Sunday, July 5, 2015

चार्ली चाप्लीन ....चेतना स्फूर्तीचा झरा ...


डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी ह्या अवतारातला चार्ली पाहिला नाही असा माणूस विरळाच.

त्यांच स्वतःच अस वेगळ स्थान प्रत्येकाच्या भूतकाळात आहे हे मला वाटते. अन हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. माझ्या बालपणी तर चार्लीचे सिनेमे म्हणजे एक मोठी मौज असायची. हसून हसून पुरेवाट व्हायची. कृष्ण धवल सिनेमे. फार लांबड नसलेले पण थेट काळजाला भिडणारे, त्याच्या साठी शब्द अन संवाद महत्वाचे नसायचे. त्याची देहबोलीच सर्व काही बोलून जायची.त्याच्या विनोदाला असणारी कारुण्याची झाक लहानपणी सुद्धा अस्वस्थ करायची.
त्याच्या कोणत्याही सिनेमातली नुसती एक फोटो इमेज जरी आपण पाहिली तरी अख्खा सिनेमा डोळ्यापुढे तरळून जातो हे त्याच्या सिनेमाचे अद्भुत यश. त्याचे सिनेमे मला तर कधी मूकपट वाटले नाहीत ते घडाघडा बोलायचे.
मॉडर्न टाईम्स, द ग्रेट डिक्टेटर, द किड, द गोल्ड रश, द सिटी लाईटस, द सर्कस, लाईमलाईट,द ट्रम्प, अ डॉग्ज लाईफ, लाफिंग गेंस, अ वुमन ऑफ पेरीस हे त्याचे सर्व जगभर गाजलेले सिनेमे.

बालपणीच्या आठवणीच्या रम्य ठेव्यातून चाली अजूनही जिवंत आहे. आज त्याचा जन्मदिवस आहे ....
तुमच्या आमच्या सर्वांमध्ये एक खोडकर लहान मुल असतेच अन त्याच्यावर कधी न कधी या अभिजात अनोख्या शैलीच्या ढंगदार अभिनयाच्या चार्लीची झाक असते..हाच आपल्यातला चार्ली. आपल्या सर्वांचा बालपणीचा एक कॉमन मित्र म्हणजे चार्ली. निर्भेळ अन सच्चा विनोद म्हणजे चार्ली. सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा त्याला पाहून आपले दुःख काही काळाकरीता तरी विसरतो अन अगदी टाळ्या पिटून पिटून त्याच्या बावळ्या रूपावर हसतो तो चार्ली.
हा चार्ली असाच तुमच्या आमच्या सर्वामध्ये जिता रहावा अन 'प्रौढत्वी निज शैशवास जपणे' हे ज्याच्यामुळे सदैव शक्य झाले तो हा चेतनेचा अन स्फूर्तीचा झरा कधी न आटावा ही त्याच्या जन्मदिनी आपल्या सर्वातल्या बालमनाला शुभेच्छा....

- समीर गायकवाड.