Sunday, July 5, 2015

एका जिद्दी देशाची कहाणी - व्हिएतनाम ... .जगाच्या पाठीवरील एका अशा देशाची कहाणी की ज्या देशाला पारतंत्र्यात राहावे लागले, स्वातंत्र्य मिळाले पण फाळणी झाली. पुन्हा एकीकरण झाले अन पूर्ण अखंड स्वातंत्र्य बहाल झाले, त्यानंतर त्यांच्यावर जगातील सर्वशक्तिमान देशाने अमेरिकेने हल्ला केला अन या चिमुकल्या देशाने मुजोर अमेरिकेला लोटांगण घालायला लावले ! आजच्या घडीला चीनी ड्रॅगनशी टक्कर देणारया या प्रेरणादायी राष्ट्राची अनोखी गाथा वाचाच....

सध्याच्या चीन व्हिएतनाम संघर्षाकडे पाहण्याआधी या देशाच्या इतिहासाकडे एक नजर टाकावी लागेल मग यातले बारकावे ध्यानी येतील. त्याच बरोबर अमेरिकच्या कच्छपी लागलेल्या आपल्या काही लोकांसाठी व्हिएतनामचा जाज्वल्य इतिहास एक चांगला धडा ठरावा. या देशाची शतकानुशतकाची लढवय्येगिरी आणि आताची प्रगती ह्या सर्वच गोष्टी आपल्यासाठी जहाल अंजनाचे काम करतील. अमेरिकचे आपल्या बाबतचे धोरण नेहमीच दुटप्पीपणाचे राहिले आहे अन पाकिस्तानबाबत त्यांचे नेहमी तळ्यात मळ्यात चाललेले असते. तर दुसरीकडे चीनने पाकसाठी शस्त्रे आणी संशोधनाची दारे आणखी मोठी केली आहेत. अमेरिका आणि चीन यांचे धोरण परस्परासाठी पूरक जरी नसले घातकही नसते हा देखील एक लक्षणीय मुद्दा आहे. अमेरिकेला आपली सुपरपॉवर गमवायची नाही अन चीनला त्यांच्या सुपरपॉवरच्या दावेदारीत दुसरा अडथळा नकोय हे सर्वज्ञात आहे. अशा वेळेस सर्वात उत्तम मार्ग म्हणजे स्वतःची शक्ती वाढवणे अन परावलंबित्व संपवून टाकणे, अन नंतर मग मोजून मोजून एकेकाला धडा शिकवणे. हे काम लहानग्या व्हिएतनामला जमले ते आपल्याला का जमू नये ?


४४ वर्षांपुर्वी २ जुलै १९७६ च्या दिवशी या देशाच्या एकीकरणावर आणि स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वीच्या व्हियेतनामला २ सप्टेबर १९४५ ला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले होते. ३० एप्रिल १९७५ ला सायगांव पडले आणि देश अस्थिरतेच्या खाईत लोटला गेला होता. मात्र याच देशाने पुढे अमेरिकेला गुडघे टेकायला लावले होते !!

अत्यंत हलाखीचा कालखंड पाहिलेल्या या देशात आता जरी साम्यवादी राजवट असली तरी आताचे या देशाचे दरडोई वार्षिक उत्पन्न सुमारे वीस हजार युएस डॉलर्स इतके आहे. आपल्याला शेजारयाला धडा शिकवण्यासाठी देखील अमेरिकेची परवानगी लागते अन अमेरिका मात्र जगभरात कुठेही घुसून माणसे मारते. आपण स्वतंत्र झालो तरी आपली गुलामगिरीची मानसिकता काही जात नाही.
व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील देश.व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे सर्वात मोठे शहर आहे,आपल्याकडच्या दिल्ली राजधानी अन मुंबई मुख्य शहर या सुत्रासारखेच ही शहरे.

इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये व्हियेतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हियेतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हियेतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हियेतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हियेत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हियेतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.

सुरुवातीचा बराच काळ पारतंत्र्यात असलेला हा देश इ स ९३८ मध्ये बाक डाँग नदीवरील युद्धात चीनचा निर्णायक पराभव करून हा देश स्वतंत्र झाला. नंतर त्यावर अनेक व्हिएतनामी सम्राटांनी आता या देशाच्या ताब्यात आहे त्यापेक्षा अधिक प्रदेश काबीज करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. त्यानंतर युरोपियन सत्तांचा त्या भागांत शिरकाव होवून तो फ्रेंच वसाहतीत सामील झाला. दुसर्‍या महायुद्धाच्या (इ स १९४० च्या) जवळपास काही काळ तेथे जपानी साम्राज्यही पसरले होते. व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी फ्रेंचांना उत्तर व्हिएतनाममधून बाहेर काढले आणि त्या देशाची उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. मात्र पुढेही हे युद्ध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिले आणि प्रथम फ्रेंच व नंतर १९७३ मध्ये अमेरिकेला दक्षिणेतून काढता पाय घ्यायला लावून उत्तरेतल्या कम्युनिस्टांनी सर्व देश एकसंध केला.

जीनिव्हा परिषदेत ठरल्याप्रमाणे व्हिएतनाम एकीकरणासाठी जनमत घेण्याचे दिएम हा दक्षिण व्हिएतनामचा पंतप्रधान टाळाटाळ करू लागला व अमेरिकेनेही त्याला निवडणुका रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे हो चि मिन्हने दक्षिण व्हिएतनाममधील क्रांतिकारकांच्या गनिमी कारवाया अधिक तीव्र केल्या. इकडे उत्तर व्हिएतनाममध्ये लालचीन व सोव्हिएत युनियन या दोघांकडून लष्करी मदतीचा ओघ सुरू झाला. त्यामुळे यापुढे व्हिएतनाम युद्ध हे उत्तर व दक्षिण व्हिएतनाममधील युद्ध न राहता कम्युनिस्ट राष्ट्रे विरुद्ध भांडवलशाही राष्ट्रे असे त्याला स्वरूप आले. दिएमच्या भ्रष्टाचारी राजवटीमुळे दक्षिण व्हिएतनाममध्ये आधीच असंतोष होता. हो चि मिन्हने दिएम राजवटीबद्दल आणखी अपप्रचार करून आपले राष्ट्रीय मुक्ती आघाडी व व्हिएतकांगी सैनिक सायगावमध्ये पाठविले.

अध्यक्ष केनेडी यांनी १९६२ साली प्रथम ४००० अमेरिकन सैन्य सायगावला पाठविले व नंतर अमेरिकेतून सैनिकी फौजा पाठविण्याचा ओघ सुरू झाला. पंतप्रधान दिएम याने दक्षिण व्हिएतनाममध्ये बौद्ध भिक्कूंचे मोठय़ा प्रमाणात शिरकाण केल्याने सायगावमधील परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यातून दिएमचा खून झाला. त्याच दरम्यान अध्यक्ष जॉन केनेडी यांचाही खून होऊन जॉन्सन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. जॉन्सन यांनीही वाटाघाटींचा घोळ चालू ठेवला. १९६९ साली निक्सन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. अमेरिकेचे नूतन सेक्रेटरी ऑफ स्टेट हेन्री किसिंजर यांची नुकतीच नेमणूक झाली होती. अखेर पॅरिसमध्ये २७ जानेवारी १९७३ रोजी युद्धबंदी व शांतता करारावर उत्तर व दक्षिण व्हिएतनामच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री विल्यम रॉजर्स यांच्या सह्य़ा झाल्या. या करारात ठरल्याप्रमाणे व्हिएतनामचे स्वातंत्र्य व दोन्ही भागांचे एकत्रीकरण केले गेले.

१९७८ मध्ये शेजारी कंबोडियाने व्हिएतनामच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामने चिनी पाठिंबा असलेल्या कंबोडियाच्या ख्मेर रूज या जुलुमी राजवटीवर हल्ला करून तिचा पाडाव केला आणि कंबोडियाच्या पूर्वीच्या राजाला सत्तेवर आणले. असे वरवर दिसत असले तरी व्हिएतनामला सोविएत युनियनचा पाठिंबा होता आणि ख्मेर रुजला चीनचा; त्यामुळे हे युद्ध सोव्हिएत युनियन व चीन मधले छुपे युद्ध मानले जाते. व्हिएतनामवर दबाव टाकण्यासाठी चीनने व्हिएत-चीन सरहद्दीवर युद्ध छेडले आणि व्हिएतनामचा काही भागही व्यापला. मात्र चिवट व्हिएतनामने तेथे प्रतिकार तर केलाच पण कंबोडियावरची आपली पकडही कमी केली नाही. यासाठी त्यांना सोव्हिएत युनियनचा उघड पाठिंबा आणि सैन्य मदतही मिळाली. शेवटी चीनने आपले सैन्य व्हिएतनामच्या व्यापलेल्या भूमीतून मागे घेतले. मात्र व्हिएतनामी सैन्य कंबोडियात पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत पुढची दोन वर्षे तेथेच तळ ठोकून होते.पुढे सारे काही स्थिरस्थावर झाल्यावर मात्र व्हियेतनामचा विकास अन प्रगतीचा स्वावलंबी वारू चौखूर उधळला आहे तो आजतागायत वेगात आहे. व्हिएतनामच्या युद्धात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील स्त्री पुरुष सामील झाले होते. विशेष बाब म्हणजे त्यांनी स्वीकारलेली गुरिल्ला युद्ध नीती शिवछत्रपतींच्या गनिमी काव्यापासून प्रेरित होती.

चीन आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये सुरू असलेल्या चकमकींमुळे गेले काही दिवस या देशांमधलं वातावरण तापलेलं आहे. वरवर दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनचे तेलविहिरी खोदण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आणि हा भाग आपला असल्याची व्हिएतनामची भावना असल्यामुळे त्यांत तणाव निर्माण झाला असल्याचं चित्र दिसत असलं, तरी हा प्रश्न तितकासा सोपा नाही. चीन आणि व्हिएतनाम यांच्यामधले संबंध पूर्वीपासूनच तणावपूर्ण आहेत आणि सध्याच्या घडामोडी या संबंधांमधलं पुढचं पाऊल आहे, हे नक्की. व्हिएतनाम हाच आग्नेय आशियामध्ये चीनच्या सगळ्यात जवळ असलेला देश आहे. चीनच्या साम्राज्यवादी आणि विस्तारवादी महत्त्वाकांक्षी हालचालींवर सगळ्यात बारकाईनं लक्ष ठेवणारा देशही व्हिएतनाम हाच आहे.

खरं म्हणजे चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांमध्ये साम्यवादी समाजव्यवस्था आहे. त्या अर्थानं दोघांचा वेगवेगळ्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा एकसारखा आहे. असं असूनही चीननं कित्येक शतकांपासून आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी केलेल्या कृतींकडे व्हिएतनाम संशयाच्या नजरेनं बघत आलेला आहे. जवळपास एक हजार वर्षं चीनचंच व्हिएतनामवर वर्चस्व असल्यामुळे व्हिएतनाममध्ये चीनचा खूप पगडा आहे. त्यातच ज्या व्हिएतनामशी युद्ध छेडून अमेरिकेनं आपलं हसं करून घेतलं, त्याच अमेरिकेच्या रिचर्ड निक्सन या राष्ट्रपतीनं १९७२मध्ये चीनचा दौरा केल्याबरोबर चीन आणि अमेरिका या दोघांविषयीचा व्हिएतनामच्या मनातला संशय आणखीनच बळावला. १९७०च्या दशकात माओ झेडाँग यांचं निधन होणं आणि चीनमध्ये सत्तापालट होणं, या घडामोडींमुळे व्हिएतमानशी चीनच्या सुरू असलेल्या अघोषित युद्धाकडे कुणाचं फारसं लक्ष गेलं नाही.

१९७८मध्ये व्हिएतनामनं सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखाली असलेल्या आर्थिक समझोत्यांसाठीच्या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं. तशीच एकूणच सोव्हिएत संघाशी आपण सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करीत असल्याची घोषणा केली. त्यामुळे चीन भडकला. व्हिएतनामचं वर्णन पूर्वेकडचा क्यूबाअशा शब्दांमध्ये चीननं केलं. यापाठोपाठ चीन आणि व्हिएतनाम या देशांमधल्या सीमारेषांपाशी चकमकी वाढायला लागल्या. १९७९च्या फेब्रुवारी महिन्यात चीननं व्हिएतनामवर हल्ला करून आपण व्हिएतनामच्या हरकतींना प्रत्युत्तर देत असल्याचं जाहीर केलं. चिनी सैनिकांनी व्हिएतनाममध्ये आठ किलोमीटरपर्यंत चढाई केली. त्यानंतर व्हिएतनामच्या चिवट प्रतिकारामुळे चीनला फार काही करणं शक्य झालं नाही. आणखी काही कारवायांनंतर चीननं व्हिएतनामला पुरेसं धमकावलं असल्याची जाणीव करून दिल्याचं जाहीर केलं आणि हे युद्ध संपवलं. प्रत्यक्षात मात्र चीनची ही मोहीम पुरती फसली असल्याचं चित्र निर्माण झालं. अर्धवट माहिती, अपुरा शस्त्रसाठा तसंच इतर सामुग्री अशा अनेक अडचणींमुळे चीनची या युद्धात बर्‍यापैकी मानहानीच झाली. या युद्धानंतर चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांनी आपापल्या सीमारेषांवरच्या लष्करी तयारीत आणखी वाढ केली. सोव्हिएत संघानंही व्हिएतनामला लष्करी मदत केली.

१९८०च्या दशकापासून चीननं व्हिएतनामवर लपूनछपून हल्ले करणं आणि व्हिएतनामी सैनिकांना गाफील ठेवून घुसखोरी करणं, असे प्रकार सुरू केले. हे हल्ले प्रामुख्याने सागरी मार्गांद्वारे होत. व्हिएतनामी लष्करापुरतेच हे हल्ले र्मयादित नसत, तर व्हिएतनामी उद्योग, नैसर्गिक संपदा यांवरही होत. असं असूनही वरवर मात्र चीन आणि व्हिएतनाम हे राजकीय तसंच आर्थिक बाबतींमध्ये परस्परसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं भासवायचे. आता मात्र दक्षिण चिनी समुद्रामधल्या वादविवादांमुळे हे संबंध कटू असल्याचं नव्यानं दिसून आलं आहे.

पॅरॅसेल्स आणि स्प्रॅटलिस अशा दोन बेटांना दक्षिण चिनी समुद्रानं वेढलेलं आहे. या बेटांभोवती चीन, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, फिलिपीन्स अशा अनेक देशांच्या सागरी सीमा आहेत. साहजिकच, या बेटांवर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी हे सगळे देश उत्सुक आहेत. त्यांपैकी चीन आपला वाटा सगळ्यात मोठा असल्याचं आणि त्याला तब्बल २,000 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगतो. १९४७मध्ये चीननं प्रसिद्ध केलेल्या एका नकाशात तर या सगळ्याच भागावर आपला हक्क असल्याचा दावा केला होता. व्हिएतनाम मात्र चीनचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावतो. तसंच सतराव्या दशकापासून आपलंच या भूभागावर नियंत्रण असल्याचं मत मांडतो. यासंबंधी आपल्याकडे कागदपत्रं असल्याचंही व्हिएतनामचं म्हणणं आहे. याउलट, आपण या बेटांच्या सगळ्यात जवळ असल्यामुळे खरं म्हणजे आपलाच या बेटांवर मालकी हक्क आहे, असं फिलिपीन्सला वाटतं. या बेटांनजीकच्या भागात भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, असा अंदाज व्यक्त केला जात असल्यामुळे इतक्या देशांचा त्यावर दावा आहे. अजून याविषयीची खात्रीलायक माहिती उपलब्ध नसण्याचं मुख्य कारण म्हणजे या वादविवादांमुळेच तिथल्या साधनसंपत्तीचा अभ्यास आजपर्यंत करता आलेला नाही. याखेरीज, मासेमारी आणि जलमार्ग या कारणांमुळेही या भागांना खूप महत्त्व आहे.

0१२च्या मे महिन्यात व्हिएतनामनं या भागात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केल्यावर चीननं हल्ले करून ते हाणून पाडले, असं मानलं जातं. तसंच, दक्षिण चिनी समुद्र हा चीनचाच भाग असल्याचं दाखवल्या जाणार्‍या वादग्रस्त पासपोर्टवर शिक्के मारायलाही व्हिएतनाम सातत्यानं नकार देत आला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये चीननं पॅरॅसेलच्या बेटानजीक तेलविहिरींचा शोध घेण्यासाठीची मोहीम हाती घेतल्यामुळे व्हिएतनाम भडकला. चीन आपल्या मालकीच्या सागरी भागात घुसखोरी करून आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करीत असल्याचा व्हिएतनामचा दावा आहे. १९८२मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं संमत केलेल्या ठरावानुसार हा भाग व्हिएतनामच्या मालकीच्या खास आर्थिक क्षेत्राच्या सीमेनुसार व्हिएतनामी किनार्‍यापासून २०० मैल अंतरावर आहे. याला चीन अजिबात भीक घालत नाही. चीन आपल्या नकाशानुसार पुढे गेला आहे आणि म्हणूनच हा वादग्रस्त भाग आपल्याच मालकीचा आहे, असा चीनचा दावा आहे.

चीनच्या या तथाकथित घुसखोरीमुळे व्हिएतनाममध्ये असंतोष भडकला. हो चि मिन शहरामध्ये सुरुवातीला २००००लोकांनी एक शांतता मोर्चा काढला; पण लवकरच काही दंगेखोरांनी परदेशी मालकीच्या कंपन्यांच्या कारखान्यांवर हल्ले सुरू केले. अर्थातच, हे हल्ले चीनच्या घुसखोरीचा बदला घेण्यासाठीचं प्रतीक ठरलं. व्हिएतनामपुढची अडचण म्हणजे त्याचे अमेरिकेशी लष्करी सार्मथ्याच्या दृष्टीनं चांगले संबंध नाहीत आणि उलट साम्यवादी चीनकडे व्हिएतनामी सरकारमधला एक भाग लष्करी बाबतींमध्ये मैत्रीपूर्ण नजरेनं बघतो. म्हणूनच या वादग्रस्त भागामध्ये रक्षणासाठी म्हणून फिरत असलेल्या व्हिएतनामी नौदलाच्या बोटींवर चिनी नौदलानं पाण्याचे मोठे फवारे मारून त्यांना माघार घ्यायला लावल्याचं दृश्य सगळीकडे प्रसिद्ध झालं. त्याबरोबर आपल्या दुबळेपणामुळे अस्वस्थ झालेली व्हिएतनामी जनता पेटून उठली.

एकीकडे आक्रमक चीनची वक्रदृष्टी, तर दुसरीकडे भडकलेली जनता, अशा कात्रीत व्हिएतनाम सापडला आहे. मात्र यातूनही हा देश योग्य मार्ग काढून चीनी ड्रॅगनपुढे नमते घेण्याची नामुष्की कधी स्वीकारणार नाही...

- समीर गायकवाड.

(संदर्भ  - 'वक्रदृष्टी ड्रॅगनची' - अतुल कहाते)