Sunday, July 5, 2015

सांजवेळ ....


 

आयुष्याच्या एका वळणावर जेंव्हा गात्रे शिथिल होतात आणि जीवनाचा जोडीदार आपल्याला मागे टाकून अनंताच्या प्रवासाला एकटाच निघून गेलेला असतो तेंव्हा होणाऱ्या आभास जीवघेणे असतात. रात्रंदिन भास होतात, स्वप्ने पडू लागतात. आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांना अर्थ असतो की नाही माहिती नाही पण आपल्यावर निस्सीम प्रेम करणारी आपली माणसं कधीकधी स्वप्नातून आपल्याशी हितगुज करतात हेही खरे. त्याचा प्रत्यय देणारी माणसे गावाकडच्या मातीत अजूनही दिसतात. असाच एक माणूस मी पाहिलेला, रंगुबाप्पा त्याचं नाव....

पूर्वेला काळसर तांबडे असताना गावकुसाच्या वेशीजवळील देवळात लगबग ऐन रंगात आलेली असायची. जुनेच पण स्वच्छ धुतलेले पिवळट पांढरे धोतर सदरे नेसलेले काही पोक्त टाळकरी तर काही तरणी पोरे पखवाजाच्या आवाजावर दंग व्हायचे. सभामंडपात टाळ गर्जत असायचे, रुक्मिणीच्या साक्षीने गाभारयात उभा असलेला विठ्ठल प्रसन्न चित्ताने हसत असे. हळूहळू भजन रंगत जाई, गाणारया टाळकऱ्यांचा आवाज आस्ते कदम टिपेला जाई. त्या आवाजात पाण्याच्या आडावर होणारी नवविवाहित महिलांची कुजुबुज, दूर कुठे तरी मोटेवर दिली जाणारी ललकार, नुकतेच जागे झालेल्या पाखरांचा चिवचिवाट असा सगळा गावगाड्याचा आवाज हलकेच मिसळून जाई.....

घराघरातल्या दारासमोर सडे पडायला सुरु होत. चुलीमध्ये हलका आर पेटवला जायचा, एकीकडे फुकारीतून फुकत फुकतच चुलीवर मातीने सारवलेल्या भांड्यात पाणी चढवले जायचे तर दुसरीकडे बंबात सरपण घालून पेटवले जायचे. शेतशिवारे आणि बैलगोठेही हळुवार जागे होऊ लागलेले. एका अंगावर कलायला झालेल्या गोठ्यातील तांबडी करडी गाय वासराला चाटू लागे. शेतातल्या समाधीवर विहिरीतले दोन तांबे थंड पाणी चढवून चाफ्याची सोनफुले काका ठेवत. वस्तीवरच्या लेकुरवाळ्या बायका तान्हुल्याना उराशी धरून हळूच बाजूला करून पदर खोचून पुढच्या तयारीला लागत......

इकडे मंदीरात बरीच वर्दळ वाढलेली असे. कराकरा आवाज करणारया पायताणाला पायरीपासून बऱ्याच अंतरावर ठेवून सगळेजण हळूहळू आतल्या ओसरीवर भावमग्न होत. कापूर आरतीची वाट बघू लागत. यथासांग गुरव आरती सुरु करायचा. मनोभावे आरती होई. सर्वांचं पांडूरंगाच्या पाया पडून होई. चिरमुरे फुटाण्याचा प्रसाद वाटून होई. देवळातून निघताना टाळकरी वीणेवाल्याच्या पाया पडत. हे सर्व सोपस्कार दुरून पाहणारे, कंबरेत वाकलेले रंगुबाप्पा नंतर मात्र थेट गाभाऱ्यात जाऊन थरथरत्या हाताने विठू रुक्माईशी दबक्या आवाजात काही तरी हितगुज करून बाहेर येत, बाहेर येताना त्यांचे डोळे किंचित पाणवलेले असत......

स्वच्छ गणवेश घालून शाळेकडे निघालेल्या पोरांच्या आवाजाचा गलका अन शिवाराकडे चालेल्या गाडीवानांनी बैलांना मारलेल्या लडिवाळ हाका यांकडे कानाडोळा करत रंगुबाप्पा मंदिराच्या पायरयाशी बसून येणारया जाणारयाचा कानोसा घेत तासंतास तिथेच थांबतहळूहळू सूर्यनारायण पुढे जाऊ लागे आणि रंगुबाप्पा येणाऱ्या जाणाऱ्याकडे निरखत बघत राहत.
दुपार येतानाच किंचित आळस घेऊन यायची, गावतल्या पारावर रिकामटेकडी माणसे गप्पा मारत बसलेली असत. रंगुबाप्पा जेवण उरकून मंदिराच्या बाहेरील लिंबाच्या झाडाखाली येऊन थोडेसे मरगळल्यागत बसलेले असत. पाखरांची चिवचिव देखील आता जरा शांत होई. झाडाखाली बसल्या बसल्या त्यांची नजर वरुन गिरक्या खात रमत गमत येणारया पिवळ्या पानांकडे असे. शून्यात गेलेल्या नजरेने ते पानगळीचे झुले बघत राहत...….

दबल्या पावलाने हळू हळू सांज दाखल होई. सांज येताना गुरे,पाखरे अन घरधन्याला गावात माघारी घेऊन येत. तांबूसलेल्या सूर्यकिरणावर धुळीचे कण अलगद तरंगत फिरत फिरत खाली येत...
शेतातून येऊन आपल्या घराकडे निघालेल्या गजूआण्णानं लांबून हाळी दिल्याबरोबर रंगूबाप्पा सावध होत, चेहरा किंचित फुलत असे अन ते त्याच्या बैलगाडीत अलगद बसत. लालबुंद तरणाबांड गजू हा बाप्पांचा नातू. देवळात बसलेल्या बाप्पाला घरी नेण्यासाठीच तो तिथं यायचा. अंधारून येऊ लागल्याने त्याना केंव्हा एकदा घरी नेईन असे त्याला वाटे.....

घरी आल्याबरोबर आधी हातपाय ओले झाल्यावर कधी मधी तलफ असली की आल्याचा गरम वाफाळता चहा नाहीतर थंडगार पन्हं व्हायचं. बाहेर अंधार वाढत जाई. चुलीवरच्या पातेल्यातले चवदार जेवण ताटात यायचे. मस्त चविष्ट जेवण होई. अंगणातल्या बाजेवर बाप्पा अंग टाकत. आकाशातल्या चांदण्यांशी मनातल्या मनात बोलू लागत. दिवसभर उदास चेहऱ्याने बसून असलेले रंगुबाप्पा बघता बघता ते हळूच झोपेच्या स्वाधीन होत....

रोज त्यांच्या स्वप्नात गावातलं देऊळ येई, विठू रुक्माईही येत, तसेच त्या रात्रीही झाले. पण त्या रात्रीच्या स्वप्नात शेवंताही आली. बाप्पाची कारभारीण ! तिने त्यांना दोन गुजगोष्टी सांगितल्या. त्यांचे अन तिचेही मन हलके केले. तिच्या आवाजाच्या भासाने ते टक्क जागे झाले. उठून तडक रानात गेले, विहिरीतल्या गार पाण्यात पोहून थेट देवळात आले. वीणेकरी येण्याआधी विठूपुढे हजर झाले. मात्र त्या दिवसानंतर त्यांचा चेहरा नेहमीच हसरा राहिला. ते सदैव लोकांच्या सुख दुःखात सामील होऊ लागले. शेवंताने त्यांना असे काय सांगितले होते कोण जाणे, पण त्या दिवसानंतर ते बदलून गेले होते .... मला कोडे असायचे की असं काय झालं अन त्यांचं वागणं बदलून गेलं ? याचे उत्तर त्यांना पडलेल्या स्वप्नात होतं...

फार वर्षांपूर्वी बाप्पांची चार पोरे,चार सुन, मालकीण अन ६ नातवंडे लग्नाच्या वऱ्हाडाच्या अपघातात गेली होती, लहानगा गजू तेंव्हा मावशीकडे असल्याने वाचला होता. तो धक्का त्यांनी मोठ्या कष्टाने अन नेटाने पचवला होता चिरेबंदी वाड्यात त्याला तळ हाताच्या फोडागत त्यांनी वाढवला होता. पण त्या दिवसा नंतर त्यांच्या चेहऱयावर मनमोकळे हसू कधीच दिसले नव्हते. ते जगणे मनापासूनचे नव्हते. त्या रात्रीच्या स्वप्नात येऊन शेवंताने त्यांना सांगितले होते की, "देवळात उधळल्या जाणारया अबीर बुक्क्याच्या गुलालाच्या प्रत्येक कणात मी आहे. उदबत्तीच्या सुगंधात अन चिरमुरे बात्ताशाच्या गोडीत मी आहे. गोठ्यातल्या करड्या गाईच्या मायेत मी आहे. मी सर्वत्र आहे, माझ्याबरोबर पोरे सुना नातवंडे आहेत. पांडुरंग थांबवतो तोवर तुम्ही थांबा. जग रहाटीचे बघा. माझा शोध घेऊ नका मी तुमच्यातच आहे. उदास राहत जाऊ नका. चित्त प्रसन्न ठेवा. माझ्या पाठी देवाने तुम्हाला थांबवलंय त्यात देवाचा काहीतरी विचारपाचार असंल की नाही ? माझी तुमची भेट होणार हायेच की ? पर त्यासाठी जीव बारीक करून का जगतासा ? गजूवर मायेचा हात असाच ठेवा. तब्येतीची काळजी घ्या.जेंव्हा तो सांगावा धाडंल तेंव्हा यायचेच आहे तेंव्हा हसतमुखाने माझ्याकडे आलं पाहिजे !! "....
शेवंताने स्वप्नात येऊन जे काही सांगितले ते बरेच दिवस रंगूबाप्पांनी हृदयाच्या कप्प्यात दडवून ठेवले होते पण आपल्या शेवटच्या दिवसात त्यांनी ते सर्वांना सांगितले होते. मग त्यांच्या वागण्यातील बदल का झाला हे सर्वांना उमजले होते. अखेरच्या श्वासात त्यांनी आपल्या पाठीमागे गजूची अन पोराबाळाची काळजी घ्यायचं आर्जव त्यांनी नातसूनेकडे केलं होतं....

वर्षामागून वर्षे लोटलीत ... रंगूबाप्पांच्या पडक्या वाड्यापुढून जाताना आजदेखील काही क्षण पाउले थांबतात, त्यांची आठवण येते... तेंव्हा मोबाईल,कॉम्प्यूटर,टीव्ही,लाईट,रस्ते यातले गावात काहीच नव्हते पण सर्वत्र समाधान चौफेर नांदत होते. आताचे माहिती नाही पण तेंव्हाची तृप्तीच निराळी होती...

गावात आल्यावर रंगू बाप्पांच्या आठवणीने आजही मन हळवे होते, अन त्यांच्या आठवणींच्या तरंगात गुंतले जाऊन नकळत चालत चालत मी पांडुरंगाच्या देवळाेंसमोर केंव्हा येऊन उभा राहतो मलाच कळत नाही, त्या सांजवेळा मंतरलेल्या होत्या हेच खरे ..

- समीर गायकवाड.