Monday, August 17, 2015

आग्र्याहून सुटका ...महाराजांच्या आयुष्यातला परमोच्च रोमहर्षक क्षण !


मुघल बादशहा औरंगजेब एक स्वप्न घेऊन जगत होता, त्या स्वप्नाची शिवछत्रपतींनी कशी धुळधाण उडवली याचा रोमहर्षक प्रसंग म्हणजे राजांची आग्र्याहून सुटका !.... 


केवळ मराठ्यांच्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासातदेखील दुर्मिळ अन पराकोटीच्या धूर्तपणाची साक्ष देणारी पराक्रमी घटना म्हणून ज्या ऐतिहासिक घटनेचे वर्णन केले जाते ती म्हणजे छत्रपती शिवाजे राजांनी युवराज संभाजीसह आग्र्याहून करून घेतलेली सुटका.काही लोक याचे पलायन असे वर्णन करतात ते क्लेशदायक आहे. मुघल बादशहा म्हणजे अत्यंत पाताळयंत्री अन कपटी व्यक्तिमत्व. त्यातही औरंगजेब म्हणजे उलट्या काळजाचा अन धूर्त लबाड माणूस.
याच्या विक्राळ जबड्यातून त्याचा बाप शहाजहान देखील सुटू शकला नाही, पण दिल्लीच्या या बादशहाने ज्याचे नेतृत्व काळ्याकभिन्न क्रूरकर्मा सिद्दी फुलादखानाकडे सोपवले होते त्याच्या चोखचौबंद कडेकोट पहारयातून एक तेजस्वी राजा त्याच्या हातावर तुरी ठेऊन अन छातीवर मिरया वाटून निघून गेला. तो रोमहर्षक दिवस होता १७ ऑगस्ट १६६६ ! त्या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झालीत. ज्याच्या नजरकैदेतून चिटपाखरूदेखील पळून जाऊ शकत नव्हते ते राजांनी अगदी चातुर्याने अन धिटाईने केले.या घटनेमुळे पुढे औरंगजेबाने आयुष्यभर खूप चडफडाट केला पण राजे त्याच्या हाती पुन्हा लागले नाहीत, तो नशिबाला कोसत हात चोळतच राहिला…

या घटनेचा धांडोळा घेण्यासाठी आणखी थोडेसे मागे जावे लागते. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म ज्या पुरंदरावर झाला होता त्याच पुरंदरला शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मुघल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या मुरारबाजीचा हा 'पुरंदर'गड !  गड सोडवण्यासाठी लालूच दाखवून फोडायचा प्रयत्न करणारया खानावर "अरे तुझा कौल घेतो की काय?"असं म्हणत चाल करून गेलेल्या मुरारबाजीने पराक्रमाची शर्थ केली. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. १३ जुन १६६५ मध्ये शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंहाशी पुरंदरचा तहनामा पूर्ण झाला......

संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसच आणि ती खेळी म्हणजे पुरंदरचा तह ! पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी महाराज आणि मिर्झाराजा यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले.दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार -
१. महाराजांकडे लहान-मोठे १२ किल्ले, त्यातील १ लाख होणा (=५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये.
२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी.
३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहाजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.) प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल.
४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी.
५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा. वरवर हाराकिरी केल्यासारखा वाटणारा पण जागोजागी मेखा ठोकलेला पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तहनामा असा होता ! त्याला मिर्झाराजे बळी पडला.  

जेंव्हा दिलेरखान आणि मिर्झाराजा जयसिंग पुरंदरला बिलगले तेव्हापासून तेथील दैनंदिन वाक्ये, तेथून औरंगजेबाला लिहिलेली पत्रे आणि त्याची आलेली उत्तरे, असा हा पत्रव्यवहार जयसिंगाचा मुन्शी उदयराज यानी जतन करून ठेवला. पुढे मुन्शी उदयराज करवी औरंगजेबाने जयसिंगावर विषप्रयोग केला आणि मग रामसिंग आणि किरतसिंग (जयसिंगचे पुत्र) ह्यांच्या पासून संभावित जीवाच्या भीतीने उदयराज मुसलमान झाला. त्याने नाव घेतले तालीयारखान. पुढे याच्या मृत्यूनंतर हा पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला. त्याचे नाव आहे हफ्त-अन्जुमान.त्यात या तहातील २३ किल्ले दिले अन १२ ठेवून घेतले यावर प्रकाश पडतो......

महाराज जेंव्हा तेथे कैद होते तेंव्हा त्यांच्याकडून दगाफटका होऊ नये म्हणून औरंगजेबाने रामसिंहला राजांना जामीन ठरवले होते.त्यामुळे आपण येथून रातोरात निघून गेल्यावर कुटील औरंगजेब रामसिंहाला छळ करून ठार मारेल याची राजांना मनोमन खात्री होती. म्हणून महाराजांनी रामसिंहाच्या विनवण्या करकरून त्याचा जमानत अर्ज रद्द करवून घेण्याचे रामसिंहाकडून मान्य करून घेतले. रामसिंह औरंगजेबास भेटला. 'आता शिवाजीराजांची सर्व जबाबदारी फुलादखान पाहत आहेतच. फौजाही आहे. शिवाय राजांची प्रकृती अगदी ठीक नाही, तरी मला या जामीनकीतून आपण मुक्त करावे.' ही रामसिंगची मागणी बादशाहाला फायद्याचीच वाटली. त्याचे लक्ष होते फिदाईच्या हवेलीकडे. बादशाहाने स्वत:च्या हाताने रमसिंहाची जमानत फाडून टाकली. रामसिंहला हायसे वाटले. 

शिवाजीराजांना त्याहूनही हायहायसे वाटले. खरं म्हणजे महाराज प्रेमाच्या महाकठोर बंधनातून सुटले. अत्यंत अवघड अशी ही त्यांची पहिली सुटका.
महाराजांनी आता वेळोवेळी बादशाहाकडे अर्जी करून आग्रह केला की, ' मी आता इथेच कायमचा राहणार आहे. पण माझ्या बरोबरच्या लोकांना परत घरी जायला आपण परवानापत्रे द्यावीत. मला त्यांची आता येथे गरज नाही. गरजेपुरती मोजकी नोकर माणसे फक्त ठेवून घेतो.' 

हेही बादशाहाला सहजच पटले. उलट आवडले. महाराजांची माणसे परवानापत्रे घेऊन ' कैदेतून ' बाहेर पडली आणि योजलेल्या ठिकाणी योजनेप्रमाणेच आग्रा परिसरात भूमिगत राहिली. ही परवाना घेऊन सुटलेली माणसे अतिशय सावध दक्षतेने आपापली कामे करीत होती. त्यात एक कुंभार सैनिक होता. त्याला आग्ऱ्यापासून काही अंतरावर निर्जन माळावरती कुंभाराची भट्टी पेटवून अहोरात्र राहावयास सांगितले होते. हा कुंभार तरुण कोणच्या गावचा होता ? त्याचे नाव काय होते ? वय काय होते ? इतिहासाला काहीही माहिती नाही. सांगितलेलं काम चोख करायचं एवढंच त्याला माहिती होतं. ही माणसे प्रसिद्धीच्या मागे नव्हतीच. ती सिद्धीच्या मागे होती. आपण करतो आहोत ते देवाचं काम आहे याच भावनेनं ही माणसे काम करीत होती. भट्टी पेटवून बसणं , एकट्यानं बसणं , निर्जन अनोळखी माळावर भुतासारखं बसणं सोपं होतं का ? तो काय खात होता ? कोण आणून देत होतं ? काहीही माहिती मिळत नाही. महाराज सुटून येतील,  ते आपल्या पेटत्या भट्टीच्या खुणेवर येतील म्हणून ही भट्टी सतत पेटती ठेवण्याचं काम हा करीत होता. त्याचं अहोरात्र लक्ष महाराजांच्या येण्याकडे लागलेलं असायचं. किती साधी माणसं ही ! कुणी कुंभार, कुणी न्हावी, कुणी महार, कुणी भटजी, कुणी रामोशी. पण याच सामान्य मराठ्यांनी असामान्य मराठी स्वराज्य निर्माण केलं. त्यांना कोणती पदवी द्यायची ? पद्मभूषण , पद्मश्री , पद्मविभूषण ? यांना पदवी एकच मराठा ! असा एकेक मराठा तेतुका महाराजांनी मिळविला.

औरंगजेब लक्ष ठेवून होता फिदाईच्या हवेलीवर. अन् एकेदिवशी (बहुदा तो दिवस दि. १७ ऑगस्ट, शुक्रवार, १६६६ हाच असावा) औरंगजेबाने या पूर्ण झालेल्या हवेलीत शिवाजीराजांना अर्थात संभाजीराजांसह नेऊन ठेवायचे तो दिवस मुक्रर केला गेला. १८ ऑगस्ट, शनिवार, सकाळी १६६६ यादिवशी हा त्याचा बेत अगदी गुप्त होता. त्याचे आयुष्यातले सर्वात मोठे राजकारण यांत भरलेले होते. दक्षिणेतील एक भयंकर शत्रू कायमचा संपणार होता. आता त्याला रामसिंहाचे वा इतर कोणाही रजपुताचे भय वाटत नव्हते. त्या हवेलीत महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवून सावकाशीने संपविण्याची त्याची योजना होती.

केवढा भयंकर आणि भीषण दिवस होता हा ! महाराष्ट्राचे आनंदवनभुवन करण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वगीर्य स्वप्न चिरडले जाणार की गोवर्धन पर्वताप्रमाणे आकाशात उचलले जाणार हे या दिवशी ठरणार होते. मराठी संतांचे आणि कोवळ्या संतांनांचे आशीर्वाद सफल होणार की , औरंगजेबी वणव्यात जळून जाणार हे विधात्यालाही समजत नव्हतं. ज्ञानेशांचं पसायदान आणि श्रीनामदेवांची, 'आकल्प औक्ष लाभो तया... ' ही कळवळून केलेली आर्जवणी औरंगजेबासारख्या जल्लादाच्या करवतीखाली चिरफाळून जाणार याचा अंदाजही हिंदवी स्वराज्याच्या कुंडलीतील नवग्रहांना येत नव्हता. मराठ्यांचा हा कृष्ण तुरुंगाच्या काटेरी गजांतून सुखरूप यमुनापार होणार तरी कसा होणार ? अशक्य. अशक्य. आजपर्यंत औरंगजेबाच्या मगरमुखातून कुणीसुद्धा सुटलेलं नाही. महाराज कसे सुटणार ? महाराजांना या उद्याच्या मरणाची आणि औरंगजेबाच्या आजच्याच रात्रीच्या काळोखात रंगणारी स्वप्न कशी समजणार ? काय , घडणार तरी काय ?

पण आगरयात आपल्या अदृश्य डोळ्यांनी आणि अतिसूक्ष्म कानांनी वावरणाऱ्या महराजांच्या गुप्तहेरांनी ही महाराजांच्यावर पडू पाहणारी मृत्युची फुंकर अचूक पकडली. निश्चित पकडली. औरंगजेबाचा उद्याचा, म्हणजे शनिवार दि. १८ ऑगस्ट १६६६, सकाळचा बेत मराठी गुप्तहेरांनी अचूक हेरला. वकीलांनी नक्कीच अचूक अंदाजला. औरंगजेबाचा डाव गुप्त होता. तरीही तो तितक्याच गुप्तरितीने हेरांनी हेरला. नेमका कसा ? नेमका कुणीकुणी ? हे सारंच इतिहासात गुप्त आहे. पण महाराजांना ही भयंकर खबर समजली. आता जे काही करायला हवं ते एका निमिषाचाही उशीर न करता, तातडीने, आजच्या आज, अंधारात करायला हवं, नाहीतर कायमचा अंधार. केवढा भीषण दिवस होता हा! दि. १७ ऑगस्ट १६६६ , शुक्रवार , श्रावण वद्य द्वादशी. उद्याची सकाळ कशी उगवणार ? मृत्युच्या उंबरठ्यावर की उगवत्या केशरी सूर्याच्या क्षितिजावर ? 

महाराज सावधच होते. आता जे काही करायचं ते इतक्या तातडीनं अन् इतक्या काळजीपूर्वक की , औरंगजेबालाच काय यमालाही कळता कामा नये.
महाराज कोणचंही दुखणं झालेलं नसतानासुद्धा ते अतिशय आजारी होते. डाव्या डोळ्याची पापणीसुद्धा लवत नव्हती , तरीही भयंकर आजारी होते. अनेकांचं राजकीय आजारपण आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहोत. पण महाराजांचे हे आग्ऱ्याच्या कैदेतील आजारपण अति राजकारणी होतं. आत्ता काय होणार ? रात्री काय होणार ? उद्या सकाळी ? नंतर ? काय , काय , काय ? विधाताच जाणे. नव्हे , दिल्लीत संचार करणारी गुप्त भुतंच जाणत होती. तीही सचिंत आणि थरथरत्या , धडधडत्या काळजाने. 
दि. १३ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी होऊन गेली होती...... कृष्ण जसे कारागृहातून बाहेर सुखरूप विदा झाले त्याच धर्तीवर जन्माष्टमी नंतर चारच दिवसांनी   
सर्व डावपेच पणास लावून राजे आणि युवराज १७ ऑगस्ट १६६६ला आग्र्याच्या कैदेतून सुखरूप बाहेर पडले.

शके १५८८ पराभव संवत्सरे, ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आगरयाहून  जाऊन औरंगजेबाची भेट घेतली. बिघाड होऊन राजश्रीस चौकया दिल्या. श्रावण वद्य द्वादशी आगरियातून पेटारियात बैसोन पळाले. यावरी राजश्री संभाजी राजेसह वर्तमान मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस रायगडास आले." असे दिनवर्तमान जेधे शकावलीमध्ये  देण्यात आले आहे.

आलमगिरनामा हा औरंगजेबाच्या कारकीर्दीचा प्राथमिक पण अधिकृत इतिहास. त्याचा लेखक महंमद काजम हा औरगजेबाचा निजी कार्मिक होता, त्याने औरंगजेबाच्या हयातीतच यांचे प्राथमिक लेखन केले होते.या ग्रंथात महाराज पेटा-यात बसून पळाले असा उल्लेख नाही. याबद्दल इतिहासकार सेतुमाधवराव पगडी लिहितात की, "वेशांतर केल्याचा संशय असल्याचा नामोल्लेख होतो.खरेतर पेटा-यांची ने आण होत होती.ही पेटारयांची रोजची ने आण सुरुवातीला मुघल सैनिक बारकाईने तपासत मात्र नंतर त्यात ढिलाई होऊ लागली. अन १७ ऑगस्ट १६६६रोजी महाराज बघ्यांच्या गर्दीत फकिराच्या वेशात मिसळले आणि निसटले. त्यांनी संभाजीराजांना पेटा-यात बसवले असेल असे एकवेळ घडले असेल पण स्वतः महाराज असहाय व दीन होऊन पेटारयात दडपून घेतील अन दबलेल्या अवस्थेत पेटा-यात बंदिस्त करून घेतील हे त्यांच्या गुणवैशिष्ट्ये आणि स्वभावाच्या विरुद्ध वाटते. तसेच पेटारयातून जातानाचा जीवाचा धोका पाहता त्यांच्या दक्ष - सावध मानसिकतेच्या भूमिकेतून पटत नाही.
महाराज पेटा-यात लपून गेले त्यामुळे आम्हांला दिसले नाहीत, असे सांगून आपली सुटका करून घेण्याची ही मुघल अधिका-यांनी आपली मान मोकळी करून घेतली. जेणेकरून त्यांच्यावर बादशहाची खपामार्जी होऊ नये. शिवाय आलमगीरनामा नुसार खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता. तो याला एकवेळ चमत्कार म्हणायचा पण ही बाब तो मान्य करत नव्हता.
मिर्झाराजे जयसिंहाने महाराजांची आग्र्यातली देखभालीची जबाबदारी ज्या रामसिंहावर सोपवली होती त्याचा एक राजपूत सरदार परकालदासच्या पत्रानुसार- 
"या अवधीत बादशहा हा दिवाण-ए- आममधून उठून गुसलखान्यात (दिवाण-ए-खास) जाऊन बसला होता. शिवाजी गुसलखान्यात आला. बादशहाने बख्शी असदखान याला आज्ञा केली, की शिवाजीला घेऊन या आणि मुलाजमत (भेट) करवा. असदखानाने शिवाजीला बादशहापाशी आणले. शिवाजीने एक हजार मोहरा आणि दोन हजार रुपये बादशहा नजर केले. आणि पाच हजार रुपये निसार म्हणून (म्हणजे ओवाळून टाकण्यासाठी) ठेवले. यानंतर शिवाजीचा मुलगा संभाजी पुढे झाला. त्याने पाचशे मोहरा आणि एक हजार रुपये नजर म्हणून आणि दोन हजार रुपये निसार म्हणून दिले. यानंतर शिवाजीला ताहिरखानाच्या जागेवर राजा रायसिंग याच्यापुढे उभे करण्यात आले. बादशहा काहीच बोलला नाही. तो दिवस बादशहाच्या वाढदिवसाचा होता. समारंभाचे पानविडे शहाजादे आणि उमराव यांना देण्यात आले. शिवाजीलाही हा विडा देण्यात आला. यानंतर शहाजादे, मुख्य प्रधान जाफरखान आणि राजा जसवंतसिंग यांना खिलतीची वस्त्रे देण्यात आली. यावर –
तब सेवो दिलगीर हुवो, गुस्सा खायो, गलगलीसी आख्यां हुवो.
शिवाजीला क्षोभ झाला. त्याला क्रोध आला आणि त्याचे डोळे क्षोभाने पाणावले. हे बादशहाच्या दृष्टीस पडले. त्याने कुमार रामसिंगाला आज्ञा केली, "शिवाला विचारा की काय होत आहे?" रामसिंग शिवाजीपाशी आला. तसे त्याने म्हटले –
"तुम देखो, तुम्हारा बाप देख्या, तुम्हारा पातशाही देख्या. मैं ऐसा आदमी हों यु मुझे गोर करने खडा रखो. मैं तुम्हारा मन्सीब छोड्या. मुझे खडा तो करीना सीर रख्या होता."
तुम्ही पाहिलेत, तुमच्या वडिलांनी पाहिले, बादशहाने पण पाहिले आहे, की मी कशा प्रकारचा मनुष्य आहे. असे असूनही मला मुद्दाम इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मन्सब टाकून देतो. मला उभे करायचे होते तर रीतसर व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीने करायचे होते."

यातील जे वाक्य महाराजांच्या तोंडी आहे ते महाराजांनीच बोलले असण्याची शक्यता सांगताना सेतू माधवराव त्यातील शब्दरचनेकडे लक्ष वेधतात कारण तेंव्हा महाराजांना दरबारात हिंदीत संभाषण करण्याच्या सुचना मिर्झाराजांनी दिल्या होत्या.
त्या काळात स्वराज्यातही अनेकांना तसे वाटत नव्हते. कवि भूषणचे उदाहरण पाहण्यासारखे आहे.
कवि म्हणतात – "कांधे धरि कांवर चल्योदी जबचाव सेती एकलिये,जात एक जात चले देवा की ;भेषको उतारि डारि डंवर निवारी,डा-यौ ध-यौ भेष ओर
जब चल्यौ साथ मेवा की,पौन हो कि पंछी हो कि गुटका की ;गौन होकि देखो,कौन भांति गयौ करामत सेवा की…" 

वेष बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटा-याबरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले की वारा बनून गेले ? काय चमत्कार करून गेले याचा पहारेक-यांना पत्ताही लागला नाही.
मुघलांचा दक्खनेचा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा यावेळी औरंगाबादेस होता. तो तारीखे दिल्कुशा या आपल्या आत्मचरित्रात लिहितो –"देवाचा प्रसाद म्हणून शिवाजी दर गुरूवारी मिठाईचे मोठमोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला. हे पेटारे इतके मोठे असत की एकेक वाहून नेण्यासाठी काही माणसे लागत. मिठाई वाटण्याच्या वेळी शिवाजीच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली. पोलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीने अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले. आणि मग एक दिवशी शिवाजीने एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले. मिठाईचे दोन पेटारे रिकामे केले आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले. त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.........."

इतिहासकारांमध्ये महाराज कसे सही सलामत तेथून गेले आणि त्यासाठी त्यांनी कोणता मार्ग अवलंबला यात एकमत नसले तरी जगाच्या पाठीवर असे धाडस आणि अशी दूरदृष्टी एकत्रित अमलात आणून अशी घटना घडल्याचे ऐकिवात नाही.
या घटनेच्या स्मरण निमित्ताने आपल्या दैवताला, जाणत्या राजाला आपल्या शिवछत्रापतींना त्रिवार मानाचा मुजरा !

(संदर्भ - जेधे शकावली, हफ्त-अन्जुमान शिवकालीन पत्र सार संग्रह पुरंदर तहाचे अस्सल नकाशे आणि नोंदी – जयपूर व बिकानेर दफ्तर, श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ- सेतुमाधवराव पगडी, राजा शिवछत्रपती - बाबासाहेव पुरंदरे)

- समीर गायकवाड.