Wednesday, September 30, 2015

बाळासाहेब आणि दादा कोंडके ---एक सच्ची मैत्री .जसे बाळासाहेब आणि दादा कोंडके हे एक समीकरण होतं तसेच दादा आणि शिवसेना हेही एक समीकरण होते. दोघं एकमेकांच्या प्रेमात होते हे कुणीही नाकारू शकणार नाही. बाळासाहेबांचं ‘मराठी’ प्रेम आणि रसिकता हे या जवळीकीचं कारण होतं. एकदा दादांचा चित्रपट मुंबईत लागावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ‘कोहिनूर’वर थेट राडाच करायचा आदेश दिला होता. घडलं असं होतं की मुंबईत मराठी चित्रपट लागायचे ते फक्त परळच्या ‘भारतमाता’ सिनेमात. बाकीचे चित्रपटगृहांचे मालक मराठी चित्रपट म्हटलं की अंगावर पाल पडल्यासारखं करीत. अगदी मॉर्निंगला लावा म्हटलं तरी ‘नाहीच’ म्हणत. दादांचा सोंगाड्या(१९७१) अन् एकटा जीव सदाशिव (१९७२) भारतमातालाच लागले, पण कमाई फारशी नाही...

एक तर थिएटर छोटं. त्यात पुन्हा तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये. बाल्कनी नव्हतीच. बरं परळचं सगळं पब्लीक चाळीत राहणारं. सगळे गिरणी कामगार. दीड रुपयात सिनेमा बघणारे. 'आंधळा मारतो डोळा' (१९७२ अखेर)च्या वेळी मात्र दादांना दादरचं कोहिनूर थियेटर हवं होतं, पण कोहिनूरचा पारशी मालक दादांना ‘दाद’ देत नव्हता. त्यात पुन्हा त्याचवेळी राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’(१९७२) आणि ऋषी कपूर – डिंपल कपाडीयाचा ‘बॉबी’(१९७३) हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. दादांनी कोहिनूरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. वास्तविक चित्रपट प्रदर्शनाचे हक्क विकत घेण्याची पद्धत होती, पण तारापोरवालाने ‘तुजा शिनमा एक हप्ताच लावीन. त्येचा बदल्यामधी तू मला २० हजार रुपये आधी देवून ठेवावा पडेल. वीस हजारच्या पुढे धंदा बनला तर तुजा वीस हजार परत देऊन टाकीन, पण आठ-दहामधी अटकून गेला तर माझा २० हजार काटून घेईन.' अशी अट घातली. दादांनी तीही मान्य केली.

तरी ऐनवेळेला ‘बॉबी’ अन् ‘हाथी मेरे साथी’ आल्यावर तारापोरवाल्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने नोकराकरवी दादांचे २० हजार रुपये आणि लाल फुली मारलेला अ‍ॅग्रीमेंट कॅन्सल असं लिहिलेला कागद दादांकडे पाठवून दिला. इकडे दादांनी कोहिनूरला द्यायचं म्हणून ग्रामीण भागातून मागणी असूनही एक रिळ राखून ठेवलं होतं. ते आता तसच पडणार. म्हणून दादा धास्तावले. त्या काळी एक रिळ पडणं म्हणजे बरीच कमाईच बुडण्यासारखं होतं. पारशानं धंदेवाईक धोका केला होता. त्यानं बॉबी सिनेमाचे हक्क पैसे देऊन घेतले होते. अन् चारी शोला बॉबी लावला होता. दादांचा ‘मराठी सिनेमा’ त्याला फुकटसुद्धा नको होता. दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, अजीजी केली, तो ऐकूनच घेईना तेव्हा शिव्याही दिल्या. तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर घालवलं. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले. त्यांना कैफीयत सांगितली. तारापोरवाल्याने अ‍ॅग्रीमेंट करून धोका दिला. माझं नुकसान होईल. काहीतरी करा असं म्हणून दादांनी अगदी साकडं घातलं...

त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘रडताय काय असे, त्या तारापोरवाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो. थांबा जरा. बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना बोलावून घेतलं. आत्ताच्या आत्ता त्या पारश्याला उचलून माझ्यापुढं आणा, आणि मराठा मंदिरवरचे बॉबीचे पोष्टर काढा; असा आदेशच दिला. अर्ध्याच तासात मोहन रावळेंनी तारापोरवाल्याला बखोटीला धरून साहेबांपुढं आणलं. तिकडे भुजबळांनी तोवर पोष्टर उतरवून ठेवले होते.

बाळासाहेबांनी तारापोरवाल्याला कडक शब्दात सुनावलं. ‘चर्चा नको, दादा कोंडकेंचा सिनेमा लावायचा! कळलं… अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो! मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही! नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन! तारापूरवाला पावसात भिजलेल्या कोंबड्यासारखा अंग आखडून नुसता टुकूटकू बघत होता.

बाळासाहेब म्हणाले, ‘चला निघा आता!’ पारशी उठला. पार गळपटला होता. रावळेंनीच त्याला धरून बाहेर आणला. कोहिनूरला सिनेमा लागला अन् अक्षरश: धो धो चालला. स्पर्धेतले बॉबी अन् हाथी मेरे साथी सुपर हिट झालेच, पण दादाही सुपरहिट झाले. पुढे पांडू हवालदार (१९७५), तुमचं आमचं जमलं(१९७६) व राम राम गंगाराम(१९७७)असे ओळीने सिल्व्हर ज्युबीली हिट झाले. .त्यावेळी टॅक्स फ्रीची भानगड नव्हती. राम रामनं दादांना धो धो कमाई अन् प्रसिद्धी दिली. अशोक सराफचा ममद्या खाटीक, दादांचा गंगाराम, उषा चव्हाण यांची गंगी आणि सिनेमातली गाणी सगळं प्रचंड गाजलं..

पब्लिक अक्षरश: झुंडीनं सिनेमाला यायचं. चिक्कार गर्दी.याच थियेटरला 'राम राम गंगाराम' सिल्व्हर ज्युबीली हिट झाल्यावर स्पेशल शो ला बाळासाहेब देखील आले होते. त्यावेळी तारापोरवाल्याने दादांना मिठी मारून ‘छोकरा बडा डिकरा हाये’ म्हणत आता यापुढे दादाचा हरएक सिनेमा आपण पैला लावणार अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली होती. त्यावर ‘नाही, लावला तर मी आहेच !’ असं बाळासाहेब म्हणाले होते. पारशी हात जोडून म्हणाला, ‘धंदा होयेंगा तो कोन छोडेंगा साहेबजी… मराठी फिल्लम को पैली बार इतना पब्लीक देखा. ये दादाजी का कमाल है! और ये छोकरी भी कमाल है! क्या बोलती वों माझ्या बकरीचा म्या!"

खडा पारशी आडवा झाला होता. दादांचा सिनेमा 'हाऊसफुल्ल' चालला होता अन मराठी सिनेमाला शिवसेनेचा जय महाराष्ट्र पावला होता. बाळासाहेबांचा करिश्मा असा जादुई होता...

- समीर गायकवाड

संदर्भ - 'एका सोंगाड्याची बतावणी' ; ईसाक मुजावर,
चित्तरकथा - उषा चव्हाण

No comments:

Post a Comment