Thursday, July 9, 2015

'शोले' ...प्रेमाची अबोल कथा ...

#फ्लॅशबॅक___ .....repost..
पूर्वी ती फार बोलायची , एक अल्लड युवती असताना चेतनेचा उत्फुल्ल झरा होती ती ! कालांतराने ती ठाकूर बलदेवसिंगची धाकटी सून होते. तिचा नवरा घरातला थोडासा लाडका अन खुशालचेंडू असावा असे भासते… एके दिवशी डाकू गब्बरसिंगचे दुःस्वप्न त्यांच्या हवेलीवर पडते त्यात तिच्या मोठ्या दिराची सहकुटुंब हत्या होते, तिच्या नणंदेची, पतीची अन चिमुरडया पुतण्याची देखील हत्या होते… या नंतर गब्बरबरोबरच्या चढाईत तिचा सासरा आपले दोन्ही हात गमावून बसतो. हात गेले तरी हार न मानलेला ठाकूर खचून जात नाही पण मनोमन तो सुडाच्या आगीत जळू लागतो. पुढे आपल्या सुडाग्नीला मूर्त स्वरूप देण्यासाठी तो जय-विरु ह्या चलाख ,धाडसी अशा गुंडांना रामगढ मध्ये पैसे देऊन आणतो ! गब्बरला जिवंत पकडण्यासाठी आलेले हे दोघे पूर्णतः भिन्न स्वभावाचे पण एकदिलाचे मित्र असतात… त्या दोघाना तेथे येऊन काही काळ लोटतो, ते त्यांच्या कामात यशस्वी होतील अशीच त्यांची वाटचाल होत राहते…यथावकाश ते आपली मोहीम फत्ते करतात. शेवटी गब्बरला ठाकूर बलदेवसिंग स्वतः चिरडून टाकतो पण त्यात जयचाही बळी जातो…. या संपूर्ण काळात ती मात्र एक अबोल राहते, अकाली खुडलेल्या कळीसारखे आयुष्य जगत राहते..

प्रेक्षक चित्रपटगृहातून एक अद्वितीय सिनेमा पाहिल्याचे मनस्वी आंतरिक सुख घेऊन बाहेर पडतो…. दिवसामागून दिवस जातात मात्र सिनेमातले एक दृश्य मात्र काळजात रुतून बसते..... कायमचेच !

जणू अजूनही रामगढ मध्ये हे दृश्य तसेच घडत असावे असे वाटत राहते… आजही ठाकूरच्या हवेलीत किरर्र रात्र झाल्यानंतर झोपी जाण्यापूर्वी छोटी बहु हवेलीच्या सज्जामधले दिवे एकेक करून मालवत असेल अन हवेलीच्या समोरील छोट्याशा बैठ्या घराच्या अंगणात कट्ट्यावर बसून जय चोरट्या नजरेने तिच्याकडे बघत माऊथऑर्गन वाजवीत असेल… दोघेही अबोल असतील अन तिथल्या वातावरणातला कण न कण आजही त्यांच्या अव्यक्त प्रेमातल्या अणुरेणूंनी भारला जात असेल…..
'शोले'मधला हा सीन मनाला इतका चटका लावून जातो की आपल्या जीवनातील वेदनादेखील त्यात विरघळल्या जाव्यात !!


- समीर गायकवाड.