठी झाल्या तरी ते मान हलवत नव्हते. ओझ्याने त्यांचा ऊर भरून यायचा, भेंडाळल्यागत व्हायचे, फासाला लटकल्यागत मान गुतवून ठेवू लागले. पण कामाची कडं गाठल्याशिवाय थांबत नव्हते.

दिवस जात राहिले.पाऊसपाणी नसल्याने सगळीच कामे कमी होत गेली आणि राणूचीच नव्हे तर अख्ख्या गावाची माणसांची जनावरांसकट दुर्दशा झाली. हिरया आणि सुभान्या तर आता उतरणीला लागले होते. तांब्व्या चिकटलेलं त्यांचा अंग आता पार रोडावून गेलं होतं. हात हात लांब हाडं दिसायला लागली होती. खांदे सुजून गेले होते, त्यात मोठाल्या गाठी झाल्या होत्या. त्यातल्या काही गाठी दुखून दुखून फुटल्या होत्या, त्यातनं पुवाचं पाणी वाहू लागले होते. काहीतरी विपरीत घडणार असं वाटू लागलं होतं.चारा छावण्या अजून सुरु झाल्या नव्हत्या. काय करावे त्याला सुचत नव्हते.

जुन पासून कोरडे ठाक गेलेलं पावसाचं बेणं मात्र मागच्या पाच सहा दिवसापासून हजर झालं होतं.त्यानं सगळं गाव खुष झालं होतं पण पावसामुळे ह्या दोघांची आबाळ जास्त वाढली. म्हसरापुढची अर्धी खाल्लेली चिपाडं, शेणामुतातला उकीरड्यातला रदाळा त्यांच्या पुढे दावणीत येऊ लागला. खाल्लेलं त्याना पचेनासं झालं, बसल्या जागी बैल शेण टाकू लागले, शेणात बसून अंगाला जळवा लागल्यागत झालं. मान झडलेले. खांदे उतरलेले, वशिंड ढळून खुरटून गेलेली, अंग चिपाडागात वाळून गेलेले अशी त्यांची अवस्था झाली होती. पाठीची पन्हाळी बुजून कण्याची हाडं तोंड वर काढून होती, खांद्यातून गळणारया पुवावर माशा घोंगावू लागल्या होत्या. कधी काळी रेशमी झुली पांघरलेलं त्यांच अंग पार वाळून गेलं होतं. नुसता सांगाडा दिसत होता. डोळे बाहेर आल्यागत झाले होते, पिचून गेलेल्या डोळ्याभोवती माशांचा घोंघावनारा जथ्था बघवत नव्हता. त्यांची खिल्लारी शिंगं उतरलेल्या मुळ्यासारखी दिसत होती. दोन दिवस झाले त्यांनी खाणं बंद केलं होतं…

सगळं गाव राणूवर हसत होतं. त्याची पोटची पोरे मात्र त्याच्या हळव्या स्वभावाला आणि आभाळभर मायेला चांगले ओळखून होते, आपली बायका पोरे काय म्हणत नाहीत. पण आपण त्याना पोटभर अन्न देखील खाऊ घालू शकत नाही याची मोठी टोचणी त्याच्या मनाला लागून होती. लोक म्हणायचे 'येड्या राणूने बैलांसाठी इळा ईकून त्येचा खिळा केला' अन खदाखदा हसायचे. राणूला सगळी डाचणी फार मनावर घेतली. म्हणून आजच्या दिवशी त्यानं घरी सांगितलं की, 'माझं मन लागत नाही, वस्तीवर जाऊन राहतो.' 'पावसापाण्याचं रानात जाऊ नका' असं सांगूनही ते ऐकणार नाहीत हे घरच्या लोकाना चांगले माहिती होते तरी त्यांनी अडवून पाहिले पण काही उपयोग झाला नाही. कधीकाळी अडीअडचण आली तर असावेत म्हणून पदराला बांधलेले चार पैसे वस्तीवर जाताना राणू सोबत घेऊन गेला. गावातल्या छोटा हत्ती रिक्षावाल्याला अर्ध्या रस्त्यातून त्याने बरोबर घेतले आणि दोघे मिळून वस्तीवर आले. रिक्षावाल्या एकनाथाला त्याने सांगितले की, 'बैलं जास्तच आजारी आहेत, तालुक्याच्या दवाखान्यात न्यायची आहेत.' त्याने जर ते कसायाकडे न्यायचे आहेत असं सांगितलं असतं तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता.

वस्तीवर आलेला राणू रात्रभर बैलांजवळ बसून होता. आभाळातल्या चांदण्यांकडे बघून काहीतरी पुटपुटत होता. त्याचे एके काळचे डौलदार बैल त्याच्या सारखेच म्हातारे झाले होते, त्यांच्या खंगलेल्या वशिंडाला डोके टेकवून बसला होता. त्याच्या मनात अनेक विचार येत होते. आपण गाठीला पैसा बांधू शकलो नाही, पोरे शिकवू शकलो नाही. लेकीचं लगीन करायचं बाकी आहे. कारभारीण थकून गेलीय.आपल्याला काम होत नाही, आपण म्हणजे खायला कहार आणि भुईला भार झालो आहोत. आपला आता काय उपयोग ? या बैलांसारखं आपणही झिझून गेलो आहोत, आपल्यालाही आता कामे होता नाहीत आणि आपण जर आपल्या बैलासारखं आजारी पडलो तर त्याचा खर्च कोण करणार ? आधीच खर्च काय कमी आहे का ? पोराबाळांवर आपलं ओझं का टाकावं ? या बैलांचं आयुष्य आता शेवटच्या पडावाला लागलंय, यांच्या मागे आपण जित्त रहायचं म्हणजे पोराबाळांना आपली धोंडच होणार. त्यापेक्षा आपण एक काम करून टाकलेलं बर असं मनाशी ठाम केलं.…

राणूच्या वस्तीवर पहाटं याचीच लगबग चालली होती. आढ्याला असलेल्या फळ्या काढून राणूने आणि एकनाथाने हिरया आणि सुभान्याला गाडीत अगदी जीवाचा पहाड करून वर चढवले. बैल चढल्यावर राणूने हळूच एक गाठोडे रिक्षात पुढे आणून ठेवले. रिक्षा सुरु झाली, तेंव्हा राणूने एकदा सगळ्या शेतशिवाराकडे, पडक्या वस्तीकडे,मोकळ्या गोठ्याकडे डोळे बघून भरून घेतले आणि जड मनाने तो रिक्षात जाऊन बसला. वाघोली गेली, वाघोलीवाडी पार झाली. वटवटे देखील मागे पडले, रिक्षात बसलेला राणू इतका शांत बसला होता की एकनाथाला त्याची भीतीच वाटली. पुढच्या सगळ्या प्रवासात तो एकटाच बडबड करत होता, राणू नुसतेच हांहुं करत होता. मिरीच्या बरचसं पुढे नदीलगत ते आले तसं राणूच्या अंगी एकाएकी बळ आलं, त्यानं रिक्षा थांबवायला सांगितली. एकनाथाला बैल उतरवायला मदत करायला सांगितलं आणि तो खाली उतरला देखील. 'हे तुझे ठरवल्याप्रमाणे सगळे पैसे घे पण आम्हाला इथंच सोड' राणूचे हे उद्गगार ऐकून तो पुरता गोंधळून गेला. राणूला त्याने विनवण्या केल्या, हात जोडले पण हट्टी राणू ऐकेना. अजून अंधार ओसरला नव्हता, रस्त्यावर चीटपाखरू देखील नव्हते.

'अजून मंगळवेढा बराच लांब आहे, ही थकलेली बैलं घेऊन तुम्ही कसं जाणार हे मला काही कळत नाही' असं म्हणून तोच राणूला हात जोडू लागला.

'माझी बैलं आहेत मी मसणात नेईन तुला फालतूच्या उचापती कशाला पाहिजेत, तुझे छदाम मोजले आहेत तु आता निघ आणि आमच्या घरी रिक्षात ठेवलेलं तेव्हढं गाठूडं तेव्हढ दे बाबा' असं निकराचं सांगून त्यानं पाठ वळवली. एकनाथ बराच वेळ रस्त्यावर रेंगाळत उभा राहिला, कुणी वाटसरू दिसतंय का बघत थांबला.एक दिवसावर पोळ्याचा सण होता त्यामुळे कदाचित रस्ता निर्मनुष्य होता बराच वेळ गेला तरी कोणी दिसलं नाही तसं तो मुकाट रिक्षात बसून परत निघाला. एकदा मागे मान करून बघितले तसं राणू त्याच्या थकल्या बैलांसोबत जड पावलाने खालच्या अंगाने चालताना दिसला तसं त्याला जरा हायसं वाटलं. लांब गेलेल्या रिक्षाचा आवाज क्षीण होत गेल्यावर राणूच्या डोळ्यात चमक आली. त्याने बैल अजून खाली घेतले आता ते तिघे नदीपात्राजवळ आले होते. खरडत खरडत पाय ओढत ओढत हिरया आणि सुभान्या राणूच्या मागे चालत होते. चिलारीतून वाट काढत काढत आता ते नदीच्या काठावर आले होते. राणूने त्यांच्या नाकातली वेसण काढली, दोघांच्या अंगावरून एकदा हात फिरवला. कपाळावर ओठ टेकवले. त्यांच्या पायाला हात लावला आणि पुढच्याच क्षणी कासरा मोकळा करून त्याचे दुसरे टोक स्वतःच्या गळ्यात अडकवले. आता भुरूभुरू पाऊस देखील सुरु झाला होता. तो अखरेचा क्षण म्हणून परत त्याने त्या दोघांच्या जवळ तोंड नेले तसं ती मुकी जनावरे त्याचे गाल चाटू लागले. त्यांच्या पिचलेल्या डोळ्याना धारा लागल्या, आपल्यावर जीवापाड माया करणारया धन्याला ते डोळे भरून पाहू लागले. बघता बघता ते तिघंही पुढं पुढं सरकू लागले. पाण्याचा लोंढा वाढू लागला, आठवड्यापासून चालू असलेल्या पावसाने नदीला चांगले पाणी आले होते. आता ते नदीच्या बरयापैकी आत गेले होते, पावसाचा देखील जोर वाढला होता. लटकत्या, तरंगत्या पायाने ते आता मधोमध आले, वाढत्या पाण्याचे मोठे लोंढे मध्ये वाहत होते आणि एका अशाच ओलेत्या लाटेने त्यांना कवेत घेतले. नदीच्या पाण्यात ते गिरक्या खात खात पुढे गेले. पाणी आणि पाऊस वाढतच गेले.....

गावात परत आलेला एकनाथ रिक्षा घेऊन थेट राणूच्या घरापुढे आला. रिक्षातून उतरून त्याने पुढे ठेवलेले गाठोडे हातात घेतले आणि राणूच्या बैठ्या घरात तो हाळी देत आत शिरला. सकाळी सकाळी एकनाथला बघून ते सगळे गोंधळून गेले. एकनाथाने सगळी हकीकत कथन केली आणि ते गाठोडे त्यांच्या हवाली केले. ह्यातलं त्याना काहीच माहिती नव्हतं त्यामुळे घरातली सगळी माणसं साशंक होऊन त्याच्याकडे बघू लागली. राणूच्या बायकोने ते गाठोडे घेतले आणि घाबरत घाबरत त्याची गाठ सोडली. एका जुनाट धोतराच्या त्या गाठोड्यात बैलांच्या दोन रेशमी झुली होत्या, दोन शिंगाळी, दोन हस्तीदंती तुकडे, रंगवलेल्या शिंगावर लावायच्या बेगडाच्या लडी आणि वादी नसलेला चाबूक गुंडाळून ठेवला होता, गाठोड्याच्या तळाशी राणूचा एक जुना सदरा, छाटी आणि पटकूर होते !! हे सगळं बघून राणूच्या बायकोने काय ओळखायचे ते ओळखले.तिच्या काळजाचे ठोके चुकले, तिने मोठ्याने हंबरडा फोडला. तिच्या हंबरड्याचा आवाज गावातल्या देवळाच्या कळसाला वळसा घालून, वस्तीतल्या गोठ्यात फिरून झाडांच्या फांद्याफांद्यातून परत आला आणि थेट नदीच्या पात्रापर्यंत विरत विरत गेला…....

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment