Wednesday, July 29, 2015

मुसोलिनी …..


अनियंत्रित राजशाही व फॅसिझम हुकूमशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे एकाच शासनपध्दतीचे दोन पोटभेद अनियंत्रित सत्ता चालविणार्‍या हुकूमशहांचाच हा एक प्रकार. जर्मनींतीलं व इटलींतील फॅसिझम पाहिल्यास असें दिसून येईल कीं, मानवांतील अत्यंत निंद्य व अत्यंत जुलुमी प्रवृत्तींच्या हातीं तेथली सर्व सत्ता देण्यांत आली आहे. त्यां सिंहासनावर आहेत. अर्वाचीन हुकूमशहा हा मानवांतील अत्यंत निंद्य प्रवृत्तींचा प्रतिनिधी होय.

पण अर्वाचीन हुकूमशहा हा नैतिकदृष्ट्या अत्यंत कमी दर्ज्याचा असला तरी त्याच्या ठायीं राजकारणांतील धूर्तता मात्र भरपूर प्रमाणांत असते. राजकारणांत तो हुषार असतो. हिटलर-मुसोलिनीसारखे लोक सत्ताधारी होतात तेव्हां त्यांच्यासमोर  विस्कळित राष्ट्राची एकी करणें,  राजकीय चळवळीसाठीं पैसे पुरविणार्‍या श्रीमंतांचे हितसंबंध संभाळणें व त्यांचा पुरस्कार करणें व  आपल्या हातीं सत्ता ठेवण्याची अपरंपार अभिलाषा (हाच सर्वांत महत्त्वाचा हेतु) असे तीन हेतू असतात. पहिले दोन तिसर्‍याच्या पूर्ततेसाठीं असतात. ज्यांतील प्रत्येक व्यक्ति स्टेटशीं राजनिष्ठ असेल असें संघटित एकजुटीचें इटली राष्ट्र आपण निर्माण करीत असल्याची घोषणा करताना मुसोलिनीच्या डोळ्यांसमोर असलेलें राजकीय तत्त्वज्ञान त्याच्या दृष्टीनें बरोबर व खरेंच असतें. आपल्या फायद्यासाठीं वाटेल तेव्हां हातीं धरतां येण्यासारखी, सार्‍या इटलीची मिळून एकमुठी तलवार तो तयार करूं इच्छी. आपल्या हेतूवर उघड टीका होऊं नये असें वाटत असल्यामुळेंच तो भाषणस्वातंत्र्याची गळचेपी करी. सार्वजनिक मतांची, त्यांमुळें इटलीचें अकल्याण होईल म्हणून नव्हे, तर आपल्या सत्तेला धोका येईल म्हणूनच त्याला भीति वाटे. भांडवलशाही व कामगार यांच्यांत ऐक्य (वस्तुत: तें नाममात्रच असतें) व अविरोध आहेत असें दाखविण्याची खटपट तो करी याचें कारण, देशांत झगडे व लढे असतील तर त्यामुळें स्वत:ची सत्ता संपुष्टांत यावयाची व देशांत उघड गोळीबार सर्वत्र होऊं लागल्यास एकाद्या वेळीं त्यांत आपलेंहि डोकें जखमी व्हावयाचें अशी त्याला भीति वाटे हें होय. मुसोलिनी सर्वांना दडपून टाकून समाजास गुलाम करून ठेवूं इच्छीत असे. कारण, असें केलें तरच त्याला स्वत:ची सत्ता टिकविणें शक्य असे. लोकांना मारूनमुटकून समाधानी ठेवण्याच्या खटाटोपोमुळेंच लोकांच्या तक्रारींकडे तो दुर्लक्ष करी. वर्तमानपत्रांना तो हुकूमशहा व त्यांचें धोरण यांचें नेहमीं समर्थन करण्यास बजावी. हुकूम न पाळणार्‍यांना तो गोळया घालून गप्प बसवीत असे व हें सर्व करून अत्यंत प्रामाणिकपणानें व मोठ्या आढ्यतेनें जगाला सांगे, ''पाहा, इटलींत कसें ऐक्य आहे ! येथें एकहि विरोधी आवाज नाहीं.''


इटलींत एकहि विरोधी आवाज नसणें हें स्वत:च्या सत्तेसाठीं ज्याप्रमाणें त्याला महत्त्वाचें वाटे, त्याचप्रमाणें पुंजीपतींच्या सर्व गरजा भागविणें हेंही त्याला आवश्यक वाटे. कारखानदारांना व बँकवाल्यांना तो आधी स्वेच्छेनें वागण्याचें स्वातंत्र्य देई व मग ते मुसोलिनीला भरपूर पैसे देत असत. त्यांच्याच जोरावर तो सत्ताधीश राहूं शके. मुसोलिनीचे राजकीय खर्च अपरंपार असत. तो हे पैसे कोठून आणीत असें हें समजावयाला इटलींत मुद्रण-स्वातंत्र्य नसल्यामुळें, तेथें वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी असल्यामुळें, मार्ग नाहीं. पण इटलींतील बहुजन-समाज दरिद्री असल्यामुळें मुसोलिनीला हा पैसा कोठून मिळे हें समजण्याला फारशी अक्कल नको. जप्ती व लांचलुचपत या दोन मार्गांनीं तो पैसे उकळी व सत्ता हातीं ठेवी. डाकूगिरी व लांचलुचपत हेच हुकूमशाही शासनपध्दतीचे दान मुख्य आधार. प्रो. रॉबर्ट सी. बु्रक्स आपल्या 'हुकूमशहांपासून सोडवा' या सुंदर व उद्बोधक पुस्तकांत लिहितात, ''मोठ्या मोठ्या प्रमाणावर लांचलुचपत व इतर नष्ट-भ्रष्ट प्रकार रूढ करूं इच्छिणार्‍या सरकारला त्यासाठीं हुकूमशाहीहून अधिक योग्य उपाय सुचविणें कोणत्याहि घटना-विशारदाला अगर सैतानालाहि शक्य नाहीं.''हुकूमशहा सर्व राष्ट्राचेचं एक हत्यार बनवितो, साधन बनवितो. श्रीमंत लोक अशा हुकूमशहाला देत असलेल्या देणग्यांच्या (अगर लांचांच्या म्हणा हवें तर) पैशाच्या जोरावर हुकूमशहा आपल्या हत्याराला धार लावतो, नीट आकार देतो. हुकूमशहा राष्ट्राचें एकीकरण श्रीमंतांपुढें लाळ घोटून करतो, कारण, त्याला स्वत:च्या हातांत सत्ता हवी असते. स्वत:च्या फायद्यासाठीं, केवळ स्वार्थासाठीं, त्याला हें सर्व करावयाचें असतें. आजकालच्या हुकूमशाहीच्या मागें या मुख्य हेतुशिवाय दुसरें कांहींएक नसतें. मुसोलिनीच्या जीवनांची व कारकीर्दीची थोडक्यांत रूपरेषा पाहिल्यास हें स्पष्ट होईल.


मुसोलिनीही हिटलरप्रमाणें अहंकेंद्री होय. सारें जग आपल्या व्यक्तित्वाभोवती फिरत आहे असें त्यालाहि वाटत असे. त्याच्या सर्व जीवनांत पुढें घुसण्याची, मीपणाची, अहंपूजेची वृत्ति दिसून येई. तो कामगार-कुळांत जन्मला. तरुणपणीं तो सामाजिक क्रांति करणार्‍यांच्या पक्षांत होता. लहानशा डबक्यांतला मोठा मासा व्हावेंसें त्याला वाटे. त्यानें आपल्या वर्तुळांत, आपल्या डबक्यांत, जास्तींत जास्त मोठा आवाज करण्याची धडपड केली. त्यानें चर्चवर हल्ला चढविला व स्टेटच्या सनदशीर सत्तेविरुध्दहि बंडाची चिथावणी दिली. जागतिक महायुध्दांत त्याच्या हिंसक वृत्तीला भरपूर क्षेत्र लाभलें. तो युध्दप्रिय पक्षाचा पुढारी झाला. युध्दनंतर अत्याचारानें-हिंसेंनें अधिकच गोष्टी मिळवितां येतील असें त्याला दिसलें, मोठी बक्षिसें मिळवितां येतील असें त्याला वाटलें. त्याची स्वार्थेच्छा अपार होती. १९२२ सालीं त्यानें सैन्यावर ताबा मिळविला व ज्युलियस सीझरप्रमाणें तो रोमवर चाल करून गेला. त्यानें आपण इटलीचें संरक्षक असल्याची घोषणा केली.


इतिहासांत तेच ते नमुने पुन: पुन: दिसतात. मुसोलिनी 'सीझरची छोटी आवृत्ति' वाटतो. सीझरप्रमाणें त्यालाहि वाटत असे कीं, फक्त आपणच जगाला वांचवूं शकूंच्. सीझरप्रमाणेंच आपण मोठे साहित्यसम्राट आहों व जगज्जेते होऊं शकूंच् असें त्याला वाटे. हुकमशहा झाल्यावर मुसोलिनी म्हणाला, ''जग एका कलावंताला मुकले.''  सीझरप्रमाणेंच तो पोरकट व पदोपदीं स्वत:ची जाहिरातबाजी करणारा होता. तो प्रसंगीं आपली लठ्ठ, बुटकी व वांकड्या पायांची मूर्ति लोकांना दाखवीत असे. तो मोठा प्रदर्शनबाज होता. तो अमेरिकन सर्कशींतील उत्कृष्ट विदूषक शोभत. तो भुंकणार्‍याचें सोंग छान करी. डामडौल व आरडाओरडा करण्यांत तो तरबेज होता. त्याची भूमिका नेहमीं उठावाची असे. तो नेहमीं धटिंगणपणा व उद्दामपणा चालूच ठेवी. मिलिटरी परेड करण्याचा त्याला फार नाद असे. जुन्या रोमन नेत्यांप्रमाणें स्वत:चे पराक्रम जगाला जाहीर करण्यासाठीं तो प्रचंड उत्सव-समारंभ योजीत असे. सीझरला 'मी' हें प्रथमपुरुषी सर्वनाम अत्यंत आवडे. तो म्हणे, ''मी आलों, मीं पाहिलें, मीं जिंकिलें !''  या बाबतींतहि मुसोलिनीनें सीझरचें झकास अनुकरण केलें. ''इटलीचा भाग्वविधाता फक्त मीच आहे.'' अशीच त्याची घोषणा असे. तो एकदां म्हणाला, ''मी लोकांना तोलतों, अजमावतों, युध्दांत पुढें ढकलतों, मीच त्यांचा मार्गदर्शक होतों.''  मुसोलिनी जाणूनबुजून सीझरचें अनुकारण करीत असे. पण तें शहाणपणाचें नव्हतें. सीझरचा अंत कसा झाला ही दुर्दैवी घटना इतिहासानें दाखविली असली तरी मुसोलिनी ती विसरून गेला असें दिसतें.

अति महत्त्वाकांक्षी लोक शेवटीं फावतात हें, थोडा वेळ कां होईना, मुसोलिनीच्या लक्षांत आलें, असें १९२९ ते १९३४ या अवधींत वाटत होतें. या चारपांच वर्षांत त्यानें आपल्या स्वभावाला थोडें नियंत्रित ठेवले होतें. त्यानें हुकूमशाही हातीं घेतली तेव्हां तो जरा ऐटींत होता. त्याचीं आरंभींचीं भाषणें गोळ्यांनीं भरलेलीं होतीं, त्यांत 'बुलेट' शब्दाशिवाय एक वाक्यहि आढळणार नाहीं. तो सार्‍या जगाशीं युध्द करावयाला तयार होता. पण मुसोलिनीच्या या अहंमन्यतेमुळें चिडून सारें जग जेव्हां त्याच्याविरुध्द उठलें तेव्हां तो जरा थंड पडला, त्याच्या वाणींत थोडा संयम आला. तो स्वत:च्या राष्ट्रापुरतें पाहूं लागला, आपल्या राष्ट्राची घडी नीट बसवूं लागला. त्यानें कामगार व भांडवलदार यांचे हितसंबंध नवीन पायावर उभारण्याचा यत्न केला. झगडे विसरून सिंह व उंदीर समाधानानें जवळजवळ राहतील, असें त्यानें केलें. कामगारांचा 'संप करण्याचा' हक्क नष्ट करण्यांत आला. आपण 'कॉर्पोरेट स्टेट' स्थापीत असल्याची घोषणा करून त्यानें सर्वत्र सहकार्याचा कारभार सुरू करण्याचें ठरविलें. प्रत्येक धंद्याचें एक कॉर्पोरेशन व्हावयाचें म्हणजे काय ? मालक व कामगार दोघांचेहि हितसंबंध संभाळणार्‍या प्रतिनिधींची एक संमिश्र कमिटी स्थापून तीमार्फत त्या त्या धंद्याचे कॉर्पोरेशन चालावयाचें. पण आतांपर्यंत तरी रशियांतल्या कम्युनिस्ट-स्टेटप्रमाणेंच इटलींतल्या कॉर्पोरेट-स्टेटची कल्पनाहि कागदावरच राहिली आहे. ती अद्यापि विचारांतच आहे, प्रत्यक्षांत आलेली नाहीं. खरें बोलावयाचें तर असें स्टेट प्रत्यक्षांत यावें म्हणून खटपटच केली गेली नाहीं,  योजनाच हातीं घेतली गेली नाहीं, कार्यक्रमच आंखले गेले नाहींत. पण ही कॉर्पोरेट-स्टेट्स् अस्तित्वांत आलीं तरीहि त्यामुळें कामगारांचा प्रश्न सुटेल असें मुळींच नाहीं. कामगारांची दैना तशीच राहणार. उंदीर व सिंह एकत्र नांदतांना दिसतील खरें; पण उंदीर सिंहाच्या पोटांत नांदणार हें उघडच आहे. आणि कामगारांना पुन: संपाची मात्र बंदी ! कामगारांची मजुरी कमी करण्यांत आली असून त्यामुळें एक-तृतीयांश कामगार कायमचे बेकार झाले. राजकीय उठाठेवी करणारा या नात्यानें मुसोलिनी हुषार असेल. पण त्याच्या ठायीं मुत्सद्देगिरी काडीमात्रहि नव्हती. मुत्सद्देगिरीचें इंद्रियच त्याला नव्हतें. पण तो इटलीच्या अंतर्गत कारभारांत व्यंग्र राहिल्यामुळें तात्पुरता एक फायदा तरी झाला. आंतरराष्ट्रीय चावटपणा करावयाला त्याला अवसरच मिळाला नाहीं. कांहीं दिवसपर्यंत जगाला त्याच्या अंगावरचा शांतीचा झगाच दिसला, आंतील लष्करी चिलखत दिसलें नाहीं.


पण इसवी सनाच्या १९२९ व्या सालच्या जुलैच्या अखेरीस त्याला शांति नकोशी झाली असावी. त्याचें शांतीचें वस्तुत: वरपांगी सोंगच होतें. किती दिवस असेंच राहावयाचें असेंच जणूं त्याला वाटत असावें. त्याचे दांत शिवशिवत होते, त्यांचीं नखें फुरफुरत होतीं. शांतीचीं वस्त्रें फेंकून देऊन पुन: संनध्द होऊन जगाला आव्हान द्यावयाला तो उभा राहूं इच्छीत होता. त्याची सत्ता हळूहळू उळमळीत होत होती, इटॅलियन जनता असंतुष्ट होती. कांहीं तरी बदल व्हावा, असें तिला वाटत होतें. तिचें लक्ष वेधण्यासाठीं कोठें तरी युध्द उकरून काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतें. ऍबिसिनियावर त्याची वक्रदृष्टि वळली. इटॅलियन तरुणांना तो इथिओपियन लोकांचीं पापें पढवूं लागला, व्देष-विषाचीं इंजेक्शनें देऊं लागला. प्राचीन काळीं कॅटो जितक्या जंगलीपणानें 'कार्थेज धुळीला मिळविलेंच पाहिजे' असें म्हणे, तितक्याच जंगलीपणानें 'इथिओपिया मातीस मिळविलाच पाहिजे' असें मुसोलिनी ओरडूं लागला.दुसर्‍यांच्या प्राणांची किंमत देऊन स्वत:चें वैभव वाढविण्यास तो उत्सुक असे. त्याचें डोकें थोडे दिवस जरा ठिकाणावर होतें; पण तें पुन: बेताल होऊं लागलें. भरमसाट उद्दाम भाषा व स्वैरे महत्त्वाकांक्षा पुन: वर डोकें काढूं लागल्या. अर्वाचीन इटॉलियनांप्रमाणें तो बोलत नसून तो जणूं अखेरचा, शेवटचा रोमन नमुना दिसूं लागला. शांतिनाथ ख्रिस्ताचें नीतिशास्त्र मुसोलिनीस माहीत नव्हतें. त्या बाबतींत तो अंधळा होता. युध्ददेवाचें-त्या प्राचीन मार्सदेवाचें जुनाट युध्दनीतिशास्त्र त्याला चांगलें समजत असे. तो ओरडून सांगे, ''युध्द म्हणजे न्याय, युध्द म्हणजे उदात्तता व धीरोदात्तता, युध्द म्हणजे बंधुभावात्मक करुणा ! युध्दचा त्रिवार जयजयकार करा !'' शांतीची प्रीति असणार्‍यांची टिंगल करतांना प्राचीन रोमनांनींहि वापरली नसती इतकी अश्लील भाषा तो वापरीत असे. शांततोपासकांना तो ''मूर्खांचा व हत-पतितांचा बाजार'' असें मानत असे. येशू म्हणे, ''शांततोपासकांना पृथ्वीचें राज्य मिळेल, ते पृथ्वीचे वारसदार होतील.''  पण मुसोलिनी अट्टाहासानें सांगे, ''असल्या शांतिब्रह्मांचें पृथ्वीवरून उच्चाटनच केलें पाहिजे.''


मुसोलिनीच्या ठायीं अतिलष्करी मनुष्याची महत्त्वाकांक्षा होती, पण अलौकिक बुध्दि नव्हती. आपण अलेक्झांडर, नेपोलियन, सीझर व्हावें, असें त्याला वाटे. दुसर्‍यांच्या मुंडक्यांशीं खेळ करूं पाहणारी जी मानवप्राण्यांची कोटि आहे तींतील तो होता, पण मानवातली ही जात झपाट्यानें नष्ट होत आहे. जुलुमानें, जुलूम करणारेच शेवटीं नाश पावतात, जुलुमाची ज्वाला जुलूम करणार्‍यांनाच जाळते, त्याच भस्म करते. हिंसेवर आधारलेलें कोणतेंहि सरकार चिरंजीव झालें नाहीं. तेहतीसशें वर्षांपूर्वी परिणत-प्रज्ञ तत्त्वज्ञान्याप्रमाणें, संस्फूर्त सन्ताप्रमाणें, ऍरिस्टॉटल म्हणाला होता, ''जुलूमशाह्या अत्यंत क्षणभंगुर असतात. जुलुमांची राज्यें क्षणजीवी असतात.''…… मुसोलिनी सीझरचीं, तर हिटलर मुसोलिनीची संक्षिप्त आवृत्ति. मुसोलिनींप्रमाणेंच 'आपण अलौकिक पुरूष आहों' असा भ्रमरोग त्यालाहि जडला होता ही समान खासियत दोघात होती …...  आजही देशोदेशीच्या प्रमुखांमध्ये मुसोलिनी जिवंत असल्याचे आढळून येते, आपल्या देशातही मुसोलिनी अजूनही अवतीर्ण आहे का हा प्रश्न थोडासा आत्मचिंतनाचा अन वादाचा आहे…. कारण, मुसोलिनी आता केवळ व्यक्तिविशेष राहिली नसून ती एक प्रवृत्ती झाली आहे. आज २९ जुलै हा या इटालियन हुकुमशहाचा जन्मदिवस, त्या निमित्ताने केलेले त्याचे हे अल्प स्मरण….   


समीर गायकवाड.