Tuesday, August 11, 2015

इरावती कर्वे - मराठी साहित्याची दीपमाळ !

"माझ्या कुंडलीत ज्योतिष्यांना न दिसणारा एक फार मोठा भाग्ययोग आहे. मला प्रत्यक्ष किंवा असामान्य कर्तृत्वाच्या रुपाने अप्रत्यक्ष भेटलेली माणसे ही ह्या भाग्ययोगाचे फल आहेत. त्यांपैकी काही माणसांचे हे गुणगान आहे." असं म्हणत पुलंनी 'गुण गाईन आवडी' या पुस्तकात ज्या दिग्गजांची व्यक्तिचित्रे चितारली आहेत, त्यापैकी एक इरावती कर्वे होत. पुलंनी  त्याना 'मराठी वाङ्मयाच्या दीपमाळ' अशी उपमा दिलीय. इरावती कर्वेंनी मराठीत शेवटचा लिहिलेला लेखसंग्रह 'संस्कृती' हा त्यांचा शेवटचा संग्रह ठरल्यामुळे त्यातल्या एका परिशिष्टात त्यांना श्रद्धांजली वाहिली होती ती तशाच तोलामोलाच्या व्यक्तिमत्वाने. नरहर कुरुंदकरांनी. 'आधुनिक मराठी ललितगद्याची अग्रदुती' असा गौरव त्यात त्यांनी केला आहे. विद्याधर पुंडलिकांनी त्याना 'चैतन्याची वेल' असे संबोधले आहे. 


'इरावती कर्वेना मला बघायला मिळाले नाही, पण त्यांचे विचार वाचायला मिळाले अन वाचनाला अन जगण्याला दिशा मिळाली' असे सांगणारे अनेक समवयस्क मित्र आजही मला जागोजागी भेटतात. समोरच्या विषयाकडे एका स्वतंत्र आणि वेगळ्या दृष्टीने बघण्याची सवय असलेल्या इरावतीबाईंनी ‘जात म्हणजे एक विस्तारित नातेसमूह’ हा जातीकडे बघण्याचा एक नवा विचार मांडला. असा विचार मांडणारया  त्या पहिल्याच संशोधक. संस्कृती, तिची घडण, कुटुंबव्यवस्था आणि समाजाचं नातं यांच्या बदलत्या रूपांविषयी विलक्षण कुतूहल असणारया इरावतीबाईंनी अनेक अंगांनी याचा शोध घेत लेखन केलं. दक्षिण व उत्तर भारतातील कुटुंबसंस्था, विवाहसंस्था व नातेपद्धती यांचा तुलनात्मक विश्लेषण करणारया  त्या पहिल्या संशोधक.

आपण वाचायला लागतो आणि ती आवड आपल्यात निर्माण होते ह्याचे सर्वात पहिले कारण असावे ते म्हणजे आपण हाती घेतलेले पुस्तक. हाती पहिलेच पुस्तक यावे आणि ते नीरस, फडतूस निघाले म्हणजे त्या वाचकाला परत पुस्तक हाती धरावेसे वाटेल का? नक्कीच नाही वाटणार ! इरावती कर्वेंचे सर्व साहित्य मी वाचलंय असं काहीही नाही पण जितकं काही वाचले ते मन गर्क करणारे आहे. त्यांचं पुस्तक वाचताना अर्ध्यात टाकून उठावंसं वाटत नाही, आपण काहीतरी वेगळच वाचतो आहे याचा फिल येत राहतो. नुसते वाचतच आहोत असे नाही तर वाचताना ज्या भावना उचंबळून येतात त्याचे श्रेय केवळ बाईंच्या लिखाणाला जाते. कधी कधी आपल्या बुद्धीला चालना देणारे, आपल्याला विचार करण्यास भाग पाडणारे साहित्य शोधून शोधून आपण थकून दमून हताश होऊन जातो पण आपल्याला ते सापडत नाही. मग एक वेळ अशीही येते की, आपण निष्क्रिय अन कुचकामी  झालो आहोत. आपला मेंदू निष्कामी झाला आहे. आपण फक्त जीव आहे म्हणून तगत आहोत असे वाटायला लागते. पण अशा वेळेस आपल्या हातात 'युगांत' सारखे नितांतसुंदर पुस्तक आले तर आपले विचार सृजनशील मनाचे सजग दार्शनिक बनून जातात.

मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात, प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट अंताकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. माणसातील दोन टोकांमधील असंख्य फिकट-गर्द स्वभावछटा ज्यात प्रभावीपणे दिसतात त्या महाभारताने अनेक लेखकांना वारंवार आपल्याकडे खेचून घेतलं. इरावतीबाईंसारख्या तत्त्वचिंतक लेखिकेला त्याची भूल नसती पडली तरच नवल! इरावतीबाईंची संशोधकीय प्रज्ञा आणि ललितरम्य प्रतिभा यांचा कस लावणारं हे पुस्तक आहे, असं इरावतीबाईंच्या चरित्रकार डॉ. उषा कोटबागी यांनी म्हटलं आहे. हे लेख इरावतीबाईंनी ‘सत्यकथे’साठी लिहिलेले होते. पुस्तक काढावयाचं हा हेतू त्यामागे नव्हता. महाभारताच्या विविध अंगांना स्पर्श करणारे हे लेख त्याच धाग्याने एकत्र गुंफले गेले आहेत. हे लेखन करताना इरावतीबाईंनी त्यातील व्यक्ती केंद्रस्थानी ठेवल्या आहेत, त्यामुळे यातील बहुतांश लेख व्यक्तिचित्रं या स्वरूपाचे आहेत. या व्यक्तिमत्त्वांचा शोध घेताना लेखिकेमधील समाजशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ सतत जागी आहे, पण या भूमिका लेखनात कुरघोडी करत नाहीत हे विशेष. त्या अर्थाने ‘युगान्त’चं वेगळेपण म्हणजे हे ललित लेखन आहे पण संशोधकाची शिस्त त्यामागे सतत उभी आहे. महाभारतावर अनेक दृष्टिकोनांतून लेखन केलं गेलं, पण ‘युगान्त’चं वेगळेपण हे, की महाभारतातील सर्व प्रमुख व्यक्तींचा माणूस म्हणून अभ्यास इरावतीबाईंनी केला आणि तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीवर या माणसांचं स्थान कोणतं हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मानवशास्त्र व समाजशास्त्र या विषयांच्या अभ्यासक-संशोधक आणि ‘ललित निबंध’ हा नवा लेखनप्रकार हाताळून नावारूपास आणणारया लेखिका अशी दुहेरी कामगिरी अतिशय समर्थपणे इरावती कर्वे यांनी केली आहे. प्रखर बुद्धीवादी, स्त्रीस्वातंत्र्याबद्दल मनापासून आस्था असणार्या इरावतीबाई या बहुआयामी व्यक्तिमत्व होत्या. काळाच्या ज्या चौकटीत त्यांची कारकीर्द घडली-बहरली त्या काळाच्या किती तरी पुढे बघणारं व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.
इरावती कर्वे जे काही लिहितात त्याचे दोन भाग पडतात. एक त्यांचे खरेखुरे अभ्यासू लिखाण. कारण, त्या एक संशोधक होत्या. अस काही लिहिताना त्यांची भाषा वेगळी असायची. आणि दुसरे लिखाण एक संपुर्ण अनुभवावर आधारलेले. म्हणजे आपण प्रवासाला निघालो की त्या अनुषंगाने दिसत जाणारे जग त्यांनी जगापुढे वाचकांपुढे मांडले. त्यांची विचार करण्याची पद्धत किती सुक्ष्म होती हे त्यांचे लिखाण वाचताना  कळत जाते. त्या खूप चौकस होत्या. त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि त्याहून दहापटीने अधिक पुराणाचे ज्ञान केवळ महान होते.

त्यांनी लिहिलेले 'परिपूर्ती' आणि 'भोवरा', 'गंगाजल' हे सर्वच वाचनीय आहे. 'भोवरा' मधले त्यांचे 'आजोबा' हे धोंडो केशव कर्व्यांचे व्यक्तीचित्र अप्रतिम आहे. त्यांच्या जाणीवा त्या काळाच्या मानाने पुढारलेल्या होत्या. त्यांचं लिखाण कधी "हे किती सुंदर आहे, हे किती छान आहे" असल्या लालित्यामधे अडकून राहिलं नाही. भाषा अगदी सरळ, धारदार आणि सुस्पष्ट असल्याने मनाला भिडते.शाळेत असताना त्यांचा मराठीत धडा असायचा, तेंव्हा फारशी गोडी अन ओढ नव्हती ; पण आज ते सर्व कळल्यावर धन्य वाटते. त्याकाळी एवढी शिकलेली, संशोधक व्यक्ती आणि त्यांचे एव्हढे ओघवते ललितलेखन, त्याची प्रभावी शैली ह्याचे अप्रूप आजही मराठी साहित्यास आहे. काळाच्या खूपच पुढे होते कर्वे कुटुंब सर्वार्थाने. इरावती शोभल्या त्यात. एरवीही त्या स्वयंप्रकाशीच होत्या. त्यांच्या नर्मविनोदाला तोड नाही. डॉ. उषा कोटबागी यांचे 'इरावती कर्वे : व्यक्ती आणि वाङ्मय' हे पुस्तक त्यांचा जीवनपट आपल्यापुढे टप्प्या टप्प्यात मांडत जाते अन त्याच वेळी त्यांचे साहित्यातले बहुआयामी कर्तुत्व प्रस्तुत करते.

त्यांनी मराठीत शेवटचा लिहिलेला लेखसंग्रह 'संस्कृती ' होय. त्यातील पहिले दोन लेख महाभारत व रामायण यांच्या तौलनिक चिकित्सेवर आहेत. 'महाभारत हा इतिहास अन रामायण हे काव्य ' ही त्यांची वैचारिक धारणा. त्यातले तीन लेख रामायणावर आहेत. 'मुलांच्या औरसत्वासाठी सीतेने शेवटचे दिव्य केले' असे इरावती कर्वे मांडतात. त्यांची लेखणी इथे अव्यक्त भावूकतेने ओथंबली आहे. 'धर्म' हा मुक्तचिंतनात्मक दीर्घ लेख आहे. त्यात सत -असत, संस्कार यावर मूलभूत चिंतन आहे.

आपल्या देशाचा अभ्यास आदिवासींना समजून घेतल्याखेरीज पूर्ण होऊ शकत नाही, असं इरावतीबाईंचं मत होतं. त्यामुळे त्यांनी देशाच्या विविध प्रांतांतील आदिवासींचा अभ्यास केला. ‘पश्चिम खानदेशातील भिल्ल’ हा तर त्यांच्या संशोधनाचा विषय होताच, पण आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश अशा सर्व प्रांतांतील आदिवासी, त्यांची भाषा, त्यांचे संस्कृतिसंघर्ष, कुटुंबव्यवस्था, त्यांच्या देवता, कला याबद्दलचं इरावतीबाईंचं ज्ञान सखोल होतं. अगदी आदिवासींसाठी राबवली जाणारी विकासकामं, त्यातील प्रशासकीय अडचणी, उणिवांपर्यंतचा तपशील त्यांना ठाऊक होता. इरावतीबाई या मानववंशशास्त्रज्ञ होत्या, इतिहासवेत्त्याही होत्या; परंतु संशोधनाचा हा सर्व प्रवास करताना मनुष्यजीवनाबद्दल वाटणारी कमालीची आस्था, प्रेम आणि मानवाच्या जडणघडणीबद्दल वाटणारं कुतूहल हे घेऊनच त्या वापरल्या. आणि म्हणून या संशोधनाला निव्वळ अभ्यासाचा करकरीतपणा न येता जिव्हाळ्याची मऊ ओेल लाभली आहे.….

इरावतीबाईंचा विवाह प्रसिद्ध समाजसेवक व स्त्रीशिक्षणाचे कैवारी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी १९२६ साली प्रेमविवाह झाला. गमतीची बाब म्हणजे हा विवाह झाल्यास इरावतींच्या नशिबी वैधव्ययोग येईल असं भाकीत केलं गेलं होतं. त्यामुळे इरावतीबाईंच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. पण अशा वेळी त्यांची आई त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली.

आपल्या ‘डोक्यावर छत्र’ धरणारया दिनकररावांचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख इरावतीबाई करतात. त्यांच्या तिन्ही अपत्यांनी ( गौरी देशपांडे, जाई निंबकर आणि आनंद कर्वे यांनी) आपल्या आईच्या कर्तृत्वाचा वारसा आपापल्या क्षेत्रात तडफेने पुढे नेला आहे. त्यातही गौरी देशपांडे यांची भिन्न लेखन शैली जास्त लक्षात राहते. इरावतीबाईंचं लौकिक जीवन आणि साहित्यिक जीवन यांच्यात जिव्हाळ्याचं आंतरिक नातं होतं. आयुष्यात त्यांनी जे अनुभवलं, बघितलं त्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात तरलपणे उमटताना दिसतं.

११ ऑगस्ट १९७० रोजी वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्यांचं पुण्यात हृदयविकाराने निधन झालं. एक कर्तबगार संशोधिका आणि तेवढ्याच उत्कट लेखिका म्हणून इरावतीबाईंनी केलेली कामगिरी भारतीय सांस्कृतिक संचिताचा एक अभिमानास्पद ठेवा म्हणून उल्लेखावी लागेल.मराठी रसिक वाचकांच्या मनातली इरावतीबाईंची जागा आजही अनन्य आहे.

- समीर गायकवाड.