Sunday, July 5, 2015

#बोन्साय ....

#बोन्साय कथा - लेखक समीर गायकवाड .

सुट्टीचा दिवस असल्याने लवकर निघावे म्हणून तयारी केली तर घरी असे पाहुणे येती घराचा छोटासा अंक झाला अन निघायला उशीर झालाच. गावाकडे पोहोचेपर्यंत वेळ झाला. हमरस्त्यावरून गावाच्या रस्त्याला लागलो. ऊन चांगलेच रणरणले होते. काही अंतर गाडी चालवून झाली तोच गाडीने देखील पाय वर केले. गाडीचे मागचे चाक पंक्चर झाले. गाडी तशीच ढकलत पुढे थेट पाणंदेपर्यंत आणली अन तेथे असणारया शितोळयाच्या मळयापाशी आंब्याच्या सावलीत उभी केली अन पाय मोडत निघालो. बाहेर ऊन अन अंगात घाम दोघेच डोलत होते, मी तसाच पुढे निघालो. वेशीच्या बाहेर असणारया मोठ्या चिंचेच्या झाडाखाली असणारया टपरीवजा खोपटात रघु आहे का डोकावून पाहिले तर तो गायब. त्याच्या दुकानाचा सारा संसार तसाच उघड्यावर टाकून तो बहुदा बिडी ओढायला गेला असणार. थोडा वेळ तिथे थांबण्यापेक्षा वेशीतल्या देवळात जाऊन थांबावे असा विचार केला अन देवळाकडे निघालो.

देऊळ आता बरेच जीर्ण झालेय. बाहेरील दगडी बांधकाम काही ठिकाणी मोकळे झाले होते तर काही जागी चुना बाहेर आला होता. देवळात मारुतीरायाची काळ्या पाशाणातली मोठी सुबक मूर्ती होती. तिच्यावर लोकांनी तेल ओतून ओतून तिला एक तेलकट दर्प प्राप्त झाला होता. मारुतीच्या मागे काही फुटांवर आणखी एक छोटासा गाभारा होता. त्यात राम लक्ष्मण आणि सीतामाई होत्या. त्यावर भक्तांनी चढवलेली वेगवेगळी फुले सुकून गेली होती, एकदोन उदबत्त्या तशाच होत्या. बारकाल्या पाकोळ्या सर्व कोपरयात होत्या. पाकोळ्यांचा, तेलाचा, फुलांचा अन जळून गेलेल्या उदबत्तीचा मिळून एक वेगळाच असा खास गाभारयाचा वास तेथे होता. त्या सर्वांचे दर्शन घेऊन काही वेळ तिथे पडवीत बसलो, उन्हापासून थोडी मुक्ती मिळाली. थोडे ताजे तवाने वाटताच परत रघुकडे आलो. त्याला गाडीची चावी दिली अन तडक शेताकडे निघालो.

काही अंतर चालून गेल्यावर ध्यानात आले की सकाळ टळून गेलीय अन ऊन खूपच वाढलेय. अंग भाजून निघत होते. डोक्यावर मोठा गमजा टाकला अन शेतवाटेच्या रस्त्याला असणारया झाडांच्या सावलीतून चालण्याचा प्रयत्न करीत निघालो. काही वेळ गेला तोच मागून म्हादूची हाळी ऐकू आली अन तिथल्या वडाच्या झाडाखाली तो जवळ येईपर्यंत थांबलो. म्हादू माझा बालपणीचा सवंगडी. गेल्या किती तरी सालापासून तो चंदू पाटलाच्या रानात कामाला होता. आज निघायला जरा उशीर झाला असे सांगतच त्याने बित्तंबातमीच्या चकाट्या सुरु केल्या. वरल्या आळीच्या ऐतखाऊ नारबाची भांडणे कशी पेटली इथपासून ते चंपाबाईच्या गाईची वेत कशी अडकून पडली आहे अशा अनेक विषयांवर तो बोलत होता.

त्याची तोंडाची टकळी चालू असतानाच समोरून पाचसात बायका चालत येताना दिसल्या. त्यात बायजा परटीण अन तिच्या सुना देखील होत्या. बायजा तरुणपणीच विधवा होऊन गावात परत आलेली पण बापाचा हात कामात धरून होती. आता तिची दोन्ही पोरे हाताशी आली होती आणि ती शहरगावी नोकरीस होती. काही दिवसात तिच्या सुना देखील मुलांकडे जाणार हआहेत अशी अधिकची माहिती मला म्हादूने दिली. तळ्यातले पाणी कमी झाल्याने आता धुण्यासाठी हे सर्व जणओढ्यावर येतात अशी पुस्तीही त्याने जोडली. डोक्यावर मोठाले कापडाचे गाठोडे घेऊन, पदराचा एक कोपरा लुगड्याच्या नीरयामध्ये कमरेत गच्च खोचून त्या सर्वच जणी अगदी लगबगीने चालल्या होत्या.सर्वांच्या डोईवर पदर अन वर गाठोडे होते. तोल सांभाळत चालत असताना देखील बाय्जाची अन माझी नजरानजर झाली. तिच्या बिलोरी डोळ्यातला ओळखीचा पारा अजूनही तसाच चमकदार होता. मनातले पारवे परत किशोरवयातल्या झाडांवर जाऊन बसले.बायजा माझी गावातली शाळकरी मैत्रीण होती. बरयाच वर्षांनी झालेले तिचे दर्शन त्या उन्हात देखील एक शीतल आठवणींची झुळूक देऊन गेले.

मी शांत झालेला पाहून म्हादूने देखील त्याच्या जबड्याला विश्रांती दिली. थोडावेळ तसाच गेला. गावात मोबाईलला रेंज नसल्याने गाव खर्या अर्थाने शांत अन सुखी होता असे मला त्या क्षणाला जाणवले. आण्णाच्या शेताच्या कोपरयावर असलेल्या छोट्याशा ओसरीवजा देवळापाशी काही वेळ थांबलो. विलक्षण शांतता होती तेथे. दूर कोठून तरी होले, तांबट अन वेड्या राघूचा घुमणारा आवाज कानावर येत होता. झाडाचे पान देखील हलत नव्हते, बहुधा वारा देखील उन्हात कुठे तरी वामकुक्षी घेत असावा. झाडांच्या सावलीत बांधलेली जनावरे देखील मलूल होऊन रवंथ करत होती. काहींच्या पुढचा कडबा तसाच होता. एका अर्धवट फुटलेल्या टाकीचे दोन हिस्से करून त्यात जनावरांसाठी पाणी ठेवले होते, त्यावर पाने नक्षीदार खेळ खेळत तरंगत होती. सावल्यांच्या आडून येणारे कवडसे फेर धरून नाचत होते.बांधावर एक रांगेत लावलेली आंब्याची झाडे अगदी जोमात आली होती. माझी नजर तिकडे वळताच म्हादूने काही उमजायच्या आत दोनेक कैरया पाडल्यादेखील. “जेवताना खावा, थोडे मीठ अन लाल येसुर लावा लई भारी लागेल”, त्याने दिलेल्या या सल्ल्यानेच माझ्या तोंडात पाणी आणले अन भूक लागल्याची जाणीव तीव्र झाली. तसा मी लागलीच उठून पुढे निघालो अन म्हादूही संगे निघाला.

मुरमाड रस्ता संपून आता मातीचा रस्ता लागला, कडेची झाडेही कमी झाली अन चालताना फुफुटा उडू लागला. घामाच्या धारा लागल्या होत्या, मी घामाघूम झालेलो पण म्हादू अगदी स्थितप्रज्ञ अवस्थेत चालत होता, शिवाय त्याच्या डोक्यावरल्या उतळीत जेवणाची शिदोरी होती. डोके न हलवता तोंड अन पाय चालू ठेवण्याचे अजब कसब त्याच्याकडे होते. म्हादुच्या बोलण्यावरून कळाले की त्याची पोरे काही शिकली नाहीत एक गावालगतच्या तेल घाण्यात आहे तर दुसरा ग्रामपंचायतची कामे अन फुकट फौजदारकी करतो. धाकटा पोरगा त्याच्याच बरोबर चंदू पाटलाच्या रानात कामाला होता. दोन्ही मुलींची लग्ने झाली होती, एकीला दोनेक पोरेबाळेदेखील झाली होती अन दुसरीची देखील आता कूस उजवणार आहे हे सांगताना म्हादुचया डोळ्यात आभाळ गोळा झाले होते. “आता माज्या समद्या जिम्मेवारया संपल्या आता इठोबाकडे जायला मोकळा झालुया”, अभिमानाने त्याचा उर भरून आला होता. कसलेही टेन्शन नाही की घोर नाही सगळे पांडूरंगावर सोपवून इथली माणसे ज्या सहजतेने मोकळी होतात त्या सहजतेने मी हरखून गेलो.

त्याच्याशी बोलत बोलता वस्ती कधी आली कळाले देखील नाही, चिंचेच्या वळणावर वळताना त्याने डोक्यावारली उतळी खाली ठेवली, चुंबळ हातात घेतली अन प्रसन्न मुद्रेने त्याने त्यातली एक लहान लोटके माझ्या हाती ठेवलं. “घरच दही आहे, एकच म्हैस आहे माझ्याकडे. त्याचे दुधपाणी येते. त्याचेच हे दही. पोराने खाल्ले काय अन तुम्ही खाल्ले काय एकच की. लई गोड हाय बघा दही. आमची रुक्मीण तुमच्या वस्तीवरली आठवण काढून कधी कधी पाखारागत होते बघा.” रुक्मीणी याच गावातली होती अन तिच्या आज्ज्या पंज्यापासून तिच्या तीन पिढ्या आमच्याकडे कामाला होत्या. उपकाराची जाणीव अन माया ह्या गोष्टी इथली माणसे अभिमन्यूगत पोटात शिकून येत असतात. मी त्याच्या दह्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. जेवणाची शिदोरी असलेली त्याची ती अन्नपुर्णेच्या आशीर्वादाची उतळी त्याच्या डोक्यावर ठेवली तसा तो पुढे निघाला. चंदू पाटलाचे शेत आमच्या वस्तीच्याही थोडे पुढे होते. भर उन्हात हा साठीचा माणूस त्याच्या पोरासाठी अन वस्तीवरच्या गड्यांसाठी चारेक किलोमीटर पायपीट करत होता. तीही सुखी मनाने अन प्रसन्न चित्ताने.

शेतातल्या वस्तीवर देखील शुकशुकाट होता. दौलत काका अन गडी,बाया माणसे कोणच दिसत नव्हते. सोन्या बहुतेक गुरे चरायला घेऊन गेला होता त्यामुळे गोठा जवळपास रिताच होता. नाही म्हणायला गोठ्यात काशी अन सारजा ह्या थकलेल्या गायी सावलीत बसून होत्या. ओसरीवर सारवलेलल्या शेणकुटाच्या खपल्या निघून आल्या होत्या.समाधीजवळ चाफा डोलत होता. लिंबाच्या बागेजवळ पाच सहा बाभळी आभाळाकडे तोंड करून खिन्न उभ्या होत्या, त्या बाभळीखाली शेळ्या निवांत बसून होत्या. त्यांचे अर्धे मिटलेले डोळे अन हलणारी शेपटीच काय तेव्हढ चैतन्य होते. सारी पाने फुले माना वेळावून बसली होती. अंगातला घाम आता पाझर फुटलेल्या झरयासारखा झाला होता. चालत चालत खाली विहिरीकडे गेलो तेथे जरा गारवा होता, थंड हवेची झुळूक होती. दुपारच्या वेळेस विहीर स्वतःला शोधत खोल जात असते, आपल्याच नादात हरखून बसते. त्यामुळेच तिच्या तळापर्यंत ठाव घेणारे पाणी शांत झाले होते.विहिरीचे पायटे ओशाळवाणे होऊन वर आले होते. दगडातल्या पारव्याच्या सांदाड्या आवाजाच्या प्रतीक्षेत होत्या. कधी काळी जेथे मोट चालत होती, तेथे आंता ढलाण होती अन त्यावर जांभळाचे झाड होते अण त्याची पाने, जांभळाच्या बिया खाली पडल्या होत्या. दूरच्या बांधाला चिंचेच्या रांगाखाली चालेलेली लगबग मला जाणवली. जसजसा जवळ गेलो तसा त्यांचा आवाज स्पष्ट होत गेला.जाताना वाटेतल्या पिंपळाच्या ढोलीत पडझड झालेली नजरेस पडली अन उगाच चिंता वाटली. ह्या ढोलीत अनेक जीव जन्मास आले अन दिगंतात उडाले होते. झाड तसे अजून ठीक होते. मग ढोलीत काय झाले असावे असा विचार करत करत मी दौलत काकांच्या जवळ पोहोचलो देखील.

मोठे चवाळे अंथरून ते सारे जण जेवणाच्या तयारीत बसले होते. वस्तीवर केलेला स्वयंपाक अन तेथले जेवण हा अमृतानुभवच होय. अन हे सारे जण ते अमृतबिंदू. थंड पाण्याने हात-पाय अन तोंड धुतले अन त्या सर्वांच्या गप्पाष्टकात सामील होत मी देखील अमृताचा स्वाद घेतला.
जेवण झाले. काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बाया माणसे बाकी राहिलेल्या कामाला लागली. काका जरा वेळ तेथेच बसून राहिले पण मला झोप कधी आली काही कळालेच नाही. बराच वेळ गेला. पाखरांच्या अवाजानेच जाग आली.जागा होऊन मी दौलत काकांच्या मागे निघालो. ते तण काढत होते तिथे गेलो. माझ्या येण्याने ते पुन्हा सावलीत आले.

'यायला उशीर का झाला ?' इथपासून ते घरातली सर्व ख्याली खुशाली विचारून झाली. ऊन किंचित कमी झाले होते, माझ्या डोक्यातली झाडे आणि पाखरे काही केल्या हटत नव्हती. ती फिरून फिरून परत येत होती. मी त्यावरच बोललो. "इतक्या कडक उन्हात झाडे अन पाखरे कशी जगत असतील?" प्रश्न ऐकताच काका मंद हसले अन उत्तरले.
“अरे त्यात काय अवघड आहे ? हे बघ आता मोठं दिसणारं झाड हे आधी एक इवलंसं रोपच असतं. जसजसे दिवस जातात ते मोठे होते. काही काळानं त्याचं झाड होतं. झाड जसजसं वाढत जातं तसतशी दरसाली त्याच्या शेंड्याला, वरच्या अंगाला चैत्रात नवी पालवी फुटते. मग येतो तो वैशाख अंग अंग जाळणारा. हा वैशाखवणवा त्या कोवळ्या पानांना सहन करावा लागतो. त्या कोवळ्या पानांखाली जुनी पाने असतात, ज्यांनी पूर्वी हा वणवा झेललेला असतो. नव्या फुटव्याखाली जीर्ण फांद्या असतात, त्या ही कधी काळी अशाच उन्हाचा सामना करून स्थिर झालेल्या असतात. नव्या पानांना कडक उन्हानंतर वर्षा ऋतूत पाऊस सोसावा लागतो. कधी सोसाट्याचे वारे आले तर सारे झाड एकजीव होते अन त्याचा सामना करते. वीज चमकली तर तिला कवेत घेते, अंग आकसून घेत नाही. आज जी पाने वरती आहेत अन सारे सोसत आहेत तीच पाने नंतर सर्व आरामाचे सर्व सुखे अनुभवणार आहेत. ही परमेश्वराची लीला आहे. आपण ऊन लागल्यावर झाडाखाली येऊन बसतो पण झाडाचे तसे नसते. ऊन लागले म्हणून झाडाला हलता येत नाही, त्याला तिथेच उभे राहावे लागते अन पाना फुलांचे हे नवे जुने चक्र चालवावे लागते. वडाच्या पारंब्या तर परत मातीकडे वळतात, खूप वर चाललेल्या शेंड्याला मागे रेटतात अडवतात. मातीशी नातं टिकवून ठेवतात. पारंब्या आभाळात राहूनही मातीची विण घट्ट ठेवतात. माणसांचेही असेच आहे नव्यांना, तरुणांना काम करावे लागते अन मग म्हातारयाना आराम. तरुणांनी काम नाही केलं तर मात्र थकलेले म्हातारे हातपाय रडत कढत का होईना पण चालवावे लागतातच !” 
इतकं बोलून बांधावरच्या झाडांत खिळवून ठेवलेली नजर हटवत मध्येच ते हसले अन पुन्हा म्हणाले, ”पण माज्या सारके आडमुटे लोक कामच करत राहतात. त्यांना आराम लागत नाही, माझ्या मस्तकावर कुणाची पालवी नाही. देव काहींना असंही बनवतो”. काकांना मुलबाळ नव्हते पण त्यांनी कधी खंत व्यक्त केली नव्हती म्हणूनच या क्षणीही ते मला किंचितही निराश वाटले नाहीत !

त्यांचे उत्तर एकूण मी सर्द झालो होतो. आपल्याकडे आता नवी पाने थोडी मोठी होताच फुटव्यासह निघून पडतात अन नवे झाड बनायचा प्रयत्न सुरु करतात. जुनी पाने तशीच उन्हात असतात, त्याना पाऊस वारा वीज सारेच सहन करावे लागते. मोठा वटवृक्ष होण्या ऐवजी आम्ही लहानशा कोंबात अन झुडपात समाधान मानतो आहोत. झाडांचे लघुरूप बनवतो आणि एकमेकापासून नाळ तोडून घेतो. आपल्या छोट्याशा विश्वात रममाण होऊन जातो. या आत्ममग्न कोशातील सुखापायी आम्ही प्रत्यक्ष जन्मदात्यांची सुद्धा फिकीर करत नाही. डेरेदार वटवृक्ष होण्याऐवजी वा त्याचा एखादा बहारदार हिस्सा होण्याऐवजी आमच्या पैकी काहींचे वन किंवा टू बीएचकेचे एक बोन्साय तयार झालेय. त्यातही भरीस भर म्हणजे घरातल्या घरात अनेक पार्टीशन्स उभी राहिलीत. माणसात अन भिंतीत देखील. तरीही तेव्हढ्याच स्पेस मध्ये आम्ही सुखी आहोत. आम्हाला पारंब्याच नाहीत तर मग मातीशी आमची नाळ कशी जुडणार ? दिसायला छान असणारे बोन्साय खरे तर खूप खुजे असते पण ते त्याच्या मस्तीत असते. त्याला जगण्याचा कैफ नसतो न त्याला फुलण्यातला खरा आनंद देखील माहित नसतो. सावली देणे हा तर त्याचा गुणधर्मच नाही. निव्वळ दिखाऊ अन चीटर ! पण आता आम्ही त्यातच समाधानी आहोत. खरे तर सावलीच्या खरया गुणधर्माला आम्ही विसरलो आहोत आम्ही नुसतेच वर उंच वाढण्याचे काम करतोय. मातीत केवळ इंचभर खोल असणारी आमची मुळे ढिली होऊ नये अन भव्य पारंब्या येऊच नयेत अशी व्यवस्थाच आम्ही केलीय. दौलत काकांच्या उत्तरावरून आपल्यात रुजत चाललेला हा अल्पसंतुष्ट स्वार्थीपणा लगेच जाणवला. बराच वेळ मी निस्तब्ध होऊन त्या सर्व सुखी जीवांच्या हालचाली निरखत बसलो. माझ्या डोक्यात एकाच वेळी अनेक विचारांचे मोहोळ उठले होते...

उन्हे तिरपी झाली अन विचाराच्या तंद्रीतून मला जाग आली. परतीच्या साठी वाटसरू कोणी तरी भेटेल म्हणून मी लवकर निरोपा निरोपी करून निघालो. घरी परतल्यावर किमान आपल्या वन बीएचकेचे तरी बोन्साय होऊ द्यायचे नाही यासाठी प्रयत्न करत राहायचे अन इथून पुढे मनातले आभाळ मातीत रिते करतच जगायचे असा विचार करत करत मी पाऊले जलद टाकण्यास सुरुवात केली. 

या घटनेला आता बरीच वर्षे उलटून गेलीत. आता माझा डेरेदार घनदाट वटवृक्ष झालाय....

- समीर गायकवाड.