Thursday, July 9, 2015

रामशास्त्री प्रभुणे ....

ज्या धन्याच्या पदरी 'ते' चाकरीस होते त्या धन्यांनी जेंव्हा अपराध केला तेंव्हा त्यांचा न्यायनिवाडा करताना 'त्यांनी' थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. ब्राम्हणांना दक्षिणा देण्याचे काम 'त्यांच्या'कडे होते, एकदा दक्षिणा मागावयास आलेल्या ब्राम्हणांच्या रांगेत 'त्यांचे' भाऊ होते तर त्यांनी 'त्यास' दक्षिणा देण्यास मज्जाव केला होता. ते स्वतः ब्राम्हण असूनही ब्राम्हणांना दक्षिणा घेताना 'ते' इतके काही नियम लावत की ब्रम्हवृंद रडकुंडीस येई आणि त्यातून ब्राह्मणांनी त्यांच्यावर श्लोकदेखील लिहिला. एकदा 'त्यांची' पत्नी भरगच्च दागिने घालून घराकडे येत असतांना 'त्यांनी' तिला उंबरठयावरच अडवले आणि 'आपण घर तर चुकला नाहीत ना ?' असं बोलून तिला आपली जागा दाखवून दयायला ते विसरले नाहीत. अशा एक ना दोन अनेक गोष्टी ज्यांच्या बाबतीत सांगता येतील त्या रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर १९४४ मध्ये 'प्रभात'ने सिनेमा काढला होता. माझ्या एका मित्राने त्याची यु ट्यूब लिंक शेअर करून त्यावर लिहिण्याची विनंती केल्याने ह्या लेखाचे प्रयोजन सिद्ध झाले.  हा सिनेमा सुरु होतो मुळात दक्षिणा वाटपाच्या दृश्याने. एका मागोमाग एक दशग्रंथी व विविधविद्याभूषित ब्राम्हणांना नियमानुसार व श्रेणीनुसार दक्षिणा दिली जाते आहे. तिथे एक ब्राम्हण भटजी आपल्यासोबत राम या आपल्या लांबच्या भाच्यास घेऊन येतात. तिथे आल्यावर तो आपल्या या मामाला सांगतो की, 'मी कुठलेही शिक्षण घेत नाही, सबब मी दक्षिणा घेणार नाही.' तरीही त्याचे मामा त्याला बखोटयास धरून रांगेत उभे करतात. जेंव्हा त्यांचा अनुक्रम येतो तेन्व्हा पेशव्यांचे कारकून दरडावून सांगत असतात की 'आजकाल काही लोक दक्षिणेसाठी खोटे बोलत आहेत.हे पाप आहे हे माहिती असूनही ते फसवणूक करत आहेत.' ते ऐकून लहानग्या रामच्या पोटात कालवते. 'तू काय शिक्षण घेतो आहेस ?' असे जेंव्हा त्याला विचारले जाते तेंव्हा तो गांगरून गप्प होतो त्यासरशी त्याचे मामा लाचार होऊन सांगतात की, "मुलाला ऐकू येत नाही." तरीही पुन्हा विचारल्यावर तो 'शिकत असल्याचे' खोटे सांगतो. पेशवे देतात ती दक्षिणा घेऊन तिथून पाय काढता घेतो पण त्याच्या कानात तिथल्या कारकुनाचे शब्द तापलेले शिसे ओतावे तसे पुन्हा पुन्हा आदळत राहतात. त्याचे मन पश्चात्तापात दग्ध होऊन जाते तो अन आल्या पावली परत फिरतो अन 'मला ही दक्षिणा घेण्याचे अधिकार नाहीत, मी हे पाप करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी कुठेही शिकत नाही. त्यामुळे ही दक्षिणा परत घ्या' असे सांगत लहानगा राम आपल्या मामांना ढकलून पुढे जातो आणि खुद्द पेशव्यांना दक्षिणा परत देतो.इतका बाणेदारपणा, प्रामाणिकपणा आणि निस्पृहता रामशास्त्र्यांच्या अंगी बालपणापासूनच भिनलेली होती.


नि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्यायनिष्ठुर व नि:पक्षपातपणा या गुणांचा समुच्चय ज्या एका अधिकारी व्यक्तीमध्ये एकवटला होता, अशी एक व्यक्ती पेशवाईत होऊन गेली. या व्यक्तीने आपल्या कर्तव्यात मोठा आणि लहान आपला व परका असा आपपर भाव कधीच केला नाही. त्यामुळेच आज इतकी वर्षे झाली तरी त्या व्यक्तीचे नाव उच्चारल्या बरोबर मन एकदम भारावून जाते व माणूस नतमस्तक होतो. ती व्यक्ती म्हणजे पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे! राम्शास्त्रींवर काढलेल्या याच सिनेमात 'दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव' हे लहानग्या राम आणि त्याच्या बालिकावधू काशी वर चित्रित केलेले सुरेख गाणे आहे. (काही दिवसांपूर्वी गुलजार यांच्या गीतांचे अनुवाद करून ज्याने त्या गीतांचे थेट मुडदे पाडले होते त्या कवी सुदर्शन आठवले यांचे वडील शांताराम आठवले यांनी हे सुंदर गाणे लिहिले आहे.) चित्रपट पाहताना जुने पोशाख, जुने गाव आणि मुख्य म्हणजे तदकालीन राहणीमान यांचे गारुड आपल्या मनावर होते.सिनेमातील नात्यांचा निरागसपणा भावणारा आहे. सेट्स भव्य आहेत. गीतसंगीतही श्रवणीय आहे. सिनेमा कृष्णधवल असूनही आजच्या काळातही प्रेक्षणीय आहे. ऐतिहासिक मूल्यांशी प्रतारणा न करता अत्यंत रसाळ शैलीत सिनेमाची कथा पुढे सरकत राहते. मुख्यत्वे यातील संवाद खूप बोलके आणि परिणामकारक आहेत. उच्च निर्मितीमुल्ये, कसदार अभिनय आणि वेगवान पटकथा यामुळे सिनेमा चक्क ७२ वर्षापूर्वीचा असूनही ताजातवाना वाटतो. असो ...


रामशास्त्री यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथभट व आईचे नाव पार्वतीबाई. त्यांचा जन्म ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात १७२० साली झाला. वयाच्या वीस वर्षापर्यंत त्यांना विद्येचा गंध नव्हता. ते प्रथम समोरच्या अनगळ सावकाराकडे शागीर्द होते. एकदा या सावकराकडे एका जवाहिर्‍याने दागदागिने तपासणीसाठी आणले होते. त्याच वेळी लहानग्या रामाचे लक्ष कानातील भिकबाळीच्या दागिन्यांच्या तेजामुळे आकृष्ट झाले. रामशास्त्रींच्या वडिलांना पेशव्यांनी भिकबाळी दिल्याचे रामने खूप वेळा ऐकले होते आणि आपणही मोठा प्रकांडपंडित होऊन भिकबाळी मिळवण्याचे त्या चिमुरडयाचे स्वप्न होते. म्हणून जेंव्हा त्याने सावकाराच्या कानातील तो दिव्य दागिना पाहिला तेंव्हा त्याच्या हातून पाय धुताना सावकाराच्या पायावर पाणी नीट न पडता ते बाजूला पडू लागले. यावर संतापलेल्या सावकाराने त्याला विचारले, ‘‘तुझे कामात लक्ष का नाही?’’ तेव्हा रामाने उत्तर दिले की, ‘‘या जवाहिरांनी माझे लक्ष विचलित केले आहे.’’ अर्थात् त्याचे हे सरळ उत्तर सावकाराला पसंत न पडून तो रागाने त्यांना म्हणाला, ‘‘असल्या गोष्टी फक्त रणगाजी व विद्वान लोकांसाठीच असतात. या तुझ्यासारख्या भिकारड्या मुलाला कशा मिळतील?’’


सावकाराच्या या उद्गारानंतर रामाने आपल्या आयुष्यातील पहिली बाणेदार वाणी उच्चारली. तो म्हणाला, ‘‘ आजपर्यंत मी पाणक्या होतो, हरकाम्या होतो, सावकाराच्या पायीचा दास होतो पण मी आज खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांचा लौकिक वाढवण्यास सिद्ध होईन. तुम्ही आपल्या खोचक व बोचक शब्दांनी मला मार्ग दाखविला व त्यामुळे तुम्ही माझे गुरू झाला आहात. हाती तलवार धरणे हा काही माझा धर्म नाही. माझा धर्म म्हणजे वेदविद्या व शास्त्रे यांच्या अभ्यास. या विषयात नावलौकिक व मानमरातब मिळवीन तेव्हाच राहीन.’’ याप्रमाणे लहान वयातच रामशास्त्र्यांनी आपल्या बाणेदारपणाची चुणूक सर्वांना दाखवून दिली.


वरील प्रसंगानंतर रामशास्त्र्यांनी मार्ग धरला तो म्हणजे वेदविद्येचे माहेरघर असलेल्या काशी नगरीचा.या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाळभट पायगुडे यांच्या पाठशाळेत विद्याभ्यास करण्यास प्रारंभ करून व अत्यंत श्रम घेऊन विद्या मिळविली आणि थोड्याच दिवसात त्यांची धर्मशास्त्री म्हणून ख्याती झाली. महाराष्ट्रात माहुलीला आपल्या गावी ते परत आले ते महान शास्त्री म्हणूनच. रामशास्त्री काशीला गेल्यानंतर इकडे त्यांच्या कुटुंबाचे दुर्दैवाचे दशावतार झाले. त्यांची आई अंथरुणास खिळली आणि रामाची अखेरची भेट घेण्यासाठी त्यांचे प्राण अडकून पडले. अखेर रामशास्त्री आपल्या आईला मांडीवर घेतात आणि मग त्यांची आई प्राण सोडते हे दृश्य अंगावर काटा आणते. यांनतर दहा वर्षांनी रामशास्त्री पुण्यात येतात.१७५१ मध्ये त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत धर्मखात्यात नोकरी धरली व नंतर १७५९ मध्ये ते मुख्य न्यायाधीश झाले. त्यांना प्रथम रोजमुरा दीडमाही ४० रुपये मिळकत असे व श्रावण मासाची दक्षिणा ५०० व वस्त्रांस ५५१ रुपये इतके मिळत असे. पुढे त्यांना पेशव्यांनी घोडा बक्षीस दिला आणि त्याबद्दल १५ रुपये दरमहा जास्त वाढविला. पेशव्यांचा त्यांच्यावर विश्वास वाढण्यास कारणीभूत ठरलेली घटना म्हणजे पुण्याचा बाजारात एका बटिकेची विक्री होताना तिला पेशव्यांचा हुजऱ्या असणारा राणोजी आधी बोली लावून हातातले सोन्याचे कडे देऊन जिंकतो पण तुळाजी हा पेशव्यांच्या पदरी कामास असणारा मानकरी शंभर सुवर्णमुद्रांच्या बदल्यात तिची मागणी करतो. शाहिराचा आधी झालेला करार मोडून बटिकेचा ताबा राणोजीला देण्याचे फिसकटते तेंव्हा तो चक्क तिला घेऊन पळून जातो. या प्रसंगाचा निवाडा रामशास्त्री कसे करतात हे पडद्यावर बघण्यासारखे आहे. या निवाड्यामुळे माधवराव पेशवे रामशास्त्र्यांवर बेहद्द खुश होतात. या घटकेपासून माधवराव त्यांना मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आले. पुढे सखारामबापूंचे निकटचे सहकारी विसाजीपंत लेले यांनी इंग्रजांच्या गलबतावरील वीस लक्ष्य किंमतीचा माल लुटल्याचा प्रसिद्ध खटला येतो. यात रामशास्त्री अत्यंत बाणेदारपणे सच्चा व अद्भुत निवाडा देतात आणि रामशास्त्र्यांचा डंका इथून चौफेर वाजू लागतो.


रामशास्त्र्यांची प्रतिष्ठा थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत वाढली होती. माधवरावांनी त्यांना न्यायाधीशांचे काम सांगितले व पालखी दिली. पालखीच्या नेमणूकीबद्दल त्यांना १ हजार रुपये अधिक मिळू लागले. माधवराव स्वत: कडक वृत्तीचे होते. तरीसुद्धा ते शास्त्रीबुवांना वचकून असत व त्यांच्याच तंत्राने वागत असत. एके दिवशी शास्त्रीबुवा माधवरावांना भेटावयास सकाळी गेले होते. त्यावेळी शिपायाने सांगितले की, श्रीमंत मौन धरून जप करीत आहेत. असा प्रकार एक दोन वेळा झाला. तेव्हा आपले सर्व सामान घेऊन ते श्रीमंताकडे आले व निरोप मागू लागले की, ‘‘काशीस जाण्यास रजा द्यावी’’, तेव्हा पेशव्यांनी विचारले, ‘‘असे विचारण्याचे कारण काय?’’ त्यावर शास्त्रीबुवा उत्तरले, ‘‘प्रभू जपास लागले तर प्रजेची व्यवस्था बिघडेल. याकरिता येथे ठीक नाही आणि जाते समयी आपणास इतकेच सांगणे आहे की, आपण ब्राह्मण असून क्षत्रिय धर्म अंगिकारला आहे. तरी तो सोडून देऊन ब्राह्मणाचा धर्म घ्यावयाचा असेल तर माझेबरोबर चलावे. आपण उभयंता गंगेचे काठी बसून स्नानसंध्या करू, परंतु क्षत्रियाचा व ब्राह्मणाचा हे दोन वर्णधर्म करू म्हणाल, तर दोन्ही बिघडतील. जशी मर्जी असेल तसे करावे.’’ यावर श्रीमंतांनी सांगितले की, ‘‘आपण जाण्याचे कारण नाही, आम्ही आपली स्नानसंध्या आजपासून सोडली.’’ तेव्हा शास्त्रीबुवा म्हणाले, ‘‘आपली स्नानसंध्या हीच की हजारो प्रजेस दाद द्यावी. त्याचे गार्‍हाणे ऐकावे हाच आपला धर्म आहे.’’


१७७२ मध्ये थोरले माधवराव मृत्यू पावले व त्यांच्यानंतर पेशवा नारायणराव हा गादीवर आले. परंतु चुलत्याच्या म्हणजे राघोबादादांच्या कारस्थानामुळे त्याचा १७७३ मध्ये खून झाला व सर्वत्र एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुख्य आरोपी होते, राघोबादादा. खून करणारी व्यक्ती एवढी मोठी होती, तरी रामशास्त्री यांनी आपल्या न्यायाच्या कामात मुळीच कसूर केली नाही. त्यांनी रोघाबांना स्पष्ट बजावले की, ‘‘नारायणरावांच्या खुनाबद्दल तुम्हांस देहांत प्रायश्चित्त घेतले पाहिजे.’’ याप्रमाणे रोकडा जबाब देऊन व इतपर पुण्यात राहावयाचे नाही, असे ठरवून त्यांनी पुणे सोडले व वाईजवळ पांडववाडी म्हणून गाव आहे तेथे वास केला.


नारायणरावांच्या हत्येनंतर पुण्यात बारभाईचे राजकारण सुरू झाले. अशा वेळी रामशास्त्री यांच्यासारख्या न्यायनिपुण व्यक्तीची पुण्यात अत्यंत जरूरी होती. म्हणून नाना फडणवीसांनी त्यांना पुन्हा पुण्यात आणले व त्यांची पूर्वीची मुख्य न्यायाधीशांची जागा त्यांना दिली. या नेमणुकीबद्दल ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असून ते साल १७७४ होते. हा पुरावा म्हणजे नाना फडणवीस, सखारामबापू व मोरोबादादा यांनी ४ जुलै १७७४ या रोजी लिहिलेले पत्र.


शास्त्रीबुवा पक्षपातीपणा करीत नसत, याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट उपलब्ध आहे. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत रामशास्त्री यांच्याकडे रमण्यात दक्षिणा वाटण्याचा अधिकार होता. एकदा त्यांचा सख्खा वडीलभाऊ दक्षिणा घेण्यास आला. तेव्हा जवळ बसलेल्या नानांनी सांगितले की, ‘‘वीस रुपये द्यावे.’’ यावर रामशास्त्री म्हणाले, ‘‘यास विद्या नाही, तेव्हा सर्वांप्रमाणेच दोन रुपये द्यावे, कारण मला पक्षपात केल्याचा दोष लागेल. याकरिता जास्ती देणे शिरस्त्यांबाहेर आहे. माझे भाऊ आहेत तर मीच काय ते देईन, पण दक्षिणेच्या अधिकारात पक्षपात नसावा.’’

या दक्षिणावाटपात ते इतके कडक व काटेकोर होते, की त्याबद्दल संस्कृतमध्ये एक श्‍लोक रचण्यात आला.

वृषिविना पंचकहो विचित्रं,

स्थलद्वषे तिष्टतिते सर्व कालं।

दानांबमिर्माधवताय मंदिरे,

विप्रस्यबाष्पै: खलु रामशास्त्रीणाम्‌॥

याचा अर्थ, ‘पावसाशिवाय चिखल तयार होतो, किती विस्मयकारक घटना आहे ही. हा चिखल बाराही महिने दोन ठिकाणी आढळतो. एक म्हणजे श्रीमंतांच्या वाड्यात दक्षिणेवर सोडलेल्या पाण्यामुळे व दुसरे म्हणजे रामशास्त्र्यांच्या वाड्यात ब्राह्मणांच्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रुंमुळे.’ शास्त्रीबुवा दक्षिणा घ्यावयास येणार्‍या प्रत्येक ब्राह्मणाची अगदी कसून परीक्षा घेत त्याचाच हा परिपाक !


रामशास्त्र्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांची पत्नी काशीबाई यासुद्धा त्याचप्रमाणे वागत असत. डामडौलाचा शास्त्रीबुवांना तिटकारा होता. एकदा पेशव्यांच्या घरी हळदीकुंकू समारंभ होता. त्यावेळी काशीबाई तिथे गेल्या होत्या, पण त्यांच्या अंगावर दागदागिने काहीच नव्हते. म्हणून समारंभ झाल्यावर पेशव्यांच्या पत्नीने दागिन्यांनी मढवून व पालखीत बसवून त्यांची घरी बोलवण केली. घराच्या दरवाज्यात त्या शिरणार इतक्यात रामशास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘बाई आपणास कोण पाहिजे? आपण घर चुकला नाहीत ना? हे घर तर रामशास्त्र्यांचे आहे.’’ काशीबाई अत्यंत ओशाळल्या आणि त्यांनी शास्त्रीबुवांचे पाय धरले.


वेदशास्त्र पारंगत असूनसुद्धा रामशास्त्री हे पुरोगामी विचारांचे होते. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या कन्येच्या पूनर्विवाहास त्यांनी मान्यता दिली होती. जेव्हा तिचा पती निर्वतला तेव्हा ती आठ वर्षांची मुलगी होती व ‘हे अर्भक बाल आहे. हिला दुसरा नवरा करून द्यावा असे आम्हास वाटते’, असा निर्णय त्यांनी दिला त्याचप्रमाणे ‘पूनर्विवाहाच्या बाबतीत पुरुषांनी तयार केलेले नियम स्त्रियांचे सुख-दु:खाचा विचार न करता केलेले असल्यामुळे पूर्वीच्या व चालू नियमांत विसंगती आढळते’’, असा स्पष्ट अभिप्राय त्यांनी दुसर्‍या एका प्रकरणात दिलेला आढळतो.


न्यायदानाचे आपले काम चोखपणे, निर्भीडपणे, नि:स्वार्थीपणे व नि:पक्षपातीपणे बजावत न्यायदेवतेचा हा निस्सिम भक्त २१ ऑक्टोबर १७८६ रोजी मृत्यू पावला. या श्रेष्ठ न्यायधीशाबद्दल पाश्चिमात्त्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो, ‘‘न्यायााधीशांची जागा विभुषित करणारा पहिला गृहस्थ म्हणजे रामशास्त्री. यांची नेमणूक पहिल्या माधवरावांच्या काळात झाली. या बाणेदार न्यायाधीशाचे चारित्र्य फारच उच्च कोटीचे होते. माधवरावांच्या पश्चातसुद्धा न्यायाचे काम याने अतिशय अब्रुदारपणे व मानाने केले. म्हणूनच त्याची आठवण अत्यंत पूज्य मानली आहे. नाना फडणवीसांनी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या सर्वांचा उगम रामशास्त्र्यांच्या प्रभावात आणि आदरात आहे. लाचलुचपतीने पोखरलेल्या सरकारात अशी व्यक्ती असणे हे त्या व्यक्तीस भूषणावह आहे. म्हणूनच अशी एखादी व्यक्ती दुसर्‍या बाजीरावाच्या काळात असती, तर तिने त्याचे व दरबाराचे नैतिक अध:पतन निश्चित थांबवले असते, असे वाटल्याशिवाय राहत नाही.’’


रामशास्त्रींच्या मृत्यूदिनाबद्दल १५ ऑक्टोबर १७८९ अशी तारीख सांगितली जाते. इतिहासात त्यावर एकमत नाही. असो.. 'ज्या देशात न्यायव्यवस्था सक्षम राबवली जाते, कायद्यांचे पालन केले जाते आणि कायदा हातात घेणारयांची जिथे कसलीही गय केली जात नाही ते राष्ट्र विनासायास प्रगतीपथावर राहते' असे जॉन स्टुअर्ट मिल हा तत्ववेत्ता सांगतो. आजही आपण पाहतो की आपल्या देशात रस्त्यावरील डिजिटल फ्लेक्सपासून ते सणवारापर्यंतच्या अनेक गोष्टींना वळण लावायचे काम आपली न्यायव्यवस्था करते. आपले प्रशासन भ्रष्ट झाले आहे, आपली पोलिसांची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा खिळखिळी झाली आहे आणि आपली सरकारे सुद्धा अकार्यक्षम सिद्ध होताहेत, पत्रकारिता विकाऊ होत चाललीय. अपवाद थोडा फार आहे तो न्याययंत्रणेचाच ! जोवर रामशास्त्री प्रभूणेंच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे न्यायाधीश आपल्या देशात असतील तोवर तरी आपल्या सर्वांना स्वतःला सुधारण्याची संधी आहे. कारण परवाच्या दिवशीच आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना निर्भीडपणे खडे बोल सुनावले आहेत.... आशा करू की आपली न्याययंत्रणा सक्षम आणि निपक्षपाती राहील.....जमल्यास वेळ काढून यु ट्यूबवर असणारा हा अद्वितीय सिनेमा आवर्जून बघा. कारण टीव्हीवरच्या वाहिन्यांवर आजकाल काय दाखवले जाते हे वेगळे सांगायची गरज नाही. सिनेमा आवडला नाही तर मला दुषणेही देऊ शकता....ज्यांच्या ठायी ब्राम्हणद्वेष भिनला आहे त्यांनीही हा सिनेमा आवर्जुन पहावा कारण या सिनेमात अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात ज्यांचा शोध काही अतृप्त आत्मे घेत फिरताहेत....सरते शेवटी इतकं तरी निश्चित म्हणेन की मराठी भाषेचा नितांतसुंदर गोडवा ऐकण्यासाठी तरी हा सिनेमा पाहावा ...


सिनेमात एक संवाद रामशास्त्रींच्या आईच्या तोंडी आहे, "राम, ब्राम्हण हा विद्वान आणि सन्मार्गी असला तर त्याचा आपोआप सन्मान होतो !" हे वाक्य आणि हा प्रसंग खूप बोलका आहे. असं खूप या सिनेमावर लिहिता येईल पण शब्दमर्यादेपायी थांबतो...

- समीर गायकवाड.