Tuesday, August 11, 2015

पाऊलवाट…पाऊलवाट हे वाटसरूच्या मनावर होणारे एक गारुड असते, वाटसरूनी तयार केलेले ते जादुई रस्ते असतात. कधीतरी कुणीतरी उजाड माळरानातून पायी जाताना या वाटा तयार होतात.कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. आधी गेलेला खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेला असतो. त्याच्या पावलाच्या ठसे मागून येणारयाला दिशा दाखवतात. अन अनेक माणसे त्या वाटेने जाऊ लागतात, अन तयार होते पाऊलवाट.वाटेने लागणारे काटे-कुटे जाणारा प्रत्येक माणूस काढून बाजूला टाकून देतो, काटाडयांनी भरलेले वाळके फांद्यांचे तुकडे देखील आधी जाणारे मागून येणारयासाठी बाजूला सरकवत जातात. पाऊलवाटेत अडथळे काहीही असोत ते बाजूला केलेले असतात, एखादी भली मोठी शिळ आडवी आली तर तिला वळसा घालून ही वाट पुढे सरकते. डोंगराच्या अल्याड पल्याड नाचत नाचत जाते,खोल दरीत निसरडी होऊन हळूवार उतरते पण चालणारयाला हाताचा आधार मिळेल याची तजवीज करते. झरे,ओहोळ,ओढे,नाले याना पार करून मागे पुढे जाते. शेताच्या रस्त्याने कधी नागमोडी होते तर कधी सरळसोट असते. पाऊलवाटेवर कधी कुठले दिशादर्शक फलक नसतात, पण आधी जाणारयाने मागच्यासाठी एक विश्वास तयार केलेला असतो त्याच्या आधारावर मागचा त्याच वाटेने पुढे जातो......


आडरानातून जाताना मात्र पाऊलवाट कधी कधी एकटी असते अन त्या वाटेवरून चालणारा त्या अनोळखी मार्गावरचा एकटाच असेल तर त्याला फक्त तिचाच आधार असतो. एखादी वस्ती वा एखादा दुसरा माणूस दिसेपर्यंत एक अनामिक भीती उगाच उरात भरून आलेली असते. पण जोडीला पाऊलवाटेने आधी गेलेल्या माणसाची चाहूल सतत जाणवत राहते. तळ्याकाठची पाऊलवाट तिच्याच कैफात असते, तिच्या कडेने चालताना पाण्यातले तरंग अन आवाज आपली सोबत करतात. पाण्याचा गारवा थेट पायाला भिडतो. ओढ्याजवळून जाणारया पाऊलवाटेचे नादमाधुर्य वेगळेच असते. ती दगड धोंड्यातून खळखळत पुढे जाते. आमराईतली  पाऊलवाट ही स्वर्गाच्या रस्त्यापेक्षा देखणी असते, तिच्या वाटेने दरवळणारा गंध दूरवर येत राहतो. टेकड्यामधली पाऊलवाट चांगलीच दमछाक करणारी असते. माळरानातून जाणारी पाऊलवाट जाताना जंगली फुलांची अन दगडफुलांची नक्षी पायाशी काढत राहते. मधेच केकताडांची टोकदार काटेरी रांग लागते तिचा वेगळाच वास असतो. वेड्यावाकड्या दगडांची पण व्यवस्थित रचलेली रास रचून तयार केलेले बांध तिला नवे रूप देतात. दिवसादेखील किर्र आवाज करणारे रातकिडे पाऊलवाटेला आपले एकसुरी संगीत देत असतात,त्याची एक वेगळीच सोबत वाटसरूला होते. गावाकडची जुनी माणसे वाटसरूच्या पायावरच्या मातीवरून ओळखायची की कोण कुठल्या वाटेने चालत आले आहे.                

मऊशार मातीतून गेलेल्या पाऊलवाटेने अनवाणी चालताना वेगळीच मजा येते. पायाला माती गुदगुल्या करत असते. कधी ढेकळे पायाला शिवाशिवी करत असतात. ढेकळात खालीवर होणारे पाय थकवा जाणवू देत नाहीत. पण पावसाळ्यात मात्र कसरत करावी लागते, पाऊलवाट पावसाळ्यात आपली कूस बदलते. थोडी मोकळी होते, या अंगावरून त्या अंगावर वळते. पाऊस ओसरला की तिला पुन्हा नवे रूप प्राप्त होते. पाऊलवाटेच्यासुद्धा आपल्या स्वतंत्र खुणा असतात. जसे की, वरच्या मोठ्या वळणाचा विटकरी दगड, एखादा भराव, एखादा पडीक माळ एक ना अनेक. आमच्या गावातून शेताला जायच्या रस्त्याला एक मोठा आडमाप दगड होता, त्याला सारे जण मुंगीचा दगड म्हणत. हा मुंगीचा दगड म्हणजे शेताकडे जायच्या वाटेचा पाव हिस्सा संपल्याची खुण होती ! वळणावर असणारी वेगवेगळी झाडे, दगड धोंडे, मोठाले खड्डे,चढ - उतार, तिरकी काटकोनी वळणे हे सर्व त्या खुणांचे अंमलदार असत. वाटेत लागणारी एखादी वस्ती हा त्या पाऊलवाटेचा थांबा असतो, बरयाचदा एखादे भलेमोठे वड,पिंपळ,चिंच, पळस वा लिंबाचे जुनाट झाड देखील एक खुणच असते. पाऊलवाटेने जाताना चालून चालून दमल्यावर या झाडांखाली घेतलेला विसावा स्वर्गीय सुख देतो. वाटेत कुठे जर निर्झराचे गोड पाणी प्यायला मिळाले तर त्यापुढे अमृतदेखील फिके !

याच वाटांमुळे कधी कधी भांडणे देखील होतात, जर या वाटा कोणाच्या शेतमळ्यातून गेल्या तर वहिवाटीचे दुखणे तिच्या मागे लागते. तंटे-बखेडे होतात, तोडगा निघाला नाही तर हाणामारया देखील होतात. मग वाट  बंद होते. तिला वळवले जाते. पण काहीही होवो या सर्व पाऊलवाटा आपल्याला इप्सित गाठून देतात, थेट आपल्या घराच्या,शेताच्या, बांधाच्या कडेला नेउन सोडतात. तिथे कधी वाहतुकीची कोंडी होत नाही ना कधी रास्ता रोकोचा चक्का जाम होत नाही. मला या पाऊलवाटा गावाकडच्या माणसांसारख्या सरळसोप्या वाटतात ; कशाचीही अपेक्षा न करता कोणालाही न अडवता सर्व अडथळे दूर करून प्रत्येकाला आपले इप्सित साध्य करण्यात त्या अग्रेसर असतात. त्याना आपल्या रुपड्याशी काही देणेघेणे नसते, ओबड धोबड माळरान असो वा काळी माती त्यातून जाताना एक आपलेपणा असतो. बांधावरची छोटी वाट  असो वा मैलोगणिक लांबीची वाट, त्या पाऊलवाटेमुळे पाय जमिनीशी नाळ जोडून राहतात अन कष्टकरयाच्या पायाचे माती मायेने चुंबन घेत राहते. आईचे अन मुलाचे नाते जोपासण्याचे हे काम या पाऊलवाटा वर्षानुवर्षे करत आल्या आहेत. काळ  बदलत गेला अन अनेक सुधारणा दळणवळणात झाल्या. सगळीकडे चित्र पालटले पण पाऊलवाटा आजही आपले मातीचे अस्तित्व टिकवून आहेत ; किंबहुना त्यांचे अस्तित्वच मातीशी अन भूमिपुत्राशी निगडीत असल्याने सहजगत्या पण भक्कमपणे टिकून आहे असे म्हणण्याचा मोह मला आवरत नाही. आजही मला पाऊलवाटावरून चालताना आईवडिलांशी भेटल्याचे अनमोल सुख मिळते, ही या पाऊलवाटांची अनमोल भेट आहे.

- समीरबापू गायकवाड.