Friday, August 14, 2015

'जेंव्हा माणूस जागा होतो'.....


आपल्याकडे वैचारिक धारणा ठरवण्यासाठी विचार करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्यापैकी एक म्हणजे व्यक्ती वा संघटनानांकडे त्यांच्या विचारसरणीनुसार शिक्के मारून त्यांच्याबद्दल केवळ आणि केवळ त्याच दृष्टीकोनातून पाहणेही एक पद्धत आहे. एखादा विचारवंत वा नेता वा लेखक वा तत्सम व्यक्ती,संघटना आपल्याला न पटणारया वैचारिक धाटणीच्या असतील तर आपण आधीच त्याच्यावर फुली मारून ठेवतो, आपल्याला झापडे बांधून ठेवतो. मग तो काय बोलतो,लिहितो आणि त्याचे विचार काय आहेत याच्याकडे आपण ढुंकूनही बघत नाही. याला अपवाद असू शकतात पण त्यांचे एकुणात प्रमाण अगदी गौण असे असते. अशा ढिगाने असणारया विचारधारांपैकी धार्मिक कट्टरतावादी आणि कम्युनिस्ट ही यातलीच दोन टोके आहेत. एखाद्या धार्मिक कट्टरवादी विचाराच्या युवकास जर सहज सुचवले की, 'गोदावरी परुळेकरांचे आत्मकथन वेळ मिळाले तर वाचून काढ. ', तर तो यावर त्याने आधीच डाव्या विचारसरणीबद्दल निश्चित केलेली त्याची प्रतिक्रिया देईल की ," असून असून त्यात काय असणार आहे ते मला माहिती आहे !". हाच प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्व विचारसरणीच्या लोकांमध्ये इतरांविषयी आढळतो. आपण जे टाळत आहोत त्यात काही तरी वेगळे असू शकते अन आपण आपल्याला न पटणारे, न रुचणारे देखील वाचले,ऐकले आणि पहिले पाहिजे इतकी प्रगल्भता आपल्याकडे आल्यावर लोकशाही मजबूत होण्यास निश्चित मदत होईल…. शहरी वातावरणात वाढलेल्या अन ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या एका आधुनिक विचाराच्या ध्येयवेड्या तरुणीने समाजकार्याच्या ओढीने स्वतःमध्ये घडवून आणलेले लक्षणीय परिवर्तन हा गोदावरी परुळेकरांच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरावा. या बाणेदार स्त्रीने लिहिलेलं जित्याजागत्या अनुभवांनी जिवंत केलेलं आत्मकथन म्हणजे 'जेंव्हा माणूस जागा होतो'….स्वातंत्र्यसैनिक,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून सनद मिळवणारया झुंझार नेत्या यापैकी आपण त्यांच्या ओळखीची खुणगाठ मनाशी नक्की काय बांधावी या प्रश्नाचे उत्तर या पुस्तकात दडले आहे ....

मुंबईपासून अवघ्या पन्नास मैलांच्या अंतरावर असलेल्या उंबरगाव, डहाणू, पालघर, जव्हार यांसारख्या तालुक्यांमधल्या जंगल जमिनींचे मूळ मालक असलेल्या निरक्षर, भोळ्याभाबडय़ा आदिवासींना फसवून त्यांच्या जमिनी बळकावल्या गेल्या. पण जमिनीवर कष्ट करण्यासाठी जमीनदारांना या आदिवासींची गरज होती आणि जमिनी गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी श्रम करण्याची आदिवासींना निकड होती. यातूनच वेठबिगारीचा आणि आदिवासींच्या अमानुष छळाचा उगम झाला. मग जमीनदारांनी या वेठबिगारांना राबवून घेणं, कामात कुचराई झाल्यास आदिवासींना बुकलून काढणं, चाबकांचे फटके मारणं, नांगराला जुंपणं, इतकंच नाही तर त्यांच्या बायकांचा उपभोग हे जिणं आदिवासींसाठी नित्याचंचझालं होतं. त्यातून पोलीस यंत्रणा आणि सरकारी अधिकारीही जमीनदारांनाच सामील. त्यामुळे गुन्हे नोंदवूनच घेतले जात नसत. आणि कोर्टाची फी आदिवासींना परवडत नसे. गरीब बिचाऱ्या वारलींना कोणीच वाली नसे.
अर्धनग्न अवस्थेत उपाशीपोटी राबणाऱ्या आदिवासींना बाहेरच्या जगाची ओळख नव्हती की कायद्यांची जाण. वर्षांनुवर्षे अत्याचार सहन करता करता त्यांची मनेही मुर्दाड झाली होती. अशा आदिवासींच्या टीचभर खोपटय़ात त्यांच्यातले एक बनून त्यांच्यासमवेत एका स्त्रीने राहणे हेच एक मोठे आश्चर्य होते. पुण्यात आधुनिक विचारसरणीच्या गोखले कुटुंबात गोदावरी जन्मल्या होत्या. त्यांचे वडील पेशाने वकील होते. नंतर मुंबईत शामराव परुळेकरांशी विवाह करून त्या गोदावरी परुळेकर झाल्या. अशा शहरी वातावरणातल्या गोदावरीबाई तिथे नेटाने अन जोमाने राहिल्या, नुसते राहिल्याच नाहीत तर त्यांनी वारलींसाठी संघर्ष करून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणला. गोदावरीबाईंच्या शहरी, सुशिक्षित आणि सुरक्षित वातावरणात तयार झालेल्या मनाला या आदिवासींचे हाल पाहून सुरुवातीला तीव्र धक्का बसला.
‘‘मी झोपडीत शिरले, तो मुलांना एक पांढरा गंजीसारखा पातळ पदार्थ खापराच्या तवलीतून चाटूनपुसून खाताना पाहिले. चौकशी केल्यानंतर समजले की, ते जे काही खात होते ते त्यांचे दुपारचे जेवण चालले होते. त्या आंबील ओरपण्याला जेवण का म्हणायचे तेच मला समजेना. त्या पोरांचे ते जेवण पाहून मला धक्काच बसला.असे वर्णन त्यांच्या 'जेंव्हा माणूस जागा होतो' या आत्मकथनामध्ये केलेले आहे.
अशी ही निराधार वारली जमात आपल्या मोडक्यातोडक्या खोपटय़ांत वेगवेगळ्या भागांमध्ये वस्ती करून राहत असे. त्यांची संघटना नव्हती आणि कुणाची त्यांना मदतही नव्हती. त्यामुळे हा सारा समाज अर्धमेला होऊन निपचित पडलेला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी, त्यांच्यात एकजूट निर्माण करण्यासाठी गोदावरीबाईंनी जिवाचे रान केले. अखेरीस लाल बाबटय़ाच्या मदतीने वेठबिगारीची पद्धत रद्द झाली. जाग्या झालेल्या मनांनी खवळून उभ्या केलेल्या संघशक्तीचा हा पहिला विजय होता. लग्नासाठी कर्ज घेतलेल्या असंख्य लग्नगडय़ांची मुक्तता आणि गवतकापणीची वाढवून मिळालेली मजुरी हादेखील संघटितपणे दिलेल्या लढय़ाचाच परिपाक होता. अर्थात या दरम्यान बाईंच्या हद्दपारीचे हुकूमनामे निघाले, दोन वर्षे तुरुंगात काढून त्यानंतरची दोन वर्षे त्यांना भूमिगत व्हावे लागले. पण आदिवासींची त्यांच्यावरची अविचल निष्ठा ही गोदावरीबाईंसाठी समाधानाची बाब होती. आणि आदिवासींमधला न्यूनगंड नाहीसा होऊन त्यांच्यात निर्माण झालेला आत्मविश्वास ही तर त्यांच्या यशाची सर्वात मोठी पावती होती. आदिवासींच्या केलेल्या या बंडात पाच हुतात्मे धारातीर्थी पडले १० ऑक्टोबर १९४५ रोजी. ३०,००० हून अधिक आदिवासी ठाणे जिल्ह्यातील तळवड्याला जमले होते. त्या शांतपणे जमलेल्या जनसागरावर सावकार आणि जमीनदारांच्या बाजूने ब्रिटीश सरकारने निर्घृणपणे गोळ्यांचा वर्षाव केला होता.
आदिवासींनी माणूस म्हणून जगावे यासाठी आपले आयुष्य वेचेलेल्या गोदावरी परुळेकर यांच्या जेव्हा माणूस जागा होतोया आत्मकथनातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. सामाजिक कार्याच्या ओढीने त्यात ओढले जाणे आणि ओढले गेल्यानंतर स्वतःला घडवणे हे बरेच अवघड आहे. वारली आदिवासींसाठी काम करताना आलेले अनुभव त्यांनी त्यात कथन केले आहेत. डहाणू भागात आढळणारया वारली समाजासाठी त्यांनी काम केले. वारलींसोबत जगताना त्यांची जीवनशैली अंगीकारणे त्याना क्रमप्राप्त वाटले. त्याचाच एक भाग म्हणजे त्यांच्याप्रमाणे आहार, विहार करावा लागणे. हे करताना त्याना वारल्यांच्या आहाराचा अपरिहार्य घटक असलेली कोंड्याची भाकरी जेवणात घ्यावी लागली. कोंड्याची भाकरी खाण्याविषयीचे त्यांचे अनुभव विचार करायला भाग पाडतात. "जेवताना कोंड्याची भाकरी खाऊन पाहावी म्हणून मी घेतली होती. पण उघडीवाघडी, कामट्याच्या कुडात ठेवलेली ती भाकरी खायची मला खंत वाटू लागली. कितीही म्हटले तरी मला ते कसे जमणार? मी ती भाकरी कढत करण्याच्या निमित्ताने, निखार्यापवर उलटीपालटी करून निर्जंतुक केल्याचे मनाचे समाधान केले. भाकरी खाऊ लागले. कोंड्याच्या भाकरीत क्वचित भाताची तुसे तशीच होती. ती तोंडाला लागत होती. चटकन चघळलीही जाईनात. मनात विचार आला, आतड्याला कोठे लागून काही होणार तर नाही ना? पुन्हा वाटले, लहान लहान मुले खातात, त्यांना काही होत नाही; मग आपल्याला तरी काय होणार? काहीही होवो, भाकरी खायचीच, अशा निर्धाराने मी ती भाकरी खाल्ली.’’
समाजकार्याची ओढ प्रेरणेतून त्वरित मिळते अन त्याप्रमाणे आपले विचार बदलतात, पण बदलत्या विचारानुसार आचरण ठेवणे अवघड असते. पण ध्येयवेड्या लोकाना ते जमते अन तेच पुढे समाजाचा आदर्श बनून जातात.
या पुस्तकाची प्रस्तावना त्यांची मानसिक अवस्था अन संघर्ष, तत्कालीन सामाजिक स्थिती याविषयी खूप काही सांगून जाते.प्रस्तावनेत त्या लिहितात
"प्रस्तावना तुम्हीच लिहिलेली बरी, असे मौज प्रकाशनाच्या श्री. श्री. पु. भागवतांनी सांगितल्यापासून अनेक वेळा मी लिहावयास बसले. दर वेळी डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमुळे कागद बाजूला करावे लागले. निवेदन लिहावयास घेतले की माझे प्रिय पती कॉ. शामराव यांच्या स्मृती दाटून येतात. अंत:करणाला असह्य वेदना होतात. हृदयातून कळा येतात. आसवे ओघळू लागतात. मला स्वत:ला मी अपराधी आहे हे जाणवू लागते. आम्ही उभयता नव्हेंबर १९६२ मध्ये बंदिवासात असताना, माझे आदिवासींमध्ये केलेल्या कामासंबंधीचे काही अनुभव मी लिहावे म्हणून कॉ. शामराव आग्रह करू लागले. आपण काही लिहू शकू असा मला मुळीच विश्वास वाटत नव्हता. मी लेखिका तर नाहीच पण सर्वसाधारणपणे लिहिण्याचा मला कंटाळा असल्यामुळे, असे काही लिहावयास प्रारंभ करण्याचा मला धीरच होत नव्हता. आपल्याला काय साधणार! सगळे श्रम फुकट जातील असेच नेहमी वाटे. त्यामुळे काही ना काही सबब काढून मी हे काम पुढे ढकलीत गेले.
कॉ. शामरावांनी अगदी हट्टच धरला तेव्हा माझा अगदी नाइलाज झाल्यावर १९६४ साली कडेकपारींतील वारल्याचे जीवनदर्शनआमची निवासस्थानेही दोन प्रकरणे मी लिहिली. शामरावांना ती पसंत पडली म्हणून मला मनापासून बरे वाटले. त्यानंतर मात्र लिहिण्याचे काम थांबले. आम्ही हायकोर्टात आमचे हेबियस कॉर्पसचे अर्ज करायचे ठरवले. शामराव स्वत:च अर्ज तयार करीत व स्वत:च बचावासाठी कोर्टात उभे राहात. त्यासाठी ते कायद्याचा कसून अभ्यास करीत. एखाद्या हुशार सराईत वकिलापेक्षासुद्धा जास्त वाकबगारीने व कुशलतेने स्वत:ची बाजू ते मांडीत. त्याबद्दल हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट या दोन्ही न्यायालयांतील न्यायाधीशांनी त्यांचा गौरव केलेला आहे. हे कायद्याच्या अभ्यासाचे काम सुरू झाल्यानंतर मलाही त्यांना त्यात थोडीफार मदत करावी लागे. त्यामुळे आणि बरेच दिवस बंदिवासात काढावे लागणार आहेत, केसची तयारी झाल्यानंतर पुन्हा लेखनाला सुरूवात करू, अशा विचाराने लिहिण्याचे काम मागे पडले. पुढे थोड्याच दिवसांत येरवड्याला गेल्यावर शामरावांना हृदयविकार व रक्तदाबाचा विकार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मग माझे मन कशातच लागेनासे झाले. त्यांनाही काळजी वाटू लागली. मी हे पुस्तक बंदिवासात लिहून पुरे करावे, अशी कॉ. शामरावांची तीव्र इच्छा होती, तरी त्यांनीही माझी मन:स्थिती ओळखून नंतर कधी आग्रह केला नाही.
लिहिलेली दोन प्रकरणे तशीच पडून राहिली होती. नव्हेंबर १९६५ मध्ये पॅरोल संपवून मी पुन्हा येरवड्याला गेल्यानंतर, शामरावांची इच्छा पूर्ण करायची, जे वेडेवाकडे लिहिता येईल ते लिहून तरी काढायचे, पुढे काय होईल ते होवो, या निर्धाराने मी पुन्हा लिहायला प्रारंभ केला. नोव्हेंबर १९६५ ते एप्रिल १९६६ पर्यंत सर्वसाधारण लेखन पुरे करून हातावेगळे केले. बंदिवासात संदर्भासाठी लागणारी पुस्तके, श्री. सिमिंग्टन यांचा अहवाल, आदिवासी सेवा मंडळाचे अहवाल, वर्तमानपत्रांतील कात्रणे ही साधने उपलब्ध नव्हती. म्हणून बंदिवासातून बाहेर पडल्यानंतर, ता. ३ ऑगस्ट १९६६ पर्यंत उतारे वगैरे काढून हे पुस्तक पुरे केले. हे पुस्तक कॉ. शामरावांना पाहायला मिळाले असते तर त्यांना किती बरे वाटले असते, याचा मला मी अपराधी आहे असे वाटते, जिवाची तलखली होते, नेत्र ओलावतात.
या निवेदनात एका गोष्टीचा खुलासा करावासा वाटतो. अनेक मध्यम-वर्गीय स्त्री-पुरूषांना मी आदिवासींमध्ये कामाला का गेले, सारे सोडून डहाणूत जाण्याचे कारण काय, असे वाटते. १९४२ नंतर बंदिवासातून बाहेर पडल्यावर कॉ. शामरावांनी व मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यामध्ये कार्य करण्याचे ठरवले. कॉ. शामरावांनी शेतकरी प्रश्नाचा सखोल अभ्यास केला होता. शेतकरी राजकीय दृष्ट्या जागृत झाल्याशिवाय, शेतकऱ्यांची लढाऊ संघटना उभारल्याशिवाय समाजवादी क्रांती अशक्य आहे, ही त्यांची ठाम व अचूक भूमिका होती. त्यामुळे आम्ही दोघांनी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांस कामास सुरूवात करायचे ठरवले. १९४५ पर्यंत कार्य करून १९४५च्या जानेवारीत टिटवाळा येथे महाराष्ट्र प्रांतिक किसान सभेचे पहिले अधिवेशन भरवले. या अधिवेशनाचा प्रचार ठाणे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत करायचे ठरले. त्या प्रचारासाठी प्रामुख्याने आदिवासी वस्तीच्या तलासरी, डहाणू भागांत आम्ही गेलो. तेथील आदिवासींचे ते भुकेकंगाल, प्रस्वाधीन, गुलामीचे जिणे पाहून तेथेच काम करायचे ठरवले. अशा रीतीने मी त्या भागात कामाला सुरवात केली.
त्या खेडेगावांतून त्या वेळी जमीनदारांची खटली होती! खटले म्हणजे काय, तर वेठीत काम करणारे स्त्री-पुरूष. त्यांनी सकाळी घंटेबरोबर जाऊन दुपारपर्यंत काम करायचे. दुपारी त्यांना एका माणसाला पुरेल एवढे भात देत. तो भात घेऊन ते लाकडाच्या उखळीत बिनवेढीच्या मुसळांनी कांडायचे आणि तांदूळ करायचे. तो भात शिजवून करून, मिठाच्या खड्याबरोबर व पाण्याच्या घोटाबरोबर गिळून, ठरलेल्या वेळीं सुट्टी संपली की कामाला हजर व्हायचे. दिवस मावळताना संध्याकाळची सुट्टी होई. घासभर भाताशिवाय दुसरी मजुरी नाही. सणासुदीचा दिवस नाही की सुटीचा दिवस नाही. दुखणेबाणे नाही. मुक्या जनावराप्रमाणे, रोज सकाळ झाली की कामाला जुंपून घ्यायचे. गोळाभर भात पोटात भरून, कंबर मोडेपर्यंत काम करायचे. रात्र झाली की मरगळून पडायचे. पुन्हा सकाळ झाली की रहाटगाडगे सुरू करायचे. जीवनात आनंद नाही, वैचित्र्य नाही, रस नाही, स्वातंत्र्य नाही. आपल्या खेड्याबाहेर, मालकाबाहेर कशाची दखल नाही. असे जिणे दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्षे आदिवासी जगत होते. एखाद्या बकऱ्याची मान कापली तरी तो प्रतिकार करीत नाही, त्याप्रमाणे जणू साऱ्या भावना मारून आदिवासी जीवन जगत होते. जीव घेतला, उपाशी ठेवले, बायको पळविली तरी मुकाट्याने सहन करून येईल त्या प्रसंगाला मान तुकवीत होते. अशा परिस्थितीत आम्ही गेलो, आणि त्यांच्यामध्ये, वर राख असली तरी आत धगधगणाऱ्या असमाधानाच्या, चिडीच्या ठिणगीचा स्फोट झाला. त्याला योग्य वळण लावण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही केले. आमचा आधार मिळाल्यामुळे आदिवासींतील माणुसकी जागी झाली. माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला हक्क आहे हे समजून तो प्रतिकाराला कसा सज्ज झाला, किती बदलला, हे या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या काळात होणऱ्या कामगार सत्याग्रहात त्यांनी आदिवासी महिलांसह भाग घेतला होता. एका सत्याग्रहाच्या वेळी नदी पार करण्यासाठी होडी मिळाली नाही तेव्हा त्या सगळ्या पोहत पैलतीराला पोहोचल्या!
सर्वसाधारण कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्याबद्दल, आणि विशेषत: आमच्याबद्दल, असलेल्या पूर्वग्रहांमुळे या पुस्तकात अतिशयोक्ती आहे असा गैरसमज होण्याची फार शक्यता आहे. तो शक्य तो होऊ नये म्हणून ठिकठिकाणी श्री. सिमिंग्टन यांचा अहवाल, आदिवासी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांची निवेदने, इतर अहवालांतील उतारे जसेच्या तसे दिले आहेत. त्यामुळे गैरसमजाला जागा राहाणार नाही, असा विश्वास वाटतो. कॉ. शामरावांच्या प्रेरणेमुळे हे पुस्तक लिहावयास घेतले. बंदिवासात कॉ. अहिल्या रांगणेकर, कॉ. विमल रणदिवे, सौ. प्रेमा ओक यांच्या प्रोत्साहनाने, त्या सतत त्यासाठी माझ्या मागे लागल्यामुळे, ते बंदिवासातील वास्तव्यात पुरे झाले. त्यांचे आभार मानले तर त्यांना रूचणार नाही. पुस्तकाचे हस्तलिखित तयार झाल्यानंतर पुढे कसे करायचे हा प्रश्न पडला. ते कोणाकडे द्यायचा मला धीर होत नव्हता. त्याच सुमारास माझ्या पायाची हाडे मोडल्यामुळे मी माझे बंधू श्री. बाळकृष्ण लक्ष्मण गोखले यांच्या पत्नी व माझी भावजय डॉ. लीला गोखले यांच्या इस्पितळात गेले होते. त्यांच्या घरी बरे वाटेपर्यंत दोन महिने राहावे लागले. तिथेच मुंबई समाजसेवा संघातील माझ्या बरोबरीच्या समव्यवसायी कार्यकर्त्या सौ. कमल वसंत पाणीमंगरूळ यांनी माझे हस्तलिखित वाचून काढले. सौ. कमल व श्री. वसंत पाणीमंगरूळ हे लागलीच त्यांचे भाचे, प्रसिद्ध मराठी लेखक श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्याजवळ त्याबद्दल बोलले. श्री. नाडकर्णी यांनीही विलंब न लावता मला भेटून हस्तलिखित वाचून पाहिले व ताबडतोब मौजेचे श्री. श्री. पु. भागवत यांना टेलिफोन केला, आणि मला माझे हस्तलिखित भागवतांकडे देण्यास सांगितले....."
पुढे महाराष्ट्र शासनाचा आणि १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार याच पुस्तकाला मिळाला. मराठी आत्मकथनपर पुस्तकातील हे एक दर्जेदार पुस्तक इतकीच याची ओळख नसून लेखिकेने अनुभवलेले विदारक अनुभव वाचकाला हेलावून सोडतात अन तत्कालीन अनेक प्रश्नांचा व सामाजिक जडणघडणीचा लक्षवेधक आढावा समोर येत राहतो. त्यामुळे एका सामाजिक चळवळीचे साक्षीदार झाल्याचा अनुभव यातून येतो.

आदिवासींच्या सद्य अवस्थेवर एक प्रकाश टाकला तर गोदावरीताईंचे कार्य किती महत्वाचे होते आणि त्याची व्याप्ती किती खोलवर व दूरवर होती याचा अंदाज बांधता येतो.लोकसत्ताच्या नोव्हेंबर २००९ मधील एका अग्रलेखात आदिवासी आणि आदिवासींविषयीचे सरकारी धोरण याचा मुद्देसूद उहापोह करण्यात आला होता. त्यानुसार आजमितीस देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आठ टक्के एवढी आदिवासींची संख्या आहे. आदिवासींच्या एकूण जमातींची संख्या ५७३ च्या घरात आहे, असे सरकारी आकडे  सांगतात. तरीही विकासाच्या नावाने सर्वत्र ओरड आहे. महाराष्ट्रात आदिवासी समाज ७३ लाखांच्या, तर मध्य प्रदेशात तो एक कोटी ५३ लाखांच्या घरात आहे. ओरिसात त्यांचे प्रमाण ७० लाखांच्या घरात आहे. ईशान्येकडल्या राज्यांमध्ये हा आदिवासी समाज बहुसंख्येने आहे. अरुणाचल प्रदेशात ६४ टक्के, मिझोराममध्ये ९५ टक्के, नागालँडमध्ये ८८ टक्के तर मणिपूरमध्ये ३४ टक्के एवढय़ा मोठय़ा संख्येने आदिवासी समाज आहे. जिथे आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे, तिथे त्यांचे प्रश्नही प्रचंड आहेत. दादरा, नगरहवेलीमध्ये ते सर्वाधिक आहेत, तसे ते अंदमान, निकोबार आणि लक्षद्विप या बेटांवरही आहेत. तिथे आदिवासींचे एकूण लोकसंख्येच्या ८० ते ९० टक्के एवढे प्रमाण आहे. या आदिवासींमध्ये काही जमाती संख्येने नगण्य म्हणता येतील अशा आहेत. एक उदाहरण द्यायचे तर शॉमपेन ही आदिवासी जमात मुळात चिनी-मलाया-मंगोलियन वंशाची असल्याचे म्हटले जाते. हे शॉमपेन निकोबारमध्ये दूर जंगलात कुठेतरी राहतात आणि त्यांचा जनतेशी कसलाही संबंध येत नाही. तिथे जाणाऱ्या पर्यटकांनाही शॉमपेन कुणी दिसलाच तर त्याच्याशी कसलाही व्यवहार करण्यात येऊ नये, अशा सक्त सूचना दिल्या जातात. एकूण ३० हजार लोकसंख्येपैकी चारशेच्या आसपास शॉमपेनची संख्या आहे. सुनामीमध्ये त्यांच्यापैकी नऊजण वाहून गेले, ही माहिती केंद्र सरकारकडे तब्बल अकरा महिन्यांनी येऊन पोहोचली. एकूणच या विभागाच्या कामाचा झपाटा एवढा असेल तर संपूर्ण समाजाचा विकास कशा पद्धतीने होईल, याचा विचारच केलेला बरा. तसेही हे दूरवरच्या बेटावर वस्ती करून असणाऱ्या संख्येने लहान असलेल्या एका समाजाचे विकासाचे चित्र. ठाणे  जिल्ह्य़ात तलासरी भागात गोदावरी परुळेकर तरुण वयात एकटय़ा उभ्या राहिल्या, त्यांनी शिक्षणापासून आरोग्यापर्यंतचे धडे वारली समाजाला दिले आणि तिथे अक्षरश: क्रांती घडवली. या समाजात असणाऱ्या अनिष्ट रुढी, प्रथा यांना बाजूला सारून त्यांनी जेवढी जागृती घडवली, तेवढी कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून इतक्या वर्षांत घडली नसती. तेलंगण जनतेचा लढा अजून उभा राहायचा होता, त्या आधीपासून वारल्यांच्या चळवळीत गोदावरी परुळेकरांनी स्वत:ला झोकून दिले होते. देशभरात त्यांच्या योग्यतेचे कार्य फारच क्वचित दिसले. कदाचित त्यामुळेच असेल, अन्यत्र आदिवासी समाजाच्या पिळवणुकीलाही अंत उरला नाही. आपल्याला जंगलांमध्ये होणारे प्रक्षोभाचे स्फोट दिसतात. परंतु जोपर्यंत त्या प्रक्षोभाची स्फुल्लिंग विझवली जात नाहीत तोपर्यंत अराजकाचे स्फोट होतच राहणार. १९६७ मध्ये चारू मुजुमदार आणि कनू संन्याल यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्टांच्या विरोधात पहिल्यांदा दंड ठोकले. याचे कारण वरवर पाहिले तर अगदी साधे होते. एका जमिनीच्या वादात स्थानिक गुंडांना हाताशी धरून एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कब्जा करायचा झालेला प्रयत्न हाणून पाडण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि तिथूनच नक्षलवादाला बळ मिळत गेले. हिंसाचार, खूनबाजी आणि अन्य मार्गाने ही चळवळ फोफावत गेली, हे खरे; पण तिचे मूळ समाजात असणाऱ्या प्रचंड विषमतेत आणि पिळवणुकीत आहे, याचे भान मात्र राजकारणाच्या हाणामारीत विसरले गेले. अलीकडे या नक्षलवाद्यांना आणि अर्थातच माओवाद्यांना राजकारण्यांप्रमाणेच खंडणीचाही रोग जडला आहे. स्वाभाविकच त्यांच्यापैकी अनेकजण खंडणी वसुलीसाठी बाहेर पडतात आणि चारदोन मुडदे पाडून परततात. आपण एखाद्या प्रश्नाचा विचार करायला घेतो, तेव्हा त्याची मलमपट्टी करून ती जखम बरी करण्यापुरतीच आपली मजल असते. पुन्हा तिचा उद्भव होणार नाही, हे मात्र आपण पाहात नाही. आदिवासी विकासाऐवजी आदिवासी भकास होत असल्याचे चित्र यामुळेच आज आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आहे. माओवाद्यांवर हेलिकॉप्टरमधून मारा करून त्यांना संपवा, असे आदेश दिल्याने ते संपू शकणार नाहीत आणि ते संपले तरी आदिवासींचे खरेखुरे प्रश्न मिटणार नाहीत. ते संपले नाहीत, तर अन्य कुणाला तरी ते हाती घ्यावे लागतील आणि या प्रश्नाचे नवे रौद्र उभे राहील. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात किती हजार कोटी रुपयांची खाती तुमच्याकडे आणि किती हजार कोटींची आमच्याकडे, असा विचार करून आदिवासींचे कल्याण झाले असते तर चित्र वेगळे दिसले असते.

आज गोदावरी परुळेकरांचा जन्मदिवस आहे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला अन त्यांनी दाखवलेल्या जिद्दीला सलाम.मी जरी कम्युनिस्ट विचारसरणीचा समर्थक नसलो तरी मला सार्थ अभिमान आहे की आमच्या सोलापुरात तेन्दुपत्त्यापासून घरगुती विड्या बनविणारया दहा हजार महिलांसाठीची घरकुलं कुंभारी येथे केंद्र शासनाच्या अनुदानातून मागील १० वर्षात बांधण्यात आली आहेत. या संपूर्ण घरकुल परीसराला गोदुताई नगर असे नाव आहे..

- समीर गायकवाड.