Sunday, July 5, 2015

मायेची गोधडी ...."गरजच काय होती ? माझ्या कपड्यांना हात लावायची ?" कान्हू मावशी मोठ्याने त्यांच्या सुनेला विचारत होत्या. रविवार दुपारची रणरणत्या उन्हातली दुपारी ३-४ ची वेळ होती. आधीच आभाळ अन सुर्यनारायण लपछपी खेळून हैराण करत होते.उष्म्याने जीवाची काहिली होत होती. चोरपावलाने आलेल्या डुलकीने डोळ्यांवर केलेला कब्जा त्यांच्या या चढ्या आवाजातील सवालाने मोडीत काढला.

त्यांच्या घरात काय झाले असावे याचे मला काही कारण नव्हते तरीही मी अंदाज घेऊ लागलो.
'अग मला विचारायचे तरी! काय केलस गंsssss तू हे ?'
आवाज येतच होता. काहीतरी चुकीचे घडले असावे असे वाटले.
खरे तर मी त्यांच्याकडे कान देणे नीतीला धरून नव्हते.
पण आवाजच एव्हढा मोठा होता कि कुतूहल तान्ह्या बाळासारखे आओपाप जागे झाले.
"घरात काय कमी पडले तुला ? फार मोठी चूक केलीस तू ! कधी कळणार गं तुला ? आता मी कुठे शोधू गं ?" असे म्हणून कान्हूमावशी ओक्साबोक्शी रडू लागल्या.
त्यांची सून कार्तिकी बारीक आवाजात काही तरी उत्तरली पण ऐकू आले नाही.
"आता एक अक्षर बोलू नकोस. मला पुढचे काय ते सांग ! " मावशींचा खडा आवाज परत कानी पडला.

मामला काही तरी गंभीर असावा हे ओळखून सविताला, माझ्या पत्नीला त्यांच्या घरी पाठवले. त्यांच्या घरी जाण्यासाठी तिने आधी आढेवेढे घेतले पण मावशींचा रडण्याचा आवाज काही थांबेना तेंव्हा तिलाच राहवले नाही अन ती लगबगीने शेजारच्या घरी गेली.

कान्होपात्रा मावशी आमच्या शेजारी. सत्तरीचे वयोमान. कार्तिकी वहिनीचे भल्या सकाळी अंगणात झाडू मारून होईपर्यंत त्या सडा मारण्यास सज्ज होत. त्यांचा सडा टाकून झाला की वहिनी रांगोळीस तयार. दारासमोर नीटस रांगोळी काढेपर्यंत मावशी बहुतेक पूजेला बसत. मी थोडेसे पाय मोकळे करून फिरून येताना त्या तुळशीला पाणी वाहून वृंदावनाला फेरी मारताना दिसत. सूर्यदेवाच्या किरणांशी काहीतरी संवाद साधून त्या लगबगीने आत जात. इथून पुढे मी माझ्या विश्वात अन ते त्यांच्या विश्वात. संध्याकाळी घरी येताना त्या देवळातून परत येताना दिसत. लवकर वैधव्य आल्याने खचून न जाता नवरयाचा भाजीपाला विकण्याचा मंडईतला व्यवसाय त्यांनी नेकीने अन नेटाने त्यांनी पुढे नेला होता. दोन्ही मुलांची लग्ने केली होती.मोठा मुलगा दिवाकर नोकरिनिमित्ताने पुण्यात स्थाईक झाला होता तर धाकटा प्रभाकर आईजवळच होता.तोदेखील चांगल्या कंपनीत कामाला होता. अगदी सुखात अन गुण्या गोविंद्याने राहणारया ह्या कुटुंबात काय झाले असावे याचा अंदाज येईना.

काही वेळातच कार्तिकीच्या रडण्याचा आवाज आला अन पाठोपाठ कावरीबावरी झालेली त्यांची लहान मुलेही रडू लागली. मला राहवले नाही अन मी अनवाणी पायानेच घराबाहेर पडलो अन त्यांच्या घरात शिरलो.


"हे आज गावाकडे गेलेत. आत्याबाई (म्हणजे कान्हू मावशी ) पारायणाला गेल्या होत्या. मुलांसोबत मी एकटीच घरात होते. परवा साफ सफाई करताना आत्यांनी आणि मी मिळून काही कपडे अन जुन्या चीज वस्तू बाजूला काढल्या होत्या. बारा-एकला दारावर बोहारीण आली होती तिला मी सर्व जुने कपडे दिले अन बदल्यात काही भांडी घेतली".
घरचे व्यवस्थित असूनही काटकसरीने संसार करणारी कार्तिकी रडत रडत सांगत होती.
'अन त्या कपड्यात आत्यांनी बोहारणीला देण्यासाठी बाजूला ठेवलेल्या, जीर्ण झालेल्या नऊवारी साड्यांशेजारी दोन गोधड्याही होत्या त्या माझ्याकडून त्या बाईला गेल्या.' तिच्या तोंडून गोधड्याचा उल्लेख येताच मावशी आणखीन मोठ्याने रडू लागल्या. माझी पत्नी सविता त्यांना समजावून सांगत होती पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या.

"माझी पोरे लहानाची मोठी त्या गोधड्यांवर झोपून मोठी झालीत. माझ्या आईच्या साड्या होत्या हो त्या !
माझ्या आईने नेसलेल्या … तिचा स्पर्श असणारया, तिची मायेची ऊब देणारया होत्या त्या… माझी नाळ जुडली होती हो त्या गोधड्यात.
कधी पांघरून झोपले तर आईच्या कुशीत डोळे मिटल्यागात वाटायचे हो."...त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.
"मी अलीकडे त्यांना वापरत नसे, कारण खूप जीर्ण झाल्या होत्या त्या. धुवायला सुद्धा टाकत नसे हो. वर्षाला कधी तरी उन्हात टाकून झटकून कपाटात ठेवायचे बघा." रडत रडत त्या सांगत होत्या.

कान्हू मावशींनी कपाटात देण्यासाठी ठेवलेल्या जुन्या साड्या अन त्या गोधड्या एकत्र रचून ठेवल्याने कार्तिकीकडून त्या अनाहूतपणे बोहारणीकडे गेल्या होत्या अन त्यामुळे त्या व्यथित झाल्या होत्या.
त्याना शांत करून मी बोहारणीचे वर्णन विचारले.
त्याना आश्वस्त केले अन घरी येउन कपडे बदलून माझ्या एका मित्राला फोन लावला अन त्या बाईचे वर्णन सांगितले. काशी कापडे गल्लीत राहणारया बोहारणीच्या भागात मी दहा मिनिटात पोहोचलो. तोवर माझ्या मित्राने तिथल्याच एका व्यक्तीला चौकात बोलावले होते. मी त्यांना सामोरा जात त्याना त्या बाईचे वर्णन आणि तिचे वर्णन सांगितले. मी कोणत्या एरियात राहतो हे त्यांनी विचारले अन त्यांनी डोक्याला खाजवल्यासारखे केले अन म्हणाले काही अडचण नाही,चला माझ्याबरोबर. एका रांगेत असणारया बसक्या जुनाट घरांच्या आळीत मी आलो. दरवाजे उघड्या असलेल्या एका घरापुढे येउन त्यांनी जोरात हाक मारली,"शकुंतला वाहिनी घरात आहेत का ?" आतून एक कमी वयाची पोर बाहेर आली अन उत्तरली की "आय अजून आली नाही इतक्यात यील बघा."

काही वेळ वाट बघण्यात गेला अन आम्ही ज्यांची वाट पाहत होतो त्या शकुंतलावाहिनी आल्या. डोईवरचे जड ओझे खाली ठेवले. चुंबळ बाजूला सारली अन घामाघूम झालेल्या त्या मध्यमवयीन बाई आमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागल्या. तसा मी सर्व किस्सा त्याना कथन केला. "पाहिजे तर डबल पैसे घ्या पण त्या गोधड्या परत द्या."
माझ्या या विनवणी अगोदरच त्यांनी गाठोड्यात बांधलेल्या कपड्याच्या राशीतून त्या दोन गोधड्या बाजूला काढल्या अन माझ्या हातावर ठेवल्या. "मला आणिक पैसं नको. त्या मावशीबाईला माझ्या पोराबाळास्नी आशीर्वाद द्यायला सांगा."
दोन ठिकाणी शिवलेल्या आपल्या साडीच्या पदराने डोळ्यांच्या ओलेत्या कडा पुसताना देखील ती माय माऊली मला फार श्रीमंत वाटली.

माझ्या मित्राचा अन त्याच्या सहकारयाचा निरोप घेऊन मी तत्काळ घराकडे निघालो. कान्हू मावशी वाट बघत दारातच बसल्या होत्या. मला बघून त्या ताडकन उठून उभ्या राहिल्या, माझ्या हातातल्या गोधड्यावर त्यांची नजर जाताच त्यांचे आनंदाश्रू वाहू लागले. लगेच कार्तिकीला हाक मारली अन तिच्या गळ्यात पडून लहान बाळाला खेळणी सापडल्यावर रडता रडता आपण हसावे तसे त्यांचे झाले.
"पोरी माझीच चूक होती पण मी तुला उगीच रागावले,मला माफ कर. आईच्या आठवणींनी जीव व्याकुळ झाला होता गं !काही सुचतच नव्हतं." सासू-सुन दोघीहीजणी रडता रडता हसमुख झाल्या तसे त्यांनी आपले आभार मानण्यापुर्वी मी पाय काढता घेणार होतो तोच मावशी म्हणाल्या, "अरे बापू, एखाद्या दिवशी सवडीने मला त्या माऊलीच्या घरी घेऊन चल, मी तिला नव्या कोरया साड्यांचे जोड माझ्या कडून देईन !!"

प्रसन्न मनाने मी घरात येउन बसलो. शिकवणीला गेलेला माझा मुलगा एव्हाना घरी आला होता, त्याने प्रश्न केला 'काय झाले होते ओ बाबा ?'… हगीज अन डायपरच्या जमान्यात वाढलेल्या माझ्या मुलाच्या प्रश्नास माझ्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते.

मी ताडकन उठलो आतल्या खोलीत गेलो अन आईचे कपाट उघडले, तिच्या जुन्या साड्यांवरून हात फिरवताना माझ्या डोळ्यांना कधी अमृतधारा बरसू लागल्या मलाच कळाले नाही.

- समीर गायकवाड.