Tuesday, September 1, 2015

मनीषा गटकळ आणि इंद्राणी मुखर्जीमनीषा गटकळने का जगावे ? कशासाठी जगावे ? ......

मराठवाडा आणि त्यातही उस्मानाबाद म्हणजे पाण्यासाठी दाही दिशा हे ठरलेले असताना मनीषाने तेथे जन्म का घ्यावा ? संवेदनाहीन राज्यात, देशात, गरीब अल्पभूधारक कुटुंबात जन्माला आल्याची यथासांग फळे तिने भोगायला नको का ? ती काय इंद्राणी मुखर्जी आहे का की सर्व सुज्ञ,सृजन आणि संवेदनशील जनतेने, सरकारने आणि माध्यमाने तिची दखल घ्यावी ? किती लोकांना माहिती आहे का, की ती कोण आहे ?का माहित असावे ?....

मनीषा लक्ष्मण गटकळ वय वर्षे जेमतेम ४०. पत्ता - दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यामधला माणसांनी वैराण बनवलेला अतिदुष्काळी तालुका म्हणजे भूम ; त्या भूम तालुक्यातले एक छोटेसे गाव अंभी. अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरचे दोनहजारेक लोकवस्तीचे गाव. भूममधे जवळजवळ सर्व गावे दुष्काळी आहेत त्यातही अंभी, निंत्रज, हाडोंग्री, ईट आणि माळेवाडी ही बारमाही दुष्काळी गावांचे चेहरे होत. वर्षानुवर्षे दुष्काळ पडत असून त्या कोरभर जमिनीच्या भिकारचोट ऋणापायी ही नशिबाचे तळपट झालेली कर्मदरिद्री माणसे तिथे का राहतात याचीही सरकारने एकदा सीबीआय चौकशी करावी आणि नेहमीप्रमाणे आपल्या हवा तसा अहवाल बनवून घ्यावा, असो.

लक्ष्मण गटकळ वय वर्षे ४५. एक जगण्याची लढाई हरलेला शेतकरी. लक्ष्मणची संपत्ती - एक एकर पडीक बरड जमीन . शिक्षणाचे म्हटले तर तो नावाला साक्षर आहे, नोकरी नाही, घरात कोणी कमावते नाही. वडिलोपार्जित आणखी काही धनदौलत नाही. भरीस भर म्हणजे आपल्या दिव्य संस्कृतीत मरताना पाणी पाजायला पोरगाच पाहिजे असे आमच्या गावाकडच्या माणसांच्या कानीकपाळी आपल्या धर्ममार्तंडांनी सांगितल्याने त्याला चार मुली आणि एक मुलगा आहे. जमिनीत काही पिकवावे म्हणले तर पाणी नाही. पावसाने तर मराठवाड्यावर जन्मजन्माचा सूड उगवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कुटुंब जगवण्यासाठी लक्ष्मण आणि त्याची पत्नी मनीषा मोलमजुरीच्या कामावर जात होते. रोजंदारीवर काय मिळतील त्या पैशातून रोजच्या गरजा भागवायच्या असे त्यांचे आयुष्य चालले होते. दुष्काळी परिस्थितीत थोडी उसनवारी करून मोठ्या मुलीचं लग्न केले होते आता आणखीन एक मुलगी लग्नाला आलेली. तरीही कसाबासा संसाराचा गाडा हे दांपत्य हाकत होते, जिथे खाण्याची ददात असते तिथे जगण्याच्या इतर भौतिक सुखाच्या बाबी आणि प्राथमिक गरजांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी ....

लक्ष्मण कोणतेही मिळेल ते मोलमजुरीचे काम करायचा आणि मनीषा त्याला हातभार म्हणून जमेल ते काम करून आणि पोटाला चिमटे घेऊन त्याला हातभार लावायची, प्रारब्धाने त्यांच्यापुढे मांडलेल्या या भीषण अस्मानी संकटाला हे कुटुंब त्यांच्या परीने टक्कर देत होते. अलीकडच्या काळात भाकरीची जमवाजमव करताना त्यांची प्रचंड ओढाताण होऊ लागली होती, काय करावे काही सुचत नव्हते आणि समोर काही पर्यायदेखील नव्हते. एव्हढ्याशा त्या गावात कामे तरी किती असणार आणि सततच्या दुष्काळामुळे सर्वच जन होरपळत चाललेले. त्यामुळे कोण कोणाला कशाचे आणि किती काम देऊ शकणार हा मुद्दा तिथे काळ बनला होता. १५ ऑगस्टपासून या कुटुंबाच्या हाताला कोणते काम नव्हते, हा केव्हढा मोठा दैवदुर्विलास आहे. काम नाही गाठीला पैसा नाही, लोकांच्या बांधकामावर व जी इतर कामे करून कसंबसं घर चालवलं जात होतं ती कामेही आता बंद पडली होती. परंतु पंधरा दिवसांत हाताला काहीच काम नसल्याने घर चालविणे अवघड बनले. उसनंपासनं करूनही हात थकले. अगोदरचेच देणे नव्याने कसे मागायचे. गावाकडची माणसे खूप मानी, अंगावर आधीचे पैसे असताना आणखी पैसे मागायला त्यांची जीभ रेटत नाही आणि पैसे बुडवून गाव सोडून त्याना पळून जावेसे वाटत नाही....

पैसे मागण्याची हद्द संपली की माणूस वस्तू मागू लागतो,तेच या कुटुंबाने केले. त्यांनी शेजारी पाजारी पीठ-मीठ उसनवारीवर मागायला सुरुवात केली. धान्य, भाजीपाला आणि पीठ-मीठ एका खेडेगावात एखादे कुटुंब किती जणांकडून कितीवेळा उसने घेऊ शकते ? जास्तीत जास्त एखादा आठवडा असे चालू शकते, गटकळ कुटुंबाचेही असेच झाले.नंतर त्यांनी एक वेळ जेवायला सुरुवात केली, दोन वेळच्या कोरभर भाकरी आणि ओल्ल- सुक्क कोरड्यास याची चैन त्यांना परवडेना. घरात सगळे नुसते बसून राहू लागले. पुढे पाणी पिऊन रहायचे दिवस आले. मराठवाड्यातील खेडेगावात पाण्याचे हंडे घागरी असलेला माणूस खरा सधन म्हणावा लागतो त्यामुळे या कुटुंबाचे तेव्हढेही सुदैव नव्हते. घरात असं काही घडतेय, आपला घरधनी गुडघ्यात तोंड खुपसून बसला आहे, चुल कित्येक दिवस पेटलेली नाही, कच्ची बच्ची उपाशी आहेत, पोटात अन्नाचा कण नाही, लोकाना दाखवायला तोंड नाही. दातावर मारायला फुटकी कवडी नाही अशा अवस्थेत जगताना माणसाचे मन खंबीर असावे लागते. ते या कुटुंबाकडे होते पण शेवटी माणसाच्या सहनशक्तीला देखील काही मर्यादा आहेत त्यातही एखाद्या हळव्या स्वभावाच्या आईच्या वाट्याला हे जिणे आणि हे आभाळभर दुःख आले तर काय होते ?

जो बाप असतो त्याला तर जगावेच लागते, पण आई जर हळवी असेल तर तिच्या मनाचे पाखरू सैरभैर होते. अपराधी भावना मनात फेर धरून नाचू लागते. मुलांसाठी जी काही गरीबाची स्वप्ने असतील मोडकी तोडकी आश्वासने असतील वा येणारया काळाची काही नियोजने असतील ती जेंव्हा जितेपणी धुळीस मिळून अन्नान्न दशा होते, तेंव्हा पहिला आघात मनावर होतो आणि माणूस एक निर्णय घेतोच. तो म्हणजे स्वतःला संपवण्याचा, भाकरीच्या चार तोंडातले एक तोंड कमी करतो. फाटक्या कपड्यातला वार भर कपडा कमी करतो. पसाभर धन्यातले चिमुटभर धान्य वाचवतो, वाटीभर आमटीतला एक चमचा वाचवतो, चुलीसाठीच्या सरपणातली काही लाकडे सरणासाठी वापरतो आणि जगण्याची लढाई अर्ध्यावर सोडून देतो.....

मनीषा गटकळ यांनीदेखील तसेच केले. आपल्या भावाला आपल्यासाठी ओवाळणीच्या रुपातले का होईना आणखी ऋण नको इथपर्यंत टोकाच्या विचाराला ती माझी मायमाऊली गेली आणि राखीपौर्णिमेच्या दिवशी तिने घराची कवाडे स्वतःसाठी कायमची बंद केली. तिने स्वतःला अग्नीच्या हवाली केले. त्या गरीब कुटुंबात बरेच दिवस काही पेटले नव्हते आता जितीजागती गलितगात्र झालेली आई धडाडून पेटली होती. शेजारी राहणारे लक्ष्मणचे भाऊ आणि भावकीतले इतर काही लोक धुरामुळे आणि आवाजामुळे गोळा झाले. त्यांनी दार तोडून मनिषाला बाहेर काढले. बार्शीला नेले. मनीषा जवळजवळ ८० टक्के होरपळली आहे. माणसाना आणि माणुसकीला जशी तिची दया आली नाही तशीच मृत्युलाही तिची अजूनही दया आलेली नाही.....

सिनेमात जसे शेवटी पोलीस येतात तसे इथेही सरकारी अधिकाऱ्यांचे पथक गावात आले आणि घाईघाईत त्यांनी चारशे मजुरांना काम देणार असल्याचे आश्वासन जाहीर केले आहे. १५ ऑगस्ट रोजी अंभीमध्ये झालेल्या ग्रामसभेत मजुरांना हाताला काम द्यावे अशी मागणी मांडण्यात आली होती . त्यानुसार ठरावही घेण्यात आला होता. याचे पुढे काय झाले पत्ता नाही. गटकळ यांच्यासारखीच आणखी अनेक कुटुंबे आर्थिक विवंचनेत आहेत येणारा दिवस कसा-बसा पुढे ढकलत आहेत. अगोदर घरकारभारी म्हणून शेतकऱ्याच्या मनातील घालमेल याबाबत चर्चा होत होती. आता शेतकऱ्याच्या पत्नीनेही असे टोकाचे पाऊल उचलल्याने आपल्या दुष्काळी आत्महत्त्या या अर्वाचीन शोकांतिकेत नवा पण अत्यंत महत्वाचा अध्याय सुरु झाला आहे आणि शासन,समाज आणि टीआरपीच्या कच्छपी लागलेली माध्यमे यांना त्याचे फारसे गांभीर्य नाही. नाही म्हणायला शेतकरी महिलेने पेटवून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांत अधिकारी आणि तहसीलदार गावात जाऊन परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतील आणि त्यांचा अहवाल आल्यानंतर यावर अजून काय तो प्रकाश पडेल असे जिल्हा प्रशासनाला वाटतेय !!

एकोणतीस ऑगस्टला पंधरा दिवसांनंतर शनिवारी लक्ष्मण गटकळ यांना काम भेटले होते. सकाळी पती कामाला जायला म्हणून त्यांना शिदोरी द्यायची होती. कामावर जाणारया माणसाच्या पोटात अन्नाचे दोन घास हवेत म्हणून तिने भाकरीची दुरडी हातात घेतली परंतु दुरडीत दोनच भाकरी होत्या. त्यातली एक भाकरी पतीला आणि एक कुटुंबाला अशी वाटणी तिने केली. नुसती भाकरी कशाबरोबर खाणार ? त्यामुळे तिने पतीला एकच भाकरी सोबत लाल तिखट बांधून दिले. काय यातना झाल्या असतील तिच्या मनाला याची कल्पना देखील करवत नाही. उर्वरित एका भाकरीत लेकरांचे पोट कसे भरायचे आणि किती दिवस असे चालायचे असा सल तिच्या मनात मनात खोलवर रुतला. आणि तिने तिच्या देहाचे सरपण पेटवून दिले. २९ ऑगस्टची ही दुर्दैवी सकाळ शेवटची ठरणार आहे की नाही हे नियतीने हा लेख लिहून होईपर्यंत तरी स्पष्ट केले नव्हते.

कोणास ठाऊक अशी कित्येक माणसे जगत असतील आणि का जगत असतील ? यांचे अठरा विश्व दारिद्र्य ठरलेले आहे , अशा माणसाना कोरभर भाकरी मिळाली नाही तरी चालेल पण इंद्राणी मुखर्जी जगली पाहिजे आणि तिला लोणी लावलेला ब्रेडचा तुकडा मिळाला पाहिजे अन त्याचीच ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे !!!!

- निरर्थक दुखणे मांडणारा समीर