Wednesday, August 5, 2015

शापित सौंदर्यसम्राज्ञीची दास्तान - मेरिलिन मनरो !


अख्खी दुनिया जिच्या सौंदर्याची दिवानी झाली होती, जिचे सौंदर्य मापदंड बनून गेले, जिला अप्सरेहून अधिक देखणं म्हटलं गेलं त्या मेरिलिन मनरोच्या जीवनाची अखेर काटेरी एकांतवासातली आणि काळीज विदीर्ण करणारी का ठरली ? ....हॉलीवूडच्या ऑल टाईम ग्रेट, बोल्ड अँड ब्युटीफुल गोर्जिअस ब्युटीक्वीन मेरिलिन मनरोच्या जीवनाचा छोटासा आलेख.....

५ ऑगस्ट १९६२, वेळ सायं. ४.२५ मिनिटे झालीत. लॉस एजेल्सच्या सार्जंट जेक क्लेमंसना एक फोन आलाय, डॉ. राल्फ ग्रीन्सन यांचा तो फोन आहे. ते सांगतात की, 'ती गेलीय' !... क्लोरल हायड्रेट अन नेम्ब्युटोल या बारबीट्युरेट्सच्या अतिसेवनाने तिचा मृत्यू झाल्याचे पुढच्या शव विच्छेदन अहवालात स्पष्ट होतं. ती एक प्रकारची आत्महत्त्याच असल्याचा अभिप्राय तिचे डॉक्टर देतात. तिच्या दफनविधीत सर्व मायाजाल आलं होतं. त्यात अभिनेता मार्लन ब्रान्डो
लहान मुलांसारखा रडला होता. पुढे पोलीस तपासात असही स्पष्ट झालं की, तिने मृत्युपूर्वी ज्याना सर्वात शेवटी फोन केला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी होते. तिने त्यांच्या आधी सिनेटर रॉबर्ट केनेडी यांना अनेक फोन केले होते पण त्यांनी ते रिसीव्ह केले नव्हते. तिने या अंमली पदार्थाचे इतके सेवन केले होते की तिचा देखणा चेहरा सोलून निघाल्या सारखा झाला होता अन सर्वांग सुजले होते. आपण इतक्या मोठ्या प्रमाणात बार्बीट्युरेटस घेतल्यावर मरून जाऊ याची तिला पुरेपूर खात्री होती. इतक्या उत्कट सौंदर्यासोबत येणारा शाप जगाला कळावा अन आपल्या जीवनात असलेलं नग्न सत्य बाहेर यावं म्हणून ती पूर्ण विवस्त्र होऊन त्या गोळ्या खाऊन शांतपणाने झोपली होती. ती गेली तेंव्हा तिच्या एका हातात फोनचा रिसिव्हर होता अन बाजूला असणाऱ्या मेजावर बार्बीट्युरेटसची रिकामी बाटली पडली होती. ज्यातल्या सर्व चाळीस कॅपस्युलस तिने घेतल्या होत्या. 

मृत्यूनंतर तिच्या चेहऱ्यावर जी शांतता होती ती जिवंतपणी कधीच दिसली नव्हती .....शापित सौंदर्यसम्राज्ञीचा मृत्यू कसा असतो हेच जणू तिला जगाला दाखवून द्यायचे असावे ...ती नेमकी कधी गेली कुणालाच कळले नाही पण तिची हाऊसकिपर फ्युनीस मरे हिनं तिला निष्प्राण होऊन पडल्याचे पाहिले अन तिचे फॅमिली डॉक्टर राल्फ ग्रीन्सन यांना कळवले...पण तिचा खेळ संपला होता.... अधिक खोलात जाऊन तिच्या तपासण्याचे कागद बाहेर येऊ लागले तसतसे जग तिच्याबद्दल आर्त वेदनेने कळवळून गेले. मृत्यूआधी १५ दिवसंपूर्वी म्हणजे २० जुलैला तिने अखेरचा गर्भपात करवून घेतला होता...होय अखेरचाच कारण तिच्या ३६ वर्षाच्या आयुष्यात तिने डझनावारी गर्भपात करवून घेतले होते..

ती म्हणजे मेरिलिन मनरो ! कुणी तिला 'शापित अप्सरा' म्हणो, कुणी 'लिव्हिंग लिजंड' म्हणो ! पण  'ए डंब ब्लाँड’ (बुद्धीपेक्षा सौंदर्यावर भर देणारी पिंगट केसांची नायिका) असे तिचे वर्णन अधिक आढळते. सौंदर्यसम्राज्ञी मेरिलिन आजही सौंदर्याच्या सर्वोच्च मापदंडावर विराजमान आहे.किशोरवयीन मेरिलीनचा चेहरा आणि देहयष्टी म्हणजे हुबेहूब बार्बीडॉलच ! ती हॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय सिनेतारका होती यात दुमत असण्याचे कारण नाही. तिच्या हयातीत 'डंब सेक्सी ब्लॉंड' असेही हॉलिवूडने तिचे वर्णन केले. नेमक्या याच शब्दांनी आयुष्यभर तिचा पिच्छा सोडला नाही. ही प्रतिमा मोडून, नवे काहीतरी करण्याची जबरदस्त इच्छा असूनही मेरिलीन पुन्हा-पुन्हा त्यातच गुंतत गेली. कोटयवधी चाहत्यांना मेरिलीनने घायाळ केले..अजूनही करत आहे. मात्र चित्रपटांत दिसणार्‍या मेरिलिनच्या व्यक्तिरेखेमागे जाऊन ती प्रत्यक्षात कशी होती याचा शोध घेतला तर तिच्या असाहायतेच्या अंधारी गुहेत जाऊन दुःख अन वेदनेचे बाह्य जगाने गौरवलेले एकाकीपणाचे हुंकारच हाती लागतात.

 मेरिलिन लॉस एंजिल्स मधल्या एका धर्मादाय इस्पितळात जन्मली होती. या आधी तिची आई वयाच्या पंधराव्या वर्षीच गर्भवती राहिली होती. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले झाली. १९व्या वर्षी तिने पहिला घटस्फोट दिला. नंतर तिने मॉर्टीन मोतेंसेशी लग्न केले ज्याच्यापासून मेरिलिनचा जन्म झाला. त्यालाही वयाच्या २६व्या वर्षी तिच्या आईने घटस्फोट दिला. पहिला पती जॉन बेकरने घटस्फोटानंतर मुले सोबत नेली, मनरोने तिच्या आयुष्यात आपल्या या भावंडाना शोधण्याचा अथक प्रयत्न केला. अनौरसतेचा कलंक टाळण्यासाठी तिच्या आईने तिच्या वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये तिचे आडनाव वेगवेगळे नमूद केले अन याने पुढे मेरिलिनची अजूनच फरफट झाली. तिच्या खरया वडिलांची निश्चितता कधीही होऊ शकली नाही. डीएनए तंत्रज्ञान विकसित झाले तेंव्हा तिचा पिता म्हणून ज्यांची नावे घेतली जात होती ती सगळी माणसे काळाच्या ओघात गडप झाली. तिच्या आईच्या अनेक मित्रांचे नाव देखील संभावित म्हणून काही चरित्रकारांनी घेतलेली आहेत यावरून तिच्या मनावर या पितृत्वाचे किती भयंकर ओझे होते ते लक्षात येईल.

 मेरिलिन जेमतेम काही आठवड्याची होती तेंव्हा तिच्या आईने तिला एका एव्हेन्जेलीकन ख्रिश्चन कुटुंबीयाकडे ठेवले होते. वयाच्या ७व्या वर्षापर्यंत ती या बॉलेडेर दांपत्याकडे होती, ते थकल्यानंतर तिच्या आईने तिला सोबत नेले. पुढे तिची आई ग्लेडीस कामावर हॉलीवूडमध्ये रमून गेली. पण वयाच्या ३२व्या वर्षी ग्लेडीस नैराश्य अन वैफल्याने दुभंगून गेली. तिला स्किझोफ्रेनियाने पुरते ग्रासले अन इस्पितळच तिचे घर झाले. या घटनेचाही मेरिलिनच्या बालमनावर खोल परिणाम झाला. मेरिलिन अल्पवयीन असल्याने अन पालकांच्या सक्षमतेअभावी अमेरिकन कायदयानुसार पुढे ती न्यायालयाच्या ताब्यात राहिली. दरम्यान तिला विविध पालक कुटुंबामध्ये ठेवण्यात आले. तिला वयाच्या ९व्या वर्षी अनाथाश्रमात ठेवण्यात आले. मेरेलिनने एका मुलाखतीत तिचे बालवयात अनेकदा शोषण झाल्याचे म्हटले होते, त्यावरून अनेकांनी अनेकांची संशयित म्हणून नावे घेतली. तिच्या बालपणाच्या अशा चिंधड्या उडाल्या होत्या अन अब्रूची लक्तरे अशी वेशीवर टांगली होती.

अनाथालायातल्या मेरिलिनला राज्याबाहेर जाण्यास बंदी होती, पण तिच्या आईचे मित्र जेम्स गोडार्ड जे तिचे नंतरचे कायदेशीर पालक (लीगल पॅरेण्ट) झाले होते त्यांना तिला यातून मोकळे करायचे होते . त्यासाठी वयाच्या १५व्या वर्षीच शेजारील डोरेती कुटुंबांतल्या तरुणाशी तिचे लग्न लावून दिले अन ती मेरेलिन डोरेती झाली. आयुष्यात जन्माचा साथीदार महत्वाचा असतो अन विवाह या शब्दाचा अर्थ कळण्याचेही एक वय असते या दोन्ही गोष्टी कळण्याआधी मेरिलीनचे लग्न झाले. लग्न या आयुष्यातील महत्वाच्या वळणाचा असा विचका झाला अन मेरिलीन पतीबरोबर कटलीना बेटावर गेली, जिथे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पती दूरच्या सफरीवर गेल्यावर तिने आपल्या सासरयांबरोबर महायुद्धात जखमी झालेल्या फायरमेन्सची शुश्रुषा अन पेराशुटच्या देखभालीचे काम सुरु केले. तिथे आलेल्या फर्स्ट मोशन पिक्चर युनिटच्या लोकांनी 'युद्धातली माणुसकी' या विषयावर फोटो काढताना तिचे खूप फोटो काढले. त्यातल्याच डेव्हिड कोनोव्हरने तिला मॉडेलींगचा सल्ला दिला. ब्ल्यू बुक मॉडेलींग एजन्सीशी तिने करार केला. तिथल्या जीन होर्लोने तिचे किंचित करडे असणारे केस गडद सोनेरी ब्लीच केले आणि विश्वविख्यात 'ब्लोंड हेयर लेडी'चा तिथे जन्म झाला ! पुढे तिने इतिहास घडविला….

मोना मनरो या नावाने तिने फक्त ५० डॉलरच्या मोबदल्यात २३व्या वर्षी केलेलं न्यूड फोटोशूट तिला प्रसिद्धीच्या झोतात घेऊन गेलं पण तिला एक शाप देखील देऊन गेलं. पुढे काय झाले हे जगाला माहिती आहे. अनेक पुरुष तिच्या आयुष्यात आले आणि गेले. तिचा नुसता वापर झाला, तिला मातृत्वाची दांडगी हौस होती. पण तिची ही इच्छादेखील पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे ती अधिकाधिक न्यूड होऊन स्वतःवर सूड उगवत गेली अन इंडस्ट्री तिचा अधिकाधिक वापर करत गेली. अफ़ेअर आणि सेक्स यासाठी तिचे नाव अविरत चर्चेत राहिले. याच काळात ती खूप एकाकी होत गेली अन नैराश्याने तिच्यावर कब्जा करायला सुरुवात केली. प्लेबॉय एडिटर पासून ते बेसबॉल खेळाडूपर्यंत अनेकांनी तिचा उपभोग घेतला. पण तिला दिले कुणी काहीच नाही, तिचे वागणेही या काळात उत्शृंखल असेच होते, किंबहुना तो तिने स्वतःवर घेतलेला बदला होता असे तिचे चरित्रकार देखील म्हणतात. 'दि मिसफीटस' हा तिचा शेवटचा सिनेमा. तिच्या सिनेमांनी कधी कधी सपाटून मार खाल्ला पण तिच्या कोस्टारची मात्र चांदी होत गेली. तिच्या नावावर अनेकांनी टुकार सिनेमे खपवले. अनेक स्टुडीओ गबर झाले. तिचे मूक शोषण झाले अन ती ते यथावकाश होऊ देत राहिली….

घुसमटलेले बालपण अन बालपणीच नात्याच्या झालेल्या चिंधड्या यामुळे विस्कटलेली आयुष्याची वीण ; तिची महत्त्वाकांक्षा, हेकेखोरपणा आणि लहरीपणा, तिचे एकाकीपण आणि असह्यता, हॉलिवूडने केलेले शोषण आणि अवघ्या छत्तीसाव्या वर्षी झालेला तिचा गूढ मृत्यू...हा मेरिलिनचा हा एका ओळीत सांगायचा जीवनपट आहे. अपमान आणि अवहेलना यांनी वारंवार उदध्वस्त होणारी मनरो आणि पुन्हा सावरणारी मनरो ; ही तिची दोन रूपे तिच्या आयुष्यात अनेकदा दिसतात. त्यातून सावरताना ती अनेकदा नैतिकतेचे मार्ग सोडून देते. पण ती कोणाची पर्वाही करत नाही पण तितक्याच वेळा ती मोडून पडते.

आर्थर मिलर या बुद्धिमान साहित्यिकाच्या आयुष्यात येईपर्यंत हॉलिवूडमधील मेरिलीनचा प्रवास म्हणजे यशाची चढती
कमान होती. पण लग्नानंतर आर्थर आणि मेरिलीन दोघांच्याही कारकीर्दीला उतरण लागली, ही दोघांचीही शोकांतिका..बेसबॉलपटू ज्यो आणि आर्थर मिलर यांनी तिच्यावर जिवापाड प्रेम केले. सर लॉरेन्स ऑलिव्हिए, फ्रॅंक सिनात्रांपासून ते जॉन केनेडी यांच्यापर्यंत अनेकांना मेरिलीनने भुरळ घातली. पण पितृत्वाचा शोध आणि मातृत्वासाठी होणारी मेरिलीनची तडफड यामुळे तिच्या वैयक्तिक जीवनाची एक शोकांतिका झाली . तिच्या मृत्यूला तत्कालीन हॉलिवूडमधील स्टुडीओजची मनमानी, प्रसिद्धीसाठी केले जाणारे स्टंट, गॉसिप पत्रकारिता याबरोबरच अमेरिकेतील राजकीय वातावरण या सर्व गोष्टीना तिचे चरित्रकार दोषी मानतात. तिच्या 'सेव्हन इयर इच' चित्रपटातल्या त्या दिलखेचक दृश्याचे स्थीरचित्र (हवेत उडालेल्या स्कर्टला आवरण्याचा प्रयत्न करणारी मेरिलिन) आजही जगप्रसिद्ध आहे.

" मी चुका करते, माझे स्वतःवर कोणतेही नियंत्रण नाही. बऱ्याचदा मला स्वतःला सांभाळणे कठीण जाते ; पण मला जर तुम्ही माझ्या वाईटात वाईट स्थितीत सांभाळू शकत नसाल तर मी सुस्थितीत असताना माझ्यावर तुमचा कधीही अधिकार येऊ शकत नाही " अशी तिची जगण्याची पंचलाइन होती.
मेरिलीन नावारूपाला आली नव्हती तेव्हा एका कॅलेंडरसाठी तिनं नग्न पोज दिली होती. नंतर तिला एका पत्रकारानं विचारलं, ‘‘तू नग्न फोटो काढून घेतला होतास हे खरं का? यू हॅड नथिंग ऑन...’’
‘‘साफ खोटं आहे हे’’ मनरो ताडकन म्हणाली, ‘‘द रेडिओ वॉज ऑन!’’ ती इतकी बोल्ड अन हजरजबाबी होती. पण हा बोल्डनेस तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा शाप ठरला.

मागे एक मनोविकारतज्ज्ञ डॉ. एड्रियन फिंकलस्टीन यांचे संपूर्ण अमेरिकेला चक्रावून टाकणारे पुस्तक प्रसिद्ध झाले ते म्हणजे ‘मेरिलीन मनरो रिटर्नस् : द हीलिंग ऑफ अ सोल.’ ‘मी मेरिलीन मन्रो आहे अशी दु:स्वप्ने व भीतीदायक भास मला होतात व त्याचा भयंकर त्रास होतो,’ अशी तक्रार घेऊन शेरी ली लेयर्ड ही कॅनडामधील पॉप सिंगर १९९८ मध्ये डॉ. फिंकलस्टीनकडे येताच त्यांना हसूच आले. पण तरीही त्यांनी तिच्यावर संशोधन करायचे ठरवले व आपल्या तब्बल ८ वर्षांच्या संशोधनानंतर सर्व शंकांचे निरसन झाल्यावर, इतर समव्यावसायिक मनोविकारतज्ज्ञांतर्फे परीक्षण केल्या जाणाऱ्या शास्त्रीय शोधनिबंधाद्वारे, शेरी म्हणजे मेरिलीनचाच पुनर्जन्म आहे असे प्रतिपादन केले. त्यास दोघींचे शरीर व चेहरेपट्टीतील धक्कादायक साम्ये, दोघींच्या हस्ताक्षरांचे व वाणीतील उच्चारांचे संगणकीय विश्लेषण व अभ्यास आणि स्वभावातील आश्चर्यकारक सारखेपणा याची जोड होती. शिवाय, शेरीने पुनर्जन्म- उत्खनन- प्रक्रियेच्या अवस्थेत असताना मेरिलीनच्या आयुष्यातील सांगितलेल्या (व कुणासही माहीत नसलेल्या) काही गोष्टींनी सर्वानाच आश्चर्यचकित केले आहे. (यासंबंधी व्हिडिओसाठी वेबसाइटस् पाहा : डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. एड्रियनफिंकलस्टीन.कॉम, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. पास्टलाईव्हस्.कॉम)… तिच्या चाहत्यांनी तिच्यात मेरिलिनला शोधण्याचा प्रयत्न केला.

तिला जाऊन आज ५ दशके झालीत पण आजही अनेकांच्या नजरा तिला शोधत असतात तर अमेरिकन जनता
तिला आजही अमेरिकन लैंगिकतेचे प्रतीक म्हणून पाहते. तिला १९५९ मधील 'सम लाइक इट हॉट' या चित्रपटातील भूमिकेसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता; तिला पुरस्काराची वानवाच राहिली होती पण तिच्या चाहत्यांनी तिच्या हयातीत अन तिच्या मृत्यूनंतरही तिच्यावर जे प्रेम केलेय ते जगातल्या खूप कमी लोकांच्या वाटेला आले आहे.तिला सर्वात जास्त कामे देणाऱ्या फॉक्स स्टुडीओने तिच्या मृत्युच्या काही आठवडे आधी तिचा करार मोडीत काढून तिला कामावरून काढून टाकले होते. एक वदंता अशीही आहे की ऑगस्ट १९८५ च्या ट्वेंटी / ट्वेंटीच्या एपिसोडमध्ये रॉबर्ट स्लेझर खुलासा करणार होते की जेंव्हा मेरिलीनने बार्बीट्युरेटसचे सेवन केले तेंव्हा बॉबी उर्फ रॉबर्ट केनेडी तिथे उपस्थित होते. पण हा एपिसोड प्रसारित झाला नाही. रॉबर्ट स्लेझरने मेरिलीनच्या मृत्यूवर संशोधन करून "लाईफ अँड क्युरिअस डेथ ऑफ मेरिलीन मनरो' हे पुस्तक लिहिले होते. विशेष बाब ही देखील आहे की प्रस्तुत लेखकाने असा दावाही केला होता की अल्पकाळासाठी का होईना पण त्याचे मेरिलीन सोबत लग्न झाले होते. काहींनी यावर विश्वास ठेवला तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका केली. मेरिलीनच्या मृत्युनंतर पंधरा महिन्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांची हत्त्या झाली तर पुढच्या साडेतीन वर्षात रॉबर्ट केनेडी यांची हत्त्या झाली.
रॉबर्ट स्लेझरने आपल्या 'मनरो फाईल्स' मध्ये लिहिलंय की ऑक्टोबर १९५२ मध्ये तो मेरिलीनचा तीन दिवसाचा पती होता. स्लेझर हा हॉलीवूडमधला लेखक दिग्दर्शक असल्याने अन तो मेरिलीनचा समकालीन असल्याने त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या आजही मोठी आहे. हे सर्व खरे आहे की खोटे याची शहानिशा करण्याची मला गरज वाटत नाही पण एक नक्की सांगता येईल की रॉबर्ट स्लेझप्रमाणे अनेक उपटसुंभ होऊन गेले ज्यांनी मेरिलीनशी संबंध वा सलगी असल्याचे दावे केले पण पुरावे कोणालाच देता आले नाहीत. मात्र या सर्व प्रकारांनी अन दंतकथांनी मेरिलीनच्या बदनाम चरित्राची पाने अस्ताव्यस्त फाटत इतस्ततः विखरत राहिली अन लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मृत्यूनंतरही तिच्या वैयक्तिक जीवनात उतरत राहिले अन तिच्या आयुष्याचा कानाकोपरा बरबाद करत राहिले .....

आपल्याकडेही मीनाकुमारी अन मधुबालेचे अकाली निधन झाले.या सर्व अप्सरा असा जीवाला चटका लावून गेल्या पण जाताना अनेक आठवणी त्या मागे ठेवून गेल्या. त्यांच्या स्वप्नांवर आजही कित्येक सिनेरसिक सुखाची झोप घेतायत….
मेरिलीन मनरोची कहाणी कळल्यावर तिचे फोटो सेक्सी वाटत नाहीत, तिच्या बद्द्ल सहानुभूती दाटून येते अन नियतीने तिचा वाईट छळ केला असे वाटू लागते, त्याहीपेक्षा ती स्वतःवर सूड उगवत बेफाम वागत गेली याचे वैषम्य वाटत राहते. तिची दया येते अन नकळत काही उसासे बाहेर पडतात…

आयुष्यभर जिला भूतकाळाने सुखाने जगू दिले नाही वर्तमानाने जिला सुखाने मरू दिले नाही तिच्या आत्म्यास ईश्वराने आता तरी चिरशांती द्यावी ही प्रार्थना. मेरिलीनच्या अभागी आयुष्याला माझ्या परीने केलेला हा आठवणीचा सलाम.....

- समीर गायकवाड.

चिरनिद्रेत शांत चित्ताने झोपलेल्या मेरिलीनची शेवटची तस्वीर कुणालाही निश्चित हळवी करते...