Saturday, August 1, 2015

मीना कुमारी रिअल लाईफ ट्रॅजेडी क्वीन.....आपल्या मागे एकाहून एक उत्कृष्ट सिनेमांचा गुलदस्ता ती रसिकांसाठी सोडून गेली. पण अखेरच्या क्षणी ती एकटी पडली होती, तिचा एकांत इतका दुखद ठरला की एका चाहत्याने तिच्या रुग्णालयाचे बिल अदा केले ! बॉलिवूडमध्ये दिलीप कुमारला ट्रॅजेडी किंग म्हणून तर मीना कुमारीला ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखले जाते. मीना कुमारीच्या अभिनयाची एक वेगळीच छाप होती. तिचा अभिनय बघून प्रेक्षकांच्या डोळ्यांत आपोआप अश्रू तरळायचे. गुरुदत्तच्या 'साहिब बीवी और गुलाम' या सिनेमातील 'छोटी बहू' जणू मीना यांच्या खासगी आयुष्यात सामील झाली होती. मीना कुमारी अशी पहिली अभिनेत्री होती की जी आपले दुःख, वेदना अन औदासिन्य मिटविण्यासाठी परपुरुषांबरोबर बसून दारु प्यायची .… धर्मेंद्रने प्रेमात दगा दिल्यानंतर ती दारुच्या आहारी गेली होती. १ ऑगस्ट १९३२ रोजी जन्मलेल्या मीनाने ३१ मार्च १९७२ रोजी या जगाचा निरोप घेतला.……

अल्लड मीना 
मीना कुमारीने बालकलाकाराच्या रुपात बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. तिची आजी (आईची आई) गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या धाकट्या भावाची मुलगी होती. त्यांनी तारुण्यात पदार्पण करताच प्यारेलाल नावाच्या तरुणासह पळून जाऊन लग्न केले होते. विधवा झाल्यानंतर त्यांनी ईसाई धर्माचा स्वीकार केला आणि दोन मुले, एका मुलीसह मुंबईत दाखल झाला. नृत्यात पारंगत असल्यामुळे त्या मुलगी प्रभावतीसह पारसी थिएटरमध्ये सामील झाल्या. प्रभावती यांची भेट थिएटरमध्ये हार्मोनियम वादक असलेल्या मास्टर अली बख्श यांच्यासोबत झाली. त्यांनी प्रभावतीसह निकाह करुन त्यांचे नाव इकबाल बानो असे ठेवले. अली बख्श आणि इकबाल बानो यांना तीन अपत्ये झाली. खुर्शीद, महजबीं बानो (मीना कुमारी) आणि महलका (माधुरी) ही त्यांची नावे.

जागरूक मीना 
अली बख्श मनमौजी स्वभावाचे होते. घरातील मोलकरणीसोबत त्यांचे अफेअर सुरु झाले होते. कुटुंब हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जात होते. त्यामुळे महजबींला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच काम करावे लागले. तिने बालकलाकाराच्या रुपात वीसेक सिनेमांमध्ये अभिनय केला. 'बैजू बावरा' या सिनेमापासून मीना कुमारी या नावाने प्रसिद्ध झालेल्या महजबीने कमाल अमरोहीची जोडीदार म्हणून निवड केली. दोघांनी निकाह केला, मात्र कमाल अमरोही यांचे हे दुसरे लग्न होते. मीना कुमारीला त्यांच्या दुस-या पत्नीचा दर्जा मिळाला. त्यांच्या निकाहमध्ये एकमेव साक्षीदार होते, ते म्हणजे झीनत अमान यांचे वडील अमान. कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांचा संसार दहा वर्षे सुरळीत सुरु होता. मात्र मुलं होत नसल्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. तिच्या आयुष्यात बालपणापासून दुःखाने जे कायम स्वरूपी बस्तान मांडले होते, ते इथे अधिक भक्कम झाले.

मीना - धरम 
साठच्या दशकात आलेल्या 'फुल आणि पत्थर' या सिनेमातील तिचा नायक धर्मेंद्रवर ती एकतर्फी प्रेम करु लागली होती. इंडस्ट्रीत स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारया धर्मेंद्रला बॉलिवूडमध्ये स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणा-या मीना कुमारीची साथ मिळाली. धर्मेंद्रचे करिअर पुढे नेण्यात मीना कुमारीचा मोठा वाटा होता. मीना कुमारीच्या शिफारशीवरुन धर्मेंद्रला अनेक सिनेमांमध्ये काम मिळाले. या दोघांच्या अफेअरच्या बातम्या त्याकाळी अनेक मॅगझिनच्या कव्हरपेजवर रंगल्या होत्या. याचा परिणाम मीना आणि कमाल यांच्या नात्यावरही पडला.

धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे कमाल चांगलेच नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी 'पाकिजा'मधून धर्मेंद्रला बाहेरचा रस्ता दाखवला आणि राजकुमार यांची एन्ट्री सिनेमात झाली, पुढे याच सिनेमामुळे 'जानी' राजकुमारने आपले बॉलीवूड मधले स्थान पक्के केले. त्या दशकात धर्मेंद्रला मीना पासून जास्तीत जास्त रोखण्याचा प्रयत्न कमालनी केला अन नेमक्या याच काळात हेमा इंडस्ट्रीत धरमच्या स्क्रीनजवळ आली…

मीना आणि कमाल अमरोही 
मीना कुमारीचे नाव त्याचवेळी अनेक पुरुषांसोबत जुळले होते. 'बैजू बावरा' या सिनेमाच्यावेळी नायक भारत भूषण यांनी मीना कुमारीकडे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. याशिवाय अभिनेता राजकुमारचेही मीना कुमारीवर प्रेम जडले होते. यात त्या नायकांचा स्वार्थ होता, आपल्या स्ट्रगलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी केलेले हे गॉसीप होते पण याने मीनाच्या आयुष्यातील सुखाची राखरांगोळी झाली. धर्मेंद्र- हेमा यांची जवळीक अन त्याच बरोबर अनेकांशी जोडले गेलेले नाव यामुळे पतीने मांडलेला दावा यामुळे ती उन्मळून पडली होती…

भावोत्कट मीना 
'पाकिजा' हा सिनेमा तयार व्हायला तब्बल सतरा वर्षे लागली. यादरम्यान मीना आणि कमाल विभक्त झाले होते. मात्र पाकिजा हा सिनेमा कमाल अमरोही यांचे मोठे स्वप्न होते, हे मीनाला ठाऊक होते. त्यामुळे तिने आजारी असतानादेखील या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. मात्र तोपर्यंत तिची लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली होती. गुरुदत्तच्या 'साहिब बीवी और गुलाम'मधील छोटी बहू पडद्यावरुन उतरुन मीना यांच्या खासगी आयुष्यात सामील झाली होती. मीना कुमारी अशी पहिली अभिनेत्री होती की जी आपले दुःख, वेदना अन औदासिन्य मिटविण्यासाठी परपुरुषांबरोबर बसून दारु प्यायची . धर्मेंद्रने दिलेला धोका पचवण्यासाठी तिने दारुला जवळ केले होते त्याचे पुढे व्यसनात रुपांतर झाले. ती छोट्या बाटल्यांमध्ये दारु भरुन आपल्या पर्समध्ये ठेवायची . अती दारु पिल्यामुळे नंतर तिला रक्ताचा कर्करोग झाला.दादामुनी या नावाने प्रसिद्ध असलेले बॉलिवूड अभिनेते अशोक कुमारनी मीना कुमारी सोबत बरेच सिनेमे एकत्र केले होते . एका कलाकाराचे असे मृत्युला कवटाळणे त्यांच्या संवेदनाशील मनाला चटका लावणारे होते. अशोक कुमारना होमिओपॅथीचे ज्ञान होते. त्याना राहवले नाही, ते मीना कुमारीच्या उपचारासाठी पुढे आले.

१९५६ मध्ये सुरु झालेले 'पाकिजा' या सिनेमाचे शूटिंग ४ फेब्रुवारी १९७२ रोजी पू्र्ण झाले. पाकिजा सुपरहिट ठरला आणि कमाल अमरोही यांचे नाव बॉलिवूडच्या इतिहासात नेहमीसाठी सामाविष्ट झाले. मात्र पाकिजाच्या रिलीजच्या काही दिवसांतच म्हणजे ३१ मार्च १९७२ रोजी मीना कुमारी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. जणू काही ती या सिनेमासाठीच जगत असावी अशी तिची चटका लावणारी एक्झिट होती… मोठी अभिनेत्री असूनदेखील तिच्याकडे रुग्णालयाचे बील चुकवण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी रुग्णालयातील एका डॉक्टरने मीना कुमारी यांच्या बिलाचे पैसे चुकते केले होते. तो डॉक्टर मीना कुमारीचा मोठा चाहता होता.

सौंदर्यवती मीना 
मीनाचे आयुष्य म्हणजे बॉलीवूडच्या पांढरया पडद्यामागची काळी बाजू होय. तिने स्वतःला दारुच्या नशेत झोकून देऊन केलेली ती एक आत्महत्त्याच होय. एका देखण्या अभिजात सौंदर्याने नटलेल्या प्रतिभावंत अभिनेत्रीचा हा करूण मृत्यू हिंदी चित्रपटसृष्टीतली एक ददंतकथा बनून गेला. पण आजही तिच्या सर्व वयातल्या चाहत्यांनी तिला आपल्या हृदयाच्या एका कप्प्यात हळुवार प्रेमाने जतन करून ठेवले आहे, चित्रपटातल्या ट्रॅजेडी क्वीनचे व्यक्तिगत आयुष्य पराकोटीच्या ट्रॅजेडीने भरलेले असावे हा केव्हढा दैवदुर्विलास !

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार  दिग्दर्शक तिग्मांशु धूलिया, मीनाकुमारीवर बायोपिक सिनेमा बनवत आहेत, हा सिनेमा पत्रकार विनोद मेहतांचे पुस्तक "मीना कुमारी: द क्लासिक बायोग्राफी" यावर आधारित आहे… या सिनेमाची अनेक रसिक अत्यंत आतुरतने वाट बघतील कारण यातला मीनाचा रोल कंगणा रानौत करणार आहे. मीनाकुमारीच्या जन्मदिनानिमित्त केलेली ही शब्दसुमनांची माला तिच्या स्मृतीना अर्पित…

- समीर गायकवाड