Thursday, August 6, 2015

गणगोत ....सकाळी रानात आल्यापासून भैरूआबाचे कशातच मन लागत नव्हते. त्याच्या जीवाची नुसती उलघाल होत होती. त्याच्या मुलाने आनंदाने सांगितलेले वाक्य कानात उकळते शिसे ओतल्यागत कानठळ्या बसवीत घुमत होते, ‘आजचा दिवस हा कामाचा शेवटचा दिवस. आता बास करायचं. उद्यापास्न घरी थांबायचं.’ काय करावे काही केल्या त्याना सुचत नव्हते. दुपारचे जेवण देखील त्यानी घेतले नव्हते. आल्यापासून सगळं लक्ष गोठ्यात लागून राहिलेले. भैरू आबा आता सत्तरीला आलेला माणूस पण गड्याची मान अजून ताठ होती. कपाळावर नुकतेच सुरकुत्यांनी डाव मांडायला सुरुवात केलेली. गालफाडे आत गेलेली अन लांब निमुळती हनुवटी. ओठावरच्या भरदाट पांढुरक्या मिशा चहा पिताना बशीत बुडाव्या अशा. कानाच्या मोठ्यालठ जाडसर पाळ्यात सोन्याची भिकबाळी त्यांचा कान हलला की हळूच डुलायची. नजर अजूनही तीक्ष्ण होती, गायी म्हशींच्या आमुण्याच्या पाटीत पडलेले गाजरगवत लांबून ओळखायचे अन बाजूला काढायचे.

आवळून बांधलेले पांढरे शुभ्र धोतर अन त्याचा लफ्फेदार मोठा सोगा, अन पायात कराकरा वाजणारी तेल लावून जड झालेली कोल्हापुरी पायताणं. अंगात नेहमी स्वच्छ धुतलेली अशी पांढरी बाराबंदी नाहीतर छाटी, अन वर सदरा. कपाळाला असेलेला गोपीचंद अन त्यावरचा काळाभोर गोल गरगरीत बुक्का. गळ्यात तुळशीची माळ अन हातात गोविदरावांनी दिलेले तांब्याचे भलेमोठे कडे ! गोठ्यातल्या डौलदार बैलजोडी सोबत चालताना तर ते एकदम उठून दिसत. गायी म्हशी अन शेळ्या मेंढरं यातच त्यांचा दिवस जायचा.

गोविंद रावताची रानातली वस्ती अगदी भन्नाट होती. गच्च हिरव्याकंच पानांनी डवरलेल्या लिंबाच्या अन आंब्याच्या डेरेदार झाडांची ती एक मैफल होती. या झाडांच्या शेजारीच एका ओळीत दहावीस नारळांची झाडे होती, ती लांबून अगदी खुलून दिसायची, वारा दिवसभर इथे फेर धरून पानांच्या कानात शीळ वाजवत घुमत राहायचा अन सावली कवडशांचा पाठलाग करत मागेपुढे होत राहायची. झाडांवर दिवसभर पाखरांची शाळा भरलेली असायची, वेगवगेळ्या झाडांवर वेगवेगळे वर्ग अन त्यांचा निरनिराळा किलबिलाट. झाडाखाली कल्ला करणारया कोंबड्यांचे खुराडे अन काही अवती भवती मोकळ्या फिरणारया कोंबड्या. असा जादुई माहौल तिथे असायचा. वस्तीसाठी तीन-तीन खोल्यांच्या चार रांगा एकाशेजारी एक अशा खेटून होत्या.आत जायला भक्कम दगडी पायरया अन ताशीव दगडाचे उंबरठे ! खोल्यांच्या समोर मातीचे अंगण शेणाने लख्ख सारवलेले असायचे. या रांगातली एक रांग गड्यांसाठी असायची अन एक रांग शेळ्या मेंढरासाठी तर पहिली रांग रावताच्या घरच्या लोकांसाठी होती. भक्कम लिंबाचे वासे आढ्याला होते अन शाडूने सारवलेल्या पण पिवळसर पांढुरक्या रंगाच्या भिंती आढ्याच्या दिमतीला होत्या. घराच्या बाहेरच्या अंगाला भल्या मोठ्या देवळ्या होत्या त्यात रातच्या वेळेस भणभणत्या चिमण्या ठेवल्या की लांबपर्यंत फक्कड उजेड पडायचा, आत छताला काहीबाही अडकवलेले असायचे. पाऊस पाणी अन जंगली जनावरापासून बचावासाठी शेळ्या मेंढर ज्या रांगेत बांधलेली असत त्या खोल्यात एक उग्र वास असायचा पण तिथेच आढ्याला एक दिसाआड तरी लिंबाचा बारीक फांटे आणून बांधलेले असत, शेळ्यांचा वास कमी व्हावा म्हणून किडा मुंगी दिकून त्यामुळे आपसूक कमी व्हायची. गड्यांच्या खोल्यात कांदे नाहीतर वांगी नाहीतर मक्याची, ज्वारीची कणसे नाहीतर बाजरीचे बोंड अशा वस्तूंची रेलचेल असे. मौसमागणिक ह्या खोल्यांतला वास वेगळा येई. तर रावताच्या घरच्या लोकांसाठी असलेल्या खोल्यात जर्मनची भांडी एका फडताळावर रचून ठेवलेली असायची. तीनचार लहान मोठी भगुणी, दोनतीन ताटं – वाट्या, एखाद दुसरी पळी. बुडाला काळ्या बिन्द्र्या झालेल्या त्या मातकट वासांच्या भांड्यात जे अन्न तयार व्हायचे त्याच्या चवीला जगाच्या पाठीवर तोड नसायची. कोपरयात दोनेक चुली गोबरगेसच्या जोडीने ठाण मांडून होत्या. एक भले मोठे रांजण पहिल्या खोलीत जमिनीत पुरून ठेवलेले होते. त्यातल्या गार पाण्याची चव अमृताहून गोड अशी असायची......

भैरूआबाचा ह्या सर्व खोल्यात सहज वावर असायचा, त्याचा हात वस्तीतल्या प्रत्येक वस्तूवरून भरभरून फिरायचा. लख्ख सारवलेल्या अंगणात असणारया तुळशी वृंदावनाला सूर्यदेवाइतकीच भैरूची सवय होती. त्याने हात जोडले की तुळशीच्या मंजुळा थरथरून उठत. अंगणापासून काही अंतरावर अगदी मधोमध असणारी थोरल्या आण्णाची समाधी रोज विहिरीतल्या पाण्याने धुऊन काढून तिची पूजा झाली की तुळशीला लख्ख पितळी तांब्यातून पाणी घालून घटकाभर भैरू तिच्याकडे पाहत उभा राही. त्या नन्तर गोठ्यातल्या गाईंच्या धारा काढायचा कार्यक्रम ! बाकीचे गडी अन वस्तीवर असलेले गडी तोवर रोजच्या कामाच्या तयारीला लागलेले असत. एक दोघे आबाला धारा काढायच्या कामात मदत करायला आलेले असत. चित्रा अन चंद्रा या दोन गायी मात्र भैरूच्या शिवाय कोणालाही अंगाला हात लावू देत नव्हत्या. त्याचे कारणही तसेच होते. या दोघी काशीच्या पोटी जन्मलेल्या काशीची आई जेंव्हा पहिल्यांदा वस्तीवर आणली होती तेंव्हा गाव तिला बघायला लोटला होता तेंव्हा भैरुचे वय असेल विसेक वर्षे ! भैरुने अगदी प्रेमाने तिचा सांभाळ केला, तिला लळा लावला. दोनेक वर्षांनी झालेल्या पहिल्या वेतात तिला काशी झाली. काशीचा जन्म भैरुच्या मायेच्या हाताने झालेला. त्यामुळे तिने भैरू सोडून कोणालाच अंगाला हात लावू दिला नाही, अगदी थोरल्या अण्णाना देखील नाही. काशीला झालेल्या वासरापैकीच चंद्रा अन चित्रा होत्या. या दोघींच्या जन्माच्या वेळेस काशी अगदी अवघडून गेलेली होती पण एखाद्या मुरलेल्या सुईणीसारखी तिची सुटका भैरुने केली होती. जन्माच्या त्या क्षणापासून ते आजपर्यंत या दोन गायींनी कोणाच्याही हाताने वैरण खाल्ली नव्हती. एखाद्या दिवशी भैरू कुठे परगावी गेला तर या दोघी तशाच उपाशी राहत, समोर ठेवलेल्या वैरणीच्या पाटीकडे बघतसुद्धा नसत, गवताच्या पेंडीला तोंड लावत नसत. दोनेक दिवस जास्त लोटले की पाणी देखील वर्ज्य करत. आता या दोघी एकोणीस- वीस वर्षाच्या होत्या, भैरू देखील सत्तरीला आलेला होता. पण त्याचा हात यांच्या अंगावरून फिरल्याशिवाय या कशालाही तोंड लावत नसत. नाही म्हणायला गोविंद रावताचा धाकलां पोरगा विष्णू भैरुच्या पाठोपाठ मागे उभा राहून या दोघींच्या अंगावरून हात फिरवत असे. चित्रा अन चंद्रा आता दुधदुभ्त्याच्या गायी नव्हत्या, पण त्या भाकड झाल्या म्हणून गोविंद रावताने कधी त्यांचे पोट मारले नव्हते. पन्नाशीतला गोविंद राऊत मुळातच समाधानी माणूस होता. त्याचादेखील सगळ्या शिवारावर, मातीवर, गुराढोरावर अन पानाफुलावर जीव होता.

आण्णा रावताच्या वस्तीवर भैरूचा बाप हरिबा कधी कामाला आला अन कुठून आला याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही, पण हरिबा लग्नाचा झाल्यावर त्याचे लग्न गावातल्याच अठराविश्वे दारिद्र्यात राहणारया बापू शिंद्याच्या मधल्या मुलीशी आण्णानी स्वखर्चाने लावून दिले अन त्यांना वस्तीवरच खोल्यांची एक रांग राहायला देऊन टाकली. त्यांच्या संसाराला फुलायला अमळ वेळ लागला, तंव्हा आण्णांनी त्यांच्या साठी देवदेवरस्की केल्याची आठवण जुनी माणसे सांगतात. पण काही फायदा झाला नाही, पण उशिराने का होईना त्यांना एक गोंडस मुलगा झाला तो म्हणजे भैरू. वस्तीतच जन्मलेला भैरू तिथेच लहानाचा मोठा झाला. तिथेच त्यानेही संसार मांडला. काळमानानुसार आण्णा निवर्तले अन भैरुचे देखील आईबाचे छत्र हरपले. आण्णांचा लाडाचा नातू म्हणजे गोविंद. त्याने भैरुला आपल्या आपल्या वडीलभावाचा मान दिलेला. दरम्यान भैरुला मुले झाली, ती मोठी झाली अन त्यांच्यासाठी गोविंदाने गावात एक घर बांधून दिले. रात्री झोपण्यापुरते घरी अन सूर्य उगवायच्या आत वस्तीवर आलेला भैरू दिस मावळेला तरी घरी परतत नसे. त्याच्या या वागण्याला त्याच्या कारभारणीची काहीच हरकत नसे कारण वस्तीचं तिला देखील त्याच्या इतकच वेड होतं. त्याच्या घरात आता सुना आल्या, नातवंडे झाली. पोराना गावाजवळ नव्याने झालेल्या एमआयडीसीत लहान मोठ्या नोकरया लागल्या. घरात सुख नांदू लागले. पोरे आता भैरूला रोज विनवू लागली, “आबा तुम्ही आता कामावर जायचं थांबवा, आम्ही हाय की काम करायला खंबीर. तुमी आता थकलासा, वय झालंय काळजी घ्याया पायजे. शिवाय लोक नाव ठेवत्येत. घरात बसत जावा,आराम करा,देवळात जावा, नातवंडे घेऊन गावात मिरवा. काम थांबवा. किती वर्षे रावताची चाकरी करशीला ? अख्खा जलम गेला की तिथं ! अजून किती काम करणार त्येंच्यासाठी ?”....पोरे अशी बोलायला लागली की भैरूचा जीव कासावीस व्हायचा. ‘पोरे काळजीपोटी बोलतात हे त्याला उमजत होते पण आपला सर्व जन्म तिकडं वस्तीवर गेलाय, तिथच आपला श्वास गुतलाय आपले आई बा तिथच मेले, अन रावताच्या माणसांनी आपल्याला घरच्यासारखा जपलाय !” असा विचार मनात येऊन त्याचा जीव कासावीस व्हायचा. काय उत्तर द्यावे त्याला सुचत नसे अन पायताण घालून तो नकळत घराबाहेर पडत असे.

दिसल त्या माणसाला तो रावताच्या वस्तीपर्यंत सोडायला सांगे अन कोणी गाठ पडलंच नाही तर पायी चालत येत असे पण तिथे आल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. पण आजच्या दिवशी थोरल्या पोराने आनंदाने अगदी दमात घेऊन निर्वाणीचे सांगणे केले होते. त्यामुळे आज वस्तीवर आल्यापासून त्याचे चित्त स्थिर नव्हते. दुपारी ऊन उतरल्यावर रानात आलेल्या गोविंदरावाच्या नजरेतून भैरुचा अस्वस्थपणा सुटला नाही. त्यांनी भैरुला तब्येत बरी नाही का असं विचारून बघितलं पण त्यानं काही उत्तर दिलं नाही. दिस मावळायला आला. सकाळी चरायला गेलेली गुरे परत यायची वेळ झाली. थकून गेलेल्या चित्रा अन चंद्रा दोघीच गोठ्यात होत्या अन त्यांच्या शेजारी इळभर बसून बसून होता तो उदास भैरू. त्या दोघींनी देखील आज चारयाला तोंड लावले नाही अन भैरूने देखील आज काही खाल्ले नाही. सगळी जनावरे गोठ्यात परत आली, वासरांचा अन गायींचा एकच कालवा उठला. वासरांना मायेने चाटणारया गायी बघून भैरुच्या डोळ्याला धारा लागल्या. चित्रा अन चंद्रीच्या डोळ्याला तर सकाळपासूनच पाझर फुटलेला होता. त्या मुक्या जनावरांनी भैरूची घालमेल ओळखली होती. गोठ्यात आलेल्या विष्णूने हे दृश्य बघितले अन त्याने तडक वडिलांना हाळी दिली. ते बापलेक रडवेल्या भैरुकडे बघून अगदी कावरे बावरे होऊन गेले. इतक्यात गाडी वाजल्याचा आवाज आला...

“आबा, वो आबा.चला की घरला. का रस्ता इसरलासा ? सकाळी काय सांगितलंय ते ठाव हाये ना ?” पोराला बघून भैरूचे अवसान गळाले. त्या बापलेकाचा हा अचानक झालेला संवाद ऐकून रावताच्या लोकांना त्याचा अर्थ उमजेना. पुढे होऊन आनंदा गोविंदरावांच्या पाया पडला. अन त्याने सगळी हकीकत त्यांच्या कानावर घातली. त्याचे म्हणणे गोविंदरावाना पटले. ते देखील भैरूआबाच्या जवळ आले अन त्यांनी ‘पोरगा सांगतोय ते खरे आहे. आता तुम्ही आराम करायचे दिवस आहेत हे..थांबा आता घरी. कधी लईच उचल खाल्ली तर महिना पंधरवाड्याला एखादी चक्कर टाका’ असे आर्जव आबाकडे केले. त्यामुळे भैरूच्या अश्रुंचा बांध तुटला. पण सगळ्यांच्या सांगण्यापुढे त्याचे काही चालले नाही. वस्तीतल्या प्रत्येक कणानकणाचा त्याने जड मानाने निरोप घेतला अन पोराच्या गाडीवर मागे बसून त्याच्या घराकडे निघाला. शेवटी जाताना परत एकदा गोठ्यात जाण्याची मात्र त्याची हिंमत झाली नाही. खरे तर मागील काही वर्षे रावतांच्या वस्तीवर भैरुला कोणतेही काम लावले जात नव्हते अन कोणतीही बंधने नव्हती. पण प्रत्येक गोष्टीचा एक शेवट या विचाराने अन पोरांच्या प्रेमळ आग्रहाने गोविंदरावांनी हा निर्णय घेतला. भैरू गाडीवर बसून जातानाच्या क्षणी गोठ्यात सर्वच जनावारांनी मोठ्याने हंबरडे फोडले अन गाडीवर मागे बसलेल्या भैरुने गाडी चालविणरया आपल्या पोराचे खांदे जोरात दाबले अन इतका वेळ दाबून ठेवलेला त्याचा अश्रुंचा बांध मोकळा केला. ओक्साबोक्शी रडणारया आपल्या बापाला समजावून सांगत आईची शपथ आडवी घालून आनंदाने शेवटी कसेबसे घरी नेले.घरी आलेल्या भैरुला काही चैन पडत नव्हती. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते.....

भैरुला वस्तीवरून गेलेलेल्या आता चार दिवस झालेत. चित्रा अन चंद्रीने आता पाणी देखील सोडले आहे. त्यांच्या डोळ्याचा पाझर मात्र काही थांबलेला नाही. डोळ्यातून वाहणारया धारांवर माशा घोंगावू लागल्यात. नाकात घातलेली वेसण ढिली झालीय. तोंडातुन फेसाचे तार लोंबताहेत. पोटात अन्न नसल्याने रवंथही बंद झालीय. गोविंदरावांच्या जीवाची मात्र उलघाल होऊ लागलीय. ते शेतात नुसतेच येऊन परत जाताहेत पण त्यांच्या चेहऱयावरचे सगळे तेज लोपले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात सगळी अस्वस्थता पसरलीय...

आणखी एक दिवस उलटला. आज तर या दोन्ही गायी जागेवरून उठल्यादेखील नाहीत, बाकीचे गडी सांगत होते की कालपासून शेणसुद्धा पडले नाही अन आज तर डोळे सुदिक उघडलेले नाहीत. शेतातली बेचैनी गोविंदरावांच्या वयोवृद्ध आईच्या नजरेतून सुटली नाही. ती कंबरेत वाकलेली म्हातारी उन डोक्यावर यायच्या आत गाडीतून रानात आली. आली ती तडक गोठ्यात गेली.ते दृश्य बघून तिला म्हातारीला डोळ्याला पाणी आले, तिने ‘गोविंद कुठे गेला आहे ?’ असे गड्यांना विचारले त्यावर ‘त्यांनी धनी गुराच्या डॉक्टरला आणायला गेलेत आता येतीलच’ असे उत्तर दिले. म्हातारीने डोळ्याला पदर लावला अन विष्णूला, तिच्या नातवाला जवळ बोलावले. त्याच्या कानात काही तरी पुटपुट केली. आजीचे बोलणे ऐकून विष्णू वस्तीहून तडक गावाकडे निघाला. बराच वेळ निरव शांततेत गेल्यावर गोविंद राऊत डॉक्टरला घेऊन हजर झाले. डॉक्टरांनी त्या दोन्ही गायीना बारकाईने तपासण्यासाठी गोठ्यात पाउल टाकले. एरव्ही कोणालाही जवळ उभे राहू न देणारया त्या निष्पाप अश्राप जीवांनी त्या दिवशी रागलोभसुद्धा सोडून दिला असावा. त्यांची तपासणी करून डॉक्टर बाहेर येत रावताच्या म्हातारीशी बोलले, ”यांचे वय आधीच खूप झालेले आहे. याना मी खूप वेळा पाहिले आहे, त्या काही इंजेक्शन सलाईन लावून घेणारयापैकी नाहीत. वाटेत मला गोविंदरावांनी सगळे सांगितलेय. जर या दोघीनी अशीच अवस्था ठेवली तर त्या फारतर एखाददुसरा दिवस काढतील.“...काळजाला चर पाडणारे डॉक्टरांचे हे उद्गार ऐकून म्हातारीला हुंदके आवरले नाहीत. तिचा रडायचा आवाज ऐकून सगळेच गोरेमोरे झाले, वातावरण गंभीर झाले. गोविंदराव डॉक्टराना सोडायला जाऊन येतो म्हणत म्हणत आपले अश्रू पुसत आपल्या आईपुढून निसटले. बघता बघता उन्हं कलली....

वस्तीतला उनाड वारा शांत झाला होता, पाने फुले हिरमसून गेली होती. पाखरांची शाळा उजाड झाली होती. गोठ्याची तर पार रया गेली होती. वस्तीतल्या सगळ्या खोल्या देखील मुक्या झाल्या होत्या. चित्रा अन चंद्रीशेजारी बसलेली रावताची म्हातारी पदराने डोळे पुसत कसला तरी विचार करत होती. इतक्यात चित्रेने अन चंद्रीने अचानक कान टवकारले, लोंबणारे ढिले झालेले कान हलवले, एकदा शेपटी जोरात जमिनीवर आपटली. तशी म्हातारी थोडी सावध झाली, तिला काही कळायच्या आत मरणासन्न अवस्थेत गेलेल्या या दोघी सगळी ताकद एकवटून अंग थरथरवत उभ्या राहिल्या अन जीवाच्या आकांताने त्यांनी शक्य तितक्या मोठ्याने हंबरडा फोडला. काय होतेय ते कळायच्या आत लांबून येणारया मोटारसायकलीचा आवाज येऊ लागला. आवाज जसजसा जवळ येऊ लागला तशा या दोघींच्या तोंडावरून त्यांची सुकलेली जीभ बाहेर फिरू लागली अन नाकपुड्या थरथरू लागल्या. गाडीचा आवाज जवळ आला तसं त्यांनी परत एकदा हंबरडा फोडला. अन ती गाडी वस्तीत येऊन थांबली. अंगावर घोंगडे पांघरून बसलेला भैरू आबा अक्षरशः भेलकांडत खाली उतरला अन धावतच गोठ्यात शिरला अन त्या गोठ्यात भावभावनांचा कल्लोळ उडाला. त्या दोन्ही गायींच्या वशिंडावर आपले हात टाकून भैरूआबा लहान लेकरागत धाय मोकलून रडू लागला अन त्या दोघी दोन बाजूने त्याचे अंग चाटू लागल्या. ते दृश्य बघून भैरुला घेऊन आलेला त्याचा पोरगा आनंदा हतबल होऊन रडवेला झाला. इतक्यात तिथे विष्णूही आला. त्याला त्याच्या आजीने खरेतर भैरुला आणायला गावात पाठवलेले होते.डॉक्टरना सोडून गोविंदरावही वस्तीवर दाखल झाले. तिथले ते दृश्य बघून सगळ्यांना भरून आले...

“इथनं गेल्यापास्न आबांनी अंथरूण धरलं. जेवण कमी केलं. बोलणं दिकून कमी केलं. तीन दिवस झालं ते तापाने फणफणलेत. दवापाणी झालं पण काही उपयोग होईना तशी आई म्हणाली की आबांनी वस्तीचा गणगोताचा दोसरा काढलाय. त्ये तिथं गेल्याबिगर नीट होणार नाहीत. इकडं यायचं म्हटल्याबरोबर अंगात हत्तीच बळ आल्यावानी उठून गाडीवर बसले. कामाचा खाडा झाला तरी चालल पण आज समद डोळ्यांनी बघावं म्हणून याना घेऊन इकडं आलो..मी लई मोठी चूक केली मला माफ करा...त्ये लहानाचे मोठे हिथच झाले, त्येंचा सगळा जीव हिथच हाये..मला कळाले नाही..” रडत रडतच आनंदा बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून गोविंदरावांनी त्याला छातीशी कवटाळले. “हे बघ त्याना आता रोज विष्णू आणत जाईल आणि त्यांचे मन करेल तेंव्हा तोच घरी नेऊन सोडेल. तुम्ही तुमच्या जागी योग्य हायेत. आबाची गोष्टच न्यारी हाय, त्येंची मायाच वेगळी हाय. तेंवा आजपासून ठरलं’ आपल्या धन्याचे हे उद्गार ऐकून भैरू आबाचा चेहरा फुलला. त्यांनी गायींचे मुके घेतले तशा त्या दोघींनी पुढ्यात ठेवलेल्या वैरणीच्या पाटीला तोंड लावून आपली संमती दर्शवली....

त्या दिवसापासून भैरूआबा आजतागायत रोज वस्तीवर येतात अन भरून पावतात. वारा देखील आता मनसोक्त फिरतो, पाखरांची शाळा देखील आता कलाकलाटात भरते. चित्रा आणि चंद्रीसह बाकीच्या सर्व गायीम्हशी अन शेळ्या मेंढरांचे देखील गणगोत आता काठोकाठ भरलेले आहे. मायेच्या त्या गणगोतावर आता परमेश्वराची देखील आनंदाश्रूपूर्ण मेहेरनजर आहे.......

-समीर गायकवाड